Categories
उपक्रम

‘होळी करा लहान, पोळी करा दान!’ अंनिसच्या आवाहनास महाराष्ट्रभर उत्तम प्रतिसाद!

एप्रिल २०१९

शाखा : मुंबई

महाराष्ट्र अंनिसने मुंबईत राबवलेल्या ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ उपक्रमाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अगदी ग्रँट रोड ते विरारपर्यंत सोसायटीतून स्वतःहून फोन करून नागरिकांनी होळीचा नैवेद्य म्हणून जाळल्या जाणार्‍या पोळ्या वाचवून कार्यकर्त्यांना दिल्या. दहिसरची रिझर्व्ह बँक सोसायटी, दहिवली सोसायटी यांनी नैवेद्यासाठी स्वतंत्र भांडे ठेवून त्याला ‘नैवेद्य कुंड’ असे नाव दिले होते. साई छाया सोसायटीतून अनिशा मुकादम, कीर्ती दुसाणे, श्री सोसायटीतून हेमा शिंदे, सराफ सोसायटी, हिरण्यकेशा सोसायटीतून; तसेच डॉ. बिराजदार यांनीही पोळ्या गोळा केल्या. मीरा रोडच्या ‘सुंदर दर्शन’ सोसायटीमध्ये एकसुद्धा पोळी होळीत टाकली गेली नाही, तर सर्व पोळ्या गोळा करून त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोचवल्या, हे दहिसरचा कार्यकर्ता हरिश खूप अभिमानाने व समाधानाने सांगत होता. यासाठी पेणकर पाडा सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष संदेश पाटील व त्यांचे मित्र अविनाश सूर्यवंशी यांनी प्रचंड मेहनत घेऊन तिथल्या लोकांचे प्रबोधन केले, असे अंनिसचा कार्यकर्ता सुमित सांगत होता. दादरला योद्धा मित्र मंडळ, आभा परिवर्तनवादी संघटना व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मिळून पोळ्या गोळा करून फूल मार्केट व टाटा हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर राहणार्‍या लोकांना वाटल्या. दहिसर, बोरिवली स्टेशनच्या बाहेर झोपणार्‍या व सानपाडा हायवेजवळ रस्त्यावर राहणार्‍या लोकांना देखील पोळ्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र अंनिस, दहिसर शाखेतर्फे करण्यात आले होते. यामध्ये दहिसर शाखेतून कार्याध्यक्ष अमित, प्रधान सचिव निशा, मनोज, गौतम, यश, किरण, सचिन, सुमित, नीलम, प्रतीक, हरिश, शुभंकर, हर्षद यांनी सहभाग घेतला. बांद्रा शाखेतून मंगेश, महेंद्र, सुजात यांनी सहभाग घेतला. तसेच दादर शाखेचे कार्यकर्ते व राज्य सरचिटणीस नंदकिशोर तळाशीलकर सर यांनीही सहभाग घेतला.

रात्री एक वाजेपर्यंत कार्यकर्ते पोळ्या वाटप करत होते. पोळ्या घेताना लोकांची होणारी गडबड पाहून हेलावून गेलेले कार्यकर्ते पोळ्या मिळाल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून समाधानी होत होते. जवळपास एक हजारपेक्षा जास्त पोळ्या होळीत जाण्यापासून वाचवून त्या गरजूंपर्यंत पोचवल्याचा आनंद सर्वांना होत होता.

अंनिस शाखा : डोंबिवली

डोंबिवली शहरातील रामभाऊ भिसे, पांडुरंग विद्यालय व गावदेवी विद्यामंदिर या तीन शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत पर्यावरणपूरक ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ या उपक्रमाची माहिती देऊन पोळ्या आणण्याचे आवाहन केले. मुलांनी त्याला उत्तम प्रतिसाद देत जवळपास दोन हजार पोळ्या आणून दिल्या. त्याच रात्री कचरावेचक कामगार वस्तीत पोळ्यांचे वाटप करण्यात आले.

