पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक, य. ना. वालावलकरांनी त्यांच्या ‘श्रद्धाविसर्जन’ या पुस्तकाच्या प्रास्ताविकात श्रद्धा ही मनोभावना आहे. खरे तर मनोभावना ही द्विरुक्ती आहे. कारण मेंदूत उद्भवणाऱ्या सर्व भावनांचा समुच्चय म्हणजेच मन. भावनेचा संबंध बुद्धीशी नाही. बुद्धी आणि मन यांचा उद्भव मेंदूतच होतो. आपण जे निर्णय घेतो ते विचारपूर्वक घ्यावा. विचारांचा संबंध बुद्धीशी आहे; भावनांशी नाही. भावनावश होऊन घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे आणि हानिकारक ठरतात. मेंदूत श्रद्धाभावनेचे प्राबल्य वाढले की बुद्धी बधिर होऊन विचार करेनाशी होते. यास्तव भावनांवर बुद्धीचे नियंत्रण हवे. त्यासाठी श्रद्धाविसर्जन करायचे. आपल्या मेंदूत बुद्धीला उच्च स्थान द्यायचे, असे लिहिले आहे. यावरून त्यांच्या या पुस्तकातील लेखांच्या आशयाची कल्पना नक्कीच येऊ शकेल, पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणातच ‘कार्य-कारणभाव’ हा नेहमीच्या वापरात असलेला शब्दप्रयोग त्यांना चुकीचा वाटतो व त्याऐवजी ‘कारण-परिणाम’ हा शब्दप्रयोग ते सुचवतात. त्याच्या पुष्ट्यर्थ पालखी आणि पाऊस, भक्ती आणि नासलेले दूध, गणेशविस्मरण व पाठदुखी अशी उदाहरणं देऊन श्रद्धावंताचे पोल खोलतात.
पृथ्वीवरील चराचर सृष्टी व सर्व नैसर्गिक घटना निसर्गनियमानुसार घडत असताना व हे नियम कुणीही बदलू शकत नाही, त्यावर आक्रमण करू शकत नाही, त्याचे उल्लंघन करू शकत नाही, ही परिस्थिती माहीत असूनसुद्धा सुशिक्षित माणसांसकट सर्व फल-ज्योतिषाच्या नादी का लागतात? आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष अशा भ्रामक कल्पनांवर विेशास का ठेवतात? अंत्यसंस्कारात दहावेबारावे-तेरावे, मासिक श्राद्ध करून सहस्रावधी रुपये व्यर्थ का घालवतात? दहा रुपये किमतीचा निरुपयोगी पत्रा पाचशे रुपयांना विकत घेऊन श्रीयंत्र म्हणून त्याची पूजा का करतात? लक्ष्मी प्रसन्न होईल असे त्यांना का वाटते? माणसाची बुद्धी इतकी रसातळाला कशी जाते? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात व या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेताना श्रद्धा हे एकमेव कारण असू शकेल, या निष्कर्षापर्यंत ते पोचतात आणि यासंबंधात सुचलेल्या लेखांचा हा एक अप्रतिम संग्रह आहे. या पुस्तकातील काही लेख लेखकाच्या वैयक्तिक अनुभवावर बेतलेले आहेत. त्यांना भेटलेल्या व्यक्ती, त्यांच्याशी झालेला संवाद, त्यांनी श्रद्धेच्या पुष्ट्यर्थ केलेला वाद-प्रतिवाद, वादातील तार्किक दोष इत्यादीवर नेमके बोट ठेवलेले… चर्चा स्वरूपातील हे लेख अत्यंत वाचनीय आहेत. हे लेख वाचत असताना ही मंडळी इतके अतार्किक वाद कसे काय करू शकतात, याचे आश्चर्य वाटू लागते. काही लेख विवेकवादाशी संबंधित संकल्पनेवर संवादाच्या स्वरुपात लिहिलेले आहेत. संवादाच्या स्वरुपातील लेख वाचत असताना लेखक आपल्या मनातील प्रश्नांचेच उत्तरं देत आहेत की काय, असे वाटते. हे संवाद वाचत असताना त्या-त्या विषयावरील तर्कसंगती ( व विसंगती) पटकन् लक्षात येतात. लेखकाने लिहिलेल्या ओवीच्या स्वरूपातील काही कविताही या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रा. वालावलकर यांनी मराठी वृत्तपत्रांसाठी वेळोवेळी लिहिलेली पत्रंसुद्धा यात आहेत. याप्रकारे विवेकावादासारख्या गंभीर विषयावर विविध शैलीतील कथा, संवाद, लेख, कविता, स्फुट लेख वाचताना वाचक नक्कीच हरवून जातो.
