Categories
कव्हर स्टोरी

विज्ञाननिष्ठेचा कळसस्टीफन हॉकिंग

एप्रिल - २०१८

धर्मावर आधारित विश्वरचनेची कल्पना विज्ञानाच्या प्रकाशात चुकीची ठरत असेल, तर धार्मिक नेत्यांनी तसं मान्य करायला हवं; पण धर्म आपला हटवादीपणा सहसा सोडत नाही. धार्मिक सत्तेचा जनमनावरील प्रभाव कायम राहावा, या हेतूने संबंधित सत्ताधारी मग विचारवंतांना आणि वैज्ञानिकांना आदेश देतात. असाच आदेश 1964 मध्ये पोपने पाश्चिमात्य वैज्ञानिकांना काढला. त्यांनी शास्त्रज्ञांची बैठक बोलावून सर्वांना इशारा दिला की, विश्वनिर्मितीच्या क्षणाचा विचार आणि संशोधन करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण तो क्षण ईश्वराच्या मालकीचा असतो. या बैठकीला स्टीफन हॉकिंग हजर होते. त्यांनी विश्वनिर्मितीबद्दल अगोदर केलेले भाषण पोपनी ऐकले होते. पण त्याचा आशय पोपना कळलाच नाही. या प्रसंगाबाबत पुढं स्टीफन हॉकिंगने उपरोधिक स्वरात उद्गार काढले- ‘माझं भाषण जर पोपना कळलं असतं, तर ब्रूनोनंतर 300 वर्षांनी जन्मलेल्या मलाही त्यांनी ब्रूनोप्रमाणे जिवंत जाळले असते.’ (गॅलिलिओच्या पूर्वी विश्वरचनेबद्दल, बायबलमध्ये लिहिलेल्या कल्पनांविरोधात ब्रूनोने नवी विश्वरचना सांगितली म्हणून धर्मसत्तेने त्याला जिवंत जाळले होते.)

ईश्वरी कल्पनेशिवाय विश्वनिर्मितीची संकल्पना निर्भयपणे मांडणारे महान खगोल सैद्धांतिक वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचे नुकतेच 14 मार्च रोजी वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा, असं जीवन ते जगले. ‘Science is not only a disciple of reason but also one of romance and passion’ स्टीफन हॉकिंगच्या विज्ञानाबाबतच्या या उद्गाराप्रमाणेच बौद्धिक आनंदात विहरत असताना ते स्वत: तितकेच रोमँटिक आणि भावपूर्ण कौटुंबिक जीवनही जगले. आचार्य अत्र्यांच्या शैलीत म्हणायचं तर स्वत:च्या वेदनेवर स्वार होऊन अवघ्या विश्वात बुद्धीने लीलया विहार करणारा असा विचारवंत मागे कधी झाला नाही व यापुढेही होण्याची शक्यता नाही. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करूया.

निर्भय हॉकिंग

अवैज्ञानिक सिद्धांत लादू पाहणार्‍या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची 300 वी पुण्यतिथी ठरलेला 8 जानेवारी 1942 हा हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि 14 मार्च हा महान सैद्धांतिक वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्मदिन हा हॉकिंग यांचा मृत्युदिन. हा जरी योगायोग असला, तरी सर्वसामान्यांना नवल वाटावे अशाच या घटना आहेत. आईन्स्टाईन यांचा सापेक्षता सिद्धांत बहुतांश लोकांना कुठे कळतो? तरी सुद्धा आईन्स्टाईनबद्दल सर्वसामान्यांना प्रचंड आदर वाटतो. हॉकिंगच्या कृष्णविवराचा सिद्धांतही आपणास कुणाला कळाला असेल, असं वाटत नाही. त्यांचा ‘द ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’ हा प्रसिद्ध ग्रंथही आपल्या डोक्यावरून जातो. तरीसुद्धा हॉकिंगच्या मृत्यूने जग हळहळले. याचं कारण काय असावं? याचं कारण आहे हॉकिंग यांचं शूर वीरासारखं निर्भय जगणं. 21 व्या वर्षी त्यांना असाध्य आजारानं गाठलं. डॉक्टरांचा अंदाज होता ते फार तर दोन-चार वर्षांचे सोबती; पण पुढची 50 वर्षे ते विश्वाच्या उत्पत्तीचा व काळाचा शोध घेत राहिले. मृत्यूला थांबवून कृष्णविवरांना शोधत राहिले. देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करीत राहिले. विकलांग अवस्थेत आपण सर्वसामान्यजन देवाला शरण जातो. स्टीफनचे सर्व शरीर लुळे पडले, तरी मेंदू सजग होता; फक्त एक बोट हलत होते. त्या बोटाने ते देवाला इशारा देत राहिले. ‘हे विश्व कोणी निर्माण केले? केव्हा निर्माण केले? लोक म्हणतात, देवाने निर्माण केले. मी विचारतो, त्याच्याशिवाय हे विश्व निर्माण होणे शक्य आहे काय?‘ या प्रश्नाचा व्हीलचेअरवरून, संगणकाच्या सहाय्याने 50 वर्षे ध्यास घेऊन हॉकिंगनी उत्तर शोधले- ‘विश्वनिर्मितीला देवाची गरज नाही.’