शाळांप्रमाणेच होळी मंडळांनाही पत्रके देऊन होळी लहान करावी, त्यासाठी वृक्षतोड करू नये व पोळी होळीत न टाकता नैवेद्य दाखवल्यावर बाजूला एकत्र जमा करून आम्हाला द्यावी, असे आवाहन केले होते. यालाही चांगला प्रतिसाद मिळून तीन होळी मंडळांनी पोळ्या कार्यकर्त्यांकडे जमा केल्या. त्याचेही वाटप गरीब वस्तीत करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसचा हा उपक्रम लोकप्रिय होत असून लोकांना पर्याय दिल्यास त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, ही आश्वासक गोष्ट आहे. डोंबिवली शाखेतील सर्व कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

अंनिस शाखा : सानपाडा व कोपरखैरणे (नवी मुंबई)

महा.अंनिस शाखा सानपाडा व कोपरखैरणे यांच्या वतीने तीन विविध सोसायट्यांमधून भाऊ पठाडे व अशोक निकम यांनी 30 ते 40 पोळ्या गोळा करून सीवूड दारावे स्टेशन व डेक्कन जिमखाना नेरूळ या परिसरातील गरीब वस्तीत वाटण्यात आल्या. महा.अंनिस शाखा, उलवे (नवी मुंबई) च्या वतीने पांडुरंग सरोदे यांनी जवळजवळ चारशे ते पाचशे पोळ्या गोळा करून गरीब वस्तीत वाटप केल्या.

शाखा : गडचिरोली

संस्कृतीच्या नावाखाली जंगलातील झाडे तोडून भूमी ओसाड करणे सुरू आहे. एवढेच नाही, तर होळी प्रसन्न व्हावी म्हणून त्यात पुरणपोळीसारखे पदार्थ नैवेद्य म्हणून टाकले जाते. या सर्वांना छेद देत महा. अंनिस गडचिरोलीतर्फे ‘एक पोळी होळीची, भुकेल्या मुखाची’ म्हणत, पुरणपोळी दान करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी गडचिरोली शाखेच्या वतीने वृद्धाश्रमात वृद्धांना होळी निमित्ताने पुरणपोळीचे वितरण करण्यात येते. यावर्षी देखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने सर्वोदय मंडळ, श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महा.अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे, उपाध्यक्ष पंडित पुडके, शब्बीर शेख, कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, प्रधान सचिव पुरुषोत्तम ठाकरे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, सुधाकर दूधबावरे, सर्पमित्रप्रमुख प्रा. विलास पारखी, पुरुषोत्तम चौधरी, बुवाबाजी संघर्ष समिती प्रमुख गजानन राऊत, सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष तथा व्यसनमुक्ती समिती प्रमुख प्रा. देवानंद कामडी, देवराव भोगेवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

शाखा : लखमापूरबोरी (ता. चार्मोशी, जि. गडचिरोली)

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा बोरी लखमापूर (ता. चामोर्शी) येथे होळीचा सण लाकडे न जाळता परिसरातील कचरा गोळा करून व कचर्‍यासोबतच समाजातील वाईट प्रथा, दुर्गुण यांची होळी केली. पुरणपोळीचे गरजूंना दान करणार आहोत, असे सांगून काही पोळ्या गोळा करून त्याच गावातील दिव्यांग बांधवांना वितरीत करून कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा बोरी (लखमापूर) च्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवून माणुसकीचे दर्शन घडविले. शाखेतील सर्व कार्यकर्त्यांनी पुरणपोळी वितरणाचा कार्यक्रम राबविल्याबद्दल गावकर्‍यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाखाध्यक्ष प्रकाश बोदलकर, कार्याध्यक्ष टिकाराम शेंडे, प्रधान सचिव दिलखूष बोदलकर, विनायक जेट्टीवार, रामचंद्र बोरकुटे, संदीप सुरजागडे, दिलखूष नैताम, आशिष वैरागडे, नामेंद्र बोदलकर, संजय बोदलकर, विनाजी भोयर आदींनी सहकार्य केले. महा.अंनिस जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकार्‍यांनी बोरी शाखेच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुकासह अभिनंदन केले.