काही स्वतंत्र लेखात प्रा. य. ना. वालावलकर अंधश्रद्धांच्या संदर्भातील अनेक संकल्पनांचा ऊहापोह घेत सामान्यांच्या मनात असलेल्या समजुती-गैरसमजुती, वर्षानुवर्षे पाळत आलेल्या रूढीपरंपरा यातील गुण-दोष वाचकांपुढे मांडतात. सर्वधर्म समभाव, विेशास-श्रद्धा-निष्ठा, आत्मा आणि मानवी मेंदू, सत्य आणि श्रद्धा, निरीेशरवाद्यांना शिक्षा, ज्ञान व श्रद्धा, श्रद्धावंताचे तत्त्वज्ञान इत्यादी लेखातून परमेेशरावर विेशास ठेवणाऱ्यातील अंतर्गत विसंगती प्रकाशात आणतात. मुळात देव, धर्म, श्रद्धा, आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, परलोक
इ.इ. ज्ञानाचे विषय नाहीतच. त्यामुळे त्यावरील चर्चा, वाद-प्रतिवाद, तर्कसंगती लावण्याचा वृथा प्रयत्न व या संकल्पनांमागील भूमिका इत्यादी गोष्टी फोल ठरतात, यावर लेखकांनी भर दिला आहे. अनेक वेळा काही ‘बुद्धिवंत’ उपनिषद, वेद, दर्शन, वा भगवद्गीता यासारख्या ग्रंथांच्या आधारे आत्मा, परमात्मा यासारख्या पारलौकिक संकल्पनांच्या अस्तित्वाविषयी, त्यांच्या सुसंबद्धतेविषयी तावातावाने वाद घालत समोरच्याला नामोहरम करण्याच्या प्रयत्नात असतात. लेखकांनी यातील काही लेखातून त्याच ग्रंथातील इतर काही परिच्छेद व श्लोक यांच्या आधारे या वादाच्या मुद्द्यातील विसंगती व प्रत्यक्ष चर्चेतील मुद्द्यांना बगल देऊन केलेले स्पष्टीकरण किती तकलादू आहे, हे दाखवून देतात. मुळात वाद घालणाऱ्यांनी आपल्या मुद्द्यांना पुष्टी देणारेच उतारे निवडलेले असतात हे लक्षात येऊ लागते. त्यामुळे वाद फिका पडतो. गीतेतील ‘श्रद्धावान् लभते ज्ञानम्’ हे गीतावचन न पटणारे आहे, याबद्दल लेखकांच्या मनात शंका नाही. श्रद्धा हे ज्ञानप्राप्ताचे साधन नाही; शिवाय श्रद्धा हा मानवजातीला जडलेला सर्वांत भीषण आणि गंभीर रोग आहे, असे लेखकाचे स्पष्ट मत आहे.
श्रद्धेचे विश्लेषण करत असताना लेखकाला पारंपरिक श्रद्धा (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावीत), गतानुगतिक श्रद्धा ( उदा. लालबागचा राजा नवसाला पावतो), आशावती स्पर्धा (उदा. श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते) व भयोद्भव श्रद्धा (उदा. मृतांवर अंत्यसंस्कार केले नाही तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो) असे चार प्रकार करावेसे वाटतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून सर्व श्रद्धांच्या विरोधात आपण लढत असलो तरी काही श्रद्धा निरुपद्रवी आहेत, असे म्हणत आपण केवळ शोषण करणाऱ्या, समाजविघातक अंधश्रद्धांच्या विरोधात आक्रमकपणे लढतो. लेखक मात्र या सर्व श्रद्धाप्रकारांच्या बाबतीत विचारपूर्वक व तर्कसुसंगत भूमिका घेत आहेत. ‘अंधश्रद्धांचा उपहास’ या लेखात अंधश्रद्धांवर घाला घालत असताना लेचापेची भूमिका न घेता चेष्टा, टवाळी, खिल्ली, अवहेलना अशा गोष्टींचा सर्रास उपयोग करावा, असे लेखकाचे मत आहे. फक्त हा उपहास अंधश्रद्धांचा असावा कोणत्याही व्यक्तीचा नसावा, हा इशारा ते देऊ इच्छितात.
अजून एका लेखात लेखक स्वतःची भूमिका मांडत असताना सश्रद्धांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यास सांगणे, यात गैर काही नाही. कारण तो घटनादत्त अधिकार आहे, अशी मांडणी करतात. जरी उपासनेचे वा आपल्या मताप्रमाणे श्रद्धा बाळगण्याचे स्वातंत्र्य घटनादत्त असले तरी योग्य काय व अयोग्य काय, हे सांगण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही घटनेने आपल्याला दिलेले आहे, याचे स्मरण लेखक करून देतात. यावरून प्रा. य. ना. वालावलकर श्रद्धाअंधश्रद्धांच्या विरोधात इतक्या तळमळीने, इतक्या पोटतिडिकीने इतकी वर्षे का लिहित आहेत, याची कल्पना येऊ शकते. या पुस्तकातील काही लेख संवादाच्या, प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात असून त्यावरून श्रद्धा, निष्ठा, निरीेशरवाद, राशीभविष्य, भाविकांची मानसिकता, नैतिकता, धर्माचे आकर्षण, आस्तिकांची मानसिकता इत्यादी विषयावरील वाद- संवाद वाचत असताना या संकल्पनांमागील बारकावे कळू लागतात व लेखकांनी हे मनोरंजक पद्धतीने केलेले सादरीकरण वाचनीय ठरू लागते. खोचक प्रश्न व त्यांना दिलेली अचूक उत्तरं यातून विषय समजून घेण्यास मदत होते. म्हातारीची गोष्ट व इंदीची गोष्ट या कथेतूनही लेखक अंधश्रद्धाविरोधी संदेश देत आहेत. या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकांनी लिहिलेल्या ओवीच्या स्वरुपातील श्रद्धेविषयीच्या कविता. मुळात अशा विवेकी विचारकेंद्रित विषयावर अभंगाच्या शैलीत निरूपण करता येऊ शकते, हीच मुळात आश्चर्यजनक कल्पना आहे. लेखकांचे मरणभय, आत्मा. पुनर्जन्म, अध्यात्म-विज्ञान समन्वय, श्रद्धा आख्यान, आनंददायी इहलोक इत्यादी कविता वाचताना कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय लेखकांनी पोचवला आहे, हे लक्षात येऊ लागते.
