‘गुरूज’ या इंग्रजी पुस्तकाची लेखिका भावदीप कांग ही फ्री लान्स पत्रकार असून 21 वर्षे ती वेगवेगळ्या पत्रिकेसाठी लिहीत असते. तिच्या या पुस्तकात महर्षी महेश योगी, धीरेंद्र ब्रह्मचारी, चंद्रास्वामी, माता अमृतानंदमयी, श्रीश्री रविशंकर, मुरारीबापू, जग्गी वासुदेव, रामदेवबाबा महाराज व भय्यू महाराज इत्यादी प्रसिद्धिझोतात असलेल्या, भन्नाट व्यक्तिमत्त्व असलेल्या ‘गुरूं’बद्दलचे लेख आहेत. आपल्या देशात बाबा–बुवांचे अमाप पीक आहे; परंतु हे ‘गुरू’चरित्र वाचकांना एक मजेशीर पुस्तक म्हणून वाचत असतानाच या समाजाच्या आजच्या स्थितीला कारणीभूत असलेल्यांच्याबद्दल आपली भूमिका काय असावी, यास पुनर्विचार करण्यास भाग पाडते.

तथाकथित आध्यात्मिक सुख-समाधानासाठी भारतातील अशिक्षित जनसामान्य (आणि शिकले सवरलेलेसुद्धा!) कुठल्याही ‘गुरू’ला डोक्यावर चढवून घेतील, याची प्रचिती भावदीप कांग या पत्रकर्तीने लिहिलेले Gurus हे इंग्रजी पुस्तक वाचताना नक्कीच येईल. यातील महर्षी महेश योगीपासून भय्यू महाराजापर्यंतच्या गुरुजनांच्या एकेका कारनाम्यावर ओझरती नजर टाकली तरी आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, मानसशास्त्र यांचा पुरेपूर वापर करत अध्यात्म हे एक प्रॉडक्ट म्हणून विकत आहेत व आपली तुंबडी भरून घेत आहेत, हे लक्षात येईल. जाहिरातींचा प्रचंड मारा करत ‘सप्लाय-डिमांड’च्या चक्रात भक्तगणांना अडकावून स्वतःचे ऐषारामी व पंचतारांकित जीवन हे गुरुजन जगत आहेत.
भावदीप कांग ही फ्री लान्स पत्रकार असून गेली 27 वर्षे ती वेगवेगळ्या पत्रिकेसाठी लिहित आहे. तिच्या या पुस्तकात महर्षी महेश योगी, धीरेंद्र ब्रह्मचारी, चंद्रास्वामी, माता अमृतानंदमयी, श्रीश्री रवीशंकर, मुरारी बापू, जग्गी वासुदेव, बाबा रामदेव व भय्यू महाराज यांच्या कर्तृत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न तिने केला आहे. एखादा अपवाद वगळता, यातील बहुतेक गुरू योग व ध्यान (आणि आयुर्वेद) यांच्या व्यापारीकरणातून त्या पदापर्यंत पोचलेले आहेत. हिमालयात तपस्या करून सिद्धी प्राप्त करून घेतलेले आहेत, असे ते दावे करतात. तेथे त्यांना साक्षात्कार झाला. जगातील दुष्ट शक्तींचा नाश करत या जगात कायमची सुख-शांती नांदण्याचा वसा त्यांनी घेतला आहे, असे ते छातीठोकपणे सांगत असतात.
माहिती-तंत्रज्ञान व खासगीकरण-जागतिकीकरण-उदारीकरणामुळे व्यवहारातील आपल्या सर्व व्याख्या बदलत आहेत. ‘गूगल अंकल’च फक्त आपल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो हा समज दृढ होत चालला आहे. परंतु गूगलपूर्व व गूगलोत्तरच्या संक्रमण कालखंडात भारतातील गुरू मंडळींनी परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला व जगभरातील लोकांना उल्लू बनवण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे लेखिकेने प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या वा त्यांच्याबद्दल गैरसमज वा भन्नाट व्यक्तिमत्त्व असलेल्या अशा गुरूंची निवड या पुस्तकासाठी केली आहे. यातील प्रत्येक गुरू या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहेत. परमेश्वराच्या अवताराचे कार्य पुढे नेत आहेत, भरपूर बोलघेवडे आहेत, भक्तांच्या हाकेला ओ देणारे आहेत, त्याच्या शारीरिक व/वा मानसिक आजारांचे निदान करून आजारावर फुंकर घालणारे आहेत. परंतु हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे करत आहेत, हे विशेष.
