मीरा नंदा यांनी ‘गॉड्स मार्केट’ या त्यांच्या पुस्तकात अलिकडील राजकीय व धार्मिक घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहेत. मध्यम वर्गाच्या वाढत्या धार्मिकीकरणाचा शोध घेताना धार्मिकीकरण पूर्वीच्यापेक्षा जास्त प्रतिगामी; प्रसंगी जीव घेणारे ठरत आहे.
विद्वेष, विद्वान हे शब्दप्रयोग करून हिंदुत्वसेना फॅसिझमला खतपाणी घालत आहे, या निष्कर्षाप्रत लेखिका पोचतात. धार्मिकतेचे प्रदूषण कशा प्रकारे वाढत आहे व त्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला नेमकी कुठली भूमिका घ्यायला हवी, हे आवर्जून सांगत आहेत.

अलिकडील वैचारिक पुस्तकं वाचत असताना वाचकांना एका प्रकारच्या नैराश्याने वेढल्यासारखे वाटू लागते. त्यातील घटना, घटनाक्रम, घटनेवरील मल्लिनाथी, विश्लेषण आपल्याला थक्क करून सोडत असले तरी मुळात माहितीचा आघातच फार मोठा असतो. याच मालिकेतील मीरा नंदा यांचे गॉड्स मार्केट (God’s market) हे पुस्तक वाचत असताना आपला समाज कुठल्या दिशेने प्रवास करत आहे, याबद्दल रुखरुख वाटू लागते. पुस्तकाच्या उपशीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे How Globalisation is making India more Hindu हे मत आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवत आहे. मीरा नंदा यांनी गेल्या 60 – 70 वर्षांच्या कालावधीतील सामाजिक स्थिती-गतीचा विचार करत-करत जागतिकीकरणामुळे कुणाचे भले झाले असेल तर ते हिंदू देव-देवतांचे, त्यांच्या मंदिरांचे आणि परमेश्वराच्या अधिकृत/ अनधिकृत प्रतिनिधींचे (दलालांचे) असे त्यांना वाटत आहे.
मीरा नंदा यांनी आपल्या या पुस्तकात उदारीकरणपूर्व व उदारीकरणानंतरच्या कालखंडाचे पाच भाग केलेले असून त्या-त्या कालखंडातील राजकीय व धार्मिक घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. पहिल्या भागात 1947 सालच्या लोकशाही, कल्याणकारी राष्ट्राच्या वाटचालीकडील दुर्दम्य आशावादाने भारलेल्या समाजाची थोडक्यात दिलेली माहिती आहे. शेकडो अयशस्वी प्रयत्नांनंतर जागतिकीकरणाचे वारे सुटले. समाजाची खासगीकरणाकडील ओढ वाढू लागली. उदारीकरण म्हणजे शिक्षणातून उद्योगावकाश हा नेहमीचा रूढ अर्थ न घेता परमेश्वराचे आणि बाबा-बुवांचे बाजारीकरण या अर्थानेसुद्धा घेतले जाऊ लागले. या तथाकथित नवस्वातंत्र्याचा कालखंड म्हणजे शासनव्यवस्थेने देशाच्या अर्थकारणावरील नियंत्रण कमी-कमी करत वंचित, गरीब व दलित यांना वार्यावर सोडलेला कालखंड असे म्हणता येईल. त्यामुळे संपूर्ण समाज भांबावलेल्या अवस्थेतून जात होता व ही अवस्था धर्माचे गोडवे गाणार्यांसाठी सुवर्णसंधी होती. मतपेटीसाठी लोकानुनय करणारे राजकारणी हिंदुत्वाचा प्रचार/प्रसार यात मोठ्या हिरिरीने सहभागी झाले. बाबा-बुवांच्या करिष्म्याने अगतिक जनसामान्य मोहित होऊन परमेश्वराला नको तितकी प्रसिद्धी देऊ लागले.
