महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागातर्फे महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान यंदाही ३ ते १२ जानेवारी २०१८ दरम्यान राबवण्यात आले. अभियानाला यंदाचा विषय होता ‘‘बुवाबाजी आणि महिलांचे लैंगिक शोषण.’’ गेल्या वर्षभरात संपूर्ण भारतात अनेक बुवा व बाबा या गुन्ह्यासाठी पकडले गेले आणि त्यांना शिक्षाही झाली. हे वेगवेगळ्या माध्यमांतून प्रसिद्ध झाले, तेव्हा या बुवाबाजीचं गंभीर स्वरूपही उघडकीस आले. हजारोंनी महिला या शोषणाच्या बळी ठरल्या आहेत. महिलांचं बुवा-बाबाकडे जाण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा कितीतरी जास्त आहे. या गंभीर घटनेचा विचार करून महिला; विशेषत: तरुण मुली यांच्यामध्ये बुवाबाजीविरोधात जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी हा विषय घेण्यात आला.
या अभियानाचे उद्घाटन औरंगाबाद येथे झाले. ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद असल्याने ४ जानेवारीला उद्घाटन झाले. मअंनिस औरंगाबाद शाखा, राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिट व डॉ. रफीक झकेरिया महिला महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. यावेळी प्राचार्य डॉ. मजहर फारुखी, प्रा. डॉ. सौ. प्रधान, डॉ.रश्मी बोरीकर, डॉ. मोनाली देशपांडे, डॉ. सविता शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास १५० विद्यार्थिनी उपस्थित होत्या, त्यातील ८० मुस्लिम मुली होत्या. त्यांचा युनिफॉर्म काळा बुरखा होता. हे सांगण्याचा उद्देश हा की, अभियानाच्या विषयावर मुलींशी संवाद व चर्चा करायची, असे मी ठरवले होते आणि या ८० मुली बोलतील की नाही, ही शंका मनात आली. परंतु जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की, बाबा-बुवाकडे बायका का जातात? तेव्हा त्यांनी स्पष्टपणे आपली मते मांडली. त्यातील काही मते – महिला जास्त भावनिक असतात, समाजात व घरात दुय्यम स्थान, शिक्षणाचा अभाव, आर्थिक परावलंबित्व, मानसिक कोंडमारा, मानसिक ताण या सारख्या समस्यांतून बाहेर पडण्यासाठी, त्यांना मानसिक आधार शोधण्यासाठी त्या बुवा-बाबांकडे जातात, यातूनच त्या लैंगिक शोषणाला वाव देतात. यावर उपाय कोणते, याविषयीही त्यांनी मते मांडली, ती मी शेवटी सर्व कार्यक्रमांची एकत्रित देत आहे.
विदर्भ विभागाचा कार्यक्रम ५ जानेवारीला अमरावती येथे झाला. अमरावतीच्या शाखा कार्यकर्त्यांनी याचे सुरेख आयोजन केले होते. राज्य सरचिटणीस सूरकारही उपस्थित होते. तेथील शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे मुले व मुली दोघेही उपस्थित होते. या कार्यक्रमात स्त्री व पुरुष प्राध्यापक वर्ग, मुले व मुली सर्वांनीच आपापली मते मांडली. काही मते अशी – संतती असलीच पाहिजे, नसेल तर स्त्रीमध्येच दोष असतो, हा समाजातील सर्वमान्य समज आणि मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीसाठी मुलगा झालाच पाहिजे, याचा स्त्रीच्या मनावर ताण असतो. बुवा, बाबा स्वत:ला देवाचा अवतार किंवा स्वत:कडे दैवीशक्ती असल्याचा दावा करतात, तेव्हा स्त्रिया या लोकांना आपल्या समस्यांसाठी साकडे घालतात. यातूनच त्यांच्या शोषणाला वाव मिळतो. याशिवाय इतर अनेक मते आणि त्यावरील उपाय यावर सविस्तर चर्चा होऊन या विषयाचे गांभीर्य स्पष्ट झाले. यावेळी प्राचार्या डॉ. स्मिता देशमुख यांनीही आपण अंनिसच्या विचारांच्या असल्याचे सांगून आपले विचार मांडले आणि अंनिसच्या विषयांची मुलींमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी दोन दिवसांचे शिबीर घेण्यासाठी मला निमंत्रण दिले.