ऑक्सफर्डमधील वास्तव्यात

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे स्टीफनचा जन्म झाला. फ्रँक आणि इसोबेल हॉकिंग या दांपत्याचे स्टीफन हे पहिले अपत्य. इसोबेल ही तत्त्वज्ञानाची अभ्यासक, तर फ्रँक हे जैवविज्ञानाचे संशोधक. ज्ञानाची आस असलेल्या या कुटुंबाचा वारसा स्टीफनलाही मिळाला. पुस्तके वाचण्यात हे कुटुंब इतके गुंतून गेलेले असायचे की, समोर आलेला जेवणाचा डबा बर्‍याचदा तसाच राहून जाई. सेंट अल्बान्स स्कूलमध्ये स्टीफनने प्रायमरी व माध्यमिक शिक्षण घेतले. त्याचे मित्र त्याला गमतीने आईन्स्टाईन म्हणत; पण शाळेत त्याने बुद्धीची फारशी चमक दाखविली नाही. शाळेमध्ये मित्रांबरोबर स्टीफन विविध खेळ खेळणे, शोभेचे फटाके आणि शोभेच्या दारूकामाची साधने बनविणे; तसेच बोट आणि विमानाची मॉडेल बनविणे या छंदात वेळ घालवी. त्याचबरोबर ख्रिश्चन धर्म आणि अतींद्रिय शक्ती याबाबतही मित्राबरोबर दीर्घ गप्पा मारी. आपल्या गणिताच्या शिक्षकाच्या मदतीने या मित्रांनी घड्याळाचे पार्ट्स, जुना टेलिफोन स्वीचबोर्ड आणि इतर टाकाऊ वस्तू वापरून एक संगणकही बनविला होता. पण शालेय वयात यंत्र-तंत्र आणि आध्यात्मिकता यांचा जेवढा संबंध हॉकिंगला आला तेवढाच. पुढे आयुष्यभर तो विश्वाच्या रचनेचे सैद्धांतिक ज्ञान घेण्यात गुंगून राहिला. गणिताचे शिक्षक डायक्रन टाहटा यांच्यामुळे स्टीफनला गणिताची गोडी लागली आणि भविष्यात गणित शिकण्याची इच्छा त्यांच्यामुळे प्रबळ झाली; पण माणसाच्या आयुष्यात बर्‍याचदा मनासारखं घडण्याऐवजी वेगळ्याच मार्गानं प्रवास करावा लागतो. स्टीफनही याला अपवाद नव्हता. स्टीफनच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने वैद्यक क्षेत्रात संशोधन करावे आणि ऑक्सफर्ड सोडू नये. गणित विषयाला नोकरीच्या संधी कमी; उलट वैद्यकाला भरपूर वाव, असं वडिलांचं म्हणणं. आपल्याकडेही मुलानं हल्ली डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं, अशीच स्वप्नं पालक मुलावर लादतात. तसाच प्रकार स्टीफनबाबतही घडू शकला असता; पण स्टीफनने वैद्यक शिकण्याला नकार दिला. मात्र गणित शिकण्याची सोय ऑक्सफर्डमध्ये नव्हती. मग वडिलांच्या दुसर्‍या इच्छेनुसार ऑक्सफर्डला राहण्याचे मान्य करून स्टीफनने रसायन व भौतिक विषयाचे शिक्षण घ्यायला मान्यता दिली.

पदवी शिक्षण

युनिव्हर्सिटी कॉलेज ऑक्सफर्ड येथे स्टीफनच्या कुशाग्र बुद्धीची चमक स्पष्ट होऊ लागली. वयाच्या 17 व्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तो या कॉलेजात रसायन व भौतिकशास्त्राचा विद्यार्थी म्हणून दाखल झाला. रॉबर्ट बर्मन या त्यांच्या शिक्षकांनी स्टीफन इतरांच्या मानाने एखाद्या प्रश्नाचे उत्तर स्वतंत्ररित्या सर्वांअगोदर कसा मिळवी, याची आठवण सांगितली आहे. इतरांपेक्षा वेगळ्या गुणांची चुणूक दाखवायला स्टीफनने कॉलेजच्या दुसर्‍या वर्षांत सुरुवात केली. तो सर्वांमध्ये प्रिय आणि चतुर ठरला. संगीत आणि विज्ञान काल्पनिका याचा त्याला छंद लागला. कॉलेजच्या क्लबमध्ये तो बोट क्लबचा सभासद झाला. बोटीच्या वेगवान हालचाली करण्याचे धाडस करणारा हिरो म्हणून तो प्रसिद्ध झाला. अशा धाडसात बोटींचे नुकसानही त्याच्याकडून होत असे.

केंब्रीजला प्रयाण

स्टीफनचं खरं स्वप्न होतं गणितात संशोधन करण्याचं. याचबरोबर अवकाशशास्त्रातही त्याला रुची होती; पण ऑक्सफर्डला ही सोय नव्हती. ऑक्सफर्डमध्ये भौतिक विज्ञानाची पदवी मिळविल्यावर केंब्रीजला पुढील संशोधनासाठी प्रवेश मिळणार होता. तोंडी परीक्षेवेळी परीक्षकाने त्याला विचारले, ‘तुला काय व्हायला आवडेल?’ हॉकिंगने झटकन उत्तर दिलं, ‘तुम्ही मला प्रथम श्रेणी दिली, तर मी केंब्रीजमध्ये गणिताला प्रवेश घेईन; पण मला द्वितीय श्रेणी दिलीत, तर मला ऑक्सफर्डमध्येच राहावं लागेल. म्हणून माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही मला प्रथम वर्ग द्यावा.’ त्याच्या या उत्तराने शिक्षक चिडले नाहीत. उलट त्याच्या गणित आवडीने ते प्रभावित झाले. आपल्या शिक्षणव्यवस्थेत एखादा विद्यार्थी असा धीटाईने बोलला, तर उर्मट म्हणून त्याला नापास करण्याचं ‘कौशल्य’ शिक्षक दाखवतील. परीक्षकांनी स्टीफनला नॅचरल सायन्स विषयात ऑक्सफर्डला प्रथम वर्ग दिला आणि त्याची स्वप्नपूर्तीची वाट मोकळी झाली. 1962 मध्ये तो गणित आणि अवकाशशास्त्राच्या अभ्यासासाठी केंब्रीजमध्ये दाखल झाला.

