21 व्या शतकात महासत्ता होण्याची स्वप्नं बघणार्या आपल्या देशाला प्रत्येक दशकाला प्रत्येक वर्षाला, एखाद्या नव्याकोर्या अवताराची गरज भासते व या अवताराला आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी विलक्षण असे काहीतरी करून जनसामाऩ्यांना अचंबित करावे लागते. मागील एक-दोन दशकांत जनसामान्यांसकट मध्यम व श्रीमंत वर्गाला मानसिक व शारीरिक आरोग्याची भलतीच काळजी वाटू लागली आहे. न परवडणारे हॉस्पिटल बिल्स व श्रद्धा-अंधश्रद्धांवर होत असलेला घाला यामुळे दुसरी एखादी चोखंदळ वाट शोधावी लागत आहे. त्यामुळे योग, ध्यान, आयुर्वेद या परवलीच्या शब्दांनी लोकांना भुरळ पाडली आहे. याचाच (गैर) फायदा घेत कॉर्पोरेट बाबा-बुवांचे फार मोठे पीक ठिकठिकाणी फोफावले आहे. केरळातील माता अमृतानंदमयी पासून हरियाणातील सच्चा डेराचे बाबा राम-रहीमपर्यंत या बाबा-बुवांचा सुळसुळाट आहे. भाईगिरी, गुंडगिरीप्रमाणे ही ‘गुरु’गिरी समाजाला पोखरत आहे. या ‘गुरुगिरी’च्या घोळक्यात हरिद्वारचे बाबा रामदेव, तमिळनाडूचे नारायण अम्मा नावाचा बाबा, गणेशपुरी येथील गुरुमायी चिद्विलासानंद (हिने हस्तस्पर्श केलेल्या रुद्राक्षमाळेची किंमत 54 हजार व चांदीच्या पादुकांची किंमत 38 हजार रुपये होती म्हणे!), हरियाना येथील आनंदमूर्ती गुरू माँ, हैदराबादचे चिन्ना जियार, रत्नागिरीचे नरेंद्र महाराज, कोलकत्ताचे श्रीश्री सोहमबाबा 1008, दिल्लीचे निर्मल बाबा, बंगळुरूचे श्रीश्री रविशंकर इत्यादी असून अलीकडच्या काळात सद्गुरू जग्गी वासुदेव यांचे नाव माध्यमांत झळकत आहे. जग्गी वासुदेव स्वतःला स्वयंभू गुरू समजतात व त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे.
योग दशक
हे दशक योगक्रांतीचे दशक आहे की काय, असे वाटण्याइतपत या गुरुजनांनी याचा वापर केला आहे. राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराच्या उचापती ऐकून विटलेल्या कानांना व टीव्हीवर खिळलेल्या डोळ्यांना योगासनांचे, कसरतीचे प्रयोग सुखावह वाटत आहेत. योगाच्या करिष्म्याचा वापर करून भव्य-दिव्य अशा कॉर्पोरेट्स-सम संस्था उभ्या केल्या जात आहेत व हे ‘गुरुगिरी’ करणारे कंपनी एक्झिक्युटिव्हप्रमाणे आलिशान जीवन जगत आहेत. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर फर्डे भाषण करून हजारो-लाखो समुदायावर छाप पाडणार्या या बाबा-बुवा, माता यांना यापूर्वीच्या तथाकथित अध्यात्म वा परमार्थाची कास धरावी लागत नाही. मोक्ष-मुक्तीसाठी उपास-तपास, जप-जाप्य, वा काम-धाम सोडून कुठेतरी रानावनात जाणे यांची काहीही गरज नाही. ही जीवननौका पार करण्यासाठी जे काही करावे लागत आहे, ते सर्व या बुवा-बाबांकडे आहे, असा दावा ते करत असतात. जागतिकीकरणामुळे मध्यमवर्गाजवळ पैसा खुळखुळत आहे व श्रीमंतांपुढे तर पैशाची उधळपट्टी कशी करावी, हाच एक मोठा प्रश्न असतो. शिवाय या अभिजनांना ‘टू मिनट्स नूडल्स’सारखे सर्व काही दोन मिनिटांतच हवे असते व त्याची पूर्तता करण्यासाठी ‘गुरुगिरी’ करणारी फौज तयारच असते. अशा वेळी खा, प्या, मजा करा, जमेल तेवढा वेळ योग, ध्यान यांना द्या, आमच्या रिसॉर्टसारख्या आश्रमात येऊन राहा व ताजेतवाने होऊन तुमच्या कामाला लागा, हाच संदेश बहुतेक कॉर्पोरेट्स बुवा-बाबा देत असतात. या बुवा-बाबांची शोषण प्रक्रिया अखंडित चालावी, यासाठी राजकारणी हातभार लावत असतात. हे बाबा-बुवा या राजकारण्यांना आपल्या दानपेटीतील थोडासा वाटा देत त्यांचे तोंड गप्प करत आहेत व हात बांधून ठेवत आहेत. मतांच्या आशेमुळे हे राजकारणीसुद्धा यांचे लाड पुरवत असतात. थोडक्यात, गुरुगिरीची व्याख्या बदलत आहे.