याच दिवशी (५ जानेवारी) संध्याकाळी ५ वाजता अमरावतीमधील ‘प्रयास सेवांकुर भवन’ येथे कार्यक्रम झाला. प्रयास संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ. अविनाश सावजी हे उपस्थित होते. या संस्थेमध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीचे पदवीधर, इंजिनिअर, एम.बी.ए. झालेल्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. तिथेही मुले व मुली उपस्थित होत्या. यावेळी ‘नैसर्गिक दृष्टिकोन व विवेक’ यावर डॉ. सावजी यांनी सविस्तर चर्चा केली. संविधानाने सांगितलेल्या या कर्तव्याचे पालन आपण केले, तर सर्वच प्रकारच्या शोषणाला आळा बसतो, असा निष्कर्ष मुला-मुलींशी झालेल्या चर्चेतून काढला गेला. स्त्रियांची व पुरुषांची मानसिकता व त्यावर उपाय यावरही चर्चा झाली. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी अशा अभियानाच्या आयोजनाची आवश्यकताही बोलून दाखविली गेली. अमरावतीच्या कार्यक्रमांच्या उत्कृष्ट आयोजनासाठी मा. कोल्हे, मा. गौरखोडे या कार्यकर्त्यांनी बरेच परिश्रम घेतले.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्राचा कार्यक्रम मिरज, सांगली येथे ९ जानेवारी २०१८ ला झाला. मिरज महाविद्यालय, मिरज येथे लेडीज वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सी. टी. कारंडे, प्रा. प. रा. आर्डे, प्रा. डॉ. यू. एम. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. बाई, बुवाबाजीला बळी पडण्याचे मुख्य कारण तिला येणारा मानसिक ताण व वैफल्य हे आहे. या वैफल्यग्रस्त महिलेला आधार देणारी सामाजिक व्यवस्था नाही. याउलट समाजातील राजकारणी, कलाकार, खेळाडू लोक बाबाला भेट देतात. यातून बाबालोकांना अभय मिळते. या आणि अशा अनेक विचारांची चर्चा घडून आली. प्रा. आर्डे सरांनी राम-रहिमच्या विरोधात माजी पंतप्रधान वाजपेयी यांना हरियानाच्या मुलीने लिहिलेले पत्र वाचून दाखवले. त्या मुलीच्या धाडसामुळे रामरहिम पकडला गेला. सर्व मुलींनी असे धाडस दाखवावे, असे आवाहनही प्रा. आर्डे सरांनी केले. लेडीज वेलफेअर कमिटीच्या प्रमुख प्रा. डॉ. सौ. चव्हाण यांनी मुलींचे एक दिवसाचे शिबीर घेण्याचे निमंत्रण दिले आहे. सांगली येथील आय.टी.आय.मध्ये मुलींच्यासाठी दुपारी २.३० वाजता कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास प्राचार्य सोनवणे, प्रा. सौ. मगदूम, प्रा. आर्डे व डॉ. निटवे यांची प्रमुख उपस्थिती होती. येथेही ‘बुवाबाजी आणि महिलांचे लैंगिक शोषण’ याची कारणे व उपायांवर सखोल चर्चा झाली. डॉ. निटवे हे स्त्रीरोगतज्ज्ञ व अंनिसच्या विचारांचे आहेत. त्यांनी मुलींना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. मिरज-सांगली येथील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आशा धनाले, त्रिशला शहा, प्रा. लक्ष्मण शिंदे, प्रा. सुतार या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
दि. १२ जानेवारी २०१८ रोजी नाशिक येथे या अभियानाचा समारोप करण्यात आला. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज, अध्यापक महाविद्यालय व महिला वरिष्ठ महाविद्यालय येथील मुलींसाठी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. गणपतराव मुठाळ, सेक्रेटरी मा. प्रवीण जोशी, प्राचार्या सौ. दुनबळे, डॉ. सौ. कुलथे, प्रा. झेंडे, मअंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस गोराणे, प्रा. घोडेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश पाटील यांचे बीजभाषण झाले. डॉ. नलिनी बागुल यांनी अंधश्रद्धेच्या अनुषंगाने स्त्रीआरोग्य यावर मार्गदर्शन केले. मा. अॅड. अंजला नवगिरे यांनी स्त्री संदर्भातील विविध कायदे व जादूटोणाविरोधी कायदा यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींची संख्या अंदाजे ३०० असल्याने ‘बुवाबाजी व महिलांचे लैंगिक शोषण’ याविषयी मुलींशी संवाद साधता आला नाही. परंतु त्या विषयाची कारणे, परिणाम व उपाय यावर मी स्वत: बोलले. मुलींना या विषयाची एक प्रश्नावली देऊन भरून घेण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वरील सर्व कार्यक्रमांमध्ये ‘बुवाबाजी व महिलांचे लैंगिक शोषण’ यावरच्या उपायांवर मुलींनी मांडलेले विचार असे :- महिलांनी हरेक प्रकारे स्वत:च्या भावना व्यक्त केल्याच पाहिजेत. नाहीतर इतर महिलांचे नुकसान होऊ शकते. महिलांनी वैज्ञानिक आणि मानसिकदृष्ट्या स्ट्राँग झाले पाहिजे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यासाठी डॉक्टरांकडेच गेले पाहिजे. एखाद्याचा संसार मोडू शकतो, अशा प्रकारचे सल्ले बाबा लोक देतात, असा बाबा गुरू कसा असू शकतो? याचा विचार महिलांनी केला पाहिजे. महिलांमध्ये एकी असली पाहिजे; जेणेकरून एकमेकींचे प्रॉब्लेम सोडवले जातील व मानसिक आधार दिला जाईल. सर्वच मीडियांनी या विषयातील चुकीच्या गोष्टींचा प्रसार करायचा नाही व सामान्य माणसापर्यंत याविषयीचा कायदा पोचवला पाहिजे. शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासक्रमात ‘लैंगिक शिक्षण’ व ‘लैंगिक शोषण’ हे विषयही समाविष्ट करावेत. महिलांनी स्वसंरक्षणासाठी टोकदार वस्तू किंवा मिरचीची पावडर यासारख्या वस्तू जवळ बाळगाव्यात. अनेक वेळा जाती-धर्माच्या वादातून लैंगिक शोषण होते, तेव्हा मानवता हा एकच उच्च धर्म आहे, हा विचार केला पाहिजे. कुटुंबातील अत्याचाराविरोधात महिलांनी दक्षता समितीकडे तक्रारी केल्या पाहिजेत. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाविरोधात इं.पि.को.च्या ४९८ कलमाखाली आणि जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करता येतात. यासाठी संबंधित वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे. प्रत्येक कोर्टात ‘लिगल एड’ विभाग असतो, तेथे मोफत सल्ला मिळतो, हेही लक्षात ठेवले पाहिजे. या गंभीर विषयाच्या जाणीवजागृतीसाठी दहा दिवसांचे अभियान पुरेसे नाही. ते वर्षभर चालवले पाहिजे, असे सर्वांचेच मत होते.
Categories
कळस गाठलाय बुवाबाजीनं, गाडू त्याला विवेकानं