सप्टेंबर 2013 मध्ये स्वत:ला संतश्री म्हणवून घेणार्या 76 वर्षांच्या आसारामबापूंना 16 वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. बलात्काराच्या आरोपाबरोबर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, बेकायदेशीर बंदीवासात ठेवणे, जादूटोणा, जमीन बळकावणे, दहशत माजविणे आणि खून असे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. पण इतके गंभीर आरोप असूनही हा खटला जलदगती न्यायालयात चालविला गेला नाही आणि आजही या खटल्याबाबत काहीही प्रगती झालेली नाही. खरेतर गुरमीत राम रहीमच्या निकालानंतर आसारामच्या खटल्याचा निकाल लागेल असे वाटत होते. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला तसे निर्देशही दिले होते. आसारामबापूवर दोन प्रकरणात बलात्कार आणि बेकायदेशीर बंदीवासात ठेवणे असे आरोप आहेत. त्यापैकी एक खटला आहे, राजस्थानात तर दुसरा खटला आहे गुजरातेत.
सध्या तुरुंगात असलेल्या आसारामबापूला लाखो भक्तांसह वरिष्ठ सत्ताधारी, विरोधी पक्षातील राजकारणी, नोकरशहा, पोलीस अधिकारी, नामांकित व्यावसायिक, तथाकथित संत आणि स्वत:ला हिंदू धर्मरक्षक म्हणवून घेणार्या सनातनी संघटना यांचा भक्कम पाठिंबा व संरक्षण आहे. आजही त्यांची गुन्हेगारी कृत्ये उघडकीस येत असताना ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत.
आसारामबापूंच्या वेबसाईटवरून अगर त्यांच्या प्रकाशनावरून घेतलेल्या माहितीप्रमाणे आसारामबापू यांचा जन्म बर्यापैकी सांपत्तिक स्थिती असलेल्या सिरूमलांनी या व्यावसायिक कुटुंबात 17 एप्रिल 1941 मध्ये फाळणीपूर्व भारतातील सिंध प्रांतात झाला. आई-वडिलांनी त्यांचे नाव आसूमल असे ठेवले. त्यांचे कुटुंबीय फाळणीनंतर अहमदाबादजवळील मणीनगर येथे आले. आसूमलला लहानपणापासून शाळेच्या अभ्यासापेक्षा ध्यान-भजनाची गोडी जास्त होती. त्यात त्याच्या आईचा वाटा मोठा होता. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर आसूमलची ही आध्यात्मिक गोडी वाढतच गेली व त्याने कुटुंबाचा त्याग केला व प्रवास करत भगवान कृष्णाच्या वृंदावनला पोचला व तेथे त्याची गाठ श्री लीला शहाजी महाराज यांच्याशी पडली. आसूमलने त्यांना गुरू मानले व त्यांची अतिशय खडतर भक्ती करीत त्यांची दीक्षा प्राप्त करून घेतली. गुरूंनी त्याला घरी परत जाण्याचा व तेथे आध्यात्मिक साधना चालू ठेवण्याचा आदेश दिला. पण ते घरी न परतता नर्मदेच्या तीरावर मोती करोल येथे आध्यात्मिक साधना करत राहिले. तेथील स्थानिक संत श्री लालजी महाराज आसूमलच्या साधनेने प्रभावित झाले व आपल्या आश्रमात त्याला प्रवेश दिला. आसूमलच्या आईला व पत्नीला हे समजल्यावर दोघीही त्याला नेण्यासाठी आल्या; पण आसूमलने अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत परतण्यास नकार दिला व तेथे त्याने खडतर अनुष्ठान यशस्वीपणे पूर्ण केले. आसूमलची कीर्ती वाढू लागली होती. त्याला अहमदाबादला जाताना निरोप देण्यासाठी लालजी महाराजसकट संपूर्ण गाव रेल्वे स्टेशनवर लोटले. पण पुढील स्टेशनवर आसूमलने गाडीतून उडी मारली, तो मुंबईच्या दिशेने जाणार्या गाडीत बसला, तेथे त्याची भेट पुन्हा त्याचे गुरू लीला शहाजी महाराज यांच्याशी झाली. ‘सत्या’च्या शोधात असलेल्या आपल्या शिष्यावर गुरू बेहद्द खूष झाले व त्यांनी आसूमलचे परिवर्तन आसारामबापूमध्ये केले. त्यानंतर आसारामबापू तब्बल अडीच दिवस समाधीत गेले. नंतर स्वानुभूती प्राप्त झालेले आसारामबापू सात वर्षे एकांतवासात गेले. दिसा, नरेश्वर धाम, हिमालय, माउंट अबू अशा अनेक आणि विविध ठिकाणी त्यांनी आपले एकांतवासातील दिवस घालवले. या एकांतवासी जीवनात ते भेटायला येणार्यांना धार्मिक प्रवचने देत. मग हरिद्वारमध्ये त्यांना त्यांचे गुरू लीला शहाजी महाराज भेटले. गुरूने आसारामला उपदेश केला, मानवतेच्या सेवेसाठी आता तुला गृहस्थीत परतले पाहिजे. सामान्यांना गृहस्थीचे उदाहरण घालून देण्याच्या गुरूच्या आज्ञेने आसाराम सात वर्षांच्या एकांतवासी जीवनानंतर अहमदाबादला परतले व साबरमतीच्या तीरावर मोटेरा या निवांत ठिकाणी काही भक्तांनी उभारलेल्या ‘मोक्ष कुटीर’ या छोट्याशा खोलीपासून आसारामबापूंच्या कॉर्पोरेट साम्राज्याच्या उभारणीला सुरुवात झाली.