अनपेक्षित असे काहीतरी घडत आहे. स्वामी-बाबा आपल्या सडपातळ पोटाला घुसळत असताना 8-10 कोटी डोळे टीव्हीच्या पडद्यावर खिळलेले असतात. एखादा फाइव्ह स्टार गुरू ध्यानसमाधीबरोबर गोल्फच्या मैदानावर वावरताना दिसतो. नागबाबा महागडा कॅमेरा हाताळत प्रेक्षकांना निसर्गाचे दर्शन घडवतो. एखादी माताजी मॉडेल गर्लप्रमाणे पर्शियन हॅट व फॅशनेबल कपडे घालून हॉलिवूडच्या भक्तांना संमोहित करत असते. एखादा संतबाबा अमृतसरच्या सुवर्णमंदिरापेक्षा मोठ्यातले मोठे सुवर्ण मंदिर बांधण्याची भाषा करतो. कॉन्व्हेंट शाळेत शिकलेली स्वामिनी डीव्हीडी कंपनीची मालकीण असू शकते. अजून एक त्रिशूळधारी महाराज विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या प्रचारात मश्गुल असतो. एखादा तरुण अर्थतज्ज्ञ आपण देवदूत होण्याच्या वा नसण्याच्या गप्पा मारत असतो. असे एक ना दोन… ‘एक ढूंढे तो हजार मिलते है.’ यातलाच एक महाठगगुरू, सद्गुरू जग्गी वासुदेव…
सद्गुरूंची जडण–घडण
तमिळनाडू येथील हिरव्यागार नीलगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कोइमतूर या शहरापासून 30 किलोमीटर दूर असलेल्या वेल्लिनगिरी येथे या सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा लक्झरी आश्रम आहे. 150 एकर विस्तीर्ण असलेले आदियोगी संकुल हे या सद्गुरूचे मुख्य केंद्र असून येथूनच सर्व सूत्रे हलवली जातात. येथे रोज काही ना काही कार्यक्रम असतात व या आश्रमाला साजेशी भक्तगणांची व उद्योजकांची येथे रेलचेल असते. कदाचित सद्गुरूंना पारंपरिक धर्मपालन मान्य नसावे. त्यांना याबद्दल एखाद्या उद्योजकाने विचारल्यास, ‘केवळ देवाच्या हाती या देशाची सूत्रं देऊन चालणार नाही. त्यांनी काय गोंधळ घातला आहे, आपण सर्व अनुभवत आहोतच. जोपर्यंत ही सूत्रं तुम्ही तुमच्या हातात घेत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील,’ असे हसत-हसत सांगतील. योगगुरूच्या पारंपरिक वेशभूषेला व भाषेला धक्का देणारे हे गुरू आहेत. महागड्या बाइकवरील फेरफटका, कोईमतूर येथील 370 एकर वनक्षेत्रात हँड ग्लायडिंगचे साहसी खेळ, वेल्लिनगिरी डोंगरावरील गोल्फ मैदानावर गोल्फ खेळ आणि रेंजरोव्हरमधून रेस लावल्यासारखे गाडी चालवत मीटिंगच्या जागी जाणे ही त्यांची लाइफ स्टाइल आहे. त्यांच्या सुपरइगोला शोभणारी शुभ्र दाढी, कफनीवजा अंगावर शर्ट, खाली भारतीय पद्धतीने नेसलेले धोतर, खांद्यावर अस्तव्यस्त टाकलेली रेशमी शाल व डोक्यावर (टक्कल झाकणारे) मुंडास या आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाद्वारे शिष्यांना ‘ट्रान्स’मध्ये पाठवू शकतात. ‘ईश योग’ या नव्याकोर्या पारमार्थिक मार्गावर शिष्यगणाचा संचार करून आणू शकतात. सद्गुरू केबल टीव्हीवाल्यांचे अत्यंत लाडके हिरो आहेत. अमेरिकेतील काही शहरातील बसेसवर यांच्या चेहर्याची जाहिरात झळकत असते म्हणे! “एक चिकित्सक म्हणून मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली. मी कधीच देवळात गेलो नाही, वेद वाचले नाहीत. तुम्ही मला आधुनिक गुरू म्हणू शकता.”
– इति सद्गुरू.

योगजगतात सद्गुरू जग्गी याचे नाव बहुश्रुत आहे. हे योगी दिव्यदृष्टी असलेले, अध्यात्मवादी, मानवतावादी व पर्यावरणवादी म्हणून जगभरातील त्यांच्या शिष्यवृंदात ख्याती आहे. आध्यात्मिक गुरू असूनसुद्धा समाजकार्यात व राष्ट्राच्या विकासात यांचा मोठा सहभाग असल्यामुळे समाजातील सर्व स्तरात यांचा बोलबाला आहे म्हणे!
60 वर्षांच्या या सद्गुरूचे मूळ नाव श्रीपाद जगदीश वासुदेव असून त्यांचा जन्म कर्नाटकातील म्हैसूर येथे झाला. त्यांचे वडील डोळ्यांचे डॉक्टर होते. वयाच्या 11व्या वर्षी जग्गी यांना त्याकाळच्या मल्लादीहळ्ळी राघवेंद्रस्वामी यांनी योगासनं शिकवली. याच योगशिक्षणावर जग्गींचा डोलारा उभा असून पुढील आयुष्यात याचाच वापर त्यांनी फार खुबीने करून घेतला आहे. सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना कुठल्याही परंपरेचा/घराण्याचा/मठाचा पाठिंबा नाही. इस्कॉन वा दासनामी वा अद्वैताचे अध्वर्यु श्रीभगवत्पाद शंकराचार्य यांचे शिष्यत्व त्यांनी कधीही पत्करले नाही. बालपणी त्यांच्यावर गौतम बुद्ध, बौद्धधर्म व बुद्धाचे संघ यांचा प्रभाव होता म्हणे! या गोष्टींचे पुनरुज्जीवन व्हायला हवे व या आधुनिक युगात याला पर्याय नाही, असे त्यांना वाटते. लालसा, द्वेष, मत्सर, टोकाची हिंसा या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, यावर त्यांचा भर आहे.
