खरे तर दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा करायला हवा आहे. त्या ऐवजी होळीच्या निमित्ताने वारेमाप झाडे तोडली जातात, होळीत बोंबा मारून शिव्या दिल्या जातात, होळीमध्ये पोळी नैवेद्य म्हणून जाळली जाते, रंगपंचमीला भरपूर पाण्याचा वापर होतो, एकमेकांना अपायकारक रासायनिक रंग लावले जातात.
या चुकीच्या प्रथांबाबत जनजागृती करण्यासाठी यंदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे बहुतेक शाखांमध्ये पर्यावरणपूरक होळी अभियान राबविले गेले.
महाराष्ट्र अंनिस शाखा औंध यांच्या वतीने ‘होळी लहान पोळी दान’ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अंधश्रद्धेला पूरक गोष्टींचे जसे की, लिंबू-मिरची-काळी बाहुली- बिबे इत्यादी गोष्टींचे दहन करण्यात आले. तसेच आजूबाजूच्या अंधश्रद्धा, बुवाबजी, जातीयता, धर्मांधता, कर्मकांड इत्यादीबाबत प्रबोधनात्मक माहिती सांगितली आणि त्यांना प्रतीकात्मक जाळून त्यापासून दूर राहण्याचा संकल्प करण्यात आला. पिंपरी चिंचवड शाखेने विविध भागातून तब्बल 1500 पुरणपोळ्या गोळा केल्या आणि शहरातील झोपडपट्टी वस्तीत वाटल्या.
नांदेड शाखेने प्रबोधन फेरी घोषणा व आवाहन करीत ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ प्रतीकात्मक होळी करा असे आवाहन केले. नागपूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक होळी… दिव्यांगांना पुरणपोळी… असा अभिनव उपक्रम राबविला गेला. पुरणपोळ्या, साखरेच्या गाठी, नारळ, चिरोंजी, बत्तासे, मिठाई प्रसाद व इतर खाद्यपदार्थ गोळा करून अनाथालयातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शाखेने होळीच्या ठिकाणी पत्रक व प्रत्यक्ष भेट देऊन जनजागरण केले. सायंकाळी 1000 पोळ्या गोळा करून विविध ठिकाणी गरिबांना पोळी वाटप केले. जालना जिल्ह्यात शाळांमध्ये होळीमध्ये नैसर्गिक रंग वापरावे, यासाठी वर्कशॉप घेऊन प्रबोधन करण्यात आले. भिवंडी शाखेतील कार्यकर्त्यांनी शाळेत पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमीची माहिती दिली. पोळी देण्यासंदर्भात पत्रकं वाटली. होळीच्या ठिकाणी 400 पोळ्या जमा केल्या व विटभट्टी कामगार, गरीब वस्तीवर वाटल्या. डोंबिवलीतील दोन शाळांमध्ये कचर्याची व सुक्या पाला-पाचोळ्याची छोटी होळी तयार केली होती. विद्यार्थ्यांनी आपल्यातील काही दुर्गुणांची नावे छोट्या कागदावर लिहून होळी सजवली होती, या दुर्गुणांची होळी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घरून पोळ्या आणल्या होत्या. त्या होळीत न टाकता गरजू वस्तीत वाटण्यासाठी कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केल्या. विद्यार्थ्यांना दुसर्या दिवशी कोरड्या व नैसर्गिक रंगांनी होळी खेळण्याचे आवाहनही केले. कार्यकर्त्यांनी 1200 पोळ्या त्याच दिवशी कचरावेचक कामगारांमध्ये वाटल्या .
पाली (जि. रायगड) येथे कार्यकर्त्यांनी एकजुटीने, उत्साहात ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ उपक्रमांतर्गत 2500 पुरणपोळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळा केल्या आणि त्यांचे आदिवासींना वाटप करण्यात आले.
धुळ्यातील साक्री शाखेतर्फे नागरेनगर येथे व्यसनांची होळी करण्यात आली. तसेच त्या होळीत पुरणपोळी न टाकता लोकांना दान करण्यास आवाहन केले आणि त्या मागील भूमिका सांगितली. कार्यकर्त्यांनी 500 पोळ्या गोळा करून गरजूंना वाटल्या. निजामपूर-जैताणे शाखेने गावातील कचरा गोळा केला, त्यात गुटखा, तंबाखू, अपप्रवृत्तीचा नाश करावा, अशा घोषणा दिल्या, प्रतीकात्मक होळी केली व 200 पोळ्यांचे वाटप केले.
कासारे (ता.साक्री) अंनिसच्यावतीने पूरणपोळया जमा करून त्या आदिवासी वस्तीमध्ये वितरित केल्या. या उपक्रमामध्ये अंनिसचे शाखाध्यक्ष सुरेश पारख, पं. स. सदस्य युवराज काकुस्ते, मंगला पारख, विलास देसले, सुहास सोनवणे, बी. एस. नेरकर, मनोहर भामरे, कविता देसले इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
लातूर शाखेतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली, कचर्याची होळी तयार करून त्यामध्ये अनिष्ट प्रथा असलेल्या अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, बुवाबाजी, कर्मकांड, भूत, भानामती, करणी, जादूटोणा, व्यसन आदी दुर्गुण असलेला फलक तयार करून ते सर्व दुर्गुण यांची प्रतीकात्मक होळी करून उपस्थित सर्व नागरिकांना अन्न हे होळीमध्ये जाळू नका तर ते गरजू लोकांना द्या, ‘होळी करा लहान व पोळी करा दान’ हा संदेश दिला. अहमदपूर शाखेतर्फे होळी लहान करा, पोळी दान करा, नैसर्गिक रंग वापर, पाण्याचा अपव्यय टाळा, कोरडा रंग वापरा, अनिष्ठ रूढी परंपरेची होळी करा, होळीमध्ये पोळी टाकू नका, देश, समाज व पर्यावरण हितासाठी मदत करा, असा संदेश देण्यात आला.