हळूहळू हजारो भक्त तेथे जमू लागले व अल्प काळातच अहमदाबाद येथील मोटेरा येथे मुख्यालय असलेल्या त्यांच्या या आध्यात्मिक केंद्राचा विस्तार संत श्री आसाराम आश्रम या कॉर्पोरेट साम्राज्यात झाला. आज हे साम्राज्य 12 देशांतील 400 आश्रमांतून पसरलेले आहे. या आश्रमातून सामाजिक आणि आध्यात्मिक काम नियमितपणे चालू असते, त्यात आठवड्याचे सत्संग, ‘ऋषिप्रसाद’ आणि ‘दिव्य प्रेरणा प्रकाश’ यासारख्या व इतर आध्यात्मिक प्रकाशनांचे वितरण, आश्रमाच्या वेबसाईटवरून जगभरातल्या लाखो साधकांना आसारामबापूची थेट प्रवचने ऐकायला मिळतात. अनेक टी. व्ही. वाहिन्या आसारामबापूची प्रवचने नियमितपणे प्रसारित करत असतात. या आश्रमाच्या पंखाखाली जवळजवळ 1300 श्री योगवेदांत समित्या, बाल संस्कार केंद्रे चालविली जातात. याद्वारे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओरिसा आणि इतर ठिकाणच्या आदिवासी भागात धान्य, कपडे, पांघरूण वगैरेंचे वाटप, साक्षरता, व्यसनमुक्ती, योग आणि अध्यात्माच्या सहाय्याने वाईट चाली-रीती आणि दुर्जनांचा नाश, व्हिडीओ सत्संग कार्यक्रम, गरिबांना फुकट अन्न आणि पैशाची मदत, लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाचे कार्यक्रम अशा प्रकारचे सामाजिक आणि सेवाभावी कार्यक्रम राबविले जातात.
पण ही सगळी माहिती झाली आसारामबापूंच्या अधिकृत वेबसाईट आणि प्रकाशनांच्या माध्यमातील. अगदी सत्य साईबाबापासून सर्वच बुवा-बाबा एखादी कॉर्पोरेट कंपनी आपल्या सामाजिक कामाची जशी प्रचंड जाहिरात करत असते, तशी जाहिरात करत असतातच. पण यांच्या एकूणच कारभाराकडे पहिल्यापासूनच संशयाची सुई फिरत होती. आसरामबापूला अटक झाल्यावर अगर अटक होण्याच्या कितीतरी आधीपासूनच त्याच्यावर आरोप होत होते. आश्रमासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनी आणि त्यावर बांधलेल्या इमारती या बेकायदेशीर असल्याचे आरोप, आंदोलने, कायदेशीर लढाया सातत्याने होत आहेत. या आश्रमांसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी जमिनी नाममात्र भावाने अगर मोफत दिल्या आहेत. मध्य प्रदेश अथवा गुजरात या राज्यात असे शहरच नसेल जेथे आसारामबापूचा आश्रम नाही. अशा जमिनी मिळाल्यावर मग आश्रम, शेजारच्या जमिनी आपल्या शर्तीवर हडपण्याच्या मागे लागे. जर कोणी नकार दिला तर दहशतीच्या, प्रशासनाच्या मार्फत धडा शिकविला जात असे.
महेंद्र चावला या हरियानातील पानिपत येथील आसारामबापूच्या मुलाच्या – नारायण साईच्या – माजी व्यक्तिगत सहाय्यकालाही जीवे मारण्याच्या धमक्यांशी सामना करावा लागला. त्याने साईकडे 2001 ते 2005 अशी नोकरी केली होती. टाइम्स ऑफ इंडियात म्हटलेल्या बातमीप्रमाणे नारायण साई ट्रस्ट स्थापन करण्यासाठी महेंद्र चावलाच्या खोट्या सह्या त्याच्या नकळत फसवणुकीने करण्यात आल्या. जेव्हा सरकारी जागेवरील गोशाला हटविण्याची नोटीस त्याला आली, तेव्हा त्याला हे सर्व कळले. तो नारायण साईशी भांडला. पण त्याला जीवे मारण्याची धमकी देत गप्प करण्यात आले. पण तीन वर्षांनंतर 2008 सालातील आश्रमातील मृत्यूनंतर त्याने नारायण साईविरोधात मुंबईतील विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आसारामबापूच्या अशाच आश्रमांपैकी सुरत येथील आश्रमाबाबत प्रत्यक्ष तेथे जाऊन ‘सेंटर फॉर सोशल स्टडीज’ने 2009 मध्ये अभ्यास केला. हा आश्रम 1985 साली सुरतपासून जवळ असलेल्या जहांगीरपुरा आणि वारियल खेड्याजवळ तापी नदीच्या तीरावर आहे. 