30 एप्रिल 2019 रोजी वर्तमानपत्रात आणि टी.व्ही.वर एक सनसनाटी बातमी झळकली. बातमीचा विषय होता हिमालयात आढळतात (?) माकड-मानवसदृश प्राणी, त्याचे नाव आहे यती. यतीला हिममानव या नावाने ओळखतात. भारतीय सैन्याने असा दावा केला आहे की, त्यांना हिमालयात यतीची पावले दिसली, ही बातमी विविध मीडियाद्वारे सगळीकडे पसरली. यानंतर 3 मे 2019 रोजी नेपाळी सैन्य आणि तेथील वन्य प्राणीविषयक तज्ज्ञ यांनी इंडियन आर्मीचा दावा फेटाळून लावला. त्याच्या मते, यतीची पावले म्हणजे जंगली अस्वलाच्या पायाचे ठसे होत. माणसांना सनसनाटीपणाणी आणि चित्रविचित्र कल्पना पसरवण्याची आणि ऐकण्याची भारी हौस असते. आदिमानवात उत्क्रांतीद्वारे बदल होत सध्याचा माणूस निर्माण झाला आहे; पण आपला पूर्वज अजूनही हिमालयात वास्तव्य करीत आहे, हे ऐकण्यात आपणाला मजा वाटते. यतीची पावले दिसली याचा अर्थ ती पावले ज्याची आहे, तो यती कोणाला दिसला का? संशोधन असे सांगते – यती कोणालाही दिसला नाही. कोणताही असाधारण दावा करताना त्यासाठी तसाच असाधारण पुरावा द्यावा लागतो. (Extraordinary Claim must be supported by extraordinary evidence) गेली कित्येक दशके यतीबद्दलच्या विविध सुरस कहाण्या भारतात रंगवून सांगितल्या जातात. यती हा खरोखरचा की काल्पनिक?
यतीप्रमाणेच जगात इतरत्र अस्तित्वात नसणार्या; पण आम्हाला ते दिसले अशा विचित्र प्राण्यांच्या हकिकती प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्राण्यांचा शोध घेणार्या तथाकथित संशोधकांना क्रिप्टोझूलॉजिस्ट (Cryptozoologists) असे नाव आहे आणि अशा प्रकारच्या संशोधनाला क्रिप्टोझुलॉजी असे नाव आहे. प्राणिशास्त्र या विषयातील संशोधक जे विद्यापीठात आणि महाविद्यालयात संशोधन करतात ते क्रिप्टोझुलॉजी हे विज्ञान आहे, असे मानत नाहीत. क्रिप्टोझुलॉजीचा प्रचलित प्राणिशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश नाही. कसलाही महत्त्वाचा पुरावा न देता चित्रविचित्र प्राण्यांच्या अस्तित्वाचा दावा करणे, हे फसवे विज्ञान आहे. फार खोलात न जाता यती कल्पित की सत्य, याचा समाचार घेऊया.

तुम्ही हिमालयात जाऊन यतीला भेटला नसला, तरी तो कसा दिसतो, याचे चित्र तुम्हाला विविध माध्यमांनी दर्शविले आहे. Scooby Doo ते Doctors Who, Tintin आणि Monstors या आणि तशाच इतर सिनेमात; तसेच व्हिडीओ गेम आणि दूरदर्शनवर गेली अनेक दशकं घृणास्पद वाटणारा केसाळ यती चित्रित केला गेला आहे. लोकवाङ्मयात यती म्हणजे प्रचंड आकाराचा केसाळ माकड-मानव दाखविला जातो. त्याचे पाय खूप मोठे आणि दात जंगली श्वापदासारखे असतात. त्याची कातडी फिकट पिंगट किंवा पांढर्या रंगाची असते. बर्फाळ हिमालयीन शिखरांमध्ये तो एकटाच असतो, असे त्याचे वर्णन केलेले असते.
लोककथांमधून आणि सांगोवांगी कहाण्यांमधून वर्णन केलेला हा प्राणी खरोखर अस्तित्वात आहे की, कल्पनेचा खेळ आहे? गेल्या काही वर्षांत आधुनिक जनुकीय विज्ञानाने या हिमालयीन यतीवर पुरेसा प्रकाश टाकला आहे. त्यातून यती हा अस्तित्वात नाही याचे पुरावे मिळालेत. यतीप्रमाणेच जगाच्या पाठीवर इतरही देशात अशा प्रकारचे विचित्र प्राणी सापडल्याचा दावा केला जातो. उदाहरण म्हणून बिग फूट आणि लेकनेस मॉन्स्टर (Lock Ness monster) याची उदाहरणे देता येतील. बिग फूट हा यतीसारखाच माकड आणि मानवसदृश प्राणी आहे. हा प्राणी उत्तर अमेरिकेतील जंगलांमध्ये वास्तव्य करतो, असे सांगितले जाते. याच्या पावलाचे ठसे पुरावा म्हणून दिले जातात; पण अशा प्रकारचा प्राणी प्रत्यक्षात पुराव्यासहीत आढळल्याचे सापडत नाही. स्कॉटलंडमध्ये सरोवरांमधून लेकनेस मॉन्स्टर फिरतो, असे वर्णन केले गेले. या प्राण्याचा आकार मोठा असून त्याची मान लांब असते. त्याचे फोटोग्राफही 1993 मध्ये प्रसिद्ध केले गेले; पण सगळ्या ऐकीव माहितीला पुराव्याचा आधार नाही.