नास्तिकतेचा मुखवटा
अगदी लहानपणापासूनच वैदिक परंपरा, धर्मग्रंथ, हिंदू तत्त्वज्ञान इत्यादीबद्दल घृणा असल्यामुळे मी संस्कृतचा अभ्यासही कधी केला नाही, असे ते गर्वाने सांगत असतात. परंतु डोस्टोव्हस्की, काँट, कामु या युरोपियन तत्त्वचिंतकांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव आहे म्हणे! त्यांच्या मते, सद्गुरू म्हणजे अशिक्षित गुरू, ज्याला संस्कृत व वेद यांचा गंध नाही व उपनिषदांबद्दल अज्ञान आहे. जे काही त्यांच्याजवळ आहे, ते सर्वस्व त्यांचेच आहे, याबद्दल त्यांना अभिमान आहे. त्यांनी कधीही भगवद्गीता वाचली नाही. तरीसुद्धा ऐन रणांगणावर अर्जुनाला उपदेश पाजणार्या श्रीकृष्णापेक्षा कित्येक पटीने त्यांच्याकडे ज्ञान आहे, असे ते दावा करतात.
लहानपणी कधीतरी आई – वडिलांबरोबर देवळात गेल्यास हजारो प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडत होता म्हणे! शेवटी ते वैतागून त्याला चपला सांभाळणार्याकडे ठेवून देवदर्शनाला जात होते. तरुणपणी जग्गी स्वतःला नास्तिक व बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवून घेत होते. परमेश्वराचे अस्तित्व मान्य नव्हते. मंदिर, देऊळ यांचा मनस्वी तिटकारा होता. देवळात जाणार्यांची ते थट्टा करत असत. देवदर्शन करून आलेल्या भक्तांच्या चेहर्यावर कायमचीच शोककळा असते. कारण त्यांचे सर्व लक्ष चपलांच्याकडे असते व हॉटेलमध्ये इडली, दोसा खाऊन बाहेर पडणार्यांच्या चेहर्यावर तृप्तीची झाक असते, असे ते चेष्टेने म्हणत असत.
भारतात तेहतीस कोटी देव-देवता असताना मनात एवढी भीती का आहे, हा त्यांचा प्रश्न होता. देवावरील श्रद्धा ही नेहमीच जी सामाजिक परिस्थिती व संस्कृतीत आपण वाढलेलो असतो, त्यावर अवलंबून असते. तुमच्या देवाला दाढी आहे की नाही, त्याला चार हात आहेत की आठ, तीन चेहरे की सहा, डोके सिंहाचे की हत्तीचे की घोड्याचे इत्यादी गोष्टी आजी-आजोबांच्या भाकडकथा आहेत, त्यात काहीही तथ्य नाही व प्रत्यक्ष परिस्थितीशी त्यांचे काही देणे-घेणे नसते. आपले देव माणसासारखेच असतात. तुम्ही जर रेडा असता तर तुमचा देवही रेड्यासारखा दिसला असता. लोकांनी डोक्यातील देव काढून टाकावा. कारण कुणीतरी पांढर्या दाढीचा मयुरासनावर बसून आकाशातील ढगांच्या आडून तुमच्या आयुष्याचे नियंत्रण करत असल्यास ते नाकारायला हवे.
नित्यनेमाच्या रुढी-परंपरा यांची ते नेहमीच टर उडवत असत. धर्मग्रंथांची टिंगल-टवाळी करत असत. ज्यांची देवावर श्रद्धा आहे, त्यांनी फक्त एक दिवस आपले सर्व व्यवहार देवाच्या हाती सुपूर्द करून जप-तपात वेळ घातल्यास तुम्हाला देव ही काय चीज आहे, याची कल्पना येईल. नाहीतर देवाचे नाव घेऊन चालत्या ट्रेनमधून उडी घ्या; मग तुम्हाला कळेल देवाचा महिमा! धर्मग्रंथांची होळी करावी, धर्मस्थळांवर बंदी घालावी, देवळं पाडून टाकावीत. कारण ती आता भिकार्यांची पिढी वाढविणारी ठिकाणं झाली आहेत. भजन, कीर्तन, सहस्रनाम म्हटल्यास किंवा देऊळ, चर्च, मशीद यांना भेट दिल्यास तुम्ही अध्यात्मवादी होणार की नाही, याची खात्री नाही; परंतु तुम्ही भ्रमिष्ट होणार, हे मात्र नक्की. खरे पाहता देव नाही, आत्माही नाही. या विश्वाची उत्पत्ती शून्यातून, अंधारातून झालेली आहे. बाकीच्या सर्व गोष्टी कल्पनाविष्कार आहेत.
