कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची बातमी मला समजली आणि मी एकदमच भूतकाळात गेलो. प्रथमत: माझ्यावरील संस्काराचा भाग म्हणून मी शंकराचार्यांना आदरांजली वाहतो. याच शंकराचार्यांशी संबंधित ते 1980-1981 च्या सुमारास ते सातार्याला असतानाच्या माझ्याशी संबंधित काही घटना आता सद्य:स्थितीत मांडाव्याशा वाटल्याने त्या लिखित स्वरुपात मांडत आहे.
कांची कामकोटी पीठाचे स्वामी चंद्रशेखर सरस्वती; तसेच ज्यांचे नुकतेच निधन झाले ते जयेंद्र सरस्वती आणि त्यांच्यानंतर पीठावर बसणारे विजयेंद्र सरस्वती हे तिघेही 1980-81 साली सातार्यात शंकराचार्य मठ परिसरात मुक्कामाला होते. देशभरातून अनेक मान्यवर; तसेच त्यांचे भक्तगण या शंकराचार्यांच्या भेटीला येत असत. अगदी माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्यापासून देशातील विविध पक्षांची नेतेमंडळी, अधिकारी मंडळी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सातार्यात येत असत. सातारा शहराच्या पूर्वेकडील भागात उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचे बांधकाम त्यावेळी सुरू होते. सातारा शहरात या तिघांमुळे त्यावेळी कर्नाटक, आंध्र व तामिळनाडू या राज्यांतून अनेक मंडळी येत होती. सातारा शहर व जिल्ह्यात पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन आम्ही ‘समाजवादी युवक दल’ या संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो. या संघटनेत डॉ. नरेंद्र दाभोलकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, प्रमोद कोपर्डे, दिनकर झिंब्रे, किशोर बेडकीहाळ, विलास ढाणे या कार्यकर्त्यांसोबत मी काम करत होतो. सातार्यातील शंकराचार्यांचे प्रस्थ वाढतच चालले होते. एके दिवशी बातमी आली की, तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना भेटण्यासाठी सातारा येथे येणार आहेत. समाजवादी युवक दलाच्या संघटनेत असलेल्या आम्हा सर्वांच्याच डोक्यात वेगळ्याच हालचाली सुरू झाल्या आणि आम्ही असे जाहीर केले की, एखाद्या विशिष्ट धर्माच्या धर्मपीठाच्या प्रमुखाला भेटण्यासाठी पंतप्रधान येणार असतील, तर त्यांनी सरकारी खर्च करून येऊ नये; स्वत:च्या पैशाने हा खाजगी दौरा करावा किंवा पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन खुशाल शंकराचार्यांना भेटावे. असे पत्रक प्रथम विविध वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी दिले. त्यावेळच्या मोजक्याच वृत्तपत्रांनी आमची बातमी छापली. दरम्यान, आम्ही ज्यादिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी सातारा येथे शंकराचार्यांच्या दर्शनासाठी येणार, त्यावेळी काळे झेंडे दाखवणार, असे समाजवादी युवक दलातर्फे जाहीर केेले. त्यावेळी ‘हिंदू एकता आंदोलन’ नावाचे संघटन काम करीत होते. त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमचा निषेध करणारे पत्रक काढले आणि आमच्या निषेधार्थ प्रतिनिदर्शने करू, असे घोषित केले. त्यामुळे वातावरण एकदमच ढवळून निघाले. सातारच्या पोलीस यंत्रणेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वाटल्याने ज्या दिवशी इंदिरा गांधी या सातारा दौर्यावर येणार होत्या, त्याच्या आदल्या दिवसापासूनच ‘ज्यांनी समाजवादी युवक दलाच्या मागणीला पाठिंबा दिला होता’ त्या सर्व धर्मनिरपेक्षतावादी पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते व ज्यांनी विरोध केला ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांची धरपकड पोलिसांनी केली. त्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांच्या भगवानदास गुजर, डॉ. गजाभाऊ कुलकर्णी, हिंदू एकता आंदोलनाचे सुनील संकपाळ, बाळासाहेब साळुंखे, बाळासाहेब मोरे, राजा मोदी, अजय लाटकर; तसेच धर्मनिरपेक्षवादी असलेले अनंतराव शिकारखाने, डॉ. अक्षय महंती, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ. शेख काका यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