पुस्तकाच्या दुसर्या भागात मध्यम वर्गाच्या वाढत्या धार्मिकीकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. कदाचित हे धार्मिकीकरण जाणूनबुजून वा ठरवून केलेले नसेलही; परंतु पुरावे मात्र धार्मिकीकरणाची गडद छाया मध्यमवर्गावर पसरलेली होती, याची खात्री देतात. मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती व संख्या ज्याप्रमाणात वाढत गेली, त्याच प्रमाणात भारतीय समाजावर (हिंदू) धर्माची आपली पकड आणखी घट्ट होऊ लागली. मीरा नंदांच्या मते, हे वाढते धार्मिकीकरण पूर्वीच्यापेक्षा जास्त प्रतिगामी व प्रसंगी जीव घेणारे ठरत होते. जागतिकीकरणाच्या वाहत्या प्रवाहात अनेकांनी हात धुऊन घेतले; मिळालेल्या संधीचा फायदा घेतला; अनेक जण पुढे सरसावले; गर्दी केली. परंतु या गर्दीतूनही वाट काढत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणार्यांत परमेश्वराचे प्रतिनिधी आघाडीवर होते. परमेश्वर ही एक विक्रेय व प्रदर्शनीय वस्तू आहे, याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. त्यातल्या त्यात हिंदूंचा परमेश्वर हा उच्चकोटीचा, तारणहार, सखा, प्रेमी असे सर्व काही होता. त्यामुळे (मध्यस्थामार्फत) संवाद करण्यास काही अडचण नाही, याची सर्व भक्तांना खात्री होती. त्यासाठी फक्त खिसा रिकामा करण्याची तयारी हवी, एवढीच माफक इच्छा या मध्यस्थांची असे. कदाचित बदलत्या सामाजिक – आर्थिक मानसिकतेची गरज पूर्ण करण्यासाठी परमेश्वराचा व (त्यांच्या मध्यस्थांचा) आधार वाटत असल्यामुळे कुठलीही किंमत देण्याचे गणित त्यामागे असावे.

भारतातील शहरी तरुण वर्गाला जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकर्षणाबरोबरच धार्मिक रूढी, परंपरा, भारताचा वेदकालीन इतिहास, धर्माचे उदात्तीकरण, धर्मश्रद्धा यांचेही आकर्षण का वाटावे, हे न सुटलेले कोडे ठरेल. हिंदुत्वाचे हे आधुनिक रूप मंदिरांच्या गाभार्यातून कॉर्पोरेट ऑफिसच्या बोर्डरूमपर्यंत पोचले. ऑफिसच्या वातावरणात उत्सव, धार्मिक समारंभ साजरा करण्यात काही गैर नाही, असेच सर्व संबंधितांना वाटू लागले. या नवीन कॉर्पोरेट संस्कृतीला खतपाणी घालण्यात माता अमृतानंदमयी, आसारामबापू, श्रीश्री रविशंकर, बाबा रामदेव यांचा पुढाकार होता.
उत्क्रांतीत ज्या प्रकारे परस्परपूरक बाबींतून उद्दिष्ट सफल होत असते, तसाच काहीसा प्रकार येथेही घडत असावा. जागतिकीकरणाला धर्मसंस्थांचा आधार व धर्मसंस्थांना कॉर्पोरेट्सचा टेकू असे हे स्वरूप असावे. परंतु जागतिकीकरणाची भलावण करत-करत आपली जबाबदारी झटकणार्या शासनाला धर्मसंस्थेच्या या नवीन स्वरुपाला शरण जावेसे वाटले असावे. त्यामुळे मीरा नंदा यांना धर्मसंस्था व कॉर्पोरेट्सबरोबरच स्टेटलासुद्धा या युतीत जोडण्यासाठी फार विचार करावेसे वाटले नसेल. शासन-मंदिर-कॉर्पोरेट्सची युती (State-Temple-Corporate Complex) भारतीय समाजाला गिळंकृत करत आहे.