वादळाची सुरुवात

केंब्रीजमध्ये स्टीफनच्या आयुष्यात एका नव्या वादळाची सुरुवात होणार होती. डेनिस सायमा; ज्यांनी अवकाशशास्त्राचा (कॉस्मॉलॉजीचा) पाया घातला, ते स्टीफनचे गणिताचे शिक्षक होते. स्टीफनला व्यापक सापेक्षतावाद आणि अवकाशशास्त्र यांच्या खोलात जाण्यासाठी डेनिसचे अध्यापन अपुरे वाटत होतं. त्याला फ्रेड हॉईल या खगोल वैज्ञानिकाबरोबर काम करण्याची इच्छा होती; पण ती संधी त्याला मिळाली नाही. यामुळे निराश झालेल्या स्टीफनवर आणखी एका संकटाने आक्रमण केले. त्याला मोटर न्यूरॉन आजाराची लागण याच काळात सुरू झाली. तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. डॉक्टरांनी उपचार चालू केले. शिक्षण न सोडण्याचा सल्ला त्याला दिला. दोनच वर्षांचं आयुष्य त्याला लाभेल, असं निदान डॉक्टरांनी केलं होतं. मात्र हा आजार अपेक्षेपेक्षा कमी वेगाने हळूहळू वाढत गेला. प्रथम त्याचा चालताना तोल जाई; मग त्याच्या बोलण्यात चोचरेपणा येऊ लागला; पण डेनिस सायमाने स्टीफनचा धीर वाढवत ठेवला आणि संशोधनासाठी प्रोत्साहित करत ठेवले. परिणामी तो अभ्यासात मन गुंतवू लागला आणि केंब्रीजमध्ये एक हुशार अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होऊ लागला. जून 1964 मध्ये स्टीफनने एका व्याख्यानात फ्रेड हॉईल यांच्या खगोल विज्ञानातील संशोधनाला आव्हान दिलं.

संशोधनाला सुरुवात

पदवी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ऑक्सफर्डमध्ये असताना विश्वरचनेबाबतच्या दोन सिद्धांतात मोठा वाद रंगलेला असायचा. ते सिद्धांत म्हणजे बिग-बँग सिद्धांत आणि स्टेडीस्टेट सिद्धांत. हॉईल आणि नारळीकर हे स्टेडी स्टेट सिद्धांताचे समर्थक होते. रॉजर पेनरोझ या संशोधकाच्या सिद्धांतावर आधारित संकल्पनेवरून स्टीफनने बिग-बँग सिद्धांतावर आपला प्रबंध 1966 मध्ये सादर केला. या संशोधनाद्वारे त्याला पीएच. डी. मिळाली. पेनरोझबरोबरच स्टीफनला या संशोधनाबद्दल प्रख्यात असं ‘अ‍ॅडम्स प्राईझ’ही मिळालं.

आजाराशी झुंज

दुर्धर आजाराने विकलांग झालेल्या व्यक्ती बहुधा मानसिकदृष्ट्या कोलमडतात. त्या देवशरण बनतात. स्टीफन मात्र याला अपवाद ठरला. मोटर न्यूरॉन डिसीजने त्याचे मज्जातंतू आणि स्नायू दुर्बल होत गेले. प्रथम त्याचा तोल जात होता. नंतर त्याची जीभ अडखळू लागली. नंतर-नंतर हाताची व पायाची आणि शरीराची हालचाल बंद पडत गेली. शेवटी-शेवटी तर फक्त एक बोट हलत होते. तेही हलायचं बंद झाल्यावर चेहर्‍याच्या स्न्यायूंद्वारे तो विचार व्यक्त करत राहिला. विचार मांडण्याची सर्व आयुधं निकामी होत गेली, तरी एक अवयव मात्र विकल झाला नाही. तो म्हणजे त्याचा मेंदू. असं म्हणतात की, आंधळ्या माणसाला दृष्टीला पारखं व्हावं लागल्यानं निसर्ग त्यांची श्रवण इंद्रिये अधिक तेज करतो. आंधळी माणसं तिखट कानाचा उपयोग करून जीवनमार्गात यशस्वी होतात. बोलता येईना, हातपाय हलत नाहीत म्हणून की काय, स्टीफनचा मेंदू अधिक सक्षम झाला असावा. त्याची स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती एवढी प्रखर बनली की, तो गणितातील कूट सूत्रे व प्रमेये मनातल्या मनात पूर्ण करी. तात्त्विक कूट प्रश्नांची उकल करण्यासाठी लागणारी प्रज्ञा त्याच्या मेंदूत विकसित होण्यास शारीरिक विकलांगता कारण ठरली असेल का? काहीही असो, स्टीफन गणिताच्या मदतीने विश्वरचनेच्या कल्पनाविलासात रममाण होऊ लागला. त्याला आनंदनिर्मितीचे क्षेत्र सापडले. या क्षेत्रात व्हीलचेअरवर बसून तो विश्वाचे कूट प्रश्न सोडविण्यात इतरांना मागे टाकू लागला. परिस्थिती विरोधी जात असताना संकटांना टक्कर देत झुंजणार्‍या एका कोळ्याची दीर्घ कथा अर्नेस्ट हेमिंग्वे या अमेरिकन लेखकाने लिहिली आहे. नोबेल पारितोषिक मिळालेल्या या कथेत हेमिंग्वेने 3 दिवस आणि 3 रात्री एका महाकाय माशाशी म्हातार्‍या कोळ्याची झालेली झुंज चित्रित केली आहे. या कोळ्याच्या होडीच्या दुप्पट आकाराचा मासा त्याच्या गळाला लागतो. मासा होडीला ओढत राहतो, तर कोळी गळाने माशाला खेचत राहतो. या संघर्षात माशाला ठार करता-करता कोळ्याचा भाला तुटतो, इतर आयुधेही निकामी होतात; पण हरत नाही म्हतार्‍याचं मन. लढाई महत्त्वाची, हार-जीत गौण. सर्व अवयव निकामी होत आहेत; पण बुद्धीचा अवयव भक्कम आहे, असा स्टीफन मला हेमिंग्वेच्या कोळ्यासारखा वाटतो. हेमिंग्वेचा कोळी माशाबरोबरच्या संपूर्ण संघर्षात कुठंही देवाला हाक मारीत नाही. माझं डोकं शाबूत राहू दे, असंच तो म्हणत राहतो. हे विश्व केव्हा निर्माण झाले, या प्रश्नाचे उत्तर शोधताना स्टीफनला सुद्धा देवाला हाक मारण्याची गरज वाटली नाही; उलट विश्व स्वयंपूर्ण आहे, त्यात अंतर्गत घडणार्‍या घडामोडीतून विश्वाचा उगम कधी झाला, हे आपणाला कळू शकेल, असं रोखठोक प्रतिपादन स्टीफननं केलं.

