फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन (फिरा) या देशातील विवेकवादी, परिवर्तनवादी चळवळींचे संघटन असलेल्या संस्थेची राष्ट्रीय कार्यकारी समितीची सभा हॉटेल एव्हॉन रुबी, दादर, मुंबई येथे रविवार दिनांक 8 एप्रिल 2018 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रायोजकत्वाच्या माध्यमातून पार पडली. ‘फिरा’ संघटनेच्या नियमावलीविषयी, प्रामुख्याने चर्चा झाली. संघटनेची बांधणी आणि मुख्यालय; तसेच अनुषंगिक बाबींविषयी सखोल चर्चा होऊन त्यासाठी सहा सदस्यीय समिती नेमण्यात आली. पुढील अधिवेशनापर्यंत या समितीने योग्य तो अहवाल कार्यकारी मंडळाला द्यावा, असे ठरले. ‘फिरा’चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र नायक यांनी फिराबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच सर्वसामान्य लोकांचे कशा पद्धतीने शोषण केले जाते, मीडब्रेन अॅक्टिव्हेशनच्या नावाखाली, सद्य:परिस्थितीत होणारी लूट याबद्दल माहिती दिली. भाजप सरकारच्या विविध उपक्रम आणि योजनांच्या माध्यमातून हिंदुत्वाचा अजेंडा राबविला जातो आहे. विवेकवादी लोकांच्या संरक्षणासाठी देखील ‘फिरा’ने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील विविध राज्यांमधील सक्रिय असणार्या संस्थांचा देखील ‘फिरा’मध्ये सहभाग अपेक्षित आहे.
राजा सुरेश, ओडिसा यांनी सदस्यत्व फीबाबत सूचना केली आणि ‘फिरा’च्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील सद्य: परिस्थितीत प्रश्नांना हात घालावा, असे आवाहन केले. मअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष आणि ‘फिरा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात मअंनिसचे कार्य जोरात चालू आहे. विवेकवादाचा प्रचार-प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, छद्मविज्ञानाला विरोध, आध्यात्मिक बुवाबाजी या क्षेत्रांतील कार्य चालूच राहणार आहे. साधूंना दिल्या जाणार्या राजकीय फायद्याविषयी देखील त्यांनी टीका केली.
8, 9 डिसेंबर 2018 रोजी ‘फिरा’ची राष्ट्रीय परिषद विशाखापट्टणम येथे आयोजित केली जाणार आहे. त्याचेही नियोजन या सभेमध्ये करण्यात आले. सर्व उपस्थित सदस्यांनी आपापल्या संघटनेविषयी आणि कार्याविषयी माहिती दिली. राष्ट्रीय सचिव बलविंदर बर्नाला यांनी ‘फिरा’च्या आवश्यकतेविषयी चर्चा केली आणि आभारप्रदर्शन केले. या विशेष सभेच्या यशस्वितेसाठी मअंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रीय समन्वय विभागाचे प्रा. डॉ. सुरेश घोडेराव यांनी विशेष परिश्रम घेतले. नंदकिशोर तळाशीलकर आणि विजय परब यांनी मुंबईतील नियोजन केले होते. देशाच्या विविध राज्यांतील 15 सदस्य सभेसाठी उपस्थित होते.
–प्रा. डॉ. सुदेश घोडेराव