मुळात त्यांच्या प्रसिद्धीला माहिती-तंत्रज्ञानाने व इलेक्ट्रॉनिक माध्यमाने फार मोठा हातभार लावला आहे, हे विसरू शकत नाही. या गोष्टींचा पुरेपूर फायदा या सर्वांनी करून घेतला आहे. याच्या आधारे त्यांना संपत्ती मिळाली, सत्तेत अप्रत्यक्षरित्या सहभागी होता आले, सत्ताधार्यांशी जवळीक साधता आली आणि राष्ट्रीय व/वा स्थानिक राजकारण/अर्थकारण यावर कायमचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाले. या जाहिरातबाजीमुळे गुरूंचे डीपर्सनलायझेशन होत-होत ब्रँडिंग वाढत गेले. त्याचाही त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. त्यांचे प्रॉडक्टस् चेल्यांच्या (ग्राहकांच्या) मागणीनुसार ठरू लागले. प्रवचन, सत्संग, ध्यान, योगसाधना, आयुर्वेद, कौटुंबिक सल्ला, कुटुंबातील हेवेदावे सोडवणे, जात-जमातीतील भांडणतंटा सोडवणे या स्वरुपात ग्राहकांच्या मागणीप्रमाणे प्रॉडक्ट्स बदलत गेले. टीव्ही चॅनेलवरील या ज्ञानाचे रतीब रोज 24 तास व वर्षातील बाराही महिने अव्याहतपणे चाललेले बघताना प्रेक्षक थक्क होऊन जातो. 70 च्या शतकात टेप्स व डीव्हीडी, व्हिसीडी मधून हे ज्ञान पाझरत होते. परंतु या चॅनेल्सनी यांना कालबाह्य ठरवले. इंटरनेट, यूट्यूब वा मोबाईलनी सर्व गुरूंना अभय देत अत्युच्च शिखरावर पोचविले. सामाजिक माध्यमातून यांच्या भक्तगणांनी स्वतःच्या गुरूंची आरती ओवाळली व इतर गुरूंची हेटाळणी केली.
भावदीप कांग यांनी या पुस्तकासाठी गुरूंना निवडताना उद्यमशीलतेला प्राधान्य दिल्यासारखे वाटते. त्यामुळे त्या अर्थाने ब्रह्माकुमारी वा आर्यसमाज यासारख्या धार्मिकपीठ वा डेरा यांच्या प्रमुखांची निवड केली नाही. त्याचप्रमाणे येथील गुरू हिंदू धर्माचा आधार घेत आध्यात्मिकतेचा गाजावाजा करणारे आहेत. मुळात यात कुठल्याही प्रकारची शोधपत्रकारिता वा प्रचारकी/प्रसारकीचा थाट नाही. यातील गुरूंच्या बद्दल वाचताना हे फार मोठे तत्त्वज्ञ होते किंवा आहेत, धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केलेले आहेत किंवा आध्यात्मिकतेबद्दल चिंतन केलेले आहेत, असे काही वाटत नाही. लेखिकेने त्यांच्या कर्तृत्वामागील मानसिकतेचेही विश्लेषण केले नाही किंवा यांच्यामुळे सामाजिक स्थित्यंतरे झालेली आहेत असा दावाही करत नाही. टीव्हीच्या पडद्यावर हे गुरूजन कसे दिसतात व मनमानी विधान करतात, यावरून त्यांचे व्यक्तिमत्त्व उभे करण्यात ती यशस्वी झालेली आहे. या गुरूंच्या आयुष्यातील घटना व घटनाक्रम उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे मांडून यांच्याबद्दलच्या आपल्या ज्ञानात भर घातली आहे.