अशा प्रकारचे कुठल्याही रॅशनॅलिस्ट वा सेक्युलरिस्टला लाजवेल, असे विचार करणारा माणूस गुरुगिरीचा फसवण्याचा धंदा कसा काय करू लागला, याचे राहून-राहून आश्चर्य वाटते. कदाचित रॅशनॅलिस्टचा हा एक मुखवटा असून आताच्या आधुनिक पिढीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेली ट्रिक असावी, असे म्हणता येईल. याकामी ‘साक्षात्कारी’ अनुभव व मागील तीन जन्माच्या आठवणी उफाळून आल्या व जग्गींनी ईशलिंगाची कास धरून आपले साम्राज्य उभे केले.
‘साक्षात्कारी’ अनुभव
स्वतःला झालेल्या साक्षात्काराबद्दल बोलताना 1982च्या सुमारास म्हैसूर येथील चामुंडीच्या डोंगरावर सद्गुरू बसलेले असताना त्यांना साक्षात्कार झाला होता म्हणे! त्यांच्या अवतीभोवतीचे जग दिसेनासे झाले आणि बघता-बघता संपूर्ण निसर्ग त्यांच्या शरीराचा भाग झाला. शरीर नष्ट झाले व शरीराभोवतीचे विश्व नष्ट झाले. सर्व काही एकमेकांत समावून गेले. अशा प्रकारे 4-5 तास या अनुभूतीचा अनुभव घेत असताना त्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी अंगावरील कपडे ओलेचिंब झाले. एका प्रकारे हा त्यांना झालेला ज्ञानोदय (शपश्रळसहींशपाशपीं) होता. या क्षणापर्यंत त्यांचे अस्तित्व दुभंगलेले होते. आता अद्वैतमय झाले. अश्रूंच्या धारा वाहू लागल्यामुळे सर्व समस्या सुटल्या. मग ते सात तासांनंतर घरी परतले. घरातल्यांना हा तरुण दारू-बिरू पिऊन आलाय की काय, असे वाटले. घरातल्यांना काळजी वाटत होती. परंतु प्रत्यक्ष गंगाच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूरूपाने वाहत होती, हे त्यांच्या घरातल्यांना कसे काय कळेल?
पुढील तेरा दिवस हाच अनुभव पुन्हा-पुन्हा येत गेला व त्यांनी हे तेरा दिवस अन्न व पाण्यावाचून काढले. या समाधीवस्थेत असताना लोक जमू लागले. पाया पडू लागले. कौटुंबिक समस्यांना उत्तरं देण्याचा आग्रह धरू लागले. गळ्यात हार घालण्यास पुढे-पुढे करू लागले. परंतु या सर्व गोष्टींचा त्यांना फार तिटकारा होता म्हणे!
पूर्वजन्मीच्या स्मृतीला उजाळा
या सगळ्या प्रकारानंतर त्यांचा आवाज, शारीरिक ठेवण, डोळे यांच्यात फार मोठा बदल दिसू लागला. पोल्ट्री फार्म व बांधकाम व्यवसायातील नोकरी त्यांनी सोडून दिली. काय करावे, कसे जगावे, या प्रश्नांच्या भोवती पुढील एक वर्ष गेले आणि काही कळण्याच्या आतच पूर्वजन्मीच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. 370 वर्षांपासूनच्या त्या आठवणी होत्या. यापूर्वीच्या तीन जन्मातील पहिल्या जन्मात त्यांचे नाव ‘बिल्व’ होते व बालपणातच विषारी साप चावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. नंतरच्या जन्मात ते ‘शिव योगी’ होते म्हणे! व वासुदेवच्या मागच्या जन्मात ते ‘श्री ब्रह्मा’ होते. सात चक्र मागे सोडून ते 42व्या वर्षी मरण पावले. आताचा हा जग्गी वासुदेव म्हणून चौथा जन्म!
त्यांचे मागील तीन जन्म शिवलिंगाशी केंद्रित होते, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे एकापवित्र शिवलिंगाची स्थापना करण्याचा त्यांनी निश्चय केला. पुढे हेच शिवलिंग ध्यानलिंग म्हणून ओळखले जाऊ लागले. जग्गींच्या मते, या लिंगाची पूजा न करता फक्त ध्यानासाठी अंतःचक्षूसमोर आणायला हवे. कारण मानवी शरीर ध्यानलिंगासम असून शरीरातील पायापासून डोक्यापर्यंत सात ऊर्जाचक्रं आहेत व त्यांना सतत जागृत ठेवण्याची गरज आहे. सृष्टी, नियमन, शांती, सौख्य व ऊर्जा या सर्व गोष्टी शरीरातच आहेत व या गोष्टी शिवयोगी गुरूकडून देणगीच्या स्वरूपात आल्या आहेत.
आदियोगी संकुल
यानंतर नुसते श्री (पाद) जग्गी वासुदेव असलेले खर्या अर्थाने ‘सद्गुरू’ जग्गी वासुदेव झाले. स्वतःला साक्षात्कारी अनुभव व त्यातून ज्ञानोदय झाल्यामुळे स्वतःच आपल्या नावापुढे सद्गुरू हे नाव लावून मिरवू लागले. सद्गुरूंचा पुनर्जन्म झाला. त्यानंतर ते कोईमत्तूर येथे आले. तेथे 17 वर्षे राहिले. तेथील लोकांमध्ये मिळून-मिसळून स्वतःबद्दल सद्भावना निर्माण करू लागले. मागच्या जन्मातील श्री ब्रह्माचा मृत्यू कोईमतूरपासून 30 किमी दूर असलेल्या वेल्लिनगिरी येथे झाला होता, याची आठवण झाली. तेथील सातव्या डोंगरावर गुरूच्या आज्ञेप्रमाणे ध्यानलिंगाची स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सद्गुरूंच्या मागच्या जन्मीचे आप्तेष्ट व मित्र याचीच वाट बघत होते. दहा दिवसांत आठ लाख रुपये जमा झाले. त्या पैशातून त्यांनी 150 एकर जागा विकत घेतली. (त्यातील काही जमीन एका आदिवासीला फसवून घेतल्यामुळे त्या महिलांनी त्यांच्यावर खटला भरलेला असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.) निलगिरीच्या निबिड जंगलातील ही जागा त्यांनी आश्रमासाठी निवडली.