ज्या दिवशी श्रीमती इंदिरा गांधी या सातार्यात येणार होत्या, त्याच्या आदल्या रात्री सातारा पोलीस स्टेशनमार्फत या कारवाया झाल्या. सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अशोक धिवरे हे काम करत होते. त्यांनी आम्हा सर्वांना ताब्यात घेण्याविषयी पोलिसांना सूचना केल्या होत्या. आदल्या दिवशी रात्री 10 च्या सुमारास मी व पार्थ पोळके पावसाची झिरझिर सुरू असतानादेखील सध्याच्या सातार्यातील कर्मवीर भाऊराव पाटील पथावरील पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या बाहेरील वडाच्या झाडाखाली उभे होतो. त्याचवेळी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या इमारतीतील संवाद आमच्या कानी पडला. तिथे अशी चर्चा चालू होती की, सगळ्यांना उचलले आहे, आता फक्त पोळके सर व विजय मांडके राहिले आहेत! हे शब्द कानी पडताच आम्ही दोघेही आल्यापावली राजवाड्याच्या दिशेने माघारी चालू लागलो. पोळके मला म्हणाले की, ‘तू आणि मी रात्री एका ठिकाणी थांबू आणि सकाळी बरोबर ठरलेल्या वेळी पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करायची आहेत तिथे जमू!’ आणि तिथून आम्ही दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो.
मी जरी समाजवादी युवक दलाचे काम करत होतो तरी, मी उपजीविकेचे साधन म्हणून सातारच्या दैनिक ‘ऐक्य’मध्ये शहर प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्यामुळे मी दुसर्या दिवशी सकाळी पोवई नाक्यावर निदर्शने करायला जाण्याऐवजी राजवाडा येथील जिल्हा माहिती कार्यालयात गेलो. माहिती अधिकारी म्हणून शं. बा. भोसले हे कार्यरत होते. त्यांच्या कार्यालयाच्या वाहनातून आम्ही आताच्या पोलीस परेड ग्राऊंडवर जेथे हेलिपॅड तयार करण्यात आले होते, त्याठिकाणी पोचलो. तेथे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे स्वागत करण्यासाठी बरीच मंडळी जमा झाली होती. वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व पालकमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा पोवई नाकामार्गे शंकराचार्य मठाकडे निघाला. त्यावेळी पत्रकारांची संख्या ही कमी असल्याने सुरक्षा यंत्रणेचा फारसा त्रास झाला नाही आणि मी व जिल्हा माहिती अधिकारी, तसेच एकमेव छायाचित्रकार शंकराचार्य मठात गेलो. तिथे जो प्रसंग मी डोळ्याने बघितला आहे, तो मला आजही जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती ज्या खोलीत नेहमी असायचे, त्या खोलीच्या खिडकीच्या बाहेर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी चक्क फरशीवर बसल्या होत्या. खिडकीबाहेर व शंकराचार्यांच्या खोलीत त्यांचे वरिष्ठ अधिकारी उभे होते. श्रीमती इंदिरा गांधी तिथे आल्याचे व त्या काय बोलू इच्छितात, याची बातचीत त्या दोन अधिकार्यांमध्ये झाली; मात्र शंकराचार्य एका शब्दानेही इंदिरा गांधीजींशी बोलले नाहीत. बराच वेळ वातावरणात शांतता होती. काहीच शब्द बोलले जात नसल्याने ऐकू येण्याचा प्रश्नच नाही. इंदिरा गांधींपासून 20 ते 25 फुटांवर आम्ही उभे होतो. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती इंदिराजींशी बोलत नाहीत आणि इंदिराजींना फरशीवर बसवले आहे, हे मला खटकले. मी शंकराचार्य मठाचे प्रमुख असलेल्यांना याबाबतीत विचारले असता मला जे सांगितले गेले, ते धक्कादायकच होते. ते मला म्हणाले की, “इंदिरा गांधी या विधवा आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार कांचीच्या शंकराचार्यांच्या समोर त्या विधवा असल्याने, जरी त्या पंतप्रधान असल्या, तरी आसनावर बसू शकत नाहीत म्हणून त्यांना फरशीवर बसवले आहे.” शेवटपर्यंत इंदिरा गांधी या तेथे असलेल्या फरशीवर बसून होत्या. जयेंद्र सरस्वती हे त्यांच्याशी काहीही बोलले नाहीत; फक्त त्यांनी आशीर्वादाच्या मुद्रेत आपला हात वर केला आणि तेथून त्यानंतर इंदिरा गांधी उठल्या आणि मठाच्या बाहेर पडून अदालत वाड्यात गेल्या. अदालत वाड्यामध्ये सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले व त्यांच्या परिवाराने त्यांचे राजघराण्याच्या परंपरेनुसार स्वागत केले. इंदिराजींनी तेथील शिवलिंगाचे दर्शनही घेतले व तेथून त्या हेलिपॅडकडे रवाना झाल्या.