उदगीर शाखेने अनिष्ट रुढी प्रथा यांचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून, अनिष्ट रुढी, प्रथा यांची होळी करा, आपल्यातील दुर्गुणांची होळी करा, होळी लहान करा, पोळी दान करा, नैसर्गिक रंग वापर, पाण्याचा अपव्यय टाळा, कोरडा रंग वापरा, अनिष्ट रूढी परंपरेची होळी करा, होळीमध्ये पोळी टाकू नका, देश, समाज व पर्यावरण हितासाठी मदत करा, असा संदेश दिला. फुलापासून नैसर्गिक रंग कसा तयार करावा व त्याचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले, पाण्याचा अपव्यय टाळा, कोरडा रंग वापरा, अनिष्ट रुढी परंपरेची होळी करा, होळीमध्ये पोळी टाकू नका, देश, समाज व पर्यावरणहितासाठी मदत करा, असा संदेश देण्यात आला. चाकूर शाखेतील कार्यकर्त्यांनी फुलापासून नैसर्गिक रंग कसा तयार करावा व त्याचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले, पाण्याचा अपव्यय टाळा, कोरडा रंग वापरा, अनिष्ट रुढी, परंपरेची होळी करा, होळीमध्ये पोळी टाकू नका, देश, समाज व पर्यावरणहितासाठी मदत करा असा संदेश देण्यात आला.
पुणे येथे शहराच्या विविध भागात फिरून कार्यकर्त्यांनी जेथे होळी पेटवली असेल, तेथे जाऊन पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी कमीत कमी लाकूडफाटा जाळण्याचे आवाहन केले, तसेच पुरणपोळी होळीत टाकून वाया घालवण्यापेक्षा ती आम्हाला दान करा, आम्ही ती गरजू लोकांना वाटू, हे खरे पुण्यकर्म आहे, असे सांगितले. लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि कार्यकर्त्यांनी तब्बल 1200 पोळ्या गोळा करून गरजूंना वाटल्या.
अलिबाग शाखा, रायगडकडून होळीच्या निमित्ताने अलिबाग झोपडपट्टीत स्वच्छताविषयक माहिती देण्यात आली व पोळी वाटप करण्यात आले शाळेत न जाणार्या मुलांना व अर्धवट शाळा सोडलेली मुलं यांना त्यांच्या अडचणी विचारून शाळेत जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 100 पोळ्यांचे वाटप करण्यात आले.
अंनिस सोलापूर शहर शाखेने चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ हा कार्यक्रम घेतला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी छोट्याशा कागदावर स्वतःचा दुर्गुण लिहून तो कागद होळीत टाकला. यापुढेही चांगले गुणच अंगीकारू, असा संकल्प केला. यावेळी ब्रह्मानंद धडके, उषा शहा व मधुरा सलवारू हे अंनिसचे कार्यकर्तेउपस्थित होते.
सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्यावतीने आकाशवाणी केंद्राजवळील भागात स्थानिक तरुण , महिला यांच्या सहभागाने ‘होळी लहान, पोळी दान’ उपक्रम केला गेला. पैठण गेट, औरंगाबाद येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व समविचारी परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने पर्यावरणपूरक होळी करण्यात आली. अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी, शोषण, व्यसन, जातियता, धर्मांधता, बुवाबाजी, हिंसाचार … दुर्गुणांचा प्रतीकात्मक पुतळा व परिसरातील कचरा यांची होळी करण्यात आली. प्रतीकात्मक पुतळा जाळल्यानतंर तो परिसर स्वच्छ करण्यात आला.
पांढरकवडा, जि.प.शाळा मूळगव्हाण, पं.स. झरी, जि. यवतमाळ शाळेत तंबाखू, दारू, अंधश्रद्धा, खर्रा, जुगार अनिष्ट प्रथा-परंपरा, इतर व्यसन न करण्याचे व इतरांना न करू देण्याचा संकल्प करून शाळेतील मुलांनी खर्रा पन्नी, प्लास्टिक दारू शिशी, गुटखा पुडी टाकून होळी पेटवली व व्यसनमुक्तीचे नारे दिले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील होळीत पुरणपोळी न टाकता गरजू लोकांना दान करा, असे आवाहन करण्यात आले. महा. अंनिसचे कार्यकर्तेकेवळ बोलतच नाहीत तर, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.’ या काव्य पंक्ती सार्थकी करत मातोश्री वृध्दाश्रमात पुरणपोळी वितरण करून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष मा. पंडित पुडके, कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, प्रधान सचिव पुरुषोत्तम ठाकरे, तालुका उपाध्यक्ष दामोधर उप्परवार, शेषराव येलेकर (अध्यक्ष डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद), विठ्ठलराव कोठारे कोषाध्यक्ष, गजानन राऊत (बुवाबाजी संघर्ष प्रमुख), इंद्रजीत शिवरकर (तालुका युवा प्रतिनिधी), सौ. चेतना बट्टूवार, कु. ऋतुजा दामोधर उप्परवार, कु. प्रियंका विलास निंबोरकर आदी उपस्थित होते.
अजून बर्याच शाखांमध्ये हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. काही शाखांची माहिती माझ्यापर्यंत आली नसल्यामुळे उल्लेख करता आला नाही. तरी सर्व शाखांनी उपक्रम झाल्यावर संपूर्ण माहिती लगेच मला Google Form भरून पाठवावी.
– अनिल करवीर संपर्क ः 9823280327