1985च्या सुमारास आश्रम सुरू झाला, तेव्हा फक्त एकच खोली होती. आज मात्र तो 25 एकरच्या परिसरात पसरला आहे. प्रथम सरकारी जमिनीवर व नंतर आजूबाजूच्या शेतकर्यांच्या जमिनी सरळ अथवा दहशतीच्या, चुकीच्या मार्गाने बळकावल्या गेल्या, असे आरोप केले जात आहेत. आजही याबाबतच्या कायदेशीर लढाया चालू आहेत. तापी नदीवरचा हा परिसर पूर्णत: ओसाड होता; पण भक्तांच्या फुकट श्रमावर आज तो एक कॉर्पोरेट मॉल बनला आहे. नुकतीच आपण रामरहीमच्या कॉर्पोरेट आश्रमाची वर्णने ऐकलीत आणि चित्रणे पाहिली आहेत, त्याचीच ही प्रतिकृती. त्यात काय नाही, ताजी फळे, फळांचे ज्यूस – भाज्या- शांपू – साबण – उदबत्त्या- मलम – आयुर्वेदिक औषधे यापासून सीडी, व्हिडीओ, आसारामबापूच्या मौलिक आध्यात्मिक विचारांवरची, गृहकलहावरची पुस्तके यांची दुकाने, होमिओपथिक दवाखाना, प्रचंड प्रार्थना व प्रवचन सभागृह; ज्याची क्षमता लाखभर भक्त सामावून घेता येईल एवढी, बाजूला तंबू मारता येतील एवढे रिकामे मैदान, मुलांसाठी बागा, यज्ञ संस्कार केंद्र, वेगवेगळी देवळे, आसारामबापूची कुटी व बाजूला दोन मोठी झाडे वड बादशहा आणि पिपल बादशहा. या दोन झाडांना मारलेल्या प्रदक्षिणामुळे भक्तांच्या सार्या समस्या सुटून जातील, असे सांगितले जाते. पण ही झाडे दुसर्याच्या जमिनीवर असल्याचे सेंटर फॉर सोशल स्टडीच्या अभ्यासात नमूद केले आहे. या अभ्यासात पुढे असेही म्हटले आहे, या सगळ्यांच्या विक्रीतून प्रचंड उत्पन्न मिळते, त्या सर्व दुकानात काम करणारे मोफत काम करत असतात. या स्वयंसेवी कामामुळे त्यांना ‘मोक्ष’ किंवा ‘शिवतत्त्व’ अथवा ‘ब्रह्मतत्त्वाची’ प्राप्ती होते आणि त्याही पेक्षा बापूचे ‘आशीर्वाद’ प्राप्त होतात, अशी त्यांची श्रद्धा असते. शिवाय या संपूर्ण मिळकतीवर कोणताही सरकारी कर नाही. रचनाकारांनी हा आश्रम उभारताना ते कसे सहलीचे, मनोरंजनाचे ठिकाण बनेल, याचा पुरेपूर विचार केलेला आहे. याचबरोबर प्रसाद विक्री; उतरवलेल्या मंडपाची विक्री; याचबरोबर शाळा, कारखाने यांचे जाळे यातूनही मोठे उत्पन्न मिळविले जाते. बापूच्या प्रवचनासाठी मोठी बिदागी घेतली जाते.

आसारामबापूच्या आश्रमात वैद्य असलेल्या अमृत प्रजापती (ज्याचा पुढे खून झाला) या माजी भक्ताने जवळजवळ दोन दशके बापूच्या आश्रमात नि:स्वार्थीपणे काम केले; पण पुढे आसाराम बापू व विशेषत: त्याचा मुलगा नारायण साई यांच्या लैंगिक अत्याचाराच्या कृत्यांना वैतागून त्याने आश्रम सोडला. त्याने सांगितलेल्या माहितीप्रमाणे, यांची जवळजवळ 1200 दुकाने आहेत आणि त्यातून चूर्ण, च्यवनप्राश, गुलकंद अशासारखी अनेक आयुर्वेदिक औषधे केवळ नफ्यासाठी विकली जातात आणि यासाठी कोणतीही गुंतवणूक करण्यात आलेली नाही. कोणत्याही पगाराशिवाय विविध आश्रमातून महिला भक्तांकडून ही औषधे फुकट बनवून घेतली जातात. औषधांची विक्री करणारेही फुकटच कामे करतात. ही कामे देवाची असल्याचे या भक्तांवर बिंबवले जाते. तसेच भक्तांना ही औषधे घेण्यासाठी उद्युक्त केले जाते. या तथाकथित आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीतून प्रचंड फायदा कमावला जातो. गोमूत्राच्या बाटलीची किंमत 350-500 पर्यंत असते आणि त्याची दैनिक विक्री 1500 लिटर इतकी होते म्हणजे दिवसाचे उत्पन्न 1,25,000. या मूत्राचे निर्जंतुकीकरण झाले आहे की, नाही वगैरेबद्दल तपास करण्यात कोणाला काहीच स्वारस्य, काळजी नाही.
आश्रमात दोन मुलांचा मृत्यू झाल्यावर गुजरात अन्न आणि औषध प्रशासनाने बापूची बायको लक्ष्मी हिच्यासह 22 इतर जणांवर परवान्याशिवाय औषधविक्रीचा आरोप ठेवताना अशी तक्रार दाखल केली होती की, बापूच्या गांधीनगर मधील मोटेरा आश्रमात नीता गायकवाड या आयुर्वेदिक डॉक्टरने निर्माण केलेल्या आणि पंचमहाल जिल्ह्यातील कानेलाव लेक आश्रमाने वितरीत केलेल्या ‘संतकृपा’ नेत्रबिंदू डोळ्यात घालण्याच्या औषधात उत्पादकाचे नाव, उत्पादनाची तारीख, परवाना क्रमांक यासारख्या कोणत्याही गोष्टींचे पालन केलेले नव्हते.