महर्षी महेश योगी

1970 च्या सुमारास पॉप कलाकारांचा आवडता गुरू, महर्षी महेश योगी हे नाव जगभर (म्हणजे अमेरिकेत!) प्रसिद्धीच्या झोतात होते, हे अनेकांना आठवत असेल. इंग्रजी भाषेच्या शब्दकोशाला ‘मंत्र’ हा शब्द बहाल करणार्या या योगींच्या शिष्यवर्गात शर्लेमॅक्लेन, बर्ट रेनॉल्ड्स, क्लायंट ईस्टवूडसारखे मातब्बर नट-नट्या होत्या. बीटल्सचा चमू याच्या प्रेमात पडला होता. बघता-बघता तो प्रसिद्धीच्या शिखरावर चढला. ठिकठिकाणी योगाश्रम उभे केले. गुरुत्वाच्या नियमाचे उल्लंघन करणार्या ध्यानातून ‘अधांतरित अवस्था’ (Levitation through meditation) या स्वर्गसुखाचे आमिष दाखवत हजारोंनी शिष्यसमुदाय जमवला. त्याचे ‘प्रत्ययातीत चिंतन’ (Transcendental Meditation – TM) जगातील कुठल्याही समस्येचा अक्सीर इलाज आहे, असा तो दावा करू लागला. या त्याच्या प्रलोभनाला बळी पडून यासाठी शिष्य रांगेत उभे असत. कुठलाही उपास-तापास नाही, शारीरिक यातना नाहीत, त्यागाची भानगड नाही, चंगळवादी जीवनशैली बदलण्याची घाई नाही, या प्रकारच्या सुलभीकरण केलेल्या अध्यात्माला अमेरिकन जनता भुलली नसल्यास नवल म्हणावे लागेल.
मध्यप्रदेश येथील महेश वर्माने महेश योगी असे नामांतर करून आयुष्यात अनेक गोष्टी केल्या; हिमालयात जाऊन ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली, जोशीमठाच्या गुहेत साधना केली, काही काळ शंकराचार्यांचा सेक्रेटरी म्हणून काम केले, उत्तरकाशी मठाचा ताबा घेतला, दक्षिणेतील रामेश्वरम व तिरुवनंतपुरम येथे जाहीर प्रवचने केली, ओंकारातून मुक्तीचा प्रचार केला, मुक्तीसाठी घरदार सोडण्याची गरज नाही – घरी बसूनसुद्धा मुक्ती मिळते, असा विश्वास दिला. मुंबई, कोलकत्ता अशा 25 ठिकाणी ध्यानमंदिरांची स्थापना केली, TM सिद्धीसाठी 25 हजार शिक्षकांना प्रशिक्षित केले, डिस्नेलँड येथे साधना करून दाखवली, हसणारा गुरू (Giggling Guru) म्हणून प्रसिद्धी मिळवली, हेन्री नायबर्ग या श्रीमंत उद्योजकाच्या रोल्स रॉयसमधून युरोपचा दौरा करून तरुण-तरुणींना प्रभावित केले, पाच लाख चेल्यांना योग उड्डाण (Yogic flying) करायचे शिकवले, दोन लाख विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षण दिले, कॅनडा, ब्रिटन व अमेरिकेमध्ये आयुर्वेद उपचार केंद्रांची साखळी उभी केली, रामराज्याचे स्वप्न दाखवले, ध्यानकेंद्राच्या प्रमुखांना ‘राम राजे’ करून टाकले, जगभरातील आश्रमांतील दैनंदिन व्यवहारासाठी राम-मुद्रा नावाचे चलन अमलात आणले, महर्षी इंटरनॅशनल विद्यापीठाची स्थापना केली….असे अनेक उपक्रम राबवत हा योगी महर्षीपदापर्यंत पोचला. Spiritual Regeneration Movement (SRM) foundation च्या माध्यमातून भरपूर संपत्ती गोळा केली. 12 हजार एकर जागेवर ताबा मिळवला. त्याची किंमतच 60 हजार कोटी होती!
