Categories
बुवाबाजी

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर

वार्षिकांक - २०१७

हे एकच गुरू असतील की, ज्यांच्या नावापुढे दोनदा ‘श्री’कार असेल. 2009च्या फोर्ब्स या जागतिक संस्थेच्या भारतातील सात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत श्री श्री रविशंकर (यानंतर श्री श्री म्हणून पूर्ण लेखात उल्लेख असेल.) यांचे नाव झळकत होते. अध्यात्माच्या बाजारीकरणातून भरपूर मालमत्ता कमावलेले ते एक आध्यात्मिक जगाचे अनभिषिक्त सम्राट आहेत. 1981 च्या सुमारास बंगळुरू येथे लहान रोपटे असलेले ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ही श्रीश्रींनी राबवलेली संकल्पना या 35 वर्षांत एक मोठा वटवृक्ष होऊन श्रीश्रींच्यावर संपत्तीचा पाऊस पाडत आहे. कदाचित आर्ट ऑफ लिव्हिंग हे नावसुद्धा त्यांचे (विस्मरणात गेलेले) गुरू महेश योगी यांच्या 1963 मध्ये प्रकाशित झालेल्या The Science of Being and Art of Living या शीर्षकावरून घेतल्याची शक्यता आहे.

श्री श्री यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेच्या जगभरातील 156 देशांत दहा हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. सुमारे 35 कोटी लोकांच्यापर्यंत यांच्या उपक्रमाचा लाभ पोचत असून त्या उपक्रमांच्या दैनंदिन आचरणामुळे हे सर्व जण सुखाने, आनंदाने, समाधानाने व आंतरिक मन:शांतीने जीवन जगत आहेत, असे श्री श्रींचा दावा आहे. आताच्या कुठल्याही बुवा-बाबांच्यापेक्षा जास्त संख्येने त्यांचे साधक-शिष्य आहेत. या शिष्यगणात समाजातील मध्यम व श्रीमंत वर्गातील शिष्यांचाच जास्त भरणा आहे, असे अनेकांचे मत आहे.

बंगळुरू येथील कनकपुरा या उपनगरात श्री श्रींचे इंटरनॅशनल सेंटर असून या 100 एकर परिसरात 244 खाटांचे एक अत्याधुनिक आयुर्वेद हॉस्पिटल आहे. याच परिसरात श्रीश्रीतत्त्व या ब्रँडच्या आयुर्वेदीय उत्पादनांची, सौंदर्य प्रसाधनांची, तूप, फळांच्या रसासारख्या अन्नपदार्थांची निर्मिती होत असते. तेथेच श्री श्रींचे कार्यालय असून येथूनच जगभरातील शाखांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या द्वारे मार्केटिंग करत असलेल्या उत्पादनांची दर महिन्याची उलाढालच सुमारे 8 कोटीएवढी आहे. या संस्थेच्या प्रवक्त्याच्या मते यातील सर्व नफा आदिवासी व ग्रामीण भागातील 425 शाळांसाठी व 25 हजार कर्मचारी व प्रशिक्षण देणार्‍यांवर खर्च केला जातो व या सर्व शाळा निःशुल्क आहेत म्हणे!

आर्ट ऑफ लिव्हिंग’चे तत्त्वज्ञान

मनातील सुस्पष्टता, हृदयातील शुद्धता व वृत्तीतील प्रामाणिकपणा हे आमचे सूत्र आहे. आम्ही योग व वेदांत या तत्त्वज्ञानांचे परिपालन आमच्या या सूत्रांच्या परिपूर्तीसाठीच आहे, असे समजतो. धर्म हे केळीचे साल असून अध्यात्म हे आतील केळीसारखे आहे, असे सांगणारे श्री श्री अध्यात्माच्याही पलिकडे जाऊन राजकीय व शांततेचे प्रश्नही हाताळू पाहत आहेत. पूर्वोत्तर राज्यातील रहिवाशांची समस्या असो किंवा काश्मीरच्या खोर्‍यातील वा आयव्हरी कोस्ट येथील वा श्रीलंका येथील दहशतवादी असो; त्यांच्याबरोबर संबंध प्रस्थापित करून शांततेने समेट घडवण्याच्या प्रयत्नात यांचा पुढाकार असतो. कोलंबिया येथील बंडखोरांना शरण जाण्यास यांनीच भाग पाडले म्हणे! तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सात लाख अपराध्यांच्या पुनर्वसनासाठी यांनी एक शिस्तबद्ध कार्यक्रम हाती घेतला. प्रत्येक अपराध्याच्या मनात आपण निरपराधी असून आपल्याला बळीचा बकरा बनवल्याची भावना असते. अशा अपराध्यांना योग-वेदांत पूर्णपणे बदलण्याची ताकद देते, असा त्यांचा दावा आहे.