‘गुजरात समाचार’ सारख्या गुजरातेतील प्रतिष्ठित वर्तमानपत्राने 2008मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे, आसाराम सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करीत होता. तेथून तो लीला बाबा शहांचा भक्त बनला. लीला शहा बाबांच्या एका प्रमुख भक्ताच्या मते आसारामला बाबांनी त्याच्या वागणुकीमुळे आणि करणीमुळे कधीच आपला भक्त मानले नव्हते. पण त्याने आपल्या गोड वाणीची आणि अमोघ वक्तृत्वाची मोहिनी सामान्य जनतेवर टाकत देशभरात आपल्या 400 ट्रस्टचे जाळे पसरवले. या ट्रस्टची आजची संपत्ती 5000 कोटीच्या आसपास असून ऋषिप्रसाद आणि लोककल्याण सेतू या त्यांच्या मासिकाची आणि पाक्षिकाची सभासद संख्या 15 लाख असून या दोन्ही मासिकांतूनच आश्रमाला 7.50 कोटी वर्षाला मिळतात.
असे सर्व सुरळीत चालू असताना 3 जुलै 2008 साली 10 व 11 वर्षांच्या मुलांचे दोन मृतदेह त्याच्या मोटेरा आश्रमाशेजारच्या साबरमती नदीच्या किनार्याला मिळाले. ही दोन मुले त्याच्या मोटेरा आश्रमाच्या गुरुकुलमधून बेपत्ता झाली होती. माहीतगारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे,एका मुलाच्या शरीराचा काही भाग जळाला होता, तर दुसर्या मुलाचे अवयव कापण्यात आले होते. याचे पडसाद संपूर्ण गुजरात राज्यभर उमटले. या हत्यांविरोधात राज्यभर बंद पाळण्यात आला. पण पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर नर्सरीतील दोन विद्यार्थी आश्रमाच्या स्वच्छतागृहात मृतावस्थेत सापडले. एकाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, तर यासंदर्भात एका वरिष्ठ विद्यार्थ्याला अटक झाल्याचे सांगितले जाते. पण सर्वांत विचित्र गोष्ट म्हणजे त्या मुलांच्या पालकांनी कोणतीही तक्रार त्या विद्यार्थ्याविरोधात किंवा आसाराम बापूविरोधात केली नाही.
प्रकरण सीआयडीकडे गेले. त्यानंतर डी. के. त्रिवेदी कमिशन नेमण्यात आले. लैंगिक अत्याचारापासून नरबळीपर्यंत आरोप झाले. सीआयडीने आश्रमात कोणतेही गैरकृत्य होत नसल्याचा निर्वाळा दिला. पण त्रिवेदी कमिशनपुढे आसारामबापू आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्या काही सहकार्यांनी सांगितले, हे दोघे बाप-लेक, मृतदेहासमोर विचित्र कर्मकांडे करत होते आणि यासाठी त्यांनी काही वेगळीच शस्त्रे वापरली होती. त्रिवेदी कमिशनने आसारामबापू आणि नारायण साईला बर्याच वेळा साक्षीला बोलावले; पण ते आले नाहीत. असेही सांगितले जाते की, या बाप-लेकाने नरेंद्र मोदींना त्यांचे सरकार पाडायचीही धमकी दिली होती. पण अखेर त्यांना कमिशनपुढे 2012 मध्ये यावे लागले. तेथे त्यांनी आपला संबंध या गुन्ह्यांशी जोडणे हा आश्रम आणि हिंदू धर्मविरोधातील कट आहे, असा बचाव केला.
आसारामबापूचे अनेक भक्त आपल्या मुलांना आश्रमाशी संलग्न असलेल्या गुरुकुलात ठेवतात. एका अशाच जोडप्याच्या 16 वर्षांच्या मुलीला ऑगस्ट 2013 मध्ये ती आजारी असल्यामुळे उपचारासाठी आसारामबापूने आपल्या खोलीत बोलावले. पालकांनी तिला खोलीत सोडले व ते निघून गेले. त्यानंतर आसारामबापूने आपले कपडे काढले व तिच्यावर सक्ती केली व ती करत असताना, ‘मी देव आहे आणि तिने स्वत:ला अर्पण करावे, नाहीतर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकेन,’ अशी धमकी दिली असे बळी पडलेल्या त्या मुलीने सांगितल्याचे ‘एसआयटी’च्या अहवालात म्हटले आहे. त्यानंतर काही आठवड्यांनी त्या मुलीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी आसारामला जाब विचारला. त्याने त्यांना भेटण्यासही नकार दिला. मग पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. जोधपूर आश्रमात अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. बलात्काराला बळी पडलेल्या मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आणि साक्षीदारांच्या जबाबावरून ही अटक करण्यात आली. पोलिसांनी आसारामला कलम 376 (बलात्कार), लैंगिक अत्याचारापासून लहान मुलांचे संरक्षण (पोस्को) अशा कलमासह इतर अनेक कलमांखाली तक्रार नोंदवली व नंतर महिनाभरात त्याला अटक झाली. त्यावेळेपासून आसाराम जोधपूरला तुरुंगात आहे.