शाखा : जळगाव

जळगाव शाखेमार्फत जी. एस. ग्राऊंड येथे दुर्गुणांची होळी साजरी करण्यात आली. त्यात एक दुर्गुणांचा पुतळा तयार करण्यात आला. त्या पुतळ्यावर विविध दुर्गुण चिकटवण्यात आले. नंतर मान्यवरांच्या हस्ते तो पुतळा पेटवण्यात आला. त्याप्रसंगी कार्यकर्ते प्रवीण पाटील, डॉ. नितीन वीसपुते, डॉ. गंभीरराव पाटील, मयूर पाटील, हर्षाली पाटील व पोलीस निरीक्षक विलास सोनवणे आदी उपस्थित होते.

जळगाव शाखेमार्फत शेरी (ता. धरणगाव) येथे प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय कचरा गोळा करण्यास सांगितला व आपल्यातील कोणताही एक दुर्गुण निवडायचा, त्याची चिठ्ठी तयार करून तो कागद पेटवून होळी साजरी करण्यात आली. यासाठी अंनिस कार्यकर्ते शिरीष चौधरी व शालेय शिक्षकांनी सहकार्य केले.

शाखा : अंमळनेर

अंमळनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेच्या वतीने इंदिरा गांधी विद्यामंदिर, श्री. एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, स्व. सौ. पी. एन. मुंदडा माध्यमिक विद्यालय आणि स्व. श्री. एम. एस. मुंदडा माध्यमिक विद्यालयात आयोजित पर्यावरणपूरक होळी कार्यक्रम उत्साहात पार पडला. सर्व शालेय परिसरातील गोळा केलेला कचरा होळीसाठी वापरण्यात आला. याप्रसंगी बुवाबाजी संघर्ष समिती प्रमुख सुनील वाघमोडे यांनी सर्व वाक्यांची माहिती आणि महत्त्व पटवून दिले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी होळी पेटवून आनंद व्यक्त केला. यावेळी कार्याध्यक्ष डॉ. दिनेश पाटील, सचिव डॉ. उदयकुमार खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास अंनिस कार्यकर्ते डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. हिम्मत पाटील, प्रवीण पाटील, शरद खैरनार, अमोल राजपूत, डी. ए. सोनवणे आणि विपुल गारमेंटचे कुंदनानी शेठ, मुख्याध्यापक संदीप पवार आदी उपस्थित होते.

अंनिस शाखा अलिबाग ः अलिबाग – रायगड अंनिसतर्फे सार्वजनिक स्वच्छता करून कचर्‍याची होळी करण्यात आली. तसेच होळीमध्ये जाणार्‍या पोळ्या दान करून त्यांचे वाटप करण्यात आले. राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांनी आदिवासी वाडी बामणसुरे येथे व्यसनमुक्ती व पर्यावरणस्नेही होळीविषयी मार्गदर्शन केले.

अंनिस शाखा : कुंटूर (जि. नांदेड)

नांदेड जिल्ह्यातील अंनिस कुंटूर शाखा व साने गुरुजींची धडपडणारी मुले यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. यावेळी वाचनालयाच्या परिसराची स्वच्छता करून सुका कचरा गोळा केला व युवतींच्या हस्ते कचर्‍याची होळी पेटवण्यात आली. यावेळी होळी करा लहान, पोळी करा दान..,’ शिव्या देऊ नका.. अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी डॉ. बाळू दुगडूमवार, संजय ठिकाणे, शिवाजी आडकिने सर्व कार्यकर्तेव गावकरी उपस्थित होते.

अंनिस शाखा : नायगाव (जि. नांदेड)

नांदेड जिल्ह्यातील अंनिस शाखा नायगाव व जनता हायस्कूल नायगावच्या वतीने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यामध्ये नैसर्गिक रंगाचा वापर करण्यावर भर देण्यात आला, नैसर्गिक रंग कसा तयार करावा, याची ऑडिओ क्लीप विद्यार्थ्यांना ऐकवली. होळीसाठी झाडे तोडू नयेत, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावावीत, असा संदेश दिला. याप्रसंगी साहेबराव जाधव, भाऊराव मोरे, उत्तम पाटील बेंद्रीकर, मुख्याध्यापक सूर्यवंशी सर, मोहन चव्हाण, इंगळे सर आदींसह विद्यार्थी शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते.