यती या कल्पनेचा उगम नेपाळमधील शेर्पा जमातीच्या इतिहासात आणि त्यांनी सांगितलेल्या दंतकथेत आढळतो. या शेर्पा जमाती पूर्वनेपाळमध्ये डोंगराळ प्रदेशात 12 हजार फूट उंचीवरच्या प्रदेशात राहतात.
सिवा ढाकल यांनी लिहिलेल्या ‘Falk Tales of Sherpa & Yeti’ या पुस्तकात यतीबद्दलच्या बारा लोककथांचा समावेश केलेला आहे. या कथांमधून यती म्हणजे एक भयंकर धोकादायक प्राणी असे वर्णन केले आहे. काही कथांमध्ये यतींच्या टोळ्या आणि शेर्पा यांच्यामधील संघर्ष चितारला आहे. या संघर्षात वाचलेले आणि दूरवरच्या जंगलदर्यांत पळून गेलेल्या यतींची वर्णने आहेत. एका दुसर्या कथेत शेर्पा जमातीतील एका मुलीवर यतीने केलेल्या बलात्काराचे वर्णन आहे. तिसर्या एका कथेत सकाळी सूर्य जसजसा वर येईल, तसतसे यती उंचीने आणि आकाराने वाढत जातात आणि त्यांना पाहणारा शेर्पा गर्भगळीत होऊन बेशुद्ध पडतो, असे वर्णन आहे. या अशा कथांमधून शेर्पा संस्कृतीत जंगलात फिरताना धैर्य आणि आशा वाढविण्याचा हेतू व्यक्त होतो. जंगली जनावरांना चांगल्या पद्धतीने, धैर्याने सामोरे जावे, यासाठी या कथा रंगवून सांगितल्या जातात. तसेच लहान मुलांनी जंगलात फिरताना मोठ्यांना सोडून एकटेच दूर जाऊ नये यासाठी भीती म्हणून (बागुलबुवा) अशा कथा मुलांना सांगितल्या जातात, असे ढाकल आपल्या पुस्तकात लिहितो. तो आणखी लिहितो की, पर्वतराजीत राहणार्या लोकांना निर्भय आणि मनाने अधिक खंबीर बनण्यासाठी अशा कथांचा उपयोग केला जात असावा.
पाश्चात्य गिर्यारोहक हिमालयातील गिरीशिखरे पार करण्यासाठी भारतात येऊ लागल्यावर त्यांना स्थानिक रहिवाशांकडून भयानक आणि थरकाप उडवणार्या कथांची रसभरीत वर्णने ऐकायला मिळू लागली.
1921 मध्ये चार्ल्स हॉवर्ड-ब्युरी (Charles Howard Bury) हा गिर्यारोहक एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी ब्रिटीश तुकडी घेऊन आला. त्याला एव्हरेस्टच्या मार्गावर मोठ्या आकाराच्या पावलांचे ठसे आढळून आले. हे ठसे (Metch-Kangmi) या प्रकारचे आहेत, असे त्यास सांगितले गेले. याचा अर्थ माणूस-अस्वल स्नोमॅन असा होतो. हॉवर्ड ब्युरीची तुकडी एव्हरेस्टवरून परतल्यानंतर त्याची मुलाखत एका पत्रकाराने घेतली, त्याचे नाव हेन्री न्युमन; पण या मुलाखतीत त्याने अनेक चुका केल्या ‘Filthy’ चे भाषांतर त्याने ‘ऋळश्रींहू’ म्हणजे घाणेरडा असे केले; पण पुन्हा घृणास्पद (Abominable) असा शब्द वापरला. त्या क्षणापासून पाश्चात्य संशोधनात यती म्हणजे अस्वल सदृश हिममानव अशी कल्पना स्वीकारली गेली. 1950 पासून पुढे पाश्चात्य संशोधकांनी यतीचा शोध घेण्यासाठी अनेक वेळा मोहिमा आखल्या.