धीरेंद्र ब्रह्मचारी

इंदिरा गांधी परिवाराचा गुरू म्हणून धीरेंद्र ब्रह्मचारी हे नाव सुपरिचित आहे. यांनी अध्यात्माच्या काळ्या व्यवहारातून अफाट संपत्ती मिळवली. सत्तेचे सूत्र हलवले. यापूर्वीच्या एकाही गुरूने राजकीय सत्तेचा विचार केला नव्हता. परंतु धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी जागतिक सत्ताधार्यांशी जवळीक साधून नाव कमविले. यावरून खरोखरच त्यांनी इतिहासाला कलाटणी दिली असेल का, हा प्रश्न विचारावासा वाटतो. यांच्या असण्या-नसण्यामुळे काही फरक पडला असता का? या प्रश्नाचे उत्तर भविष्यकाळ देईल. एक मात्र खरे की गुरुजनांनी राजकीय नेत्यांच्या जवळपास वावरण्याचा पायंडा ब्रह्मचारीनेच पाडला.
1975 च्या सुमारास लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांतीचा नारा देशभर गाजत होता. त्याच सुमारास नेमीचंद ऊर्फ चंद्रास्वामी या तरुण साधूने जेपीना आकर्षित केले. परंतु पुढील 20 वर्षांत या साधूने केलेल्या जागतिक ‘पराक्रमां’चा हिशोब मांडल्यास गुरू या पदास काळिमा फासणारा तो ठरेल. अनेक देशांतील राजकीय नेत्यांशी गट्टी जमवण्यात तरबेज असलेल्या या चंद्रास्वामीवर शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याचा आरोप होता. एका देशाच्या प्रधानमंत्र्याच्या खुनाचाही आरोप त्याच्यावर होता. त्याच्या वाढदिवसाच्या समारंभाला झाडून सर्व सत्ताधारी हजेरी लावत होते. परंतु 1996 च्या सुमारास त्याच्या प्रसिद्धीला ओहोटी लागली व जनसामान्यांच्या उपेक्षेला सामोरे जावे लागले. आता तो तिहार जेलमध्ये सडत आहे.
माता अमृतानंदमयी

दैवी आलिंगनातून (Divine hug) करोडोंनी ‘माया’ जमविलेल्या माता अमृतानंदमयीचे नाव सुपरिचित आहे. तिच्या भक्तगणांना एकदा-दोनदा नव्हे, तर हजारदा आलिंगन घेतले तरी समाधान वाटत नसेल. ‘माय चाईल्ड, माय चाईल्ड’ हे शब्द पुटपुटल्यावर oxytocin चा क्षण आल्यासारखा भासत असेल. साडेतीन कोटी जणांना जादूची झप्पी देणार्या या गुरुमातेचे नाव जागतिक रेकॉर्डच्या यादीत नक्कीच नोंदलेले असेल. स्वतःच्या संपत्तीतील काही वाटा देऊन तिने ठिकठिकाणी अत्युच्च शिक्षण देणार्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. एक मात्र खरे की तिच्या शिक्षणसंस्थेतून बाहेर पडणार्या उच्चशिक्षित पदवीधरांनासुद्धा या मातेजवळ दैवी शक्ती आहे, याची खात्री पटलेली असते. त्यामुळेच ही सुधामणी बघता-बघता अध्यात्माच्या अत्युच्च शिखरावर पोचली. ती स्वतःला अवतारी स्त्री समजत नसली तरी तिच्याजवळ अतींद्रिय शक्ती आहे, याबद्दल तिच्या भक्तांना तिळमात्र शंका नाही. ती केवळ आध्यात्मिक गुरुमाता नसून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, दारिद्य्र याविषयीसुद्धा प्रवचन देत असते. जगाच्या सर्व समस्यांवर आयुर्वेदामधून उत्तर मिळेल, याबद्दल तिची खात्री आहे.