शाखा : बिलोली (जि. नांदेड)

नांदेड जिल्ह्यातील अंनिस शाखा बिलोली अंतर्गत कासराळी येथे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. आठवडी बाजाराच्या मैदानातील कचरा एकत्र गोळा करून त्याची होळी केली. ‘होळीसाठी झाडे तोडू नयेत, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावावीत,’ असा संदेश दिला. होळीमध्ये पोळी न टाकता समोर ठेवून नंतर ती गरिबांना द्यावी, असे कार्यकर्त्यांनी सुचविले. अशाप्रकारे जमा झालेल्या पोळ्या कार्यकर्त्यांनी गरिबांमध्ये वाटप केल्या. याप्रसंगी अर्चना जमदाडे, कमलाकर जमदाडे, अविनाश महेशकर, आकाश महेशकर, चंद्रशेखर इबितवार, नवनाथ सोमसे, फैजान शेख, बळीराम गजल ओड, सतीश मंगडे उपस्थित होते. गावात प्रथमच होणारा हा अभिनव उपक्रम बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

शाखा : खेड (सातारा)

‘चला दुर्गुणांची होळी करूया… विज्ञानाची कास धरूया…’ हा उपक्रम खेड परिसरातील मेकॅनिकल कॉलनी समोरील मैदानावर राबविण्यात आला. यावेळी खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच इंदिराताई बोराटे यांचे हस्ते दुर्गुणांची होळी पेटविण्यात आली.

यावेळी म.अं.नि.स.चे बुवाबाजी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सदस्य भगवान रणदिवे यांनी अभिवादन करून ‘तुम्हा डॉ. दाभोलकर…’ हे गीत गायले. सर्वांनी कोरस दिला; तर म.अं.नि.स.चे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया,’ ‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे,’ ‘होळी लहान करू – पोळी दान करू,’ ‘दुर्गुणांची होळी करू-विज्ञानाची कास धरू…’ इत्यादी घोषणा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा शहर अंनिसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांनी केले. दुर्गुणांची प्रतिमा बनविण्यासाठी प्राधान्याने दिलीप महादार, केशवराव कदम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास जांभळे, रोहित घाडगे, सूरज साळुंखे, जितेंद्र शिवदास, विजय पवार, वीर पोतदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तर उपस्थितांचे आभार सुमित भोसले यांनी मानले.

शाखा : कल्याण

गेल्यावर्षी पहिल्यांदाच यशस्वीपणे राबविलेल्या या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर या वेळी हा उपक्रम आयोजित करताना व्यवस्थित नियोजन करण्याचे पाक्षिक बैठकीत ठरले होते. त्यानुसार कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी नेटके नियोजन केले व सर्व साथी उत्साहाने कामाला लागले. ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ उपक्रमाची पत्रके आपल्या जवळच्या सोसायट्यांमध्ये वाटायला व विविध मंडळांशी संपर्क साधायला सुरुवात केली. तसेच कल्याण शहराचे दोन भाग पाडून त्या भागात कार्यकर्त्यांना दोन गटात विभागून कामे देण्यात आली. स्थानिक वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनेलवर प्रसिद्धीची व्यवस्था ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गौतम जाधव यांनी चोखपणे सांभाळली होती. दत्ता बोंबे यांनी अनेक खोक्यांवर महाराष्ट्र अंनिसचे व उपक्रमाचे नाव लिहून पोळ्या व्यवस्थित गोळा करायची सोय केली होती.