प्रा. वालावलकर अंधश्रद्धेच्या विरोधातील लढ्यात प्रत्यक्षपणे मैदानात उतरलेले नसले तरी या लढ्याला जे सैद्धांतिक पाठबळ लागते, ते पुरवण्यात नेहमीच पुढाकार घेत आलेले आहेत. यासाठी ते सातत्याने वेगवेगळ्या मराठी दैनिकांत पत्र लिहून अंधश्रद्धाविरोधी भूमिका सामान्य वाचकापर्यंत पोचवत आले आहेत व या पत्रांद्वारे जनमत तयार करण्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. या पुस्तकात त्यांनी वेळोवेळी लिहिलेली पत्रं समाविष्ट केली असून ते श्रद्धाविरोधातील एका प्रकारे स्फुट लेख आहेत, असे म्हणता येईल. पत्रांच्या आशयाला मुख्यत्वेकरून त्या-त्या वेळच्या वृत्तपत्रातील बातम्या वा लेखांचा संदर्भ आहे. त्यात काही गोष्टींचे स्पष्टीकरण दिलेले असल्यामुळे वाचकांना बातम्यांतील वा एखाद्या आस्तिक लेखकाच्या लेखातील भूलथापा पटकन् लक्षात येतात. ज्ञान म्हणजे नेमके काय, पुनर्जन्माची संकल्पना, धार्मिक विधींचे स्तोम, साडेसाती निवारणासाठी सुरक्षाकवच, आत्महत्येचे कोडे, वास्तवाचा स्वीकार, ज्योतिषशास्त्राचा फोलपणा, वैचारिक प्रगती, प्रसारमाध्यमांची जबाबदारी, ईेशराचा निर्दयपणा, अज्ञानाचा उदोउदो, निरुपयोगी यज्ञ, सत्यनारायण पूजा, वैदिक धर्म इत्यादीबद्दलची पत्रातील मांडणी जणू स्फुटलेखच वाटतात व हे लेखन वाचताना समाजमानस कसा आहे, समाजाची दिशा कशी हवी, या गोष्टी स्पष्ट होत जातात. यातील काही पत्रं प्रकाशित झालेली नसतीलही; परंतु या सर्व पत्रांना एक श्रद्धाविषयक दस्तावेज म्हणून बघता येणे शक्य झाले आहे. याच पुस्तकातील लेखकाचे मित्र, भालचंद्र काळीकर यांनी लिहिलेले तीन लेखसुद्धा वाचनीय आहेत.
अनेकांना श्रद्धेविना जीवन अशक्य आहे, असे वाटत असते. अशावेळी लेखक श्रद्धाविसर्जन करण्यास सुचवतात, हे त्यांना कदापि रुचणार नाही. कदाचित पुस्तकाचे शीर्षक अंधश्रद्धा विसर्जन असे चालले असते; परंतु श्रद्धाविसर्जन योग्य नाही, असे सश्रद्ध सुचवतील. परंतु लेखकाच्या मते अंधश्रद्धा निर्मूलन करायचे तर कोणीतरी दाभोलकरांसारखा प्रबोधनकार लागतो. पण आपले श्रद्धाविसर्जन मात्र प्रत्येकाला स्वतःहून पुढाकार घेऊन करायचे असते. त्यासाठी भावनेवर मात करत बुद्धिनिष्ठपणे विचार करत राहिल्यास हे काम सोपे होईल. या विवेकनिष्ठतेच्या खडतर मार्गावर चालण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करू शकेल. विवेकाची चाड असलेल्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवे, असे हे पुस्तक आहे.
पुस्तकाचे नाव : श्रद्धाविसर्जन,
लेखक : प्रा. य. ना. वालावलकर
वरदा प्रकाशन प्रा. लि.,
पृ. सं २५६, किंमत ३०० रु.
Categories
अंधश्रद्धा निर्मूलन कार्याला स्फूर्ती देणारे पुस्तक – श्रद्धाविसर्जन