श्रीश्री रविशंकर
महर्षी महेश योगीच्या पठडीत तयार झालेल्यांपैकी रामदेवबाबा व श्रीश्री रविशंकर यांनी आपल्या देशाची virtual वाटणी केल्यासारखे उत्तरेकडील राज्यात रामदेव बाबा व दक्षिणेकडील राज्यात श्रीश्री रविशंकर आध्यात्मिक राज्य करत आहेत. महेश योगीच्या सर्व व्यापारीतंत्रांचा वापर करत हे दोघेही आपले प्रॉडक्ट्स चेल्यांच्या माथी मारत आहेत. त्यामुळेच कदाचित श्रीश्री रविशंकरचे ‘आर्ट ऑफ लव्हिंग’ (AOL) नसून ‘आर्ट ऑफ सेलिंग लव्ह’ म्हणून टीका केली जात आहे.
दहा दिवसांच्या मौनव्रताच्या काळात सुदर्शन क्रिया करत असताना रविशंकरला दैवी साक्षात्कार झाला व त्यातून प्रेरणा घेत त्याने ठिकठिकाणी वेदविज्ञान विद्यापीठाच्या शाखा उभारल्या. विद्यापीठाच्या ट्रस्टमध्ये माजी न्यायमूर्ती अय्यर, भगवती, बेंगळुरूचे मेयर अशी मातब्बर मंडळी असल्यामुळे याला बस्तान बसविण्यात कुठलीही अडचण आली नसावी. कर्नाटक शासनाने नाममात्र किमतीत बेंगळुरू येथे रविशंकर याला जागा दिली व 200 विद्यार्थ्यांची वेदविद्येची सोय केली. महर्षी महेश योगीनेसुद्धा हेच तंत्र वापरून दिल्ली येथील जागा बळकावली होती. सुदर्शन क्रिया योग यातून अजङ च्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली व बघता-बघता रविशंकरला जागतिक प्रसिद्धी मिळाली. ज्या प्रकारे अजङ चे मार्केटिंग रविशंकर करत आहे, त्याला तोड नाही. मागणी तसा पुरवठा या बाजारीकरणाच्या संदेशाप्रमाणे आपल्या प्रत्येक शिष्याला समाधान करण्यात रविशंकर यशस्वी होत आहे. किंबहुना शिष्यांचे ‘ब्रेनवाशिंग’ करण्याची हातोटी त्याला सापडली आहे. रविशंकर याच्या मते, त्याच्या आध्यात्मिक व्यवसायात इतर स्वामी, गुरू, आचार्य, बाबा, बुवा यांच्या दुकानांमुळे कुठलीही अडचण येत नाही. कारण यासाठीच्या जागतिक बाजारपेठेत अशा लाखो गुरूंना सामावून घेण्याची क्षमता आहे. या समाजाला अशा बाबा-बुवांची अत्यंत गरज आहे, असे त्याचे प्रांजळ मत आहे. राजकीयदृष्ट्या नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजप यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्याचे काही बिघडत नाही, असेही त्याचे मत आहे.
अजङ च्या कोर्सचे इतके का वेड आहे? कदाचित अजङ हे स्मार्ट म्हणवून घेणार्यांसाठी असावी. ज्यांना रिकामा वेळ आहे वा शारीरिकरित्या आपण अस्वस्थ आहोत, असे ज्यांना वाटते वा आपण एखाद्या भव्य-दिव्य गोष्टीशी जोडलेलो आहोत, अशी ज्यांची भावना आहे तेच अजङ चा पाठपुरावा करतात, असे लेखिकेला वाटते. हरमिंदर साहिब वा अजमेरचा शरीफ दर्गा वा शिर्डी साईबाबाला हजारो संख्येने जाणारे, त्यासाठी शारीरिक वेदना सहन करणारे अजङ च्या भानगडीत पडणार नाहीत. कारण अशा ठिकाणी जाणार्या सश्रद्धांच्या मनात हरमिंदर साहिब वा अजमेरचा शरीफ वा शिर्डी साईबाबा दुःखाचा पर्वतसुद्धा हलवू शकतात, हा विश्वास असतो. तो विश्वास AOL च्या भक्तगणात नसावा, असे वाटते.