आधुनिक लोकशाही राष्ट्रं धर्मनिरपेक्षतेच्या (Secularism) कोनशिलेवर भक्कमपणे उभी आहेत. त्या राष्ट्रांच्या लिखित वा अलिखित घटनेमध्ये याचा उल्लेख आढळतो. शासन-प्रशासन व्यवस्थेत धर्माची, धर्मसंस्थांची, धार्मिक नेतृत्वाची लुडबुड खपवून घेणार नाही, याची हमी येथे दिलेली असते. सार्वजनिक ठिकाणी वा शासनाच्या खर्चाने धर्माचे उदात्तीकरण होत असल्यास राष्ट्रातील न्यायपालिका जाब विचारू शकते. धर्मनिरपेक्षतेचा वाट्टेल तसा अर्थ काढता येत नाही. परंतु आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेची थट्टा होत आहे की काय, अशी स्थिती आहे. गंमत म्हणजे धर्माच्या संबंधातील बहुसंख्य अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण होत आहे म्हणून शासनावर दोषारोप करत असतात व अल्पसंख्य धर्माच्या बाबतीत बहुसंख्यांचा दबाव वाढत आहे, अशी तक्रार करत असतात. शासनाच्या या सेक्युलर धोरणामुळे हिंदू धार्मिकांना दुखवून अन्य धार्मिकांचे पारडे जड केले जात आहे, अशी बहुसंख्य हिंदू धार्मिकांची भावना आहे. परंतु लेखिकेच्या मते, यात काही तथ्य नाही. कागदोपत्री शासन व्यवस्था अजूनही सेक्युलर आहे; परंतु निवडणुकीच्या वेळी बहुसंख्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी आसुसलेले राजकीय नेते व त्यांचे लांगूलचालन करणारे अभिजन यांच्या वाढत्या दबावामुळे शासन हतबल होत आहे (की लोकानुनयासाठी उत्तेजन देत आहे?) आणि शासन व धर्म याची सुप्त (अभद्र) युती समाजात दिसत आहे. कट्टर हिंदूंनाही या युतीतून वारेमाप फायदा होत असल्यामुळे तेच नेहमी हिंदूंना सापत्निक वागणूक मिळते म्हणून गळा काढत असतात.
शासन-मंदिर-कॉर्पोरेट्सच्या युतीचे मूळ शोधत असताना लेखिकेने युतीच्या आर्थिक व्यवहाराचे बारकाईने निरीक्षण केले. ही युती म्हणजेच एक उद्योग व्यवस्था असून हा उद्योग चांगलाच भरभराटीत आहे, याची ग्वाही कुणीही देऊ शकेल. पुस्तकाच्या एका प्रकरणात या युतीमुळे संस्कृतीवर – विशेषकरून शिक्षण, धर्म, नीती, आरोग्य, कला, साहित्य इ.इ. वर – कशा प्रकारे अनिष्ट परिणाम होत आहेत, याचा सविस्तर उल्लेख आहे. धार्मिक रुढी – परंपरांना शासनाचा मिळणारा राजकीय व आर्थिक पाठिंबा हा पुरोगाम्यांसाठी चिंतेचा विषय होत आहे. देशभरातील उदाहरणं देत मीरा नंदा, धर्माचा शिक्षण-प्रशिक्षण संस्था, कॉलेजेस, विद्यापीठ यांच्यावर कशाप्रकारे प्रभाव होत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
गंमत म्हणजे राष्ट्रवाद व धर्मवाद यांचीसुद्धा सांगड घालण्याचा येथे प्रयत्न होत आहे. काही प्रमाणात इस्लाम वा ख्रिश्चन धर्मग्रंथ त्यांच्या अनुयायांना एकसंधपणे जीवन जगण्याची शिकवण देत असतात. तद्विरुद्ध हिंदू धर्म रूढी, परंपरा, उत्सव, पुराणकथा, पौराणिक प्रसंग वा स्थळ इत्यादीवर आधारित जीवनशैली असण्यावर भर देतो. सुट्या-सुट्या बारीक-सारीक धाग्यांना पीळ देऊन घट्ट दोरा विणल्यासारखे विविध धार्मिक विधी व निष्ठा हिंदू यातून हिंदू मानसिकता विकसित होते व हीच धर्माची ओळख म्हणून जपली जाते. परंतु या प्रकारच्या कर्मकांडांमुळे व कर्मकांडांनाच धर्म म्हणून ओळखण्याच्या मानसिकतेमुळे हिंदू धर्माची मूळ शिकवण विसरली जाते, हे हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांच्या लक्षात येत नसावे. धार्मिक रुढी-परंपरा, उत्सव, यात्रास्थळे इत्यादीत जखडून घेतलेले सामान्य हिंदू धार्मिक आणि युतीचे अंग असलेले शासन, मंदिरांचे व्यवस्थापक व त्यांच्या जिवावर जगणारे कॉर्पोरेट्स, एका प्रकारचा खेळ खेळत आहेत की काय, असे वाटू लागते. रूढी, परंपरांच्या जंजाळात संपूर्ण समाजाला अडकून ठेवण्यात ही युती पूर्णपणे यशस्वी होत आहे.