या खटल्याचे गांभीर्य तेव्हा वाढले, जेव्हा तिन्ही साक्षीदारांचे एका मागोमाग एक असे गोळ्या घालून खून करण्यात आले. यापैकी अमृत प्रजापती हा आयुर्वेदिक डॉक्टर आसारामच्या विविध आश्रमांत 15 वर्षे काम करीत होता. 2005 मध्ये त्याने आसारामला सोडले. त्यानंतर त्याला सतत धमक्या येत, एकदा त्याला पळवून नेण्यात आले व मारहाणही करण्यात आली; पण धाडसाने तो साक्षीदार बनला. पण 23 मे, 2014 ला राजकोट येथे त्याच्या दवाखान्याबाहेर त्याला गोळ्या घालण्यात आल्या. आसारामबापूचा स्वयंपाकी अखिल गुप्ता याने ‘एसआयटी’ला सांगितले, बाप आणि मुलाच्या गैर कृत्यांमुळे अस्वस्थ होत त्याने 2008 मध्ये आश्रम सोडला. 16 वर्षांच्या मुलीच्या बलात्काराच्या खटल्यात तो मुख्य साक्षीदार होता. कामावरून घरी जात असताना 12 जानेवारी 2015 ला मुझफ्फरनगर येथे त्याला गोळ्या घालून मारण्यात आले. तिसरा साक्षीदार कृपाल सिंग आसारामचा 2000पासून भक्त होता. तो बलात्काराच्या खटल्यातला महत्त्वाचा साक्षीदार होता. त्याला 10 जानेवारी, 2015 ला पुनवारा येथे गोळ्या घालण्यात आल्या. बलात्काराच्या खटल्यातला चौथा महत्त्वाचा साक्षीदार राहुल साचेन हा 22 फेब्रुवारी, 2015 पासून बेपत्ता आहे. त्यालाही आश्रमात चालणारे गैरव्यवहार मान्य नव्हते. त्याने साक्षीदारांच्या खुनाची सीबीआय मागणी केली होती. या सर्व प्रकरणात अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. आजही त्यांचे कुटुंबीय आसारामचे लोक आपल्याला मारतील, या भीतीने लपून राहत आहेत.
आसारामबापू आणि त्याच्या मुलावर सुरतमध्येही दोन बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहेच. या गुरूने माझ्यावर तीन वर्षे बलात्कार केल्याचे यातील एका स्त्रीचे म्हणणे आहे. गुजरात पोलिसांच्या खास चौकशी दलाने 100 साक्षीदारांच्या जबाबावरून आसारामबापू, त्याची बायको, मुलगी आणि चार सेविका यांच्यावर बलात्काराच्या आरोपाबरोबर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, बेकायदेशीर अडकवून ठेवणे आणि गुन्हेगारी कट अशा आरोपाखाली गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आसाराम बापूने आपल्या आश्रमात गुन्हेगारांना आश्रय दिल्याचे आरोप आहेत. याबाबतचा सविस्तर वृत्तांत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक 2010 च्या अंकात दिलेला आहे.
एखाद्या गुन्हेगारी कथेत असावे, असे हे वरील वर्णन आहे. एखाद्याची छी-थू होण्यास ही आर्थिक गैरव्यवहारांची, लैंगिक अत्याचारांची, भ्रष्ट आणि गुन्हेगारी कृत्यांची एवढी प्रकरणे पुरेशी आहेत. तरीही या सर्व गंभीर प्रकरणाचा आसारामबापूच्या भक्तांवर फारच कमी प्रभाव पडलेला आहे. स्वत: आसाराम बापूलाही याची काहीच फिकीर नाही. त्याचा त्याच्या राजकीय, आर्थिक पाठिंब्यावर पूर्णत: भरवसा आहे. आसारामचे ठीक आहे; पण त्याच्या भक्तांचे काय? त्याला अटक झाल्यापासून मोर्चे निघाले, धरणे धरली गेली. यामागची भक्तांची मानसिकता काय असावी?
याबाबत ‘सेंटर फॉर सोशल स्टडीज’ने काही भक्तांच्या मुलाखती घेतल्या. आसारामच्या लाखो भक्तांच्या तुलनेत मुलाखती देणार्यांची संख्या जरी कमी असली तरी त्यावरून आपल्याला काही निष्कर्ष नक्कीच काढता येतील. आसारामबापूचे बहुसंख्य भक्त ओबीसी किंवा तथाकथित खालच्या जातीतील आहेत. ते ग्रामीण किंवा अर्धशहरी भागातील पारंपरिक उद्योगधंदे-व्यवसाय करणारे शिक्षित अथवा अर्धशिक्षित आणि थोड्याफार फरकाने सारखाच दृष्टिकोन आणि मूल्ये मानणारे आहेत. या भक्तांपुढे आपले प्रवचन रचताना आसारामबापू अतिशय हुशारीने त्या भक्तांच्या गर्दीतील बहुसंख्यांच्या मनात असलेल्या पारंपरिक श्रद्धा, कर्मकांडे आणि रीतिरिवाज यांचा वापर करून घेतो. अनेक बाबा पारंपरिक सरंजामदारी, जातीय, धर्मांध मूल्ये, रामकथा, कृष्णकथा, भागवतकथा, वेद, उपनिषद, गीता वगैरेचा उपयोग करून घेतात, त्याप्रमाणे आसारामबापूचा भर पुराणकथांवर जास्त आहे. पण इथेच त्याच्यात आणि इतर आधुनिक भारतातील पारंपरिक बाबालोकांत