ऊठसूट अध्यात्म व वेदांत यांचे प्रवचन देणार्‍यांनी व स्वतः आध्यात्मिक जीवन जगत आहे, असा दावा करणार्‍यांनी राजकारण व सत्ताकारण यात भाग घेणे कितपत प्रस्तुत आहे या प्रश्नाला उत्तर देताना श्री श्री यांनी ‘निश्चितच भाग घ्यावा. कारण माझ्यासारखे गुरू सामान्य माणसांच्या संपर्कात असतात. रोज मला 2500 ते 3000 लोक भेटतात. आठवड्याच्या शेवटी वा सुट्टीच्या दिवशी हा आकडा 30 ते 40 हजारापर्यंत जाऊ शकतो. मी त्यांच्या समस्यांच्या व रोजच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी संबंधित अधिकारी व्यक्तीशी संपर्क साधू शकतो व असे करणे आमचे कर्तव्य आहे. भ्रष्टाचार असेल, पाण्याची समस्या असेल, वनसंपत्तीचा नाश होत असेल वा वाहतुकीचा, प्रदुषणाचा प्रश्न असेल, तेथे आमचा सहभाग अनिवार्य आहे. कृतिशीलता हे आमचे कर्तव्य आहे. तुम्ही कृतिशील असताना तुम्हाला नेमके काय वाटते, हे शब्दातून समजावून सांगावे लागते. सामाऩ्यांना तुम्हाला काय वाटते, याच्याशी मतलब नसून त्यांच्या समस्या सुटतात की नाही, यावर लक्ष केंद्रित केलेले असते. काही सत्ताधारी व अधिकारी संवेदनशील असतात, काही नसतात आणि यात कुठला राजकीय पक्ष सत्तेवर आहे, याचा काहीही संबंध नसतो. काही प्रामाणिक असतात, काहीजण गार्‍हाणे ऐकून घेतात. काही वेळा आम्ही केलेल्या विनंतीला केराची टोपली दाखवतात. हे सर्व पुरातन काळापासून असेच घडत आहे. यापूर्वीसुद्धा स्वामी, बुवा, बाबा, संत-महंत, हे सामाजिक व्यवस्थेचे भाग होते. त्यांनी गुरुकुलांची, आश्रमांची साखळी उभी केली. याच गुरुकुलांनी लोकांना संजीवनी देणार्‍या आयुर्वेदाला जन्माला घातले, वाढविले व लोकांना दिलासा दिला. आठव्या शतकातील अद्वैत वेदांताचे तत्त्वज्ञ आदिशंकराचार्य लोककल्याणासाठीच देशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पायी फिरले. जर त्याकाळी विमानाची सोय असती तर ते विमानाने गेले असते. मी विमानाने जाणार नाही, पायीच फिरतो, असे कधीच म्हणाले नसते. ज्या काही सुविधा असतील, त्यांचा वापर त्यांनी केला असता,’ असे म्हणाले. या विधानात वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या गुरूंनी राजकारणात भाग घ्यावा, याबद्दल ते काहीही बोलत नाहीत. जर झाडून सर्व गुरू, राजगुरू होण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रयत्न करू लागल्यास श्री श्रींचे काय होईल, हे सांगता येणार नाही. एकमेकांचे हितसंबंध जपत तथाकथित राजगुरू व सत्ताधारी आपापल्या कृष्णकृत्यावर पांघरूण घालत असतात.

