भारतातील पहिल्या डॉक्टर म्हणून डॉ. आनंदीबाई जोशी प्रसिद्ध आहेत. आनंदीबाईंनी इंग्लंडला जाऊन डॉक्टरची पदवी घेतली; पण त्या वैद्यकीय सेवा करू शकल्या नाहीत. त्यानंतर डॉ. रखमाबाईंनी इंग्लंडला जाऊन डॉक्टरकीचे शिक्षण घेतले आणि भारतात येऊन 1895 ते 1931 अशी प्रदीर्घ काळ रुग्णसेवा केली. त्यापूर्वी स्त्रीच्या एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याच्या हक्कासाठी त्यांनी पराकोटीचा संघर्ष केला. त्यांचा हा जीवन वृत्तांत…
डॉ. रखमाबाई या हिंदुस्थानातील स्त्री डॉक्टरांच्या पहिल्या पिढीतील डॉक्टर! रखमाबाईंचे संपूर्ण नाव रखमाबाई जनार्दन सावे. त्यांच्या आई जयंतीबाई यांनी डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी पुनर्विवाह केला होता. डॉ. सखाराम अर्जुन राऊत हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रख्यात सर्जन होते.
रखमाबाईंनी त्यांना अनुरूप नसलेल्या पतीबरोबर नांदण्यास नकार दिल्याने त्यांच्या पतीने त्यांच्यावर खटला भरला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या वादळाला धैर्याने तोंड देऊन पुढे इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या तेजस्वी डॉ. रखमाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी दर्शन मोहिनी वर्दे यांनी चरित्रातून घडविले आहे.
रखमाबाईंचा जन्म इ. स. 1864 मध्ये झाला आणि विवाह वयाच्या 11 व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी 1875 च्या सुमारास झाला. विवाहानंतर आठ वर्षांनी रखमाबाई वयात आल्यानंतर दादाजींनी त्यांना आपल्याकडे राहण्यास बोलावले. परंतु रखमाबाईंना ‘आपल्या घरात योग्य प्रतिष्ठेने राहता येणार नाही,’ असे सखाराम अर्जुन यांनी पत्रोत्तर दिले. त्यावर दादाजींनी मुंबई उच्च न्यायालयात रखमाबाई-विरुद्ध दिवाणी दावा दाखल केला. सुशिक्षित आणि सुसंस्कृत रखमाबाईंची पतीकडे जाण्याची इच्छा नव्हती. ‘पती दमेकरी होता’, अशीही एक तक्रार होती. “विवाहित स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध नांदण्यास भाग पाडता येते का व तिने नकार दिला, तर तिला तुरुंगात पाठविणे कितपत न्याय्य आहे,” असे प्रश्न यासंदर्भात उत्पन्न झाले. न्यायालयांत सुनावणी सुरू होण्यापूर्वीच हा खटला लोकमानसात उत्सुकता निर्माण करीत होता. सुनावणीनंतर न्या. पिन्हे यांनी “वादीला अशा प्रकारची बळजबरी करता येणार नाही,” असा निर्णय दिला. या निर्णयाने एकच खळबळ माजली. हिंदूंच्या भावना दुखावणारा व हिंदू कुटुंबव्यवस्थेला बट्टा लावणारा निर्णय दिल्याबद्दल अनेकांनी दोष दिला. या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे अपील करण्यात आले. मूळ दावा फेरतपासणीसाठी परत पाठविण्यात आला. त्यानुसार न्या. फॅरन यांच्यासमोर फेरसुनावणी होऊन (तोपर्यंत न्या. पिन्हे निवृत्त झाले होते) त्यांनी मार्च 1887 रोजी निकाल जाहीर केला.
“वादीची तक्रार रास्त आहे. एक महिन्याच्या आत रखमाबाईंनी वादीच्या घरी राहायला गेले पाहिजे… या हुकुमाची अंमलबजावणी न झाल्यास कोर्टाची अवज्ञा केल्याबद्दल न्यायासनातर्फे सहा महिन्यांची कैदेची शिक्षा भोगायला सिद्ध झाले पाहिजे.”
