भिसेवाघोली (ता. जि. लातूर) येथील अल्पभूधारक शेतकरी वायाळ यांच्या शीतलने लग्नासाठी हुंडा द्यायला वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून नुकतीच आत्महत्या केली. अशा अनेक आत्महत्या आजपर्यंत झालेल्या आहेत; पण त्याचप्रमाणे शीतल वायाळचीही आत्महत्या समजून तिच्या घरच्यांना सहानुभूती दाखवून, काही आर्थिक मदत करून विसरणारी ही आत्महत्या निश्चितच नाही. म्हणूनच हा लेखणीचा प्रपंच.
शीतलने केवळ वडिलांकडे लग्नाला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केलेली नाही. कारण तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संपूर्ण समाजव्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. समाजातील कुप्रथा, रुढी-परंपरा, पाहुणचार, देवाणघेवाण, मानपान, अंधश्रद्धा, करणी-धरणी, कर्मकांड अशा अनेक गोष्टी तिच्या मन:पटलावर तरंगत असाव्यात, असे वाटते.
शीतलला असे वाटत असावे की, लग्नाच्या एका क्षणाच्या कार्यक्रमात मुलगी आपले जन्मदाते आई-बाबा, बहीण-भाऊ, आजी-आजोबांना सोडून सासरची होते. आपल्या रक्ताच्या नात्यांना विसरून सासरचीच होऊन जाते, तरीदेखील तिच्याकडून मुलाला, मुलाच्या पालकांना एवढ्या टोकाच्या अपेक्षा का? की हुंड्याची रक्कम एवढीच पाहिजे, हुंड्याची रक्कम लग्नाच्या अगोदरच पाहिजे, लग्न सर्व रीतिरिवाजाप्रमाणेच झाले पाहिजे, पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे, लग्न भव्य-दिव्य, मोठे आणि मंगल कार्यालयात झाले पाहिजे, मनोरंजनासाठी व अक्षतासाठी गायन चमू असला पाहिजे, हळदीचा कार्यक्रम एखाद्या मालिकेतील कार्यक्रमासारखाच झाला पाहिजे, यासारख्या अनेक अपेक्षा मुलीच्या बापाकडून बाळगत असताना त्याच्या आर्थिक परिस्थितीचा कुठेच विचार केलेला दिसत नाही. नाईलाजास्तव ही सर्व हौस मुलीच्या बापाला पूर्ण करावी लागते; प्रसंगी त्याला खासगी सावकाराकडे आपले शेत गहाण ठेवून व्याजी पैसे काढावे लागतात. ते पैसे फेडण्यासाठी वर्षानुवर्षे शेतात मेहनत करूनही ते पैसे फिटत नाहीत. काही वेळा नैसर्गिक संकटे येतात, तर काही वेळा मानवनिर्मित, मानसिक कुचंबणा होते; प्रसंगी एकच मार्ग शिल्लक राहतो आणि तो म्हणजे आत्महत्या…. हा मार्ग तिच्या वडिलांनी स्वीकारू नये म्हणूनच शीतलने स्वत:चे बलिदान दिले. त्यामुळेच तिची आत्महत्या नसून या अनेक कुप्रथांतून झालेली हत्याच आहे. मात्र या घटनेने संपूर्ण समाजाचे लक्ष एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळविण्याचे काम केले आणि तो प्रश्न म्हणजे लग्नात दिला जाणारा आणि घेतला जाणारा हुंडा.
येणार्या काळामध्ये शीतलसारख्या निरागस मुलींचे जीवन वाचवायचे असेल, तर सर्व मुला-मुलींनी निश्चय करावयास हवा की, ‘मी हुंडा घेणार नाही आणि देणार नाही.’ अन्यथा येणार्या काळामध्ये शीतल वायाळसारख्या हजारो घटना घडतील, मुलीच जन्माला घातल्या जाणार नाहीत. त्यामुळे मुलींचे प्रमाण एवढे कमी होईल की, मुलांना लग्नासाठी मुलीच मिळणार नाहीत. मिळाल्या तर त्यांना मुलांकडून हुंडा घ्यावा लागेल. त्यावेळी मुलांच्या बापाची परिस्थिती केविलवाणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वेळीच मुलांनी आणि त्यांच्या बापांनी सामाजिक कुप्रथा सोडून द्याव्यात आणि हुंडा न घेता मुलांचे लग्न लावण्याचा प्रयत्न करावा; अन्यथा अनर्थ दूर नाही.
शाही लग्नाच्या खर्चाला फाटा देण्यासाठी अनेक पर्यायी लग्नाच्या पद्धती आहेत. त्यात महात्मा फुले यांनी सांगितलेली सत्यशोधक विवाहपद्धती अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिसून येते. या विवाह पद्धतीमुळे पर्यावरणाची, नैसर्गिक साधनसंपत्तीची कसलीही हानी होत नाही. मानवनिर्मित साधनांचाही नाश होत नाही. पैशाचीही नासाडी होत नाही. कारण या विवाहपद्धतीमध्ये आंतरधर्मीय, आंतरजातीय, स्वजातीय विवाह लावले जातात. लग्नासाठी फक्त वधू-वर, त्यांचे पालक-निवडक निमंत्रित व्यक्ती साधारणत: 15 ते 20, लग्नासाठी दोन पुष्पहार, अक्षतांसाठी थोडेसे खुले पुष्प, विवाह नोंदणीचे फॉर्म एवढ्याच बाबी लागतात. अट एकच असते, मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावयास हवे. त्याशिवाय एच.आय.व्ही. टेस्ट करणेही अनिवार्य आहे. म्हणजेच या लग्नासाठी साधारणपणे फक्त 500 रुपये एवढा खर्च येऊ शकतो.
एवढा कमी खर्च भारतातील कोणत्याही राज्यातील गरिबातील गरीब व्यक्तींना करणे सहज शक्य आहे. त्यामुळे येणार्या काळात मुला-मुलींनी या पद्धतीनेच विवाह करावेत. या विवाह पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करावा, ज्यामुळे अनेक गोरगरीब लोकांच्या मुला-मुलींची आनंदाने लग्ने होतील. शहरातील मोठे व्यापारी व नोकरदार, राजकारणी, अधिक उत्पन्नधारक लोकांनीही याच पद्धतीने आपल्या मुला-मुलींची लग्ने लावली पाहिजेत; जेणेकरून खेड्यापाड्यातील लोक याचे अनुकरण करतील आणि आपल्याही मुला-मुलींची लग्ने या सत्यशोधक पद्धतीनेच लावतील. टी.व्ही.च्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर व सिनेमांत ज्याप्रमारे अवास्तव लग्नसमारंभ दाखविले जातात, त्यावर देखील सेन्सॉर बोर्डाने बंदी घालून ‘सत्यशोधक विवाह’ पद्धतीप्रमाणे विवाह मालिकेत, सिनेमात दाखविण्याची विनंती करावी, ज्यामुळे घराघरापर्यंत या विवाहपद्धतीचा प्रचार आणि प्रसार होईल; पर्यायाने येणार्या काळात भयमुक्त, कुप्रथामुक्त, अंधश्रद्धामुक्त, कर्मकांडमुक्त समाज निर्माण होण्यात कसलीही कसर राहणार नाही.
संपर्क : 9420437831