गॅलिलिओन्यूटनच्या खांद्यावर

विश्वाची निर्मिती कशी झाली आणि त्याचा शेवट काय असेल, याबद्दल मानवी मनाला प्रचंड कुतूहल असते. या प्रश्नांची उत्तरे मानव प्राचीन काळापासून शोधत आला आहे. विविध धर्मग्रंथांनी विश्वनिर्मितीचे कारण देव आहे, असं स्पष्टपणे सांगितलं. विश्वाचा निर्माता देव आहे, एवढंच नाही, तर त्याचं निर्मितीनंतरचं चलनवलनही तोच करतो, असं ठाम प्रतिपादन धर्म करतो. धर्माच्या या संकल्पनांना सोळाव्या शतकापासून विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाने आव्हान द्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळातील विज्ञानाच्या संस्थापकांत गॅलिलिओ आणि न्यूटन हे प्रमुख होत; पण त्यांनी देवाला स्पष्टपणे नकार दिला नव्हता. गॅलिलिओचे एक प्रसिद्ध वचन आहे, ‘ज्या देवाने मानवाला बुद्धिसामर्थ्य दिलं आहे, तो त्याला बुद्धीचा उपयोग करू देण्यास विरोध करेल, असं मला वाटत नाही.’ म्हणजे बुद्धीनं निसर्गाचे नियम समजून घेण्यास देवाची आडकाठी नाही, असं त्याला वाटत होतं; पण ज्ञानवृक्षाचं फळ स्वर्गातील इव्हनं खाल्लं म्हणून देव संतापला, असं बायबल सांगतं. म्हणजे निसर्गाचं ज्ञान घेण्याचा वेडेपणा माणसानं करू नये, अशीच धर्माज्ञा होती. म्हणून गॅलिलिओ दुर्बिणीतून निरीक्षण करून नवं सत्य जगाला सांगतो, हे पाप आहे, असं ठरवून पोपने त्याला शिक्षा सुनावली. गॅलिलिओप्रमाणेच न्यूटनही धर्म मानत होता; पण तो गॅलिलिओच्या चार पावलं पुढं गेला. हे विश्व देवाने निर्माण केले, हे जसे खरं असलं तरी नंतर मात्र तो विश्वातील घडामोडीत हस्तक्षेप करीत नाही. निसर्गाचे नियम त्यालाही बदलता येत नाहीत. हे नियम बुद्धीने शोधता येतात. न्यूटनने गुरुत्वाकर्षण आणि गतीचे नियम मांडून वैश्विक घडामोडींचे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले. स्टीफन हॉकिंगचे श्रेष्ठत्व हे की, पेनरोझसोबत त्याने विश्वरचनाशास्त्राला पुष्टी देणार्‍या गणितीय समिकरणांची मांडणी केली. विश्वाच्या रचनेत व चलन-वलनात देवाची गरज नाही, असं हॉकिंगनं ठाम प्रतिपादन केलं. विश्वरचनेविषयीच्या बिग-बँग सिद्धांताला त्याने गणिती पाया दिला. या अर्थी स्टीफन हॉकिंग हा विज्ञाननिष्ठेचा कळस म्हणावा लागेल.