खरे पाहता, तेथील लोकांना सद्गुरू देऊळ बांधणार आहेत यावरच विश्वास बसत नव्हता. तुमच्यामुळे आम्ही देवळात जाणे थांबवले व आता तुम्ही देऊळ बांधणार! असे तक्रारीच्या सुरात विचारू लागले. परंतु जनसामाऩ्यांची स्मृती क्षणिक असते. त्यामुळे अशा प्रकारच्या फसविणार्यांची चलती असते, याची खात्री सद्गुरूंना असल्यामुळे जनसामाऩ्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून मंदिर निर्मितीच्या कार्यात स्वतःला गुंतून घेतले.
सद्गुरूच्या मदतीला व ध्यानलिंगाच्या प्रतिष्ठापनेला त्याची पत्नी विजयाकुमारी ऊर्फ विज्जी (मागच्या जन्मातील त्यांची बहीण!) व भारती ही शिष्या (तीसुद्धा मागच्या जन्मातील विभूती ही मैत्रीणच होती!) होत्या. ध्यानलिंगाला पवित्र करण्यासाठी सात ऊर्जाचक्रांची निर्मिती त्यांना करायची होती. कमीत कमी लोकांचा यात सहभाग असावा, ही इच्छा मात्र त्यामुळे पूर्ण होऊ शकली नाही. 95 टक्के काम संपत असताना त्यांच्या 31 वर्षांच्या पत्नीचा अचानकपणे मृत्यू झाला. सद्गुरूने तिने महासमाधी घेतली, असे जाहीर केले. सद्गुरूनीच तिचा खून केला म्हणून त्यांच्यावर खटला भरला गेला व त्या खटल्यात पुराव्याअभावी ते सहीसलामत सुटले. पत्नीच्या मृत्यूनंतर सद्गुरूला पती व पत्नी या दोन्ही भूमिका वठवाव्या लागल्या. पुढील तीन वर्षे त्याचा ताण पडत होता. त्यामुळे ध्यानलिंगाचे काम काही दिवस रेंगाळले. शेवटी काम पूर्ण झाले.
ध्यानलिंग
दीर्घ वर्तुळाकाराच्या या ध्यानमंदिराच्या घुमटाचा व्यास 76 फूट असून त्याची उंची 35 फूट आहे. त्यात काळ्या संगमरवरी दगडात कोरलेले 13 फूट उंचीचे लिंग आहे. या विस्तीर्ण संकुलाच्या प्रवेशद्वारावर महादेवाच्या नंदीबैलाची महाकाय आकारातील मूर्ती आहे. सद्गुरूंच्या मते हा नंदी शाश्वत प्रतीक्षेत आहे. कारण प्रतीक्षा करत राहणे हा हिंदू संस्कृतीचा स्थायीभाव आहे. ध्यानासाठी बसलेले असतानासुद्धा अशा प्रकारच्या प्रतीक्षेची अनुभूती येत असते. हे केवळ औपचारिक नसून त्यामागे सत्य दडलेले आहे.
नंदीच्या मूर्तीच्या बाह्य आवरणासाठी 6 ते 9 इंचाच्या वेगवेगळ्या धातूंच्या तुकड्यांचा वापर केला असून त्याच्या आतील पोकळीत विभूती, वाळू व विशिष्ट प्रकारची माती भरलेली आहे. मूर्तीचे एकूण वजन 20 टन आहे व हा नंदी ऊर्जाकिरण सोडत असतो म्हणे!
आदियोगी संकुलाच्या प्रवेशद्वारात धर्मस्तंभ आहे. त्यावर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, ज्यू, पारशी व शिंटो इत्यादी धर्मांची चिन्हं कोरलेली आहेत. गर्भगृहातील शिवलिंग 35 फूट खोल असलेल्या तळ्यावर तरंगत ठेवला आहे म्हणे! त्याचे वजन स्थिर ठेवण्यासाठी -35 अंश तापमानात गोठलेल्या पार्याचा वापर केला आहे. ध्यानलिंगाच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी भक्त या तीर्थकुंडात स्नान करतात. त्यामुळे ऊर्जास्रोतात वाढ होते म्हणे! या तीर्थकुंडाच्या आतील भागात महाकुंभमेळ्याची दृश्ये रंगवलेली आहेत. ध्यानलिंगाच्या पूजेच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये वाजवली जातात. या वाद्यामुळे भक्तांचे शारीरिक व मानसिक आजार दूर होतात, असा समज आहे. मंदिराला भेट देणार्यांच्या रोजच्या ध्यानधारणेत ‘ओम’ या मंत्राला असाधारण महत्त्व आहे. ‘ओम’ मध्येच सर्व प्रकारचे अतींद्रिय गुणधर्म आहेत, असा दावा केला जातो. ओम मंत्रामुळे व ध्यानामुळे मन:शांती मिळते व कुठल्याही आजारातून मुक्त होणे शक्य होते, यावर भक्तांचा विश्वास आहे. याच संकुलात सूर्यकुंड व चंद्रकुंड अशी दोन तळी आहेत. स्पंदन हा ध्यानासाठीचा हॉल आहे. भक्तांना राहण्यासाठी व्यवस्था आहे व पंचतारांकित रिसॉर्टमध्ये मिळणार्या सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा (सढळ हाताने पैसा सोडण्याची तयारी असल्यास) यात मिळतात.