गंमत म्हणजे हॉलिवूड मधील एक चित्रपट अभिनेता जेम्स स्टुअर्ट हाही यतीच्या मोहिमेत सामील झाला. त्याला हिमालयातील यतीचे एक बोट सापडले, असा दावा त्याने केला. त्या बोटाच्या डी.एन.ए. टेस्टिंगमध्ये ते माणसाचेच बोट असावे, असा निष्कर्ष निघाला. तेव्हापासून अनेकांनी विविध प्रकारे यतीबद्दलचे पुरावे पुढे केले. त्यामध्ये बर्फामधील यतींची पावले, फोटोग्राफ आणि आँखोदेखा रिपोर्ट यांचा समावेश होता. यतीच्या कवट्या; तसेच हाडाचे तुकडे आणि केसाचे सॅम्पल्सही अनेकांनी पुराव्यादाखल पुढे आणले; पण चिकित्सेअंती हे सर्व पुरावे जंगली प्राणी उदा. अस्वल, काळवीट आणि माकड यांचेच अवशेष असल्याचे सिद्ध झाले.
असे पुरावे मिळूनही लोक अजूनही हिमालयातील यतीचा वेड्यासारखा शोध घेत आहेत. यतीचा शोध हे क्रिप्टोझुलॉजीचे उत्तम उदाहरण आहे. क्रिप्टोझुलॉजी म्हणजे ज्याला खात्रीशीर पुरावा नाही, अशा अस्तित्वात नसलेल्या प्राण्याचा शोध.
रीनहोल मेसनर या गिर्यारोहकाने यतीच्या शोधासाठी प्रचंड काम केले आहे. 1980 साली हिमालयात एक यती पाहिल्याचा त्याने दावा केला होता. खात्री करण्यासाठी अनेकवेळा हिमालयात शोध घेऊन यतीचे रहस्य शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. या प्रयत्नातून मेसनरला यतीचे रहस्य शोधण्यासाठी एक साधे उत्तर सापडले ते म्हणजे यती नावाचा कोणी हिममानव नसून तो अस्वलाचा एक प्रकार आहे. त्याच्या मते, शेर्पा जमातीत यतीबद्दल पसरवलेल्या लोककथांमधून अस्वल आणि शेर्पाने वर्णन केलेल्या कथांचे बेमालूम मिश्रण आहे. यतीच्या पायाचे ठसे हे वास्तवात असलेल्या हिमालयातील अस्वलांच्या पावलांचे ठसे होत. मेसनर म्हणतो, ‘लोकांना वास्तव आवडत नाही, त्यांना आवडतात रंगवून सांगितलेल्या कल्पित गोष्टी.’ जंगली प्राणी किंवा यतीसारखे कल्पित हिममानव यांचा त्यांच्या अधिवासात शोध घेता येऊ शकतो. बोनोबो आणि ओरंग उहान किंवा चिंम्पाझी यासारखे प्राणी कितीही दुर्मिळ असले, तरी त्यांच्या अधिवासात शोध घेऊन त्यांचे अस्तित्व सिद्ध करता येते. हिमालयातील जंगलांमध्ये किंवा बर्फात टेकड्यांवर अर्धा माणूस आणि अर्धा माकड अशा स्वरुपाचा यती अजूनही कोणाला दिसलेला नाही. पाश्चिमात्य संशोधकांनी यतीच्या शोधासाठी त्यांचा अधिवास अनेक वेळा पालथा घातला आहे; पण त्यांना यतीचे दर्शन झालेले नाही.
गंमत म्हणजे यती दाखविण्याचे अमिष देऊन बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना फसवणार्या टोळ्यांचे कारनामे डायनेटस या रशियन गृहस्थाने उघड केले. जवळजवळ वीस वर्षे जगातील विविध शहरांतून आलेल्या नागरिकांना पर्वतराजीत नेऊन फसविण्याचे प्रकार डायनेट्सने उघड केले आहे. ‘ताझिकिस्तान आणि किरगिझस्तान मधील पर्वतराजीत आपण यती पाहिला आहे. तुम्हालाही तो बघता येईल,’ असे सांगून तेथील रहिवासी, प्रवाशांना दूरवरच्या दर्याखोर्यांत घेऊन जातात. त्यांना यती दाखवला जात नाहीच; पण आम्हाला तो दिसला अशा थापा मारतात. त्यांच्याकडून भरपूर पैसे उकळतात.
या शोधाचा एकूण निष्कर्ष असा – हिमालयीन यती नावाचा अद्भुत प्राणी अस्तित्वात नाही. खाकी पिंगट रंगांची अस्वले यांच्या पायाचे ठसे मोठे असतात. हवामानातील बदलामुळे व सूर्यकिरणांमुळे बर्फातील हे ठसे आणखी मोठे होतात; पण ठशांवरून ही यतीची पावले असे समजणे वेडेपणाचे आहे; पण विरुद्ध पुरावा जाऊनसुद्धा कल्पनेत रमणार्या मानवी स्वभावाला औषध नाही, हेच खरे. जोपर्यंत ऐकीव कथा आणि परिकथा यांत माणसाला आनंद वाटतो, तोपर्यंत कल्पित यतीचं अस्तित्व लोक चघळून सांगत राहतील.