रामदेव बाबा
लेखिकेच्या मते, रामदेव बाबा हा virtual गुरू आहे. कारण त्याचा वावर प्रत्यक्षापेक्षा टीव्हीच्या पडद्यावरच जास्त असतो. हसताना, खिदळताना वा योगाची प्रात्यक्षिके करत असताना त्याचे दर्शन होत असते. गेल्या वीस वर्षांत या योगी पुरुषावर इतकी टीका झाली, तरी दाढीच्या आत लपलेल्या त्याच्या चेहर्यावरच्या सुरकुतीत थोडासाही बदल झालेला नसावा. गंमत म्हणजे त्याच्या भोवती इतके गूढ वलय आहे की तो कुणाच्याही आवाक्यात येत नाही. कदाचित रामदेव बाबा, योगगुरूच्या प्रतिमेबरोबरच सत्ताकांक्षाची प्रतिमासुद्धा जपत असावा. परंतु 2014 च्या निवडणुकीत त्याच्या राजकीय आकांक्षेला खीळ बसली. त्याच्या मते, तो फक्त आपली छाप पाडण्यासाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरला होता म्हणे. अण्णा हजारेंच्या जनलोकपाल बिलसाठी पाठिंबा देण्याचे निमित्त साधून राजकारणात बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात तो अयशस्वी ठरला. यापूर्वीसुद्धा 2011 च्या दिल्ली येथील जाहीर सभेतून पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याला स्त्रीवेषातून पळ काढावा लागला. योगविश्वाचा अधिपती व सर्व इंद्रियावर ताबा असलेल्या या गुरूला असे काहीतरी करावे असे सुचलेच कसे? एक मात्र खरे की, भाजपने याच्या ब्रँडचा आधार घेत सत्ता हाशील केली. परंतु शेवटी त्या पक्षानेसुद्धा त्याला झिडकारले. भाजपबरोबरच्या गाढ मैत्रीमुळे रामदेवबाबाच्या मागे लागलेला CBI व ED संचालनालयांचा ससेमिरा मात्र सुटला. आता रामदेव बाबा म्हणजे (पातंजलीची म्हणजे आद्य योगगुरू ही ओळख पुसून काढून) पातंजली ब्रँड साबण, मध, आटा यासारख्या गृहोपयोगी वस्तू वा वाण सामान अशी स्थिती आहे.
हे पुस्तक वाचत असताना या गुरुमालिकेत न शोभणारे गुरू म्हणजे मोरारी बापू, सद्गुरू जग्गी व भय्यू महाराज असे म्हणता येईल. मोरारी बापूच्या ‘रामकथा’ने उत्तर भारताला भुरळ घातली. व मोरारी बापू गुरू पदापर्यंत पोचले. परंतु त्यांच्याबद्दल वाचताना हे सर्व अर्थाने एक निरुपद्रवी गुरू आहेत, असे वाटते.
सद्गुरू जग्गी
अण्णा हजारे यांच्या प्रेमात पडलेले जग्गी वासुदेव हे मूळचे कर्नाटकातले. इतर गुरूप्रमाणे यांच्याबद्दलही अनेक दंतकथा आहेत. योगाचे क्लासेस घेत-घेत शक्तिचलन क्रिया, भावस्पंदन यासारखे उपक्रम राबवत त्यांनी ईश आश्रमाची स्थापना केली.भव्य ध्यानगंगा मंदिर बांधले. शिष्यांची संख्या व त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटस् वरून गुरूंचे मूल्यमापन करत असल्यास जग्गी वासुदेवाचा प्रथम क्रमांक लागेल. लठ्ठ पगाराच्या नोकर्या सोडून अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले आहे. जग्गीच्या मते विनाशापासून या जगाला तोच फक्त वाचवू शकतो. महत्त्वाच्या पदावर असलेल्या 2000 विचारवंतांची (game changers) यादी त्याच्याकडे असून त्यांना दिलेल्या एका आठवड्याच्या प्रशिक्षणातून असाध्य ते साध्य करण्याची किमया त्याच्याकडे आहे, म्हणे!

रामदेवबाबाच्या उद्योजकत्वावर जग्गीचे प्रेम आहे. रामदेवबाबाइतके जग्गीला टीव्हीवर दिसण्याइतके वेड नसले तरी फुटबॉल, क्रिकेट खेळाडूंच्या शिबिरात, कॉर्पोरेट्सच्या अधिवेशनात त्याची हजेरी असते. तो फक्त आरामखुर्चीत बसून सत्संग करणारा गुरू नाही; तर धाडसी खेळ, वेगवान गाड्या व इतर खेळांमध्ये प्रत्यक्ष भाग घेणारा संन्यासी आहे.