हिंदू धर्मशास्त्रावर आधारित कायद्याप्रमाणे “शास्त्रोक्त विवाह झालेली एक हिंदू स्त्री आपल्या पतीकडे जाण्याचे नाकारते,” ही शास्त्राची अवज्ञा आहे. कोर्ट या मताचे होते म्हणून रखमाबाई गुन्हेगार ठरल्या. रखमाबाई ही एक मानवी हक्कांची मागणी करणारी व्यक्ती म्हणून तिचा विचार केला जात नव्हता. रखमाबाईंचे कुटुंब, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, स्त्रीशिक्षण, बालविवाह, दादाजी आणि त्यांचा समाज, वातावरण यांचा परस्परसंबंध लक्षात घेतला जात नव्हता. ज्या विचित्र परिस्थितीत रखमाबाई सापडल्या होत्या, त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन्ही ठिकाणी अनेकांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली.
रखमाबाईंना त्यांच्या घरातून व नातेवाईकांकडून पूर्ण पाठिंबा होता. परंतु अखेर कैद भोगावी लागली, तर ती त्यांना एकट्यांनाच भोगावयाची होती. या वेळेला त्यांनी असामान्य मनोधैर्य दाखविले. त्यांची, त्यांच्या आईची, त्यांच्या आजोबांची ताटातूट होणार होती. कारावासाचा कलंक जन्मभर बाळगावा लागणार होता. कैदेत विकासाचे सर्व दरवाजे बंद होणार होते. भविष्याचे कोणतेच आडाखे बांधता येणार नव्हते, तरीही रखमाबाईंनी आपल्या वकिलामार्फत कोर्टाला निक्षून सांगितले की, वादीच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहायला जाण्याऐवजी आपण कैदेची शिक्षा भोगायला तयार आहोत.
एकूण चार वर्षांची मानसिक ससेहोलपट रखमाबाईंनी सहन केली होती. “आपण अधिक शिकून उपयुक्त जीवन कंठावे,” या ध्येयाच्या आड येणारा विवाह त्यांनी नाकारला. वडिलांच्या मृत्यूमुळे नैतिक पाठिंबा संपला. आर्थिक बाजू लंगडी पडली. तरी त्या अगतिक झाल्या नाहीत. ज्या जमिनीवर त्या उभ्या होत्या, ती जमीन कायद्याने हादरवून टाकली, तरीही ‘समान दर्जाच्या स्त्री-पुरुष संबंधातील विवाहच फक्त सुखकारक असू शकेल व तोच आपण बंधनकारक मानावा,’ या भूमिकेपासून त्या तसूभरही हलल्या नाहीत. त्यांनी खंबीरपणे कैदेचा पर्याय स्वीकारला.
18 फेबु्रवारी 1887 रोजी इंग्रज मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात रखमाबाईंनी लिहिले आहे, “आपल्या जातीत शिकलेली मुले मिळत नव्हती म्हणून माझे या साधारण शिकलेल्या होतकरू मुलाशी लग्न लावले. या मुलाच्या पुढच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आमच्या शिरावर घेतली होती; फक्त त्याने व्यवस्थित शिकावे एवढी अपेक्षा होती… मी शिकता येईल तेवढे शिकत गेले. समाजसुधारकांशी एकसारखा संबंध येत गेल्यामुळे जसजसे माझे शिक्षण वाढत गेले, तसतसे हिंदू स्त्रियांसाठी काहीतरी करावे, असे फार वाटू लागले. याच्या उलट माझे ज्याच्याशी लग्न झाले होते, त्याच्या वाईट सवयी, व्यसने व आळशीपणा बघून त्याच्याकडे राहायला पाठवायचे नाही, असे माझ्या वडिलांनी ठरविले. त्यानेही त्याबाबत विशेष औत्सुक्य दाखविले नाही… परंतु आमच्या जातीतील काही पुढार्यांनी व दुष्ट माणसांनी जुनी भांडणे उकरून काढून त्याला चिथवले आणि त्याने दावा केला….”