श्री श्रींची राजकीय नेत्यांबरोबरची ऊठबस मोठ्या प्रमाणात आहे. भारताचे प्रधानमंत्री, नरेंद्र मोदी व आर.एस.एस. प्रमुख मोहन भागवत यांच्या बरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. राष्ट्रपतीभवनातील प्रधानमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला श्रीश्री हजर होते. मार्च 2016 मध्ये श्री श्री रविशंकर यांनी यमुनेच्या काठी तीन दिवसांच्या जागतिक संस्कृती महोत्सवाचे आयोजन केले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग या त्यांच्या संस्थेला 35 वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून राजधानीत हा सोहळा साजरा केला गेला. त्यावेळी सत्ताधारी भाजपचे अरुण जेटली, वेंकय्या नायडू, अमित शहा, सुमित्रा महाजन इत्यादी मातब्बर नेते सहभागी झाले होते.

राष्ट्रीय हरित लवादाकडून दंड

यमुनेच्या तीरावरील हा महोत्सव काही काळ वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. यमुनाकाठच्या 3000 एकर पूररेषेतील जमिनीचे पर्यावरणीय व जैविकरित्या अतोनात नुकसान केले म्हणून केंद्र सरकार व राष्ट्रीय हरित लवाद यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगला धारेवर धरले. मुळात काहीतरी जुजबी परवानगी घेतल्याचे सोंग वठवून व काहीही बांधकाम करणार नाही वा जमीन सपाट करणार नाही, या शर्तीवर परवानगी घेतलेल्या 7 एकर जमिनीवर 1200 x 200 चौ. फूट व 40 फूट उंचीचे स्टेज बांधले होते. 24 देशांतील 36 हजार कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला व एका अंदाजाप्रमाणे 18 लाख लोकांनी या ठिकाणाला भेट दिली.

लवादाने व केंद्र सरकारने काही कोटींच्या दंडाच्या रकमेची मागणी केली. कारण पर्यावरण व जैविक हानी भरून काढण्यास 10 वर्षे वेळ लागणार होता. परंतु सत्ताधार्‍यांचा पाठिंबा गृहित धरून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ मनमानी करत होती. शिवाय आम्ही हा कार्यक्रमच यमुनेच्या व तिच्या 27 उपनद्यांच्या रक्षणासाठी करत आहोत व त्यासाठी आम्ही या नदीतीरावर सात कोटी झाडे लावलेली आहेत, त्यामुळे आम्ही कधीच पर्यावरणाची हानी करत नाही, असा प्रतिवाद केला.

राष्ट्रीय हरित लवाद यांनी श्री श्रींच्या संस्थेने विनापरवाना काही बांधकाम करून पर्यावरणाची हानी केली, हा आरोप करत त्यांच्यावर दंड ठोकला. दंडाची रक्कम देणार नाही, म्हणून श्रीश्री हटून बसले व हरित लवादाच्या विरोधात मजकूर प्रसिद्ध केला. हरित लवादाने बदनामीकारक लेखन केल्याबद्दल ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वर खटला भरला. शेवटी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून काही कोटींतील दंडाची रकम कमी करून फक्त काही लाख रुपये दंड भरण्यास ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ला भाग पाडले व श्रीश्री यांनी नमते घेत या प्रकरणातून स्वतःची सुटका करून घेतली.

अशाच प्रकारे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने कोलकता येथील पाणथळावर तीनमजली इमारत व तिला जोडून रस्त्यांचे बांधकाम केले आहे. त्यावरसुद्धा लवादाची टांच आली असून फेब्रुवारी 2018 च्या आत इमारत जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. येथेसुद्धा ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने मनमानी केली व आडमुठेपणे वागली.

गंमत म्हणजे याच राष्ट्रीय हरित लवादाने नुकत्याच भरती झालेल्या शेकडो वनरक्षा अधिकार्‍यांना पर्यावरणासंबंधी प्रशिक्षण देण्यास श्री श्रींच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची नेमणूक केली आहे. लवादाच्या प्रवक्त्याच्या मते लवादाने ठोकलेला दंड व प्रशिक्षण हे दोन वेगवेगळे मुद्दे असून त्यांचा एकमेकांशी संबंध नाही, असे कोडगेपणाने सांगितले. यावरून ही विसंगती आहे, हेच लवादाने दुर्लक्षिले आहे, असे म्हणता येईल.