इंदौरच्या मध्यवर्ती ठिकाणी एका लहानशा जागेत राहणार्या भय्यू महाराजांची छबी एखाद्या मध्यमवयीन सिनेनटासारखी आहे. पांढराशुभ्र (खादी) कुर्ता, पायजमा व त्यांना मॅचिंग दिसणारी दंतपंक्ती, चेहर्यावर सुहास्य, यांच्या जोरावर त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना आपलेसे करून घेतले आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून प्रतिभा पाटील, नितीन गडकरी वा गल्ली-बोळातील कुठलाही होतकरू राजकीय कार्यकर्ता त्याच्यापर्यंत सहज पोचू शकतो. सामान्यपणे ते कुठल्याही देवळात जात नाहीत. धर्मामधून समाजसुधारणा हवी व कर्मकांडातून स्वतःचेच कल्याण करून घेणार्या वृत्तीला आळा बसावा, असे त्यांना वाटते. त्यांच्या आश्रमात नाथ संप्रदायातील कालिका माता, सूर्य भगवान आणि दत्तात्रेय यांचे फोटो आहेत. इतर गुरू आपण किती मानववादी आहोत, याची शेखी मिरवत असतात. भय्यू महाराज मात्र स्वतःला देशभक्त म्हणवून घेण्यात धन्य मानतात. एका हातात स्वस्तिक चिन्ह, एका हातात नांगर, एका हातात गंगाजल व एका हातात भगवद्गीता आणि केसात मोरपीस असलेल्या भारतमातेचे चित्र त्यांच्या घरी बघायला मिळते. देशभक्तीपर गाण्याचे त्यांना वेड होते. शहीद भगतसिंग वा शिवाजी महाराजांसारखे होण्याचे त्यांचे बालपणीचे स्वप्न होते.
लेखिकेच्या मते, भय्यू महाराजांनी आपली गुरुप्रतिमा फार काळजीपूर्वक उभी केलेली आहे. जे भक्तगणांना आवडते तेच देण्यात त्यांचा हातखंडा आहे. आध्यात्मिक समन्वयक, शेतीतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि धूर्त राजकारणी याचे एक चांगले मिश्रण यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.
पुस्तक वाचून संपवत असताना भावदीप कांग यांनी हेच गुरू का निवडले, याबद्दल आश्चर्य वाटू लागते. कारण आपल्या देशात बाबा-बुवांचे अमाप पीक आहे. इतिहासात डोकावल्यास सच्चिदानंद, योगी भजनसिंग, योगानंद, भगवान रजनीश, आसारामबापू, निर्मलबाबा, माता निर्मलादेवी यांसारखे अतिरथी-महारथी लेखिकेला सापडले असते. त्या तुलनेने भावदीप कांग यांनी निवडलेले गुरू किस झाड की पत्ती वाटतील. कदाचित या ‘गुरू’ परंपरेत लिंगपिसाटपणा, स्त्रियांबद्दल टोकाची भूमिका आणि भ्रष्ट मार्गानेच प्रसिद्धीस आलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे भावदीप कांग यांचे लक्ष तिकडे गेले नसेल. परंतु हे ‘गुरु’चरित्र वाचताना वाचकांना अस्वस्थ न करता मनोरंजनासाठी लिहिलेले आहे की काय, असे वाटू लागेल.
एक मजेशीर पुस्तक म्हणून वाचत असतानाच या समाजाच्या आजच्या स्थितीला कारणीभूत ठरलेल्यांच्याबद्दल आपली भूमिका काय असावी, याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे असे राहून-राहून वाटते.
पुस्तकाचे नाव: गुरूज
(स्टोरीज ऑफ लीडिंग बाबाज)
लेखिका: भावदीप कांग
प्रकाशक: वेस्टलँड प्रकाशन
किंमत: 295 रुपये
पाने: 266