एका प्रकरणात मीरा नंदा यांनी भारतीयांच्या आपल्या संस्कृतीबद्दलच्या अवास्तव कल्पनेबद्दल ताशेरे ओढले आहेत. जगातला आमचाच धर्म पहिल्या क्रमांकावर आहे, असे म्हणणार्यात भारतीयांचाच प्रथम क्रमांक लागेल, यात शंका नसावी. स्वातंत्र्योत्तर काळात या मानासिकतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दर वर्षी कॉलेजेसमधून बाहेर पडणार्या आयटी प्रशिक्षित इंजिनिअर्सच्या प्रचंड संख्येवरून व जागतिक बाजारपेठेतील त्यांची पत व त्यांच्यावर होत असलेल्या पैशाच्या वर्षावावरून हे गृहितक उत्तरोत्तर भारतीयांच्या गौरवाचा विषय होत आहे. संगणकतज्ज्ञ, महत्त्वाच्या पदावरील अनेक भारतीय वा विचारवंत या सर्वांना हिंदुत्वामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय संगणकतज्ज्ञ जगभर पसरलेले आहेत, असे खरोखरच वाटत आहे. परंतु मीरा नंदा मात्र काही ठळक उदाहरणं देत या मिथकाचा पर्दाफाश करत आहेत आणि या संबंधातील वास्तव अगदीच वेगळे आहे, असे सुचवतात.
शेवटच्या प्रकरणात मीरा नंदा यांनी विद्वेष सिद्धांत (Theory of hatred) हा शब्दप्रयोग करून ‘हिंदुत्व सेना’ फॅसिझमला खतपाणी घालत आहे, या निष्कर्षाप्रत त्या पोचतात. ही ‘थेअरी ऑफ हेट्रेड’ आपण (आणि आपला हिंदू धर्म) अन्य धर्म वा धार्मिकांबाबत किती सहिष्णू आहोत, हे फक्त हिंदू धर्मामुळेच शक्य झाले, यावर भर देत आहे. इतर धर्मीयांबद्दलचा हा द्वेष भारतीयांचा गुणविशेष ठरत आहे. वरचेवर उफाळून येणारा हा विद्वेष अल्पसंख्याकांना कायमचेच भीतीच्या दडपणाखाली जगण्यास भाग पाडत आहे. हिंदू अभिजन वा विचारवंतांची निष्क्रियता या फॅसिस्ट वृत्तीला उपकारक ठरत आहे. काही तथाकथित हिंदू विचारवंतांच्या दबावामुळे माध्यमातूनही हाच आवाज प्रतिध्वनित होत आहे. मुस्लिम व इतर धर्मीय हे उपरे असून त्यांनी दुय्यम नागरिकत्व पत्करले पाहिजे, हाच प्रयत्न येथे होत आहे. खरे पाहता, हिंदू धर्म वा जीवनशैली म्हणून प्रभाव नसलेले सेक्युलरिझमच भारताला प्रगतिपथावर नेऊ शकेल, असा आत्मविश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे.
जागतिकीकरणाच्या या कालखंडात जगातील इतर देश धर्म वा सेक्युलरिझमकडे ज्या दृष्टीने बघतात, याचाही ऊहापोह लेखिकेने केला आहे. एक मात्र खरे की गेल्या वीस – तीस वर्षांच्या उदारीकरणाच्या झंझावातात धर्माचा प्रभाव अजिबात कमी न होता, उलट वाढतच आहे. याचे प्रमुख कारण सांस्कृतिक संघ, संस्था व संघटनांकडून सेक्युलरिझमचा चुकीचा काढलेला अर्थ असावा. विशेषकरून भारतीयांचा सेक्युलरिझम हा इतर प्रगत लोकशाही राष्ट्रांपेक्षा फारच वेगळा आहे, असे जाणवते. जागतिकीकरणाच्या वातावरणात धर्माचा वाढता प्रभाव आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली असा काहीसा प्रकार येथे होत आहे. जागतिकीकरण व सेक्युलरिझममधील दरी वाढत आहे.