महेश योगीचे शिष्यत्व

एका अय्यर ब्राह्मण कुटुंबात 1956 साली जन्मलेले श्री श्री यांनी त्यांच्या वयाच्या 20 व्या वर्षी कर्नाटकातील मेलकोटे येथे महेश योगींच्या ट्रान्सिंडेंटल मेडिटेशन (TM) चे प्रशिक्षण घेतले. या ‘टीएम’मुळे प्रभावित झालेले श्रीश्री, महेश योगींच्या ऋषिकेश येथील आश्रमात राहिले. या तरुणाच्या जिद्दीची महेश योगीने दखल घेत वेदविज्ञान, आयुर्वेद व यज्ञ या विषयावरील अधिवेशनाची जबाबदारी श्रीश्रींवर सोपवली. अधिवेशन यशस्वी झाले. त्यानंतर महेश योगींच्या सोबत श्रीश्री देशभर फिरू लागले. महेश योगींच्या इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅनेजमेंट सायन्स या भोपाळ येथील संस्थेचे प्रमुख म्हणून श्रीश्री काम करू लागले.

1980 च्या सुमारास महेश योगी व श्रीश्री यांच्यातील काही मतभेदांमुळे श्रीश्रींना राजीनामा द्यावा लागला. नंतर श्रीश्री यांनी बंगळुरू येथे स्वतःच्या आश्रमाची स्थापना केली. श्रीश्रींच्या मते, महेश योगींनी त्यांना भोपाळ सोडण्यास भाग पाडले नसून ते स्वतःच त्यातून बाहेर पडले. या विषयावर जास्त काही बोलण्याची त्यांची तयारी नव्हती. एका सूत्रानुसार श्रीश्री यांनी इन्स्टिट्यूटमधील एका अमेरिकन शिष्याला आत्मप्रौढी मिरवण्यासाठी महेश योगींविषयीची काही गुप्त माहिती पुरवली होती व हा अमेरिकन शिष्य CIA या अमेरिकेतील गुप्तचर संस्थेचा एजंट होता व महेश योगीसंबंधीची माहिती गोळा करत होता. अमेरिकन एजंट व श्रीश्रींवर पैशाची अफरातफर केल्याचे आरोप करण्यात आले व श्रीश्री बंगळुरूला रवाना झाले.

सुदर्शन क्रिया योग

या मन:स्तापाचा परिणाम म्हणून प्रायश्चित्त घेण्याच्या उद्देशाने 1982च्या सुमारास कर्नाटकातील शिमोगा येथे श्रीश्रींनी दहा दिवसाचे मौनव्रत पत्करले व त्याच वेळी सुदर्शन क्रिया योग या श्वासोच्छ्वास प्रकाराचे कौशल्य हस्तगत करून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा पाया घट्ट केला. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या सर्व कोर्सेसमध्ये सुदर्शन क्रिया योगाचा थोडा फार तरी अंश असतो व या सुदर्शन क्रिया योगाच्या स्वामित्वाचे हक्क (पेटंट) त्यांनी घेतले. खरे पाहता अशा गोष्टीसाठीचे पेटंट कुठल्याही देशाची अधिकृत संस्था देत नाही. परंतु श्रीश्रींनी यावर त्यांचे हक्क प्रस्थापित केले. येथूनच अध्यात्माच्या बाजारीकरणाची सुरुवात झाली.