होळीच्या दिवशी सायंकाळी दोन्ही गटांनी पोळ्या गोळा करण्यास आरंभ केला. एकमेकांशी संपर्क साधून पोळ्या एकत्र केल्या. अनेक सोसायट्या व संस्था यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या वर्षी पुरणपोळ्यांचा आकडा 1700 ते 1800 च्या आसपास पोचला होता. तसेच एक छोटे पोते भरेल एवढे तळलेले पापड सुद्धा मिळाले होते. अशोक वानखडे यांच्या गाडीत व बाईकवर ही खोकी नेऊन डंपिंग ग्राऊंड जवळील अण्णा भाऊ साठे नगर, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, फूटपाथ, स्कायवॉक या परिसरात शेकडो लोकांमध्ये पोळ्यांचे वाटप केले गेले. या परिसरातील गरीब लोक अक्षरशः पोळ्यांवर तुटून पडले. एवढेच नाही, तर गाडी चुकल्याने मुक्काम करणारे प्रवासी, एसटी कर्मचारी यांनीसुद्धा या होळीच्या ‘प्रसादा’चा लाभ घेतला. पोळ्यांचे वाटप झाल्यावर सर्व एकत्र आले व उपक्रमाच्या यशाचा जोश व्यक्त केला. या उपक्रमात सक्रिय भाग घेणारे कार्यकर्ते आहेत – वर्षा पवार, चिमुरडी हृदया पवार, सुनंदा वानखडे व अशोक वानखडे, शरद लोखंडे व आरती लोखंडे, दत्ता बोंबे व कल्पना बोंबे, गौतम जाधव, अ‍ॅड विनोद जगताप, राजेश देवरुखकर, रामदास देसाई, उत्तम जोगदंड, अविनाश पाटील, शाहीर स्वप्नील शिरसाठ ऊर्फ शाहू, संदेश बालगुडे. योग्य नियोजन, भरपूर पूर्वप्रसिद्धी व कार्यकर्त्यांचे कठोर परिश्रम यामुळे हा उपक्रम प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला.

शाखा : सोलापूर

अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूरच्या माध्यमातून श्री समर्थ विद्यामंदिर येथे पर्यावरणाला पूरक असलेल्या ‘दुर्गुणांची होळी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अंनिस सोलापूरचे माजी अध्यक्ष निनाद शहा, अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्या उषा शहा, अंनिस सोलापूर कार्याध्यक्ष ब्रह्मानंद धडके, मधुरा सलवारू, निधी व्यवस्थापन कार्यवाह, निशा भोसले; तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

माणसाच्या मनातील वाईट विचार, वाईट गुण जसे की, खोटं बोलणे, परिसर स्वच्छ न ठेवणे, भ्रष्टाचार, गुटखा खाणे, दारू पिणे, बिडी-सिगारेट ओढणे, इतरांना शिव्या देणे, इतरांचे वाईट चिंतणे असे जे वाईट गुण आहेत, त्यांना या निमित्ताने आपल्या शरीरातून, आपल्या मनातून बाहेर काढणे आणि त्यांची होळी करणे या उद्देशाने या पर्यावरणपूरक दुर्गुणांची होळी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुलांना एक कागद आणि पेन देण्यात आले, ज्याद्वारे आपल्या मनातील वाईट विचार, आपले दुर्गुण त्या कागदावर लिहिण्यास सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी आपले दुर्गुण त्या कागदावर स्वतःचे नाव न टाकता लिहिले आणि या सर्व दुर्गुणांच्या कागदांना एकत्र करून व्यसनांच्या पोस्टर्ससह एका भांड्यामध्ये ठेवून त्यांची होळी करण्यात आली, ज्या माध्यमातून मुलांना आपले दुर्गुण जाळून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिखरे, मुख्याध्यापक रवींद्रकुमार शिखरे यांची उपस्थिती होती.

