Categories
उपक्रम चळवळ

अंनिस पनवेलची अविस्मरणीय स्मशान सहल

एप्रिल - २०१८

मृत्युंजय अमावस्येच्या काळोख्या मध्य रात्री पनवेल जवळील काळुंद्रे गावातील स्मशानात 110 च्या वर उपस्थिती. त्यातही 8 वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांच्या आजींपर्यंत जमलेले सारे, स्मशान असतं कसं? आणि तिथं भुताचा वावर खरंच असतो काय? या उत्सुकतेपोटी आलेले होते.

महाराष्ट्र अंनिसच्या पनवेल शाखेच्या वतीने 17 मार्चच्या मृत्युंजय अमावस्येच्या निमित्ताने स्मशान सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून जशी जाहिरात सुरू झाली, तसे अनेक स्तरांतून कार्यकर्त्यांना फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. काय करणार तिथं जाऊन? नेमका उद्देश काय आहे? अशा प्रश्नांपासून ते ‘भुताने झपाटले म्हणजे कळेल’ आणि ‘दारू पिऊन गोंधळ घाला तिथं, तुम्ही फक्त विज्ञान मानणारे. मग आता भुतावर पण विश्वास ठेवायला लागलेत का?’ असे रागीट आणि खोचक प्रश्न विचारणारे कॉलही आले. या सगळ्या वेगवेगळ्या स्वरुपाच्या मंडळींना कार्यकर्तेउत्तरं देत होते. वातावरण जाणीवपूर्वक कलुषीत केलं जात आहे, याची कार्यकर्त्यांना कल्पना आली. ऐन वेळी काही अडचण नको म्हणून प्रत्यक्ष सहलीच्या दिवशी महेंद्र आणि करुणा तांडेल हे कार्यकर्तेसंध्याकाळी गावात जाऊन आले. ग्रामस्थांबरोबर बोलून आले. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला फारच आश्वासक वाटला. स्मशान सहलीसाठी नोंदणी जोरात झाली होती. शनिवारी सकाळपासून आलेल्या फोनवर नोंदणी थांबवली असल्याचं सांगावं लागत होतं. इतक्या भरभरून प्रतिसादामुळे समाजात स्मशानाविषयी किती उत्सुकता आहे, हेच लक्षात येत होतं.

सहलीच्या वेळी रात्री साडेनऊपर्यंत नोंदणी केलेल्यांनी पनवेल स्टँडसमोर थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आम्ही कार्यकर्तेत्याआधीच उपस्थित होतो. ‘ए.बी.पी.माझा’चा कॅमेरामन, ‘लोकमत’ची पत्रकार, ‘सकाळ’ची पत्रकार, पुणे हवेलीच्या तहसीलदार मॅडम अशी मंडळी ऐनवेळी हजर झाली आणि आमच्या उत्साहात भर पडली. सगळे 10 वाजता स्मशानात पोचलो आणि गोल रिंगण करून बसलो. 110 च्या वर लोकं उपस्थित होती. आजीपासून घरातल्या लहान मुलापर्यंत सगळे गाडी करून आले होते. सगळ्यांचं स्वागत करून महेंद्र यांनी प्रास्ताविक करत स्मशान सहलीचा उद्देश सांगितला. सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी चळवळीची गाणी म्हणत वातावरणात उत्साह भरला. उपस्थित सगळ्यांनी ‘शूर गडी तू’ म्हणत साथ दिली.

मअंनिसच्या ‘शोध भुताचा, बोध मनाचा’ या मोहिमेचे नेतृत्व केलेले पनवेलमधील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ व मअंनिसचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर यांनी त्यावेळच्या मोहिमेच्या आठवणी जागवल्या, अनुभव सांगितले आणि मोहिमेचे गाणंदेखील सगळ्यांना सहभागी करून घेत म्हटलं. यानंतर डॉ. पाटकर यांनी मानसिक बदलाबाबत माहिती दिली, उपस्थित लोकांचं शंका-समाधान देखील केलं. मध्येच आडवे प्रश्न विचारून डॉ. पाटकर यांना अडवणार्‍या एका पत्रकारासमोर अंनिसची भूमिका फार उत्तम प्रकारे कार्यकर्त्यांनी मांडली. पत्रकार म्हणवणार्‍या त्या व्यक्तीने शेवटी अक्षरशः काढता पाय घेतला.

मनोहर तांडेल आणि महेंद्र नाईक या दोघांनी मिळून चमत्कार सादरीकरण केले, प्रयोगात सामील होऊन स्वतःच्या मनातील भीती दूर करण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले आणि खरंच याला प्रतिसाद देत सहभागिनींनी देखील प्रयोगांचा अनुभव घेतला. या सगळ्यांमध्ये मध्ये-मध्ये गाणी रंगत आणत होती. शाखेच्या वतीने सगळ्यांसाठी भेळीचा बेत होता, सगळ्यांनी जागेचं भान न ठेवता मनसोक्त आस्वाद घेतला; शिवाय आभार देखील मानले. मीडियाच्या प्रतिनिधींनी आमच्याबरोबर जागत संपूर्ण सहल कॅमेर्‍यात बंद केली. तहसीलदारांपासून कॉलेज विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार अशा सर्व स्तरावरची मंडळी अगदी दहिसर -दादर – ठाणे- नवी मुंबई – कर्जतकरांची उपस्थिती हुरूप आणणारी ठरली. या सकारात्मक बाबींच्याबरोबर कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ घालण्याचा केलेल्या अयशस्वी प्रयत्नाला उपस्थित लोकांनीसुद्धा हस्तक्षेप करत त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. हे प्रतिगामी लोकांना दिलेलं खरं उत्तर आहे, असं आम्हाला वाटलं. या सगळ्याला यशस्वी तोंड देत आपल्या कार्यकर्त्यांनी ठामपणे यशस्वी केलेली सहल ‘न भूतो, न भविष्यति’ अशीच म्हणावी लागेल.

खरं म्हणजे जेवढे लोक आले, त्यापेक्षा जास्त जणांना वाढत्या संख्येमुळे नाही म्हणावं लागलं, इतकी समाजात या विषयाची उत्कंठा आहे आणि हा मिळणारा प्रतिसाद, समाजाची जाणून घेण्याची इच्छा हीच प्रतिगामी शक्तींची अस्वस्थता आहे. या सर्वांत पनवेलमधील काळुंद्रे गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थांनी केलेले सहकार्यही अभिनंदनीय आहे.

सहल यशस्वी करण्यासाठी शाखेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि पनवेल विवेक वाहिनीच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. प्रियंका, मनोहर तांडेल, करुणा तांडेल, आरती, महेंद्र, रोहिदास कवळे, प्रबोध दळवी, डॉ. पाटकर, मानसी नायक, निमिषा नायक, रोनिश, हर्षल, नेहल, तेजल, नाजूका सावंत, तनुश्री खातू या सगळ्यांनी आयोजनात आणि सहल यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. अशा प्रकारे या भन्नाट सहलीचा अनुभव घेत आम्ही परतलो.

– आरती नाईक, पनवेल