सुदर्शन क्रिया योग हा श्वासोच्छ्वास क्रियेतील एक निव्वळ प्रकार आहे आणि त्यासाठी एवढी जबरदस्त फी का आकारली जाते, हे एक न सुटलेले कोडे आहे. ऋएठअ चे अध्यक्ष व एक विवेकवादी चिकित्सक, डॉ. नरेंद्र नायक तर श्वासोच्छ्वास शिकण्यासाठी कुणीतरी पैसे देतील का, हा प्रश्न उपस्थित करत आहेत. शरीरातील इतर कित्येक क्रिया-प्रक्रियांप्रमाणे श्वासोच्छ्वाससुद्धा एक क्रिया आहे. पळत असलेल्या कुत्र्याला जशी धाप लागते, तसाच काहीसा प्रकार या सुदर्शन क्रियेच्या वेळच्या श्वासोच्छ्वासाच्या वेळी होत असावा व त्यामुळे शरीरातून नाकावाटे व तोंडावाटे मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड हा वायू बाहेर पडत असावा. त्यामुळे कि ची पातळी कमी झाल्यामुळे शरीरात गुदगुल्या केल्यासारखी सुखद संवेदना होत असावी व त्यालाच भक्तगण निर्वाणावस्था असे म्हणत आनंदित होत असावेत. भारतीय मध्यम वर्गाला अशा प्रकारचे चमत्कार सादर करून फसवण्याचा प्रकार आणखी कुणीही केला नसेल, असे नरेंद्र नायक यांना वाटते. अशा प्रकारची टीका फक्त रॅशनॅलिस्टच करत नसून दहा-दहा वर्षे योगाची प्रॅक्टीस करणारे व या संस्थेत प्रशिक्षक म्हणून काम करणारे सुद्धा करतात.

आर्थिक (गैर) व्यवहार

या संस्थेच्या गैरव्यवहाराबद्दल आजकाल उघडपणेसुद्धा बोलले जात आहे. या संस्थेच्या बहुतेक शाखांत श्रीश्रींच्या नातेवाईकांचा सुळसुळाट आहे. काहीही होऊ दे; कार्यक्रम यशस्वी झालाच पाहिजे, या श्रीश्रींच्या हट्टाला मान डोलावणार्‍यांची भरती केली जात आहे. यांच्या विरोधात ‘ब्र’ काढणार्‍यांची थेटपणे हकालपट्टी केली जाते. काढून टाकलेल्यांची अन्यायाच्या विरोधात कोर्टात जाण्याचीसुद्धा सोय नाही. कारण सर्व व्यवहार कागदोपत्री व्यवस्थितच असतात.

श्रीश्री यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ला देणगी म्हणून मिळालेली जमीन त्यांचे पुतणे, अरविंद वर्चस्वी व अजय तेजस्वी यांच्या सुमेरू कंपनीला देऊन टाकली. अशाच प्रकारचे जमिनीचे अनेक गैरव्यवहार ही संस्था करत आली आहे म्हणे. काही वर्षांपूर्वी बंगळुरू येथील त्यांच्या आश्रमाजवळची 15 एकर जमीनसुद्धा मालकावर दबाव आणून विकत घेतली. जमीन मालकांनी या जागेत मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून ठिबक सिंचनाची यंत्रणा उभी केली होती. एका रात्री श्रीश्रीच्या भाडोत्री गुंडांनी त्या यंत्रणेची तोडफोड केली. मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेवटी वैतागून श्रीश्रीला जमीन विकण्याची तयारी दाखवली. सव्वा कोटी रुपयांच्या जमिनीच्या मालकाला 33 लाख रुपये देऊन ’वाटेतील काटा’ दूर केला. श्रीश्रींनी सगळी कहाणी ऐकल्यानंतर ही जमीन तुझीच आहे. येथे येऊन सेवा कर. म्हणून त्याचे समाधान केले.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या विरोधात अनेक ब्लॉगवर सातत्याने टीका होत असते. 2010साली श्रीश्रींच्या विरोधात आक्रमकपणे लिहिणार्‍या काही ब्लॉग्सवर बंदी आणावी व त्यांची नावे जाहीर करावीत म्हणून भारतातील व अमेरिकेतील प्रशासनाकडे त्यांनी रीतसर तक्रार केली. गूगल आणि वर्डप्रेसबद्दलही त्यांची अशीच तक्रार होती. या कंपन्यांना आरोपीच्या कठड्यात उभे केले होते. सुदर्शन प्रक्रियासंबंधीची काही हस्ताक्षरातील टिप्पणी प्रसिद्ध केल्यामुळे या कंपन्यांच्या विरोधात त्यांनी खटला भरलेला होता.

परंतु अमेरिकन कोर्टाने ब्लॉगर्सची आयडेंटिटी गुप्त ठेवून काही आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यास सांगितले.