हॉकिंगचा युद्धाविरोधी मोर्चात सहभाग

विश्वाच्या शोधात

रॉजर पेनरोझ आणि नंतर इतर वैज्ञानिक सोबत्यांसोबत स्टीफन हॉकिंगने कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वरचनाशास्त्रात क्रांतिकारक सिद्धांत मांडले. कृष्णविवरांबाबत ‘हॉकिंग रेडिएशन’चा सिद्धांत मूलगामी आहे. विज्ञानातील विविध सिद्धांतांना एकत्रित बांधण्यासाठीच्या ‘स्ट्रिंग थेअरीला’ही हॉकिंगचे समर्थन आहे. त्याच्या संशोधनाचा थोडक्यात परिचय करून घेऊया.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या दुर्बिणीतून हबल आणि त्याचा सहकारी हमसन दीर्घिकांचे निरीक्षण करीत होते. त्यांना अवकाशातील दूरवरच्या दीर्घिका परस्परांपासून आणि आपल्यापासूनही अधिकाधिक दूर जात आहेत, हे लक्षात आलं. म्हणजे विश्व प्रसरण पावत आहे. उलट विचार केला, तर भूतकाळात या दीर्घिका आतापेक्षा अधिक जवळ असणार. लाखो वर्षांपूर्वी त्या जेवढ्या जवळ असतील, त्यापेक्षा कोट्यवधी वर्षांपूर्वी अधिक जवळ म्हणजे विश्व लहान आकाराचं असणार. गणित केल्यास 1400 कोटी वर्षांपूर्वी एका अतिप्रचंड ऊर्जा सामावलेल्या एका बिंदूत विश्व सामावले असणार. या बिंदूवत अवस्थेला ‘सिंग्युलॅरिटी’ असं नाव आहे. या बिंदूवत अवस्थेत स्फोट होऊन मूलकण आणि ते बंधित होऊन विश्वातील विविध पदार्थ निर्माण झाले. हाच तो बिग-बँग सिद्धांत. आईन्स्टाईनच्या E = mc2 या सिद्धांतानंतर महास्फोटातून मुक्त उर्जेचे पदार्थामध्ये रूपांतर होत गेले. विश्वाचे मूळ म्हणजे ‘सिंग्युलॅरिटी’ अवस्था. सिंग्युलॅरिटीतील स्फोटाक्षणी वस्तुमान म्हणजे पदार्थ आणि काळाचीही निर्मिती झाली. हॉकिंग यांनी विश्वरचनाशास्त्रातील या बिग-बँग सिद्धांताचे सखोल संशोधन केले. याबाबतीत हॉकिंगनी एक समर्पक उदाहरण दिलं आहे. पृथ्वीच्या उत्तर धु्रवावर कोण उभा असेल, तर तो तिथून कोणत्याही दिशेने चालत गेला, तरी तो उत्तरेकडे कधीच जात नाही. म्हणजेच तो जिथून निघाला तेथे उत्तर दिशा संपते, तसंच बिग-बँगच्या आधी काळ असणारच नाही. सध्या आपलं विश्व प्रसरण आणि महासंकोच यांच्या सीमारेषेवर उभं आहे. या अवस्थेविषयी हॉकिंग आणि पेनरोझ याचं संशोधन आहे. काळाची सुरुवात आणि शेवट यावरही त्यांनी महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत.

हॉकिंग रेडिएशन

‘बिग-बँग’ बरोबरच हॉकिंगचं दुसरं प्रसिद्ध संशोधन म्हणजे कृष्ण विवराबाबतचं रेडिएशन. अवकाशातील सूर्यासारख्या तार्‍यात अणुइंधनामुळे ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळेच ते ऊर्जा उत्सर्जित करतात. हे इंधन संपले की, तारे मृतप्राय होऊ लागतात. गुरुत्वाकर्षणामुळे कृष्णविवरातून कोणतीही वस्तू किंवा प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही. ज्या अंतरावरची वस्तू कृष्णविवराकडे वेगाने खेचली जाते, त्या अंतराला ‘इव्हेंट होरॉयझन’ म्हणतात. हॉकिंग आणि पेनरोझ यांनी कृष्णविवर म्हणजे अनंत घनता असलेला आणि शून्य आकाराचा बिंदू (सिंग्युलॅरिटी) असं मत मांडलं. कृष्णविवरात नेहमीचे भौतिक नियम लागू पडत नाहीत. त्यामुळे आत काय चालतंय, हे समजत नाही.

अंतराळात असंख्य अतिसूक्ष्म कण आणि प्रतिकण यांच्या जोड्या असतात. या कणांना पुंज यांत्रिकीचे नियम लागू पडतात. हे कण परस्परांना नष्ट करत असतात. हे कण कृष्णविवराच्या ‘इव्हेंट होरॉयझन’च्या कक्षेत आले की, त्यातील एक कण कृष्णविवरात आकर्षिला जातो, तर प्रतिकण बाहेर फेकला जातो. या कणामुळे ऊर्जा उत्सर्जन होते. ही ऊर्जा क्ष-किरण आणि गॅमा किरण स्वरुपात असते. त्यालाच ‘हॉकिंग रेडिएशन’ हे नाव आहे. ‘हॉकिंग रेडिएशन’मुळे कृष्णविवराचे वस्तुमान आणि ऊर्जा कमी होत जाते आणि अखेर ते नष्ट होते. ‘हॉकिंग रेडिएशन’च्या संशोधनात पुंजवाद आणि व्यापक सापेक्षतावाद यांच्या एकत्रित उपयोगातून निष्कर्ष काढले जातात. या संशोधनाला ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ असं नाव आहे.

एकतत्त्वाचा शोध

हॉकींग यांनी ‘स्ट्रिंग थेअरी’वरही काम केलं आहे. अतिसूक्ष्म कणांच्या म्हणजे सब अ‍ॅटॉमिक कणांच्या संशोधनातून स्ट्रिंग थेअरीचा जन्म झाला. या कणांचे संघटन ज्या चार मूलभूत बलांनी चालते, ते म्हणजे गुरुत्वाकर्षण, विद्युत चुंबकीय बल, अणुकेंद्रातील क्षीण आणि उच्च बल. ही चार बले आणि अतिसूक्ष्म कण यांना जोडणारी संकल्पना म्हणजे स्ट्रिंग. या स्ट्रिंगच्या वेगवेगळ्या प्रकारे थरथरण्यातून वेगवेगळ्या पार्टिकल्सचे गुणधर्म दाखविले जातात. या स्ट्रिंग संकल्पनेद्वारे विश्वातील सर्व एकाच मूळ तत्त्वानं चालतात ते एकतत्त्व आपल्याला कळेल, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. एका महावाक्यातून विश्वाचं कोडं उलगडण्याचा हा प्रयत्न म्हणजे मानवी प्रजेची उत्तुंग झेप आहे. विज्ञानाचे हे महावाक्य शोधण्याच्या प्रयत्नात स्टीफन हॉकिंग यांनी सहभाग दिला आहे. हे महावाक्य मिळालं, तर प्रत्येक धर्म आणि त्यांचा देव आणि त्यांच्या विश्वनिर्मितीच्या वेगवेगळ्या कल्पना निकालात निघतील.