व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्याकरिता रखमाबाईंनी आपले सर्वस्व पणाला लावले. रखमाबाईंच्या आयुष्यात या निकालामुळे प्रचंड स्थित्यंतर घडले होते. रडून अश्रू ढाळण्याचाही अधिकार त्यांना राहिला नव्हता! निरनिराळ्या वर्तमानपत्रांतून त्याचे प्रतिध्वनी उमटले. ‘झाली गोष्ट योग्यच झाली,’ असे काहींना वाटले. ‘खटला निर्णयाप्रत नेणे मनुष्यबुद्धीला अशक्य आहे,’ असे 5 मार्चच्या ‘बॉम्बे गॅझेट’ने म्हटले, तर ‘हिंदू नीतिशास्त्राचा इंग्रज कायद्याने योग्य तो मान ठेवला. आमची जीत झाली. इंग्रजांनी नांगी टाकली. आता आम्ही आमचे कायदे हवे असल्यास बदलू’, अशी प्रतिक्रिया 5 मार्च 1887 रोजी ‘नेटिव ओपिनियन’ने व्यक्त केली.
या अगोदरच सरकारने मलबारींच्या सूचना अमान्य केल्या होत्या. हिंदूंच्या अंतर्गत व्यवस्थेत कोणतेही बदल न करण्याचे पक्के ठरवले होते. ‘रखमाबाई संरक्षण समिती’ची स्थापना झाली. या समितीचे अध्यक्ष एल्फिन्स्टन कॉलेजचे प्रिन्सिपल एम. वर्डस्वर्थ होते. न्या. महादेव गोविंद रानडे, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, तय्यबची, सदानंद भांडारे या व्यक्तींना समितीने सहकार्यासाठी पाचारण केले.
रखमाबाईंनी असाच कायद्याला शह देत राहावा म्हणून कितीतरी पत्रे, पत्रके रोज प्रसिद्ध होत होती. गुन्हा जर हिंदू विवाहशास्त्राच्या कक्षेतला होता, तर त्याला शिक्षा इंग्रज कायद्याने करणे हे कितपत संयुक्तिक होते, हाही प्रश्न होताच. रखमाबाईंच्या बाबतीत अनेक संवेदनक्षम मनेही कंपित झाली होती. त्यातील काहींनी स्वत:च्या अंत:करणातील क्षोभ आपापल्या परीने व्यक्त केला होता. उचंबळून येणारे भावनेचे कढ शब्दांतून, कवितेतून, पत्रांतून प्रकट होत गेले. हे मृदू रखमाबाईंच्या जळणार्या मनावर फुंकर घालणारे होते, त्यांच्यावर अपार सहानुभूतीचा वर्षाव करणारे होते.
‘रखमाबाई संरक्षण समिती’ची उद्दिष्टे काही प्रमाणात साध्य झाली. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये या प्रश्नावर आवाज उठला व इंग्लंडमधून रखमाबाईंकरिता सहानुभूतीचा ओघ वाढला. 7 जून 1887 रोजी रखमाबाईंना सहानुभूती व्यक्त करणारी दोन पत्रे प्रसिद्ध झाली. एक पत्र स्कॉटलंडमधील ‘पर्थ’ शहरातून आले होते. त्यावर 105 स्त्रियांच्या सह्या होत्या. ‘आम्ही स्कॉटलंडमधील स्त्रियांनी तुमचा खटला ऐकला. तुमचं दु:ख, तुमच्या आशा-आकांक्षा यामध्ये आम्ही सहभागी आहोत. पुरुषांच्या गुलामगिरीत राहण्यापेक्षा व स्वत:चा अपमान करून घेण्यापेक्षा कैदेचा मार्ग तुम्ही स्वीकारलात, याचा आम्हाला अभिमान वाटतो… दुष्टपणाविरुद्ध आवाज उठवून तुम्ही अन्यायाविरुद्ध झगडणार्या स्त्रियांचे मनोधैर्य उंचावले आहे… आजपर्यंत शतकानुशतके हिंदुस्थानातील स्त्रियांच्या कपाळी अज्ञान, गुलामगिरी आली आहे व आता नवा दिवस उजाडतोय, हे पाहून आम्हाला आनंद झाला आहे.’ रखमाबाईंचा प्रश्न वैयक्तिक नव्हता, स्त्रीदास्य विमोचनात रस घेणारी जेवढी जिवंत मने होती, त्यांना या प्रश्नाने हलवले होते.