मी तेथून माहिती कार्यालयाच्या वाहनातून राजवाड्यावर आलो व शंकराचार्यांच्या मठात घडलेला प्रसंग आमचे समाजवादी युवक दलाचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना सांगावा म्हणून त्यांच्या सदाशिव पेठेतील घरी गेलो. तेथे मला समजले की, पार्थ पोळके हे पोवई नाक्यावर सकाळी इंदिरा गांधींना काळी निशाणी दाखविण्यासाठी गेले असता खिशातून काळे फडके काढून इंदिरा गांधींचा निषेध म्हणायचा अवकाश की, त्यांना पोलीस उपअधीक्षक अशोक धिवरे यांनी अटक केली. मला हादराच बसला; मी पार्थ पोळकेंसोबत निदर्शने करण्यास गेलो असतो, तर शंकराचार्यांनी मठात इंदिरा गांधी यांना विधवा म्हणून फरशीवर बसवले ही गोष्ट उघडकीस आली असती की, नाही कुणास ठाऊक! मी निदर्शने करायला गेलो नाही; मात्र ही धक्कादायक बाब उघडकीस आणू शकलो, यात धन्यता मानली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या घराच्या माडीवर पुण्याहून आलेले ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे पुरंदरे व कुमार जोशी हे दोन पत्रकार तेथे मला भेटले. डॉक्टरांनी त्यांची व माझी ओळख करून दिली. डॉक्टरांना शंकराचार्यांच्या मठातील घटना कधी एकदा सांगेन, असे मला झाले होते. त्यामुळे मी तो प्रसंग त्या पत्रकारांच्या उपस्थितीत डॉ. दाभोलकरांना सांगितला. त्या दोनही पत्रकारांना मी सांगत होतो ती घटना पटत नव्हती, हे मला जाणवत होते. डॉ. दाभोलकरांनी त्यांना माझ्याबद्दलचा विश्वास दिला आणि दुसर्या दिवशी ‘टाईम्स’; तसेच ‘इंडियन एक्सप्रेस’ व ‘महाराष्ट्र टाईम्स’ या वृत्तपत्रांमधून घडलेली घटना प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे मात्र महाराष्ट्रात खळबळ माजली व शंकराचार्यांबाबतचे एक वेगळे मत बनू लागले. त्यानंतर शंकराचार्य सातार्यात अनेक ठिकाणी बोलत होते. आम्ही, समाजवादी युवक दलाच्या कार्यकर्त्यांनी वाईचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या पुढाकाराने शंकराचार्यांशी आमची चर्चात्मक बैठक ठरवली आणि त्यांनी आम्हाला वेळ दिली. आम्ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शंकराचार्यांच्या मठात गेलो. शंकराचार्य बसलेल्या खोलीत जेव्हा आम्ही प्रवेश केला, तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कांची शंकराचार्यांना साष्टांग नमस्कार घातला. तर्कतीर्थांसमवेत आ. ह. साळुंखे, नरेंद्र दाभोलकर, अर्जुन जाधव, किशोर बेडकीहाळ, दिनकर झिंब्रे, पार्थ पोळके व मी होतो. आम्ही जाताना पूर्वीच्या पद्धतीचे दोन टेप-रेकॉर्डर घेऊन गेलो होतो. एक टेप-रेकॉर्डर शंकराचार्य व आमच्यामध्ये सुरूच ठेवला व दुसरा टेप-रेकॉर्डर सुरू असलेल्या अवस्थेत शबनममध्ये माझ्याजवळ ठेवला. दोन्ही टेप-रेकॉर्डर सुरू असतानाच आम्ही येण्याचे प्रयोजन अस्खलित संस्कृतमधून व काही वेळेस हिंदी भाषेतून शंकराचार्यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सांगितले. आम्हाला शंकराचार्यांकडून त्यांची स्त्रीशिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य-व्यवस्था व आरक्षण आदीविषयीची मते जाणून घ्यायची आहेत, असे निवेदन केले. आ. ह. साळुंखे यांनीही काही मुद्दे सांगितले. आमचे विवेचन संपल्यानंतर शंकराचार्यांनी आम्हाला विचारले की, ‘आपका हो गया?’ आम्ही त्यांना ‘हा! हो गया’ असे सांगितले. त्यावेळी कांचीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती समोरच्या टेपकडे बघून म्हणाले की, ‘ये टेप बंद कीजिए कुछ स्मरण के लिए लिखीए।’ त्यावेळी पार्थ पोळके यांनी बाहेर असलेला टेपरेकॉर्डर बंद केला. मात्र शबनममधील टेप तसाच चालू ठेवला. शंकराचार्य त्यावेळी म्हणाले की, ‘टेप बंद किया है ना?’ आम्ही त्यांना एका सुरात टेप बंद केल्याचे सांगितले. त्यांनी पुन्हा एकदा टेप बंद केल्याची खात्री केली आणि त्यांनी त्यांचे विवेचन सुरू केले. ते सुरुवातीसच असे म्हणाले की, ‘हम परंपरावादी है। परंपरासे जो आया है वही हम मानेंगे और करेंगे।’ स्त्रियांना शिक्षण कशाला हवे आहे? स्त्रियांच्या स्वातंत्र्याबाबत देखील त्यांनी परंपरागत मत व्यक्त केले आणि स्त्रियांना स्वातंत्र्य नकोच, असे ठामपणे सांगितले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला. बराच वेळ आमची चर्चा चालली. चर्चा संपल्यानंतर आम्ही उठलो. पुन्हा एकदा तर्कतीर्थांनी व आम्ही त्यांना नमस्कार केला व आम्ही बाहेर पडलो आणि सगळेजण दाभोलकरांच्या घरी आलो. तर्कतीर्थ वाईला गेले व आ. ह. साळुंखे त्यांच्या घरी गेले. दाभोलकरांच्या घरी आम्ही गेल्यानंतर तिथे पुन्हा एकदा शांतपणे मुलाखतीचा टेप ऐकला व आम्ही ठरवले की, टेपरेकॉर्डरवरील चर्चा शब्दबद्ध करायची व त्याचबरोबर चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे आणि अस्पृश्यतेचे व स्त्रियांच्या गुलामीचे समर्थन केल्याबद्दल शंकराचार्यांच्या निषेधाचा फलक मोती चौक येथे लावायचा व निषेधाच्या बातम्या सर्व वृत्तपत्रांत द्यायच्या. त्याप्रमाणे आम्ही निषेधाच्या बातम्या घेऊन स्थानिक वृत्तपत्र असलेल्या दैनिक ‘ऐक्य’च्या कार्यालयात गेलो. दैनिक ‘केसरी’ व ‘महाराष्ट्र टाईम्स’चे प्रतिनिधी सी. एन. शहा व ‘सकाळ’चे बातमीदार पां. वि. खांडेकर यांच्याकडे गेलो व त्यांना निषेध पत्रक प्रसिद्धीसाठी दिले. सुरुवातीस शंकराचार्यांची अशी काही मते असतील, यावर त्यांचा विश्वास बसला नाही. आम्ही त्यांना शंकराचार्यांसोबतच्या मुलाखतीचा टेप आमच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी बातम्या पाठवल्या. दोन दिवसांनी या संबंधित वृत्तपत्रांतून बातम्या आल्या. त्याचबरोबर या वृत्तपत्रांतून बातम्या आल्यानंतर चार दिवसांनी स्थानिक वृत्तपत्रांतून बातमी आली. त्यानंतर मात्र सर्वत्र मोठी खळबळ उडाली. आमच्या निषेधाच्या बातम्यादेखील शंकराचार्यांच्या भक्तांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्या. मजेची गोष्ट म्हणजे आम्ही दिलेल्या बातम्या छापायला का-कू करणार्यांनी आमच्या निषेधाच्या बातम्या लगेच छापल्या. आम्हीही शंकराचार्यांनी अस्पृश्यतेचे समर्थन केल्याच्या निषेधार्थ त्यांचा निषेध करणारा फलक मोती चौकात लावला. त्यानंतरही पुन्हा सातार्यात खळबळ माजली. आम्ही असे ठरवले की, समाजवादी युवक दलाच्या वतीने गांधी मैदानावर शंकराचार्यांच्या निषेधाची जाहीर सभा घ्यायची आणि सभेसाठी पुण्याहून ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव व ‘युक्रांद’चे डॉ. कुमार सप्तर्षी यांना बोलवायचे. त्यांनी येण्याचे मान्य केले आणि आम्ही दि. 