शाखा : नागपूर

‘ एक पोळी होळीची, भुकेल्या मुखाची’ हा अभिनव उपक्रम घेऊन महाराष्ट्र अंनिसच्या कोराडी शाखेने 22 होळ्यांपर्यंत पोचून 225 पोळ्या जमा करून शेकडो अनाथ व मतिमंद मुलांची एका दिवसाची भूक भागविली. प्रत्येक मंडळाचे समुपदेशन करून होळीला अर्पण होणारी पोळी भुकेल्याला कशी मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांनी धडपड केली. बर्‍याच मंडळांतील महिलांनी, ‘आम्हीही अजून घरून जास्तीच्या पोळ्या आणून देतोय,’ अशी भावना व्यक्त केली; परंतु कार्यकर्त्यांनी जास्तीच्या पोळ्या न स्वीकारण्याचा व ‘फक्त होळीत टाकण्याकरिता जी पोळी आणली तीच पोळी आम्हाला द्या,’ असा समुपदेशक सल्ला त्यावेळी दिला. या सल्ल्यामुळे कार्यकर्त्याला दोन-तीन ठिकाणी अपमानित पण व्हावे लागले; पण याकडे दुर्लक्ष करून पोळ्या गोळा करण्याचं काम रात्री साडेअकरापर्यंत सुरू ठेवले. कोराडी रोडवरील साईकृपा अनाथ मतिमंद मुलांच्या शाळेत होळीच्या आनंदोत्सवात पोळ्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा अध्यक्ष जगजित सिंग, कोराडी शाखेचे उपाध्यक्ष बबनराव द्रवेकर, कार्याध्यक्ष बबनराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप रंगारी, ‘लोकमत’चे कोराडी वार्ताहर दिनकरजी ढवळे मंचावर उपस्थित होते. त्यानंतर उरलेल्या पोळ्या जीवनधारा मतिमंदांच्या निवासी शाळेला वितरीत करण्यात आल्या.

शाखा : ऊर्जानगर, चंद्रपूर

अंनिस ऊर्जानगर शाखेच्या वतीने यावर्षीही होळीच्या पूर्वसंध्येला पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन ऊर्जानगर वसाहतीतून करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा. पी. एम. जाधव सर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी सी. जी. रामटेके, सिद्धार्थ चिमुरकर, समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि राष्ट्रचेतना सामाजिक कल्चरल तथा पर्यावरण सेवा समिती, ऊर्जानगरच्या वतीने सार्वजनिक पर्यावरणपूरक होळीचे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील खुले रंगमंच मैदान येथे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जयंत बोबडे, मुख्य अभियंता चंद्रपूर वीज केंद्र, तर प्रमुख अतिथी मा. मधुकर परचाके, अनिल आष्टीकर, राजेंद्र राजगडकर, आर. के. ओसवाल उपमुख्य अभियंता, मा. उपासे, जाधव, सोमकँुवर अधीक्षक अभियंता; तसेच मा. शंकर दरेकर, सेवाधिकारी श्रीगुरूदेव सेवा मंडळ, ऊर्जानगर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. पर्यावरणपूरक होळी मुख्य अभियंता बोबडे यांच्या हस्ते पेटविण्यात आली. सोबतच प्रमुख अतिथीच्या हस्ते समाजातील हिंसाचार, बलात्कार, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, आतंकवाद, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनाधीनता, आळस या कुप्रवृत्तीचे होळीत दहन करण्यात आले. याप्रसंगी आयोजकांच्या वतीने पर्यावरण या विषयावर घोषवाक्य स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आली. यात 50 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांत प्रथम उमंग मिरासे, द्वितीय विजय भोयर, तृतीय शिवम गाजुलवार व प्रोत्साहनपर खुशाल कामडे, ऋचा कोंढेकर यांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

‘होळी करा लहान, पोळी करा दान’ या संकल्पनेतून जमा झालेल्या पुरणपोळ्या एकत्र करून त्यांचे वांढरी येथील अनाथालयात आणि डेबू सावली वृद्धाश्रमात वाटप केले. या होळीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

शाखा : भिवंडी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम ‘होळीची पोळी दान करा’ भिवंडी अंनिस शाखातर्फे राबविण्यात आला. यासाठी भिवंडीतील शाळांमध्ये जाऊन अंनिस कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्यात आलं. महिलांचंही प्रबोधन केलं. त्यामुळे होळीच्या वेगवेगळ्या ठिकाणी पोळ्या दान मिळाल्या. कार्यकर्त्यांनी जमा झालेल्या पोळ्यांचे वीटभट्टीवर काम करणारे मजूर, फूटपाथवर राहणार्‍या गरीबांना वाटप केले. त्यामुळे त्यांचाही सण गोड झाला. यावेळी भिवंडी अंनिस शाखेचे कार्यकर्ते गणेश शेलार, विनोद म्हात्रे, सुरेश साळवे, संतोष म्हात्रे, सचिन पाटील, विजय पाटील, पी. बी. मोरे, ज्ञानेश्वर गोसावी सहभागी झाले होते.