दादाजी विरुद्ध रखमाबाई या मूळ खटल्यातूनच पुढे आणखी एक प्रकरण उद्भवले. रखमाबाईंनी लिहिलेले निवेदन प्रसिद्ध केल्याबद्दल ‘बॉम्बे गॅझेट’चे संपादक ग्रेटन गॅरी, रखमाबाई आणि इतरांवर फौजदारी खटला दाखल झाला. मूळ दाव्यातील कैफियतीत दादाजींच्या कुटुंबीयांवर या निवेदनात केलेले काही आरोप खरे असण्याची शक्यता समोर आली आणि फौजदारी खटला खारीज झाला. पुढे मूळ दिवाणी दाव्यात 5 जुलै 1888 रोजी तडजोड होऊन खटल्याच्या खर्चाबद्दल रखमाबाईंनी दादाजींना दोन हजार रुपये द्यावेत व दादाजींनी रखमाबाईंवरचे पती म्हणून असलेले सर्व हक्क सोडून द्यावेत, असे ठरले आणि प्रकरण संपले.
या खटल्यानंतर रखमाबाई इंग्लंडला गेल्या. इंग्लंडमध्ये सर वॉल्टर मेक्लरेन व लेडी मेक्लरेन यांनी रखमाबाईंना स्वत:च्या घरी ठेवून घेतले. लंडनमधील बुद्धिवादी व पुरोगामी मताच्या व्यक्तींच्या वर्तुळाशी रखमाबाईंचा जवळून संबंध आला.
त्या काळात इंग्लंडमध्येही समाजसुधारणांची लाट उसळली होती. नव्या विचारसरणीच्या लोकांना स्वतंत्र विचारवादी – फ्री थिंकर्स असे म्हटले जात होते. स्त्रियांच्या मताधिकाराच्या चळवळीसाठी मॅक्लेरननी आघाडी उघडली होती; तर स्त्रियांच्या संस्थांतून त्यांच्या पत्नी इव्हा मॅक्लेरननी आघाडी उघडली होती. ‘मनुष्यजन्माचे सार्थक’ या विषयावर एका संस्थेत इव्हा मॅक्लेरन यांचे भाषण झाले. रखमाबाई या भाषणाला गेल्या होत्या. त्या भाषणात इव्हा मॅक्लेरन म्हणतात, ‘एखाद्या स्त्रीला वक्तृत्वाची देणगी असेल, एखादीला लेखनाची, एखादीला चित्रकलेची, म्हणून जिला जे जमते ते तिने मनापासून करावे व समाजसुधारणेला त्यायोगे हातभार लावावा. ज्या विषयाची आवड सर्वांत जास्त असेल, त्या विषयात आपण उत्तम कार्य करू शकतो. स्त्रीच्या कार्यशक्तीला कितीप्रकारे वळवता येते, याचा प्रत्यय समाजाला यायचा आहे.’
स्त्रीच्या कार्यशक्तीचा प्रत्यय समाजाला देण्याच्या इच्छेने अंतर्बाह्य प्रेरित होऊन ज्या स्त्रियांनी महाराष्ट्रात विशेष कार्य केले, त्यातील रखमाबाई या एक होत्या. काळाच्या भविष्यकालीन बलवान आणि व्यापक प्रवृत्ती ओळखून त्यांनी वैद्यक व्यवसाय हे कार्यक्षेत्र निवडले होते. आपल्या बौद्धिक विकासातून समाजाच्या उन्मनाचा मार्ग त्यांनी चोखाळला. रखमाबाईंनी आपल्या ध्येयावर अविचल दृष्टी ठेवून अभ्यास केला.