21 मे 1981 रोजी गांधी मैदानावर रीतसर सभा जाहीर केली. अर्थातच, आम्हाला त्यावेळी असलेले पोलीस उपअधीक्षक अशोक धिवरे यांनी सभेच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून परवानगी नाकारत असल्याचे सांगितले. आम्ही तरीही सभा घेणारच असे जाहीर केले. त्याच दिवशी आमच्या संघटनेतील आमचे सहकारी दिनकर झिंब्रे यांचे लग्न असल्याने ते उपस्थित राहणार नव्हते. आम्ही संघटनेमार्फत संघटनेचा निर्णय होऊन लग्नाला प्रमोद कोपर्डे व किशोर बेडकीहाळ यांनी जावे असे ठरवले, तर सभेसाठी नरेंद्र दाभोलकर, पार्थ पोळके, विजय मांडके, विलास ढाणे यांनी थांबावे असे ठरले.
गांधी मैदानावर सभेच्या ठिकाणी संध्याकाळी प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. समोरच्या जनसमुदायातही हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्तेआम्हाला दिसत होते. नियोजित वेळी सभेच्या ठिकाणी दाभोलकर हे डॉ. बाबा आढाव व डॉ. कुमार सप्तर्षी यांना घेऊन आले. सभेचे सूत्रसंचालन माझ्याकडेच होते. सभेच्या सुरुवातीला पार्थ पोळके व दाभोलकर यांची भाषणे झाली आणि त्यानंतर कुमार सप्तर्षींनीही त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार अनेक दाखले देत शंकराचार्यांच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करणार्या प्रवृत्तीचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर मात्र सभेत उपस्थित असलेल्या हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सभा मंचकाच्या दिशेने टोमॅटो व अंडी फेकली. सभेच्या ठिकाणी थोडासा गोंधळ झाला. सूत्रसंचालन माझ्याकडे असल्याने मी सभेला उद्देशून शांत राहण्याचे आवाहन करत होतो. थोड्याच वेळात पोलिसांनी गोंधळ करणार्या हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बाबा आढाव भाषणासाठी उभे राहिले व त्यांनी सुरुवातच अशी केली की, “तुम्ही जरी टोमॅटो व अंडी फेकली, तरी आम्ही तुमची अंडी-पिल्ली बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.” त्यांचे भाषण झाले; सभा विसर्जित झाली. दुसर्या दिवशी पुण्याच्या नातूबागेतील दैनिक ‘तरुण भारत’च्या पहिल्या पानावर बातमी होती की, ‘समाजवाद्यांची सभा उधळली, सभेवर अंडी व टोमॅटोचा वर्षाव’, आमचे ईप्सित साध्य झाले होते. जे शंकराचार्य सातार्यात पुढील काळात तळ ठोकून बसणार होते, सभेमुळे दोन-चार दिवसांतच त्यांनी आपला सातारचा गाशा गुंडाळला आणि पंढरपूरमार्गे कांचीकडे रवाना झाले आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करणार्या शंकराचार्यांपासून सातारा वाचला. या आठवणींना उजाळा देत कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य असलेल्या जयेंद्र सरस्वती यांच्याशी संबंधित आठवणींना उजागर करत त्यांना अखेरीस पुन्हा एकदा आदरांजली वाहतो.
‘परिवर्तनाचा वाटसरू’ मधून साभार