हॉकिंगचे भावविश्व

विदीर्ण शरीरामुळे झालेल्या विकलांग अवस्थेतही, अपंगासाठीच्या विजेच्या खुर्चीवर बसून अंतराळ, कृष्णविवरे आणि पृथ्वीची उत्पत्ती यांचा परस्परसंबंध शोधण्याची बौद्धिक कसरत करत असताना देखील हॉकिंगची विनोदबुद्धी शाबूत होती. मृत्युपूर्वीच्या एका मुलाखतीत ते म्हणाले, ‘विश्वाच्या रहस्याच्या जोडीला, मला आणखी एक रहस्य शोधता आलं नाही. ते कोणते?’ या प्रश्नावर हॉकिंग म्हणाले, ‘स्त्री’.

स्टीफन आणि पत्नी जेन व त्यांची मुले

खरं तर विकलांग व्यक्तीवर एखाद्या स्त्रीने प्रेम करणं, तसं अनैसर्गिकच; पण दोन स्त्रियांनी स्टीफन हॉकिंगसारख्या अपंगावर वेड्यासारखं प्रेम केलं. जेन वाइल्ड आणि इलेन वेसन याच त्या दोन स्त्रिया. या दोघी त्याच्या आयुष्यात आल्या नसत्या, तर हॉकिंगला संशोधन आणि नित्याचे व्यवहार अशक्य झाले असते. तरीसुद्धा त्यानं ‘स्त्री’ला रहस्यमय का म्हणावे? उलट हॉकिंगसारख्या उत्तुंग प्रतिभेच्या माणसाचे अंतरंगातील गूढतेचे आपल्याला आश्चर्य वाटावे. त्याच्या भावविश्वातील या गुंतागुंतीवर त्याच्या चरित्रकारांनी प्रकाश टाकला आहे.

वयाच्या 21 व्या वर्षी 1963 मध्ये स्टीफन केंब्रीजमध्ये दाखल झाला. तेथे एका पार्टीत त्याची जेन वाइल्डशी ओळख झाली. त्यावेळी त्याला मोटर न्यूरॉन आजाराची लागण झालेली नव्हती. पहिल्याच संवादात ‘मला विश्वाचा सारा पसारा एका समीकरणात बांधायचा आहे,’ असं तो जेनला म्हणाला. म्हणजे काय शोधायचं, या प्रश्नानं जेन संभ्रमात पडली; पण काहीतरी भव्य-दिव्य स्वप्न बाळगणारा हा तरुण आहे, हे तिच्या लक्षात आलं असावं आणि ती चक्क त्याच्या प्रेमात पडली. प्रणयात दोघांचे दिवस सुंदर चालले होते; पण एके दिवशी तो महाविद्यालयाच्या प्रांगणातच कोसळला. डॉक्टरांनी त्याच्या मोटर न्यूरॉन आजाराचे निदान केले.

जेनने आपल्या आयुष्याची माती करण्यात अर्थ नाही, असं स्टीफनने तिला सुनावले, तरी ‘काहीही होवो, आपण एकत्र राहू’, असा जेनने निश्चय केला आणि स्टीफनशी लग्न केलं. यालाच ‘स्त्री’ स्वभावाची गहनता मला कळली नाही, असं स्टीफन म्हणाला असेल काय?

पुढे 20 वर्षे जेनने स्टीफनबरोबर राहून त्याची शुश्रुषा आणि सोबत केली. दोघांना 3 अपत्ये झाली; पण मध्येच एका चर्चमध्ये जेनची तरणाबांड जोनाथन ब्राऊन या संगीतकाराबरोबर ओळख झाली. जोनाथनकडे तिचं मन ओढलं गेलं. स्टीफनची शुश्रुषा, त्याच्या पुस्तकांचे डिक्टेशन, टायपिंग, व्याख्यानाची तयारी यातून तिच्या कमरेचा काटा ढिला होत असे. अशा परिस्थितीमुळे ती जोनाथनकडे ओढली गेली असेल काय? स्टीफनला जेनच्या या ओढीची कल्पना होती; पण त्याने तिला याबाबतीत विरोध केला नाही.

अशा परिस्थितीत स्टीफनची एलेना नावाच्या नर्सशी ओळख झाली. तो तिच्यात नकळत गुंतत गेला. पुढे स्टीफनला जगप्रसिद्धी मिळाली. तो भाषणासाठी विविध देशांत दौरे करू लागला. त्यावेळी त्याला एलेनची सोबत असायची. आपल्याकडे स्टीफनचे दुर्लक्ष होतंय, अशी जेनची भावना झाली असावी. दोघांमध्ये धार्मिक कारणावरूनही मतभेद होते. याचा परिणाम म्हणजे 20 वर्षांनंतर स्टीफन आणि जेन विभक्त झाले. स्टीफनने एलेनबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. जेननेही जोनाथनशी विवाह केला. या वेळचे त्याचे उद्गार होते, ‘It is wonderful. I have married the woman I love’ 20 वर्षे जेनशी भावनिक संबंध ठेवून आणि तिच्यापासून तीन अपत्ये होऊनही जेनवर स्टीफन मनापासून प्रेम करीत नव्हता काय? कोणाचं मन गहन गूढ; जेनचं की स्टीफनचं?

