दहाव्या जागतिक नास्तिक परिषदेचे आयोजन द्रविड कळघम चेन्नई, नास्तिक केंद्र, विजयवाडा आणि रॅशनॅलिस्ट फोरम तामिळनाडू यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथील पेरियार शताब्दी शैक्षणिक संकुल येथे केले होते. नास्तिकता-मानवतावादाचा आशावाद हा जुना विषय होता.
उद्घाटन कार्यक्रमासाठी मान्यवर पाहुणे म्हणून गॅरी मॅकलेलँड, प्रमुख कार्यकारी अधिकारी ‘इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट अँड इथिकल युनियन’ (आय.एच.ई.यू.) लंडन, ए. राजा (माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री) व अविनाश पाटील (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती); तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के. वीरमणी (अध्यक्ष, द्रविड मुनेत्र कळघम), प्रमुख पाहुणे डॉ. लक्ष्मण (तामीळ, पेरियार इंटरनॅशनल अमेरिका) हे होते. पाहुण्यांचे स्वागत व्ही. अन्बुराज, जनरल सेक्रेटरी द्रविड कळघम, प्रास्ताविक डॉ. जी. विजयम, कार्यकारी संचालक, नास्तिक केंद्र, विजयवाडा; तसेच पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन एलिझाबेथ ओ कॅसी (सल्लागार संचालक, आय.एच.ई.यू.), बु्रसेल्स, बेल्झियम यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांची चित्रे असलेल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान रुस्तम सिंग (जागतिक नास्तिक समन्वयक), अमेरिका, प्र. कुलगुरू पेरियार (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी), वल्लभ तंजावर यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार प्रदर्शन डॉ. टी. नेहरू (अध्यक्ष, रॅशनॅलिस्ट फोरम) यांनी; तर परिषदेचे संचालन सेक्रेटरी व्ही. कुमरेसन (सेक्रेटरी, बहि:स्थ समन्वयक, द्रविड मुनेत्र कळघम) हे होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. सुदेश घोडेराव (राष्ट्रीय समन्वयक, विभाग कार्यवाह) व लातूरचे सक्रिय कार्यकर्ते डॉ. दिलीप आरळीकर यांनी सहभाग घेतला.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर पाहुणे म्हणून बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी समितीच्या कार्याचा स्थापनेपासूनचा उल्लेख केला. भारतातील इतर राज्यांत देखील अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधी कार्याची मागणी आहे. भारतीय विवेकवादावर आधारित म.अंनिसचे कार्य असून गौतम बुद्ध, संत तुकाराम, महात्मा फुले; तसेच कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, गोरा आणि महात्मा गांधी या संत व समाजसुधारकांच्या विचारांवर चळवळीची पुढील वाटचाल सुरू आहे. ‘अंधश्रद्धा या विकासविरोधी आहेत. मानवी जीवनाच्या प्रगतीचा निर्देशांक वाढविण्यामधील अडसर आहेत,’ या नोबेल पारितोषिक
विजेत्या अमर्त्य सेन यांच्या विधानाचा उल्लेख केला. मानवतावाद, विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी जागतिक पातळीवर विचार होणे गरजेचे असून त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर झाली पाहिजे. देव व धर्मावरील लोकांचा विश्वास कमी व्हावा म्हणून किंवा ते नाकारले जावे, असे अनेक चळवळींना वाटते व त्यासाठी त्या कृतिशील आहेत; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे कार्य हे मानवतावाद व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे आहे आणि हेच भारतीय संविधानात सांगितले आहे. या दृष्टीने कार्यरत असणाऱ्या विविध संस्था किंवा चळवळी प्राधान्यक्रमाने पुढीलप्रमाणे होत. द्रविड कळघम (तामिळनाडू), नास्तिक केंद्र (विजयवाडा), केरळ शास्त्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. या चळवळींचे स्थानिक राज्यात कार्याचे जाळे विणलेले असून सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित कार्य केले जाते, असेही ते म्हणाले.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर Distinguished Service to Antisuperstition Award I.H.E.U. तर्फे प्रदान
दहाव्या जागतिक नास्तिक परिषदेद्वारा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना जाहीर झालेला Distinguished Service to Antisuperstition Award 2017 I.H.E.U.चे चिफ एक्झिक्युटिव्ह गॅरी मॅकलेलँड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचा स्वीकार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील व राष्ट्रीय समन्वय विभागाचे कार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडराव यांनी केला. गॅरी मॅकलेलँड, आय.एच.ई.यू. यांनी पुरस्कारामागची भावना याप्रसंगी व्यक्त केली. तिरुचिरापल्ली शहरात झालेल्या जाहीर कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मंचावर डॉ. के. वीरमणी (अध्यक्ष, द्रविड मुनेत्र कळघम), डॉ. जी. विजयम (नास्तिक केंद्र, विजयवाडा), एलिझाबेथ ओ कॅसी (सल्लागार संचालक, आय.एच.ई.यू., बु्रसेल्स, बेल्जियम) संसद सदस्य कन्हीमोझी (द्रविड मुनेत्र कळघम) कॉम्रेड डी. पोडियन (सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी, भा.क.प.) योल, भिरूमालवन (अध्यक्ष, विद्युतथलाई चिस्तथेगाई, सस्तमसिंग (नास्तिक केंद्र इंटरनॅशनल, अमेरिका) इत्यादी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय समन्वय विभागाचे कार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी लिहिलेल्या “Crusaders of Rationalism and Humanism’ या इंग्रजी पुस्तिकेचे प्रकाशन मा. डॉ. के. वीरमणी यांच्या हस्ते व मंचावर असलेल्या वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
-प्रा. डॉ. सुदेश घोडेराव
Categories