ऑक्टोबर 1890 मध्ये त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसीन फॉर विमेन’ या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आपल्या प्रेमळ पालकांना सोडून त्या ‘कॉलेज हॉल’ या वसतिगृहात राहायला गेल्या. वसतिगृहात रखमाबाईंनी चार वर्षेकाढली. 1894 मध्ये त्यांनी वैद्यक व्यवसायातील शेवटची परीक्षा दिली. पदवी परीक्षेला त्यावेळी स्कॉटलंडला जावे लागे. रखमाबाई शेवटची पदवी परीक्षाही उत्तम तर्हेने उत्तीर्ण झाल्या. एल.आर.सी.पी. अॅण्ड एस. या पदव्यांची बिरुदावली नावापुढे लागल्यावर सनदशीरपणे इंग्लंडच्या मेडिकल रजिस्टरमध्ये त्यांचे नाव दाखल झाले. तेथून 7 सप्टेंबर 1895 रोजी त्यांनी मुंबईच्या कामा हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसरच्या पदाकरिता अर्ज केला. त्या अर्जातील शेवटचे वाक्य त्यांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकते. ‘माझ्या जन्मभूमीमध्ये वैद्यकीय व्यवसायात काम करण्याची माझी तीव्र इच्छा आहे, हे आपण मुंबईच्या माननीय गव्हर्नर साहेबांना कळवावे.’ रखमाबाईंचा जगण्याचा उद्देश इंग्लंडने साध्य करून दिला. रखमाबाईंच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला.
इंग्लंडमध्ये विद्यार्थी दशेत असताना रखमाबाईंचे स्वदेश प्रेम अविकृत राहिले. लंडनमध्ये सार्वजनिक जीवनात त्या अधून-मधून चमकल्या. स्त्रियांच्या सभांतून भाषणे केली. हिंदुस्थानातील स्त्रियांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडली. वाजवीपेक्षा एक पळभरही त्या जास्त परदेशात राहिल्या नाहीत. येथील मातीशी असणारे रक्ताचे नाते कितीही घाव पडले, तरी विसरले गेले नाही. डॉक्टरी व्यवसायामुळे दुबळ्या माणसांबद्दल त्यांचे हृदय सतत करुणेने भरून येत राहिले. त्यांच्या सौख्याकरिता स्वत:ला जे-जे शक्य असेल, ते-ते त्या करीत राहिल्या. स्त्रियांकरिता त्या विशेष झटल्या. विरोधी परिस्थितीशी झगडणार्या स्त्रियांना त्यांनी संकटात सहाय्य केले. कित्येकांच्या आयुष्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. शिक्षणाला त्यांच्या हृदयात एक स्वतंत्र स्थान होते.
1894 साली रखमाबाई परतण्यास निघाल्या. त्यावेळी ‘वुमन्स सिग्नल’ने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत पत्रकार हॅना स्मिथ म्हणते, “या क्षणी हिंदुस्थानातून आलेल्या रखमाबाईर्ंखेरीज इंग्लंडमध्ये दुसर्या कोणत्याही व्यक्तीबद्दल इतके कुतूहल नाही. रखमाबाई हिंदुस्थानातील इतर स्त्रियांप्रमाणे लहानखुरी, विनयशील, पौर्वात्य स्त्रियांचे असे खास सौम्यपण ल्यालेली असूनही तिच्यात धारिष्ट्य आहे, आव्हान स्वीकारण्याची जिद्द आहे. अशी धैर्यशाली स्त्री मी कधीच पाहिली नाही. ज्या देशाच्या सामाजिक, धार्मिक परंपरा इतक्या दृढ, पुरातन व चिवट आहेत, त्या देशाच्या शतकानुशतकांच्या सामाजिक व धार्मिक रुढींच्या शृंखला तोडण्याचे सामर्थ्य समाजात पैसा आणि प्रतिष्ठा असलेल्या एखाद्या पुरुषालाही जवळजवळ अशक्य आहे. ती गोष्ट जिला दुर्दम्य विश्वासाखेरीज कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहता आले नाही, अशा स्नेहशील शालीन मुलीने करून दाखवावी, हे अशक्यप्राय वाटते आणि तरी ते नेमके रखमाबाईंना साधले आहे.”