पीटर बर्गर या समाजशास्त्रज्ञाचा संदर्भ देत लेखिकेला धर्म आणि राष्ट्र हे दोन्ही संस्कृतीच्या अधिष्ठानासाठी एकमेकांसमोर स्पर्धक म्हणून उभे आहेत, अशी आताची स्थिती आहे, असे वाटते. खरे पाहता विवेक, तर्क, मानवता, सहानुभूती, सहिष्णुता इत्यादींचा प्रभाव जनसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात असण्याची गरज आहे. त्यातूनच मानवतावादी संस्कृतीचे संवर्धन होऊ शकते. परंतु धर्मव्यवहारच आता जनसामान्यांच्या जीवनात वरचढ ठरत आहे. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा प्रभाव असलेल्या या बदलत्या परिस्थितीत धर्माचरण हे एक निरुपयोगी कर्मकांड असायला हवे होते व एव्हाना कालबाह्य व्हायला हवे होते. परंतु धर्माचे पुरस्कर्ते शासनाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदतीने जबरदस्तीने समाजावर धर्माचरण लादण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात या धर्माचरणात चमत्कार, अतींद्रिय शक्ती, वा मिथकं इत्यादींचेच उदात्तीकरण केलेले असते. त्याला कुठलाही तार्किक, वैज्ञानिक वा नैतिक आधार नाही. भौतिक सुखाच्या शोधासाठी अत्यंत अनुकूल ठरत असलेल्या जागतिकीकरणात यांचाही मागमूसही नसावा, अशी अपेक्षा असते.

धर्म व जागतिकीकरण यांच्यातील घनिष्ठ संबंधाप्रमाणे धर्म आणि अर्थकारण यांच्यातील संबंधाविषयीसुद्धा लेखिकेने विश्लेषण केले आहे. मुळात धर्माला चिकटून असलेल्या समाजात कमालीचे दारिद्य्र असते, असे तिचे मत आहे आणि त्या समाजात श्रीमंत व गरीब यांच्यात फार मोठी दरी असते. ही विषमता गरिबांना धर्माचरणाकडे खेचते. जागतिक बाजारपेठेत मागणी तसा पुरवठा या तत्त्वाचा दबाव असल्यामुळे प्रत्येक धर्म बाजारपेठेतील वाट्यासाठी स्पर्धा करत असतात. भारतीय बाजारपेठ त्या तुलनेने फारच मोठी असल्यामुळे हिंदू धर्माची चांगलीच चलती आहे व परमेश्वर त्याच्या व्यापार्यांना ‘छप्पर फाडके’ देत आहे.
कदाचित समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावेसे वाटल्यास अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्या व शोषणाला उत्तेजन देणार्या धर्माला उतरती कळा लागेल. त्यासाठी खर्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे तंतोतंत पालन हवे व धर्माला चार भिंतीतच राहायला भाग पाडायला हवे.
मीरा नंदा यांचे हे पुस्तक मानवता, विज्ञान व धर्मनिरपेक्षता यासारख्या संकल्पनांबद्दल व त्यांचा व्यवहारात उपयोग करायला हवा, यासाठी आस्था असणार्या सर्वांसाठी आहे. कट्टर धार्मिकतेच्या या पोषक वातावरणात विवेकी विचारांना थारा देणे अत्यंत कठीण काम आहे, असे वाटत असले तरी त्याला पर्याय नाही. मीरा नंदा यांचे हे पुस्तक (व त्यांची इतर पुस्तकं) वाचताना विकासाची दिशा विवेकवादी असलेच पाहिजे, हे जाणवते. मीरा नंदा व रोमिला थापर याच गोष्टींचा पाठपुरावा करत असून या सत्याला सामोरे जाण्याचे आवाहन करत आहेत. लेखिका ‘गॉड्स मार्केट’ या त्यांच्या पुस्तकातून आपल्याला धार्मिकतेचे प्रदूषण कशा प्रकारे वाढत आहे व त्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला नेमकी कुठली भूमिका घ्यायला हवी, हे आवर्जून सांगत आहेत.
पुस्तकाचे नाव : गॉड्स मार्केट
(हाऊ ग्लोबलायजेशन इज मेकिंग इंडिया मोअर हिंदू)
लेखिका : मीरा नंदा
प्रकाशक : रँडम हाऊस इंडिया प्रकाशन
किंमत : 395 रु.
पाने : 239