शाखा : वर्धा

वर्धा शहरातील विविध उपनगरातून, तडस ले आऊट येथे अनिल मुरडिव, राजेंद्र ढोबळे, गिरीपेठ येथे सारिका व राजेश डेहनकर, तर स्वागत कॉलनी अरुणभाऊ चवडे, गजेंद्र सुरकार आणि अंजनामाता परिसर येथे विजय कडू, प्रकाश कांबळे, न्यू आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज परिसरात ममता बालपांडे आणि मिलिंद भगत, जिजामाता शाळा परिसरात सुधाकर मिसाळ, सचिन मेश्राम, तर गोपुरी येथे भरत कोकावार, रूपेश म्हैसकर या कार्यकर्त्यांनी होळीच्या दिवशी पूजेच्या नावाखाली होळीत टाकली जाणारी पुरणपोळी व गाठी दान मागून ते सर्व अन्न एकत्र करून वर्धा रेल्वे स्टेशन व साई मंदिर येथील गरजूंना सन्मानाने वाटप केले. यावेळी विलास भगत, संजय भगत, बाबाराव किटे, डॉ. सिद्धार्थ बुटले आदींनी सहकार्य केले.

शाखा : औंध (जि. सातारा)

महाराष्ट्र अंनिस शाखा औंध (ता. खटाव, जि. सातारा) यांच्या वतीने ‘होळी करा लहान, पोळी करा दान!’ उपक्रमांतर्गत अंधश्रद्धेला पूरक गोष्टींचे जसे की – लिंबू-मिरची-काळी बाहुली- बिबे इत्यादी गोष्टींचे दहन करण्यात आले. तसेच आजूबाजूच्या अंधश्रद्धा, दहशतवाद, मनुवाद, बुवाबाजी, जातीयता, धर्मांधता, कर्मकांड इत्यादींबाबत प्रबोधनात्मक माहिती सांगितली आणि त्यांना प्रतीकात्मक जाळून त्यापासून दूर राहण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी औंध शाखेचे अध्यक्ष जयवंत खराडे, प्रशिक्षण विभाग कार्यवाह बाळकृष्ण कुंभार, प्रधान सचिव श्रीपाद सुतार यांनी मनोगत व्यक्त करताना आपण जो पर्यावरणस्नेही होळीचा सकारात्मक पर्याय दिला आहे, तो सर्व स्तरांवर स्वीकारला पाहिजे. यामधूनच समाजाची प्रगती होणार आहे, असे नमूद केले. यावेळी महा.अंनिसचे कार्यकर्ते, जोतिर्लिंग तरुण मंडळ, औंध यांचे कार्यकर्ते सहभागी होते.

दिघी (पुणे) :

होळीच्या सणानिमित्त ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ या उपक्रमास दिघी गावकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिघी गावातील परांडेनगर मधील सुमनशिल्प, कमलराज, स्वप्नशिल्प सोसायटी मधील रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने गरिबांसाठी सुमारे 350 पेक्षा जास्त पुरणपोळ्या जमा केल्या. या उपक्रमास काळे सर, नानासाहेब जाधव, दीपक घाग, अशोक परांडे, अष्टविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष तेजस पंडित, सुशील मैलय्ये आदी नागरिकांनी सहकार्य केले.जमा केलेल्या सर्व पुरण पोळ्या यमाईनगर जवळील गरिबांच्या वस्तीत वाटण्यात आल्या. या उपक्रमाचे समन्वयक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते भानुदास दुसाणे व कुणाल शिरसाठे यांनी या प्रतिसादाबद्दल दिघीवासीयांचे आभार व्यक्त केले.

(संकलन ः राहुल थोरात)