मुलाखतीत रखमाबाईंच्या लढ्याचा साद्यंत इतिहास थोडक्यात दिला आहे. रखमाबाई इंग्लंडमध्ये महाराष्ट्रीय पद्धतीची स्वच्छ काठपदरी नऊवारी लुगडी नेसत असत. त्यामुळे हॅनाला भारतीय स्त्रीच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेचे कुतूहल वाटले. हॅना स्मिथ पुढे म्हणते “… मला हे सारे रखमाबाईंनी सांगितले आहे. खटल्याच्या सुनावणीच्या वेळची तिची मन:स्थिती शब्दांत सांगणे अशक्य आहे. रोजच्या रोज तिला भयंकर अपमानकारक दिव्यातून जावे लागत आहे. तिच्या जवळच्या नातेवाईकांच्या सहानुभूतीखेरीज तिला कुणाचा आधार नव्हता. स्वत: पूज्य मानलेल्या मूल्यांवर तिची श्रद्धा होती, एवढे तिचे बळ होते. तिच्या जातीतील, समाजातील लोक तिला घालून-पाडून बोलत असत, टोमणे मारत, शिव्याशाप देत; प्रसंगी दगड मारावयासही त्यांनी कमी केले नाही. या संकोची मुलीला काय यातना झाल्या असतील?”
या मुलाखतीत हॅना स्मिथने रखमाबाईंचे हृदयस्पर्शी चित्र काढले आहे. ‘एवढ्या अटीतटीने मिळविलेल्या स्वातंत्र्याचे रखमाबाईंनी चीज केले. परकी भाषा, परके शिक्षण, परक्या देशात पदोपदी येणार्या अडचणींवर तिने मात केली आहे…. येत्या डिसेंबरमध्ये हिंदुस्थानातील स्त्रियांच्या उन्नतीकरिता झटण्याचे तिचे ध्येय गाठण्याच्या इच्छेने ती हिंदुस्थानात परत जात आहे. ती डॉक्टर बनून चालली आहे.’
या मुलाखतीत रखमाबाईंनी आपल्या जीवनाची भूमिका स्पष्ट केली आहे. येथून पुढे त्यांना समाजासाठी उपयुक्त जीवन जगण्याची इच्छा होती.
24 डिसेंबर 1895 रोजी त्या हिंदुस्थानात परत आल्या. अत्यंत विभिन्न परिस्थितीतून रखमाबाईंनी प्रवास केला. लोकनिंदेला पात्र झालेली, तुरुंगाच्या उंबरठ्यापर्यंत पोचलेली, बेअब्रूच्या आगीत पोळलेली, ना धड सधवा ना विधवा, आंधळ्या न्यायदेवतेचा दरवाजा ठोठावणारी, एकोणीस वर्षांची, अशिक्षित रखमाबाई कोठे आणि बुद्धिवाद्यांच्या मेळाव्यात आपल्या प्रभेने चमकणारी, नेत्यांकडून गौरविलेली, परदेशगमनाने अनुभव समृद्ध झालेली, आत्मविश्वासाने वावरणारी, पीडितांना देवदूतासमान वाटणारी डॉ. रखमाबाई कोठे!
रखमाबाईंनी स्त्रीजातीसमोर फार मोठा आदर्श घालून दिला. स्त्रियांना स्वत:च्या उन्नतीकरिता कोणापुढेही हात पसरायची गरज नाही, हे त्यांनी सिद्ध केले. हजारो वर्षांच्या अदृश्य शृंखला स्वत:च्या मन:सामर्थ्यावर तोडण्याचे अद्भुत कार्य त्यांनी करून दाखविले. स्त्रीशिक्षणाचे महत्त्व स्वत:च्या जीवनादर्शाने समाजाला पटवून दिले. पुढचा मार्ग मोकळा केला. नव्या वाटा पाडणारी माणसे असामान्य म्हणून गणली जातात. रखमाबाई अशांच्या जातीतल्या होत्या. आपल्या अपूर्व लढ्यात त्यांनी स्त्रीजातीची मान सतत उंच ठेवली, शान वाढविली.
रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. 16 फेब्रुवारी 1895 रोजी कामा हॉस्पिटलला हाऊस सर्जन म्हणून रखमाबाईंची नेमणूक झाली. सहा महिन्यांनंतर त्यांना सुरतच्या हॉस्पिटलवर जाण्याची संधी मिळाली. मुंबईपासून दूर जाणे काही दृष्टींनी सोयीचे होते. त्यांच्या कर्तृत्वाला तेथे अधिक वाव मिळणार होता. रखमाबाईंनी व्यवसायाच्या सुरुवातीलाच सबंध हॉस्पिटलचे काम अंगावर घेतले. रखमाबाईंना सुरतेच्या हॉस्पिटलमध्ये आपले ध्येय पूर्ण करण्याची संधी मिळाली. सुरतचे हॉस्पिटल म्हणजे रखमाबाईंचे एक अपत्यच होते. सुरतेच्या माळवी हॉस्पिटलवर मेडिकल ऑफिसर म्हणून 1 नोव्हेंबर 1895 रोजी रखमाबाईंची नेमणूक झाली. मात्र आज हे हॉस्पिटल ‘रखमाबाई हॉस्पिटल’ म्हणून ओळखले जाते.
डॉ. रखमाबाई सुरतेला गेल्या आणि सुरतेच्या सामाजिक जीवनावर त्यांनी आपला कायमचा ठसा उमटवला. ‘सुरत सोनानी सुरत’ या गुजराती पुस्तकात सुरतमधील कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय दिला आहे. त्यात रखमाबाईंचा गौरव केला आहे.
माळवी हॉस्पिटलची इमारत 1895 मध्ये उभी राहिली. हॉस्पिटलच्या वास्तुशांतीनंतर एक विचित्र संकट उभे राहिले. नव्या इमारतींबाबत लोकांच्या मनात साशंकता होती. स्त्रिया पेशंट येत, तपासून घेत व निघून जात. बाळंतपणासाठी तिथे राहण्याची कोणाची तयारी नव्हती. न जाणो, नव्या जागेचा गुण-अवगुण लागला आणि बाळ-बाळंतिणीवर काही बला आली तर…? रखमाबाईंनी एक व्यावहारिक सोपा उपाय शोधून काढला. हॉस्पिटलच्या आवारात एक गाभण बकरी चरताना त्यांनी पाहिली होती. त्या बकरीचे बाळंतपण रखमाबाईंनी हॉस्पिटलमध्ये केले. बकरी व्याली. पिले सुखरूप निघाली. ही बातमी रखमाबाईंनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली व स्त्रियांना बाळंतपणासाठी येण्यास विनंती केली. रखमाबाईंच्या या कृतीचा चांगला उपयोग झाला. भाबड्या स्त्रियांच्या मनातील शंका विराम पावल्या. निश्चिंत मनाने स्त्रिया बाळंतपणासाठी येऊ लागल्या.
1896 मध्ये प्लेग व 1897 मध्ये दुष्काळाने समाज जीवन ग्रासून टाकले. रखमाबाई दोन वर्षे रुग्णसेवेत झटल्या. त्यांना या कामगिरीबद्दल ‘कैसर-ए-हिंद’चे चांदीचे पदक दिले गेले. बाळंतपणासाठी येणार्या स्त्रियांसोबत त्यांची लहान मुले असत. त्यावेळी चाळीस दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागे. रखमाबाईंनी ‘माळवी बालकमंदिर’ स्थापन केले. रखमाबाईंनी स्वत:च्या परिचयाच्या घरंदाज स्त्रियांना या कार्यात खेचले. पुढे काही वर्षांनी ‘वनिता विश्राम’ ही प्रसिद्ध स्त्री संस्था स्थापन झाली.