खरे पाहता, ध्यानलिंगाच्या निर्मितीनंतर वयाच्या 42 व्या वर्षी सद्गुरू देहत्याग करणार होते. परंतु काही विशिष्ट योगांच्या उपचारातून त्यांनी स्वतःच्या नाडींची दुरुस्ती केली व गुडघ्याच्या हाडातील दोष काढून टाकला व दम्याच्या आजारातून ते मु्क्त झाले. याकाळच्या आजारपणात परलोकातील नागराजाने त्यांच्या बेंबीला चावल्यामुळे त्यांच्या मृतवत शरीरात जीव भरला गेला होता म्हणे! त्यांच्या प्रिय शिष्यगणांच्या आध्यात्मिक निष्ठाही सद्गुरूंच्या कामी आल्या होत्या. या शिष्यगणांनी त्यांच्या उजव्या पायात तांब्याचे कडे घातले व धाग्यांनी आवळले. हाच धागा वायरलेस अँटेनासारखा काम करू लागला व भक्तगणांचे ऊर्जास्रोत पकडून सद्गुरूकडे पाठवू लागला व सद्गुरू आजारातून मुक्त झाले.
खरे पाहता, ज्ञानोदयानंतर त्यांचा जीव केव्हाही शरीरात प्रवेश करू शकत होता, बाहेर निघून जात होता व पुन्हा येत होता. या अवस्थेत असताना सद्गुरू सिद्ध समाधी योगाचे (SSY चे वा Science of Silence Yoga – SSY चे) थक्क करणारे आठ व तेरा दिवसांचे प्रयोग करू लागले. मुळात हा एसएसवाय त्यांचे गुरू श्रीऋषी प्रभाकर यांची विद्या होती. परंतु सद्गुरू सिद्ध समाधी योगऐवजी सहजस्थिती योग (SSY) असे त्याचे पुनर्नामकरण करून प्रचार करू लागले व तमिळनाडू व अमेरिकेत त्यांच्या या ‘एसएसवाय’ला भरपूर प्रसिद्धी मिळाली. एसएसवाय हा पूर्णपणे राजकारणविरहित, निधर्मी व फक्त सामाजिक हिताचे उद्दिष्ट असलेला प्रयोग आहे, असा त्यांचा दावा आहे. ईश फौंडेशनचे स्वयंसेवक कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता, याचे प्रयोग करून दाखवतात. सद्गुरूंना चामुंडीच्या डोंगरावर आलेला अनुभव भक्तांमध्ये येण्यासाठी आंतरिक अभियांत्रिकी (inner engineering) हा एक अभिनव उपक्रम ईश फौंडेशनतर्फे राबवला जातो.
मिस्टिक म्यूजिंग्स
सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘मिस्टिक म्युजिंग्स’ (Mystic Musings) या आत्मकथावजा प्रचारकी पुस्तकात तद्दन खोट्या, दिशाभूल करणार्या व कल्पनारम्य गोष्टी आहेत असे टीकाकार भक्तांचे म्हणणे आहे. 11 व्या वर्षी योग शिकणे व इतरांना शिकवणे, चामुंडीच्या डोंगरावरील साक्षात्कारी अनुभव इत्यादी गोष्टींचा छडा लावल्यास त्यात काही तथ्य नाही, हे लक्षात येईल. 1984-86 च्या सुमारास श्रीऋषी प्रभाकर या अजून एका भोंदूबाबाने सद्गुरूंना योगशास्त्राचे प्राथमिक धडे शिकविले. परंतु त्यांच्याकडून मी शिकलो एवढे कबूल करण्याइतपत प्रामाणिकपणा यांच्यात नाही. ध्यानलिंगाच्या मंदिराची रचना स्वतःची आहे व त्यांच्या ब्रह्मचारी शिष्यांनी त्यांच्या रचनेनुसार ती बांधली, हा त्यांचा दावाही खोटा आहे. फ्रेंच आरोव्हिल्ले अर्थ इन्स्टिट्यूटचे सत्प्रेम मैनी व कार्तिकेयन हे त्या मंदिराचे आर्किटेक्ट्स होते, हे उघड झाले आहे व हे दोघेही पाँडिचेरी येथील आश्रमातील अरबिंदो यांचे शिष्य होते.