एलेन, स्टीफनला छळते अशी जेन आणि त्याचे निकटवर्ती यांनी पोलिसांकडे तक्रार केली; पण यातून काहीच निष्पन्न झालं नाही. स्टीफनने असं काही घडलं नाही, अशी साक्ष पोलिसांना दिली. पुढं एलेनशीही स्टीफनने घटस्फोट घेतला. नंतर मात्र तो जेन आणि त्यांची मुलं-नातवंडे यांच्यासोबत राहू लागला. अखेरपर्यंत जेनने त्याला साथ दिली. या त्यांच्या जीवनपटावर आधारित ‘The Theory of Everything’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला. गूढतेबरोबरच स्टीफनचं भावविश्व सुद्धा गूढमय आहे खरं! स्टीफन म्हणाला, ‘स्त्री’ चरित्र गूढ आहे; पण त्यापेक्षाही स्टीफनसारख्या कलंदर पुरुषांचं चरित्रदेखील अधिक गूढरम्य हेच खरं!

अभिवादन

स्टीफन हॉकिंगपासून आपण काय घ्यावे, तर ती त्यांची विज्ञाननिष्ठा. अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यावर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की, अन्य कोणा ईश्वर नावाच्या ताकदीची त्यांना गरज वाटली नाही. “इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आणि तत्सम गोष्टींवर संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की, परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा कोणी निर्माता नाही की, भाग्यविधाता नाही. म्हणून स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला वेळ तेवढा आपला आहे आणि तो मला मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे,” असा हॉकिंगचा जीवनविषयक दृष्टिकोन होता. त्यांनी धर्माबाबतही आपले मत प्रसिद्ध केले आहे. ‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात, ते निरीक्षण आणि तर्क. या दोघांच्या संघर्षात अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल. कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे.’

आज जगात बहुतेक सर्वत्र देव आणि धर्म यांचाच प्रभाव जनमानसावर आहे; पण आजपासून काही शतकांनी का होईना, स्टीफन हॉकिंगचे विचारच खरे ठरतील, तेव्हा अस्तित्वात असलेला माणूस या विश्वमानवाला अभिवादन करेल. तोपर्यंत विज्ञाननिष्ठेच्या प्रवाहात यथाशक्ती योगदान देणार्‍या सर्व विवेकवादी समूहातर्फे स्टीफन हॉकिंगला भावपूर्ण आदरांजली!

हॉकिंगचे मानवजातीला इशारे

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाच्या मुळावर

कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास इतक्या वरच्या स्तरावर होऊ शकेल की, ज्याद्वारे मानवी बुद्धी आणि कौशल्यावर मात केली जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वत:ला विकसित करीत राहील, त्यातून तिची पुनर्निर्मिती होत राहील, त्यातून नव्या स्वरुपाचे जीवन निर्माण होईल; परिणामी मानवजातीचे अस्तित्व संपेल. (बी.बी.सी.ला दिलेली मुलाखत)

100 वर्षांत पृथ्वी नष्ट होईल

वातावरणातील बदल प्रचंड वेगाने होत आहेत. त्याच्या जोडीला अण्वस्त्र आणि जैविक अस्त्राचा धोकाही मदतीला येऊ शकतो; परिणामी पुढील 100 वर्षांत पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येऊ शकेल, तेव्हा आपलं अस्तित्व टिकायचं असेल, तर दुसर्‍या ग्रहावर वस्ती करण्याची तयारी ठेवावी लागेल.

परग्रहवासीयांचा धोका

विश्वाच्या पसार्‍याचा विचार करता, पृथ्वीशिवाय इतर ठिकाणी जीवनसृष्टीचं अस्तित्व शक्य आहे; पण त्यांच्याशी आपण संदेशाद्वारे संबंध प्रस्थापित करणे टाळायला हवे. हे परग्रहवासी पृथ्वीवरील साधनसंपत्तीचे शोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोलंबस अमेरिकेत पोचल्यावर तेथील मूळ रहिवाशांवर जसे आक्रमण झाले आणि त्यांची संपत्ती व प्रदेश जसा युरोपवासीयांनी लुबाडला, तसंच आपल्याबाबतीत परग्रहवासीयांकडून घडू शकेल.

हॉकिंगची राजकीय मते

हॉकिंग हा लेबर पार्टीचा समर्थक होता. अल गौर या डेमॉक्रेटिक उमेदवाराप्रती त्याने संवेदनशीलता व्यक्त केली होती. इराकवरील आक्रमण हा राजकीय गुन्हा आहे, असे तो म्हणाला. अण्वस्त्रबंदीचा तो समर्थक होता. स्टेम सेल रिसर्च; तसेच जागतिक आरोग्यव्यवस्था आणि पर्यावरणसंवर्धनासाठीचे उपाय याचे त्याने समर्थन केले. युरोपीय युनियनपासून स्वतंत्र होण्याच्या ब्रिटनच्या धोरणाला (ब्रेक्झीट) ला हॉकिंगने विरोध दर्शविला. त्याच्या मते, अशा पॉलिसीमुळे, मुक्त वैचारिक देवघेव आणि आधुनिक संशोधनासाठी गरज असलेले आंतरराष्ट्रीय सहकार्य यांना खीळ बसेल.

ब्रिटनमधील आरोग्य व्यवस्थेच्या खाजगीकरणाला हॉकिंगचा विरोध होता. जितके खाजगीकरण वाढेल, तितकी आरोग्यव्यवस्था महागडी होत जाईल.