रखमाबाईंचा सुरतेतील काही सामाजिक संस्थांशी घनिष्ठ संबंध आला. 1907 साली सुरतेत प्रांतीय काँग्रेस भरली होती. त्यावेळी काँग्रेसला लागूनच ‘अखिल भारतीय महिला परिषद’ भरविण्याचा प्रघात होता. रखमाबाई त्या वेळेस स्वागत समितीच्या चिटणीस होत्या.
रखमाबाईंचे सुरत येथील घर अडल्या-नडल्या स्त्रियांना विसावा होते. तसेच महाराष्ट्रीयांचे जमण्याचे एक ठिकाण होते. 8 ऑगस्ट 1917 साली त्यांनी आपल्या मेडिकल ऑफिसर पदाचा राजीनामा दिला. 1918 मध्ये राजकोट येथील रसूलकालजी जनाना हॉस्पिटलवर सौराष्ट्र आणि कच्छ प्रांताचे प्रमुख डॉक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली. येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली, नर्सिंग कोर्स सुरू केला. 1931 नंतर निवृत्तीचे शांत जीवन जगू लागल्या. त्याही वेळी अस्पृश्यता निवारणाचे काम गती घेतलेले दिसते. अखेर 25 डिसेंबर 1955 मध्ये त्यांचा जीवनसंघर्ष कायमचा थांबला.
रखमाबाईंना 91 वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य मिळाले. आयुष्यात त्यांना अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले; तसेच मान-पान, सत्कारही खूप मिळाले. आयुष्याच्या सुरुवातीलाच गाजलेला खटला, अत्यंत धैर्याने त्यामधून रखमाबाईंनी काढलेला मार्ग, इंग्लंडमध्ये घेतलेले वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय कार्य करताना अशिक्षित पेशंटस्च्या अनुभवातून असंख्य अडचणीतून मार्ग काढत केलेले समाजकार्य या सार्या संकटांना रखमाबाई पुरून उरल्या. तत्कालीन समाज, चाली-रिती, परंपराग्रस्त मानसिकता सारे सहन करत त्यांना वाटचाल करावी लागली. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जात रुग्णांच्या सेवेत आयुष्य व्यतीत केले. त्यांचे जीवनचरीत्र मोहिनी वर्दे यांनी रेखाटले आहे.

या चरित्रग्रंथात अनुक्रमणिकेनंतर रखमाबाईंचे, त्यांच्या आप्तेष्टांचे, दवाखान्याचे फोटो दिलेले आहेत. परिशिष्टामध्ये रखमाबाईंनी त्यांच्या वडिलांनी लिहिलेली वेगवेगळ्या विषयांवरील पत्रे, काही नोंदी, पुस्तकांची नावे व माहिती, रखमाबाईंच्या घराण्याचा वंशवृक्ष आणि त्यांच्यावरील मृत्युलेख यांचा समावेश केला आहे. रखमाबाईंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविले आहे. रखमाबाईंनी स्वत:विषयी फारसे काही लिहून ठेवलेले नाही. तथापि, रखमाबाईंना ओळखणार्या व्यक्ती, त्यांचे नातेवाईक, तत्कालीन वृत्तपत्रे यांच्या सहाय्याने रखमाबाईंच्या जीवनातील घटना सत्यासत्यतेच्या दृष्टीने पारखून घेऊन हे चरित्र रेखाटले आहे.
एकोणिसाव्या शतकातील सामाजिक परिस्थिती, परावलंबी स्त्रीजीवन, सामाजिक बंधने ध्यानात घेता रखमाबाईंच्या असामान्य जीवनातील वेगळेपण जाणवते.
स्त्री हक्कासाठी झगडलेल्या पहिल्या स्त्री डॉक्टर रखमाबाईंना शतश: प्रणाम.
लेखिका संपर्क ः मोबा. 9850128612