सद्गुरूंचे कार्यक्रम, उपक्रम, सत्संग, प्रवचन वा कुठलेही प्रयोग फक्त श्रीमंत वर्गासाठी आहेत की काय, असे वाटण्याइतपत त्यांची प्रवेश फी असते. कदाचित या सद्गुरूंच्या पारमार्थिक शिकवणीची त्यांनाच जास्त गरज असेल. सद्गुरूंच्या मते त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी झाल्याशिवाय मन:शांती मिळणार नाही. त्यामुळे एकदा या आश्रमात आलेले भक्त आयुष्यभर टिकून असतात व पैशाचा ओघ सतत वाहत असतो. या प्रकारच्या शिष्यगणांचा मुक्काम आश्रमात असतो. खाणे, पिणे, मौजमजा करणे या गोष्टीच तेथे जास्त प्रमाणात घडत असतात व ध्यान, योग यांना गौण स्थान दिले जाते. सद्गुरू ज्याप्रकारे तरुण वयात वागत होते, त्याचीच उजळणी येथे होत असावी. गंमत म्हणजे या ‘गुरू’गिरीच्या धंद्यातही स्पर्धा आल्यामुळे सद्गुरू अस्वस्थ आहेत. गुरूंची संख्या वाढत आहे व श्रीमंत भक्तांची संख्या क्षीण होत आहे. त्यामुळे इतरांकडे जे नाही, ते माझ्याकडे आहे, हे दाखवण्याची चढाओढ असते. सद्गुरूंच्या मते सद्गुरू, ईश फौंडेशन व आदियोगी मंदिर पाच हजार वर्षांनंतर अगदी योगायोगाने जनसामाऩ्यांना मिळत आहे व यातूनच जगन्मुक्तीचा मार्ग जात आहे. त्यामुळे फौंडेशनचे स्वयंसेवक, भक्त, शिष्य व दानी स्वपासून मुक्त होण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणे हितकारक ठरेल, हा संदेश सद्गुरू देत आहेत.
ईश फौंडेशन
गूगलवर ईश फौंडेशनविषयी खालीलप्रमाणे माहिती आहेः
1992 मध्ये सद्गुरूने या फौंडेशनची स्थापना केली. ही एक स्वयंसेवी, लाभनिरपेक्ष संघटना असून या संघटनेचे जगभरात सुमारे 50 लाख सदस्य आहेत. भारत, लेबनान, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया व सिंगापूर येथे त्यांच्या शाखा आहेत.
योग, सामाजिक उन्नती व पर्यावरणरक्षण यासाठी ही संघटना वेगवेगळे उपक्रम राबवते. तमिळनाडू व कर्नाटक येथे सत्संगाच्या माध्यमातून योगशिक्षणाचा प्रचार करते. या फौंडेशनने गेल्या 35 वर्षांत वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. यात प्रामुख्याने 2002 सालापासून तमिळनाडूमध्ये पर्यावरण रक्षणाचे Project Greenland राबवला जात आहे. 2010 साली या उपक्रमाला इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार मिळाला होता. या संघटनेच्या ग्रामोन्नती (Action for Rural Rejuvenation – ARR) या उपक्रमातून खेड्यातील गरिबांच्या आरोग्याचे व जीवनाच्या गुणवत्तेत वाढ करणारे कार्यक्रम राबवले गेले. ‘ग्रामोत्सव’ या वार्षिक उपक्रमातून सद्गुरू व त्याच्या फौंडेशनने 7680 खेळाडूंचे 640 गट करून व्हॉलिबॉल व थ्रोबॉल यांच्या स्पर्धांचे आयोजन केले. अशा प्रकारे खेळातून खेळाडू आंतरिक आत्म्यापर्यंत पोचू शकतात, असे सद्गुरू याचे समर्थन करतात. ईश विद्या या उपक्रमातून खेडेगावात शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आता अलिकडे ‘रॅली फॉर रिव्हर्स’ हा उपक्रम राबवला जात असून भारतातील नद्यांच्या काठापासून 1-2 किमी अंतरावर फळांची झाडे लावण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यासाठी भारतभर प्रचार करत असून हा प्रकल्प किती जीवनदायी आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
वरील माहिती वाचत असताना ही संघटना खरोखरच अशा प्रकारचे कार्य करत असल्यास सद्गुरूंच्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करून संघटनेला मदत करावी, असे वाटणे स्वाभाविक ठरेल. परंतु ही एक जाहिरातबाजी आहे, असे अनेकांचे मत आहे. प्रचारकी थाटातील हे उपक्रम फक्त निधी गोळा करण्यासाठी आहेत, असेच त्यांच्या कार्यपद्धतीवरून वाटत आले आहे. सद्गुरूंची पैशाची हाव कशाचीही विक्री करण्याच्या मानसिकतेत आहे. हातात बांधण्यासाठीच्या साध्या तांबड्या दोर्याची किंमतसुद्धा दोन-अडीचशे रुपयांपेक्षा कमी नसते.
गंमत म्हणजे ते स्वतः व त्यांचे फौंडेशन पूर्णपणे निधर्मी आहेत, असे दावा करत असतात. सामान्यांना तत्त्वज्ञान व परमार्थ यातील फरक कळत नाही म्हणून टिंगल करत असतात. परंतु स्वतः व त्यांचे शिष्यगण बौद्ध, शैव व शक्ती यांच्या भक्तीत आकंठ बुडालेले असतात. कारण कुठल्याही पैसेवाल्याला परत पाठवायचे नाही, हा अलिखित नियम असल्यामुळे ज्याला जे आवडेल, तेच देण्याच्या प्रयत्नात फौंडेशन कार्यरत आहे. त्यामुळे महाशिवरात्री, बुद्धपौर्णिमा, कृष्णाष्टमी, ख्रिसमससारखे सण एखाद्या पर्वणीसारखे वाटतात व यात गुरुपूजेचा थाट रचला जातो. नारायण, वशिष्ठ, शंकराचार्य, पराशर, इत्यादींचे गुणगान होत असते. ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’चे अखंड पठण होत असते. हे सर्व घडत असले तरी निधर्मीपणाचे सोंग वठवले जात असते.
