Categories
जट निर्मूलन

शामला सातेरी झाल्या जटामुक्त

जून - २०१८

सौ. गीताताई सुतार जटामुक्त झाल्याची बातमी अंनिस मासिकात व वृत्तपत्रात वाचून एस. एन. राजगोळकर सर, पांडुरंग करंबळकर गुरुजी (उपाध्यक्ष-मअंनिस, शाखा गडहिंग्लज) यांना भेटले व त्यांनी सांगितले, “शामला सातेरी पाटील ही 40-45 वर्षांची जटाधारी बाई आहे. तिच्या डोक्यावर अंदाजे दोन-अडीच किलोची जट असून त्याचा तिला त्रास होत आहे. ते ओझे मानेला तोलत नाही; शिवाय कीड (उवा) झाल्याने तिला झोप नाही. शारीरिक, मानसिक त्रासातून तिला मुक्ती हवी आहे. तेव्हा हे जटा काढण्याचे काम तुमची अंनिस शाखा करीत असल्यास ती बाई आपल्या संस्थेस खर्चासाठी पैसे देण्यास तयार आहेत.” तेव्हा मी राजगोळकर सरांना सांगितले, “शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अंनिस संस्था एक रुपयाही घेत नाही. स्वखर्चाने, स्वइच्छेने अशी अनेक कामे मोफत करते. अंनिस कार्यकर्त्यांनी स्वत:हून ही समाजसेवा स्वीकारली आहे. अशा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नेसरी विद्यामंदिराचे अध्यक्ष मा. वसंतराव पाटील सर यांनी वाचनालयाची जागा दिली आहे.” हे ऐकून राजगोळकर सरांनी संबंधित स्त्रीला आणण्याची तयारी दर्शविली. नेसरी अंनिस समितीची बैठक घेऊन जटामुक्तीचा कार्यक्रम घेण्याचे ठरविले.

शामलाबाई या आपली मुलगी, जावई व राजगोळकर सरांचे भाऊ महादेव राजगोळकर यांच्यासह नेसरी वाचन मंदिरात हजर झाले. या ठिकाणी करंबळकर गुरुजी, पी. डी. पाटील, सदानंद शिंदे, विष्णू पाटील व परशराम कांबळे या सर्वांनी शामलाबाईंचे प्रबोधन केले. तिची देवाबद्दलची भीती दूर केली व जटा निर्मूलनाच्या कामास सुरुवात केली. या जटा निर्मूलनाचे कार्य प्रकाश भोईटे सर, बाबूराव धबाले, पी. डी. पाटील, करंबळकर गुरुजी, अलका भोईटे, शिवलीला हिडदुगी यांनी पार पाडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नेसरी या शाखेने हे दुसरे जटा निर्मूलनाचे सामाजिक कार्य पार पाडले.