फरक आहे. इतर बाबा काही प्रमाणात तरी कोणत्या ना कोणत्या विशिष्ट धार्मिक पंथांचे किंवा कोणती न कोणती धार्मिक अथवा आध्यात्मिक परंपरा मानणारे आहेत किंवा त्यांचे स्पेशलायझेशन आहे. पण आसारामच्या प्रवचनाची अशी कोणतीही रचना नाही, कोणताही असा विशिष्ट हिंदू धार्मिक ग्रंथ नाही की, त्याचा तो सढळ वापर करतो. त्याच्या प्रवचनात याचे किरकोळ उल्लेख येतात. त्याच्या ऑडिओ-व्हिडिओ कॅसेट वरची शीर्षकेही धार्मिक नाहीत. उदाहरणार्थ, मधुर जीवन कैसे बनाये, जीवन उन्नत कैसे बनाये वगैरे. उलट आपल्या प्रवचनात तो पारंपरिक कौटुंबिक समस्या, आयुर्वेदिक औषधे, कौटुंबिक संबंध, मुला-बाळाचे संगोपन, कुटुंबातील वरिष्ठ-कनिष्ठ संबंध, संयुक्त कुटुंबाचे गोडवे गात सुनेशी आणि मुलाशी कसे वागावे, याबाबत बोलतो. तसेच कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचे ढोल बडवितो आणि अखेर गुरुभक्तीचा महिमा, गुरुमंत्राचे निरुपण, अमानवी शक्तीचे महत्त्व यावर प्रवचन येऊन थांबते. आसारामबापूच्या संमोहित करणार्या वक्तृत्वाने भक्त मंत्रमुग्ध होऊन जातात. कोणत्याही तालसंगीताशिवाय अधूनमधून तो गात असलेल्या भजनाने तल्लीन होऊन जातात, अशा भजनात बापू सर्वांना सामील करून घेतो. मधूनच होणारा ‘हरी ओम’चा गजर अथवा ‘बापूका बच्चा नहीं रहेगा कच्चा’ सारख्या घोषणांनी भक्त उत्साहित होतात. त्याच्या विनोदी वाक्यांनी अथवा चाळ्यांनी हास्यकल्लोळात बुडून जातात.
आसारामबापूच्या भक्तांसाठी त्याच्या आश्रमात साजरी होणारी होळी अतिशय महत्त्वाची आहे. तीन दिवस लाखो लोक ही होळी साजरी करण्यासाठी देशातील विविध भागातून आश्रमात येतात. त्यांच्या राहण्याची, जेवण्याची उत्तम सोय माफक दरात आश्रमातर्फे केली जाते. त्यासाठी हजारो स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने राबत असतात. सारी सरकारी यंत्रणाही यासाठी मोठ्या तत्परतेने काम करीत असते. हे एक भक्तांचे स्नेहसंमेलनच असते. तेथे सत्संग वगैरे फारसे नसतातच. वातावरण दिवाळीसारखे किंवा एखाद्या पर्यटनस्थळावर सहलीला गेल्यासारखे असते. सर्व कार्यक्रम अशा पद्धतीने आयोजित केलेला असतो की वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री-पुरुष तेथे आराम उपभोगू शकतील. वेगवेगळे खाण्याचे पदार्थ, फळे, औषधे, सौंदर्य प्रसाधने, हार-तुरे, रुद्राक्ष अतिशय माफक किमतीत मिळत असतात. नेचरोपथी, होमिओपथिक, आयुर्वेदिक तपासणीचे दवाखाने, आयुर्वेदिक औषधांची दुकाने, फक्त चष्म्याचे पैसे घेणारी मोफत नेत्र तपासणी वगैरे.
एका मोठ्या खास तंबूत टीव्हीसह दोन मोठे पडदे लावलेले असतात, तंबूभर शिशुसंस्काराची पोस्टर लावलेली असतात, भक्तांना तेथे तासभर घालवण्यासाठी उद्युक्त केले जाते. तेथे त्यांना आपआपल्या भागात शिशुसंस्कार केंद्र कसे चालवावे, याच्या सूचना दिल्या जातात. यात शिशुसंस्काराबाबत आसारामबापूचा जो दृष्टिकोन आहे, त्या अनुषंगाने सूचना दिल्या जातात. स्मृती वाढविण्याच्या क्लृप्त्या, सरस्वतीची भक्ती, मंत्रांचे पाठांतर, विविध योगासने, औषधे यांतून मुलांचे कौशल्य कसे वाढवावे, याचे प्रशिक्षण दिले जाते.
याच होळीच्या समारंभात ‘मंत्रदीक्षे’चा कार्यक्रम असतो. यासाठी हजारो भक्त उत्सुक असतात. बापू भक्तांना प्रथम गुरू देत असलेल्या मंत्राची महानता सांगतो. नंतर स्वत: तोच बराच वेळ ध्यानस्थ होतो. नंतर तोच मंत्रांची नावे सुचवितो (ओम नमो शिवाय, हरी ओम, जय श्री कृष्ण वगैरे) व त्यातील एक स्वीकारण्यास सांगतो. बहुतेक भक्त ‘हरी ओम’ स्वीकारतात. कारण तो बापूचा आवडता मंत्र आहे. त्यानंतर प्रत्येक भक्त ओळीत उभा राहतो व बापूच्या जवळ जाऊन बापूच्या छायाचित्रावर सही घेतो. या सगळ्या प्रक्रियेत बापूची तीक्ष्ण नजर मंत्रदीक्षा घेणार्या प्रत्येक भक्तावर असते. भक्त सही घेताना प्रचंड भारावून जातो, त्याला जणू साक्षात्कारच होतो, अनेक देवांचे दर्शन त्याला बापूच्या रुपात घडते, त्याच्या जाणिवेत बापूच भगवान होऊन जातो व तो कायमचा आसारामबापूमय होऊन जातो.