आर्ट ऑफ लिव्हिंग’चा धंदेवाईकपणा

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे अध्यात्म व योग या फारच महागड्या गोष्टी आहेत, असा अनेकांचा अनुभव आहे. पहिल्यांदाच प्रवेश घेणार्‍यांच्या तीन दिवसाच्या ‘हॅपिनेस’ प्रोग्राममध्ये श्वासोच्छ्वासाच्या कौशल्यामधून आयुष्यात कसा बदल होऊ शकतो, श्वासोच्छ्वासातून शरीराला कशा प्रकारे शिथिल करता येते, योगाच्या काही आसनांतून मनाच्या आत कसे डोकावून पाहता येते व ध्यानाचे काही प्रकार कसे करावेत, याचे शिक्षण दिले जाते व या तीन दिवसांची फी फक्त 5300 रुपये आहे. अमेरिकेतील सुमारे 200 शहरांत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शाखा आहेत. या शाखेत नियमितपणे श्रीश्री योग, आर्ट ऑफ सायलेन्स, सहज समाधी ध्यानपद्धती व पंचकर्म शुद्धोपचार पद्धती इत्यादी प्रकार शिकविले जातात. यासाठीची फी 300 डॉलर्स (18 हजार रुपये) ते 2000 डॉलर्स (साडेचार लाख रुपये) आहे. यांच्या बहुतेक शाखा करमुक्त ट्रस्ट म्हणून नोंदवलेल्या असून त्या आता नफा कमावणार्‍या संस्था म्हणूनच कार्य करत आहेत. अमेरिकेतील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या काही शाखा आरोग्य व शिक्षण या क्षेत्रातही कार्य करत असल्यामुळे देणगीचा ओघ वाढतच आहे. वॉशिंग्टन येथे श्रीश्री यांची इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज ही संस्था असून त्यालाही करमाफी आहे. त्यांचेच एका वर्षाचे उत्पन्न 7 लाख डॉलर्स असून मालमत्तेचे मूल्य सुमारे 21 लाख डॉलर्स आहे. ही काही मासलेवाईक उदाहरणं आहेत व ती हिमनगाचे टोक आहेत. त्यांच्याच जाहिरातीप्रमाणे 156 देशांतील आर्थिक व्यवहाराचा अंदाज केल्यास आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आर्थिक साम्राज्याचा अंदाज येईल.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चीच एक उपसंस्था असलेले श्रीश्री आयुर्वेद ट्रस्ट मोठ्या प्रमाणात आयुर्वेदीय टॉनिक्स, टूथपेस्ट, साबण, मसाले पदार्थ, लोणचे, डबाबंद फळांचे रस इत्यादींचे उत्पादन व विक्री करते. या उत्पादनांची विक्री करणारी 1000 दुकानं भारतभर पसरलेली आहेत. इतर देशांतील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शाखांतही विक्रीव्यवस्था आहे. ग्राहकांनी आपापल्या आयुष्यात आयुर्वेदाला प्रमुख स्थान दिल्यामुळे आमच्या ब्रँडला जास्त मागणी आहे. या कॉर्पोरेट टाईप विक्री व्यवस्थापनातून आर्ट ऑफ लिव्हिंगला सुमारे 230 कोटी रुपयांचे दरवर्षी उत्पन्न मिळते. 2011-12 पासूनचा हिशोब केल्यास हा आकडा 10 हजार 500 कोटी रुपयापर्यंत पोचू शकतो.

त्यामुळे हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ नसून ‘आर्ट ऑफ सेलिंग’ आहे, असे टीकाकारांचे मत आहे.