एकेकाळी ब्राह्मण, पुनर्जन्म, मन, आत्मा, कर्म याबद्दल प्रश्न विचारणार्यांची चेष्टा करणारे हे सद्गुरू आज मात्र जीवन बदलण्याचा दावा करणार्या शांभवी, महामुद्रा, भावस्पंदन, साम्यम या ईश फौंडेशनच्या उपक्रमांतून याच गोष्टींचे उदात्तीकरण करत आहेत. त्यांचे आंतरिक अभियांत्रिकीचे प्रयोग म्हणजे फक्त शब्दांचे बुडबुडे आहेत, असे अनेकांचे मत आहे.
ईश फौंडेशनमधील शारीरिक परिश्रमांच्या कामासाठी मात्र जनसामान्यातील स्वयंसेवकांची आठवण येते. यांचे अशा प्रकारचे काम केल्यास पुढच्या जन्मी मोक्ष मिळेल, याची मात्र ते खात्री देतात. या श्रीमंत शिष्यांच्या श्रम न करण्याच्या वृत्तीचे समर्थन करताना त्यांना गौतम बुद्धाची आठवण येते व गौतम बुद्धाने कधीही श्रम केले नाहीत, असे सांगण्यास ते विसरत नाहीत. आपण मात्र विनाकारण शारीरिक श्रमात गुंतून पडतो. त्यांचे श्रीमंत शिष्य हे गरिबांच्या श्रमातूनच ऐषारामी जीवन जगत आहेत, याचा कदाचित त्यांना विसर पडलेला असावा.
ईश हे एक कल्ट
सत्संगाच्या प्रवचनात आत्मोन्नती, शून्यतत्त्व, तेजस, प्रज्ञा, शिवा, आंतरिक अभियांत्रिकी इत्यादी शब्दांची व त्या शब्दांना वेगळाच अर्थ देत त्यांची ठिकठिकाणी पेरणी करत प्रेक्षक भक्तांची मती गुंग केली जाते. ध्यानलिंगाचे तरंग, कृष्ण ऊर्जा (black energy), क्वांटम ऊर्जा असे काहीतरी असंबद्ध बडबड करत जमलेल्या गर्दीची दिशाभूल केली जाते. परंतु मती गुंग झालेल्या भक्तांच्या लक्षातच ही गोष्ट येत नाही. काहींच्या मते, ईश हे एक कल्ट असून सद्गुरू जग्गी हा एक अघोरी मांत्रिक आहे. कुठलाही गुरू या जग्गीप्रमाणे स्वतःची आरती कधीच ओवाळून घेत नाही. हा सद्गुरू मात्र ध्यानलिंगाच्या समोर बसून एका नवीन प्रकारच्या परमार्थाची स्थापना करत आहे.
माध्यमांसमोर नेहमी चमकणार्या या सद्गुरूंची मतं मात्र भरपूर मजेशीर असतात. पूर्वीच्या काळच्या राजा-महाराजांच्या दरबारी असलेल्या राजगुरूप्रमाणे आताच्या राजकीय नेत्यांना सल्ला देण्यासाठी राजगुरू असल्यास बिघडले कोठे, या प्रश्नाचा रोख काय आहे, हे न कळण्याइतपत जनता मूर्ख नाही. माकडचेष्टा करत माध्यमांत झळकणार्या राधेमाँबद्दल बोलताना, ‘राधेमाँ माझ्या आश्रमात कुठलेही कपडे घालून हिंडू शकते. परंतु त्या बिचारीला माँच्या वेशातच बहुतेक वेळा पाहिलेले असल्यामुळे आता तिला स्कर्टमध्ये पाहणे कसेतरीच वाटू लागते,’ असे म्हणाले. ‘रॅली फॉर रिव्हर्स’ हा उपक्रम वनीकरण नसून नदीच्या काठच्या शेतात सरकारी खर्चाने झाडे लावण्यात येणार आहेत. परंतु तज्ज्ञांच्या मते, सद्गुरू व ईश फौंडेशन प्रादेशिक हवामानाचा तेथील मातीच्या गुणधर्मांचा अभ्यास न करता सरसकट काही विशिष्ट प्रकारचीच झाडे लावत गेल्यास शेतकर्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात यात सद्गुरूंचा काहीतरी डाव आहे, असेच मत व्यक्त केले जात आहे. नैतिकतेचा व भारतीय संस्कृतीचा एकमेकांशी संबंध नाही, हे त्यांचे अलिकडील वक्तव्य वादाच्या भोवर्यात सापडलेले आहे. जैन परंपरेतील ‘संथारा’ या मरणोत्सवाचे सद्गुरू स्वागतच करतात. कारम यांच्या मते ही एकाप्रकारे समाधी आहे. या समाधी प्रकाराला ते Art of Dying असे म्हणतात.
बाबा रामदेव वा श्रीश्री रविशंकर यांच्याप्रमाणे देशभर दुकानं मांडून जाहिरातबाजीद्वारे स्वतःची उत्पादनं लोकांच्या माथी सद्गुरू मारत नाही, असे समाधान वाटत असले तरी तेही या स्पर्धेत केव्हा उतरतील, याचा नेम नाही. त्यामुळे सूज्ञांनी हा धोक्याचा इशारा समजून गुरुगिरीपासून चार हात दूर राहिल्यास नक्कीच भले होईल, असे शेवटी जाता-जाता सांगावेसे वाटते.