आधुनिक बाबांसाठी असे धार्मिक पार्श्वभूमी असलेले, अतिशय योजनाबद्ध, भव्य, थाटामाटात साजरे होणारे हे समारंभ या बाबांचे एक परिणामकारक हत्यारच आहे. जरी लाखो भक्तांना स्वस्त जेवण-खाण, राहणे मिळत असले तरी आश्रमाचे ते एक उत्पन्नाचे साधन आहे, या बुवा-बाबाच्या प्रसिद्धीचा तो एक मार्ग आहे, आपल्या खर्या-खोट्या सामाजिक कार्याचे तमाम भक्तापुढे प्रदर्शन मांडण्याची संधी आहे. तीन दिवस चार-पाच लाख लोक एकत्र असणे, हे त्यांच्या ताकदीचे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामुळेच त्यांचे राजकीय महत्त्व वाढते. अशा समारंभांना मग राजकीय नेतृत्वाची हजेरी ही बाबाच्या आणि राजकारण्याच्या दृष्टीने आवश्यक बाब बनते. बाबा राजकारण्यांना आणि राजकारणी बाबाला योग्य तो मान देतात. त्यांनाही मग एवढ्या मोठ्या व्होट बँकेला काबूत ठेवणार्या बाबाच्या पायावर लोळण घ्यायला, बाबाच्या बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण द्यायला काहीच वाटत नाही. आज जरी आसारामबापू तुरुंगात असला तरी जेव्हा आश्रमात दोन मुलांचा मृत्यू झाल्यावर जो जनक्षोभ उसळला, तेव्हा त्यापासून आणि कायदेशीर प्रक्रियेपासून आसारामाला वाचविण्यासाठी राजकीय पातळीवर; तसेच देशातील तथाकथित संतमंडळींनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष बरेच प्रयत्न केले. आजही आसरामचा खटला ज्या धीम्या गतीने चालू आहे, त्यापाठीमागे हीच राजकीय व्यवस्था कार्यरत आहे, हे स्पष्ट आहे.
वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल की, आसारामबापूच्या आसूमल ते आसारामबापू या प्रवासाबद्दल सांगितल्या जाणार्या त्याच्या पूर्वायुष्यातील कथा, त्याचे अनुष्ठान, त्याचे गुरुपुराण, त्याच्या प्रवचनाची रचना, पद्धत, त्यातून आपल्या अमोघ वक्तृत्वाने पाजले जात असलेले नैतिक मूल्यांचे डोस यांनी भारावून जाणारा भक्त, आपली जात-पात, सामाजिक स्थान, आजच्या या बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेमुळे निर्माण होणारे बेकारी, जीवघेणी स्पर्धा, असुरक्षितता अशासारखे प्रश्न विसरायला लावणारे; पण धार्मिक परंपरा असणारे आश्रमात सार्वजनिकरित्या साजरे होणारे सण-समारंभ, त्या समारंभाचे भव्य आयोजन, त्या आयोजनातला भक्ताचा अल्पसा का होईना; पण सहभाग, यातून भक्ताला मिळत असलेला मानसिक विसावा, आश्रमाच्या ट्रस्टतर्फे आदिवासी, स्त्रिया, मुले यांच्यासाठी चालू असलेले तथाकथित सामाजिक कार्य, सत्ताधारी असो व विरोधक राजकारणी, प्रशासन, सरकार, तथाकथित धर्माचार्य, स्वघोषित संत, सनातनी धर्मांध संघटना यांच्याकडून मिळत असलेली प्रतिष्ठा व प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संरक्षण या सर्वांतून आसाराम अथवा तत्सम बाबाची, एका साक्षात्कारी गुरूची, आपले सारे प्रश्न ज्याच्यावर सोपवून आपण निर्धास्त राहू शकतो, आपले घर, नोकरी, लग्न, मुलीचे लग्न, आपले आरोग्याचे प्रश्नही याच्याच आशीर्वादाने सुटू शकतात, हाच आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यातून सोडवू शकतो, आपल्याला मानसिक शांती देऊ शकतो, असा जणू ‘भगवान’च अशी प्रतिमा निर्माण होते व त्या भावनेतून भक्त त्या-त्या बाबाशी; इथे आसारामशी बांधला जातो व मग त्याची कितीही दुष्कृत्ये अगदी पुराव्यानिशी सामोरे येवोत हे ‘बंध’ तोडणे त्याला अवघड जाते.