साधकांची मानसिकता

बुवा-बाबांच्या नादी लागणार्‍या भारतीय समाजाच्या आजच्या मन:स्थितीचा विचार केल्यास तीन ठळक मुद्दे उठून दिसतात. हा समाज आता एका संक्रमणावस्थेतून जात असल्यामुळे आर्थिक व सामाजिक अनिश्चिततेचा सामना करत आहे. कौटुंबिक रचना बदलत आहे. नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी अरेरावी वाढली आहे. आर्थिक विषमता वाढत आहे. सामाजिक तेढ वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या समस्यांवर ताबडतोबीने तोडगा हवा आहे व हा तोडगा कॉर्पोरेट बाबा-बुवांच्याकडे आहे म्हणून सर्वजण धाव घेत आहेत. समाजात ‘गुरुशरण’ वृत्ती वाढत असल्यामुळे ठिकठिकाणी धार्मिक पुढार्‍यांचे पीक फोफावत आहे. त्यांच्या संस्थेच्या शाखांचा विस्तार होत आहे व भक्तगण सढळ हाताने देणग्या देत आहेत किंवा देणग्या ‘वसूल’ केल्या जात आहेत. धार्मिक पुढार्‍यांचे हे आकर्षण हे आताच्या समाजाच्या धार्मिकीकरणाचे एक प्रमुख लक्षण आहे.

त्याचप्रमाणे आर्थिक दुर्बल वर्ग हा गुरुपरंपरेचा बळी ठरत असून गुरूंच्या विरोधात एकही शब्द न ऐकण्याच्या मन:स्थितीत वावरत आहे. हे सर्व गुरू त्यांचे आयकॉन्स आहेत व या आयकॉन्सच्या प्रतिमेला थोडासा जरी धक्का लागला तरी जमाव हिंसक होत आहे व झुंडशाहीने विरोधाचा आवाज बंद केला जात आहे. हे आयकॉन्स नसतील तर दुर्बल घटकांचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. या आयकॉन्समुळे त्यांच्या अस्मिता जागृत होत आहेत. त्यांच्या गुरूंच्या सान्निध्यात असताना जात-पात, उच्च-नीच, शिक्षित-अशिक्षित हे भेद गळून पडतात, याची खात्री गुरू देत असल्यामुळे फार मोठा लोंढा त्यांच्याकडे जात आहे व या सर्वांना इन्सान म्हणून वागणूक मिळत असल्यामुळे गुरूंच्या विरोधात एकही शब्द न ऐकण्याच्या मन:स्थितीत ते आहेत.

तिसरा घटक म्हणजे या गुरूंना राजाश्रय व सत्ताश्रय मिळत असल्यामुळे समाजातील मोठ्या समुदायाला आपल्या सर्व समस्या चुटकीसरशी सुटतील, याची खात्री झाली आहे. मुळात या दुर्बल घटकाला पारमार्थिक सौख्याशी काहीही देणेघेणे नाही. रोजी-रोटीचे प्रश्न सुटत असल्यास ते कुणाचेही शिष्यत्व पत्करण्याच्या तयारीत असतात. या सर्व घटकांमुळे हा समाज जास्त धार्मिक झाला, असे वरवरून तरी वाटत आहे. खरे पाहता पूर्वापार धार्मिक कार्य करत असलेले स्वामी नारायण पंथ, रामकृष्ण मिशन, डिव्हाइन लाइट मिशन, रमण महर्षी आश्रम वा वारकरी संप्रदाय यांसारख्या आपल्या देशातील संस्था त्यांना या भोंदू बाबांच्यापासून जनसामान्यांना रोखूशकल्या असत्या; परंतु आताचे अत्याधुनिक गुरू आपल्या स्वार्थासाठी यांचा वापर करून घेत आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट बाबा-बुवांच्या समोर या पारंपरिक संस्था सपशेल लोटांगण घालत आहेत. मुळात गुरूद्वारे प्रस्थापित होत असलेला धर्म व बाजारीकरणातून उपलब्ध होत असलेल्या ऐहिक सुविधा यांच्या कात्रीत सापडलेल्या जनसामान्यांना या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ करणार्‍या गुरूंचे आकर्षण वाटते व या गुरूंची आध्यात्मिक टूथपेस्ट, साबण, तेल, तूप, यांची मागणी केली जाते. त्यांचे शिष्यत्व पत्करण्यात धन्यता वाटू लागते. त्यामुळेच कदाचित श्रीश्री रविशंकर यांचे आध्यात्मिक व आर्थिक साम्राज्य विस्तारित होत असावे.

(संदर्भः फ्रंटलाइन पाक्षिकातील आणि वायर व स्क्रोल या वेबसाइटवरील यासंबंधीचे लेख.)