डोनाल्ड ट्रंपची ग्लोबल वॉर्मिंगबद्दलची धोरणे पृथ्वीला हानिकारक ठरतील, असा इशारा हॉकिंगने दिला आहे. ग्लोबल वॉर्मिंग जर नियंत्रित केले नाही, तर पृथ्वीचा शुक्र होण्यास वेळ लागणार नाही. पृथ्वीचे तापमान 250 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होईल आणि तीवर सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस पडेल, असे भाकीत स्टीफनने वर्तवले.

हॉकिंगची ग्रंथमाला

ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम – 1988

या ग्रंथाच्या एक कोटीहून अधिक प्रती आणि 40 विविध भाषांत भाषांतरे.

ब्लॅक होल्स आणि बेली युनिव्हर्सेस – 1993

दि युनिव्हर्स इन नटशेल – 2001

ऑन दि शोल्डर्स ऑफ जायंटस् – 2002

माय ब्रिफ हिस्टरी – 2013

दि ग्रँड डिझाइन – 2010

याशिवाय मुलांसाठी विज्ञानकथा हॉकिंगने लिहिल्यात. ‘दि थेअरी ऑफ एव्हरी थिंग’ या चित्रपटाबरोबरच इतरही विविध चित्रपट हॉकिंगच्या जीवनावर प्रसिद्ध झालेत.

अ‍ॅवॉर्ड्स आणि सन्मान

फेलो ऑफ रॉयल सोसायटी – 1974

ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट बहाल – 1978

केंब्रीजमध्ये ल्युकेशियन प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स म्हणून सन्मान-1979. पूर्वी हा सन्मान न्यूटनला मिळालेला होता.

अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित – 2009

बीबीव्हीए फाऊंडेशन फ्रंटीयर्स ऑफ नॉलेज अ‍ॅवॉर्ड

प्राईड ऑफ ब्रिटन अ‍ॅवॉर्ड्स – 2016

अंनिस डोंबिवलीच्यावतीने स्टीफन हॉकिंग यांना अभिवादन

14 मार्च रोजी स्टीफन हॉकिंग यांचं निधन झालं. या वैज्ञानिकाला अभिवादन करणे व त्यानिमित्ताने लोकांशी संवाद साधून विज्ञान, वैज्ञानिक, त्यांनी लावलेले शोध, वैज्ञानिक दृष्टिकोन यासंबंधी चर्चा करावी, या उद्देशाने त्याच दिवशी संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत भागशाळा मैदान, डोंबिवली येथे खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले.

स्टीफन हॉकिंग यांचं विज्ञानातील योगदान (ब्लॅक होल, बिग बँग) आणि त्यांची जडणघडण याबद्दल किरण तोंडवळकर याने सगळ्यांना माहिती दिली. श्रीप्रसाद खुळे यांनी प्रश्न विचारून कार्यक्रमाची सुरुवात केली. सुरेखा भापकर, किशोरी गरुड यांनी ‘स्त्रिया आणि त्यांचं विज्ञानातील योगदान’ याबद्दल प्रखरपणे मांडणी केली.

अनेक तरुण यात सामील झाले. त्यापैकी यज्ञांग पवार, शुभांगी कदम आणि अक्षय सोंडे यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवला पाहिजे, याबद्दल भाष्य केले. प्रश्न विचारणे गरजेचे आहे आणि त्याची उत्तरे शोधणे आपले कर्तव्य आहे. लहानपणापासून आपल्या शिक्षणव्यवस्थेत अशी मूल्ये रुजविणे फार गरजेचे आहे. त्यातूनच भावी शास्त्रज्ञ तयार होतील आणि या देशाचं भविष्य उज्ज्वल होईल, असे मत त्यांनी मांडले.

कार्यक्रमाची सांगता ‘उत्क्रांतीवाद आणि आजचा विकसित माणूस’ या विषयाने झाली.

किरण तोंडवळकर, डोंबिवली.

अंनिस कोल्हापूरच्यावतीने स्टीफन हॉकिंग यांना अभिवादन

महाराष्ट्र अंनिस, कोल्हापूरच्या वतीने स्टीफन हॉकिंग यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्टीफन हॉकिंग : एक किमयागार’ या परिसंवादाचे आयोजन केले. यावेळी सोनाली माळवी हिने स्टीफन हॉकिंग यांचे चरित्र मांडताना हॉकिंग यांच्या जीवनातील विविध घटनांचा आणि त्यांनी केलेल्या संशोधनाचा आढावा घेतला. परिसंवादाचे प्रमुख वक्ते प्रा. शैलेंद्र पाटील यांनी वास्तव म्हणजे काय? आणि सत्य म्हणजे काय? या प्रश्नांनी मांडणीची सुरुवात केली. या दोन्ही बाबी एकच वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वेगळ्या असल्याचे स्पष्ट केले. वास्तव म्हणजे जे दिसतं ते, तर सत्य म्हणजे जे प्रत्यक्षात असतं ते, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. तसेच कृष्णविवराविषयीच्या हॉकिंग यांच्या संशोधनावर चर्चा झाली. तसेच हॉकिंग यांच्या देव, धर्म याबाबतची मतांवरही चर्चा झाली. सध्या भारतात होत असलेल्या वैज्ञानिक सिध्दांतांची पायमल्ली, ओम = = mc2 अशा अवैज्ञानिक संकल्पनांचा प्रसार याबद्दल चर्चा झाली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रमेश वडणगेकर, जिल्हा प्रधान सचिव दिलीप कांबळे, विलास आंबोळे, कोल्हापूर शहर प्रधान सचिव नियाज अत्तार, अनिल शेलार, स्वाती कोरे, प्रकाश हिरेमठ, राजवैभव शोभा रामचंद्र, कृष्णात स्वाती आदी उपस्थित होते. यश आंबोळे याने सूत्रसंचालन केले. वैभव राऊत यांनी आभार मानले.

कृष्णात कोरे, कोल्हापूर