या ‘बंधा’चे मूळ भारतीय समाजातील वैशिष्ट्यपूर्ण ‘गुरू’परंपरेत आहे. जगातील दुसर्या कोणत्याही संस्कृतीत अशी गुरूपरंपरा दिसून येत नाही. भारतीय समाजाच्या आर्थिक-सामाजिक विकासाच्या प्रत्येक टप्प्यात अगदी प्राचीन-मध्ययुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत या गुरू परंपरेने मोठी भूमिका निभावली आहे. फक्त धार्मिक क्षेत्रापुरतीच ही परंपरा मर्यादित नाही, तर सांस्कृतिक-राजकीय-सामाजिक सर्वच क्षेत्रात ती महत्त्वपूर्ण राहिली आहे. पण आधुनिक काळात या परंपरेतील गुरूची संकल्पना आज केवळ संकल्पना म्हणून राहिली आहे, वास्तवात तिचे स्वरूप आज बदलले आहे. आजचे आसारामबापूसारखे बुवा-बाबा या गुरूपरंपरेचे विकृत रूप आहेत. सर्वसामान्यांच्या भावविश्वात त्या परंपरेबद्दल असलेल्या आदराच्या भावनेचा गैरफायदा ते घेत आहेत. रूढी, परंपरेत रुतलेल्या आधुनिक भांडवली व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांनी ग्रासलेला सर्वसामान्य माणूस गुरूच्या त्या वाचाळ, भपकेबाज, दिखाऊ विकृत रुपाकडे मोठ्या आशेने खेचला जात आहे. प्रत्यक्षात हे तथाकथित गुरू मात्र त्यांच्याकडे या आशेने आलेल्या भक्तांना विकासाकडे नाही, तर विनाशाकडे नेत आहेत.
1990 नंतरच्या जागतिकीकरणाच्या पर्वात विकासाचे प्रचंड ढोल जरी बडवले जात असले, तरी विषमतेची दरी मात्र प्रचंड रुंदावताना दिसत आहे. कॉपोर्रेटमधील एखाद्याचे उत्पन्न आणि शहरातील एखाद्या सर्वसामान्य स्थलांतरित कामगाराचे किंवा ग्रामीण भागातील शेतमजुराचे उत्पन्न यात भयानक अंतर आहे. या नवउदारवादी आर्थिक धोरणांतील विकासाचा हिडीस चेहरा या भयानक विषमतेच्या रुपात पुढे आलेला आहे. आजचा आपला मानवी निर्देशांक कितीतरी खाली घसरला आहे; अगदी आफ्रिकेतील मागास, गरीब देशांच्याही खाली. शेतीतील संकट जास्तीत जास्त गहिरे होत चाललेले आहे, त्याचे प्रतिबिंब शेतकर्यांच्या आत्महत्येत होणार्या वाढीत दिसत आहे. कामगार कायदे धाब्यावर बसवत कामगारांना देशोधडीला लावले जात आहे. बेरोजगारांच्या फौजा निर्माण होत आहेत. आरोग्य, शिक्षण, निवारा आणि इतर सामाजिक सुरक्षेवरचा सार्वजनिक खर्च दिवसेंदिवस कमी होत चालला आहे आणि या सेवांच्या खासगीकरणामुळे त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. स्वातंत्र्यानंतर स्वत:ला कल्याणकारी म्हणवून घेणारे भारतीय शासन आता या मूलभूत सेवा-सुविधांपासून अंग काढून घेत आहे. आजच्या सत्ताधार्यांच्या नोटाबंदी, ‘जीएसटी’सारख्या मनमानी निर्णयांमुळे, कॉपोर्रेटशरणतेमुळे सामान्यांच्या हालात भरच पडत आहे. परिणामी त्याचे सारे भविष्यच अंध:कारमय होऊन गेले आहे. सामाजिक पातळीवर दलित, अल्पसंख्याक यांच्यावर गोवंशबदीच्या नावाखाली हल्ले होत आहेत. स्त्रियांवरील अत्याचार वाढतच आहेत. सामान्य माणसाला आपल्या अस्तित्वासाठीच संघर्ष करावा लागत आहे. सर्वसामान्यांतील असुरक्षिततेची, अस्वस्थतेची, असंतोषाची भावना वाढत चालली आहे. अशावेळेस ज्यांना या नवउदारवादी आर्थिक धोरणांचा लाभ होत आहे, तो प्रभावशाली वर्ग या वाढत्या असंतोषाची दिशा आध्यात्मिकेकडे आणि धर्मांधतेकडे वळविण्यासाठी सत्ताधार्यांच्या मदतीने या बुवा-बाबांना हत्यार म्हणून वापरत आहे, ज्यामुळे या आर्थिक सुधारणांचे लाभार्थी आणि सत्ताधारी वर्गाच्या विरोधातील शोषित वर्गाच्या संघर्षाची धार बोथट होत आहे. म्हणूनच या बुवा-बाबांच्या सर्व बेकायदेशीर ‘लीलां’ना सत्ताधारी वर्गाच्या राजकारण्यांकडून अभय मिळत आहे, त्यांना करसवलती, सर्व सोयी-सुविधा मिळत आहेत, त्यांच्या विरोधात जरा कुठे खुट्ट झाले की हा सारा सत्ताधारी वर्ग त्याच्या सुटकेसाठी धावून जात आहे. या नवउदारवादी आर्थिक धोरणांचा लाभार्थी वर्ग आणि सत्ताधारी यांच्या विरोधात नवउदारवादी आर्थिक धोरणामुळे हाल सोसणार्या शोषित वर्गाला संघटित करून तीव्र संघर्ष उभा करून त्यांना पराभूत करणे, हाच या बुवा-बाबांचे आध्यात्मिक साम्राज्य नष्ट करण्याचा योग्य मार्ग आहे.
(या लेखासाठी सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केलेले उदय मेहता यांचे Religion and Gurus in Traditional and Modern India या पुस्तकातील आसारामबापू या प्रकरणाचा व 13 ऑक्टोबर, 2017 च्या ‘फ्रंटलाईन’ या पाक्षिकाचा आधार घेतलेला आहे).