Categories
बुवाबाजी

भुलभुलैय्या बाबा रामदेव

वार्षिकांक - २०१७

Rediff.com ने भारतातील 10 अतिवादग्रस्त गुरूंच्या यादीत बाबा रामदेवचा समावेश केला आहे. संत रामपाल, आसाराम बापू, स्वामी नित्यानंद, बाबा रामदेव, स्वामी अग्निवेश, रजनीश, चंद्रास्वामी, जयेंद्र सरस्वती, गुरमीत राम रहीम आणि सत्य साईबाबा हे ते दहा गुरू.

बाबा रामदेवबाबत काय आक्षेप आहेत?

तहेलका मासिकाने बाबा रामदेवच्या ट्रस्टमध्ये विविध प्रकारचे गैरप्रकार असल्याचे उघड केले आहे. वृंदा करात यांनी बाबा रामदेवच्या आयुर्वेदिक औषधात मानवी हाडांचा अंश असल्याचा आरोप केलाय. बाबा रामदेवचा असा दावा आहे की, विविध प्रकारचे कॅन्सर, प्राणायाम तंत्राने बरे करता येतात. योगाने एड्स बरा करता येईल, असे ते म्हणतात. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण नको, योगा हा त्याला उत्तम पर्याय आहे. समलैंगिकता हा आजार योगाने बरा करता येईल, असे कोर्टात अ‍ॅफिडेव्हिटही बाबांनी दाखल केलंय.

बाबा रामदेवचे दावे कितपत सत्य? बाबा रामदेव संन्याशी, विक्रेता की राजकारणी?

इंटरनेटवरील घेतलेल्या माहितीच्या आधारे जनहितार्थ रामदेवबाबांचे सत्यशोधन.

खर्‍या संस्कृतीची स्फूर्ती विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मिळत असते. – पं. जवाहरलाल नेहरू.

‘आस्था’ दूरचित्रवाणी चॅनेल रामदेवबाबाच्या मालकीचे. या व त्यांच्या ताब्यातील ‘संस्कार’ या दुसर्‍या चॅनेलवरून रामदेवबाबा भारतीय आयुर्वेद, पतंजली योगा आणि भारतीय अध्यात्माची महती प्रसारित करीत असतात. लाखो भारतीय, त्यांनी दूरचित्रवाणीवरून केलेले योगाचे आणि हर्बल वनौषधीचे दावे आस्थेने पाहत आणि ऐकत असतात. बाबांच्या योगाच्या कसरती आणि पोट आत-बाहेर करणारे कपालभातीसारखे व्यायाम यांचा दणदणाट सकाळी ‘आस्था’वर आणि ‘संस्कार’वर चालू असतो.

बाबा रामदेव स्वत:ला महात्मा गांधींचे आणि राजा शिवाजीचे वारसदार समजतात. ‘शिवाजीने मोगल आक्रमकांना परतवून स्वराजाचे रक्षण आणि विकास केला, तसेच महात्मा गांधींनी ब्रिटिशापासून भारत स्वतंत्र केला. तद्वत पाश्चात्यांच्या आर्थिक आक्रमणापासून मला भारत मुक्त करायचा आहे. पाश्चात्यांच्या, शरीराला विषमय करणार्‍या औषधी रसायनापासून भारतीय जनतेला वाचवायचे आहे. त्यांच्या व्यापारी उत्पादनातून भारतीय संपत्तीची होणारी लूट वाचवायची आहे,’ असा त्यांचा घोष ऊर्फ ढोल-ताशा टी.व्ही.वरून, सभांतून, शिबिरांतून दणक्यात चालू असतो.

बाबा रामदेव. सायकलवरून च्यवनप्राश विकणारा हरियाणातील एक सामान्य युवक. आज हे बाबा भारतीय समाजाला प्रचंड भुरळ घालून संन्याशी देशप्रेमी बनले आहेत. भारतीयांच्या दारिद्य्रासहित सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे शोधली आहेत. भारत रोगमुक्त, दारिद्य्रमुक्त आणि आरोग्यसंपन्न झाल्यावर त्यांना जगाला भारतीय अध्यात्माचे सामर्थ्य दाखवायचे आहे.

पु. ल. देशपांडे यांच्या ‘असा मी असामी’ या एकपात्री नाटकात शंकर्‍याचा बाप त्याला सल्ला देतो – ‘शंकर्‍या, कुंभार हो, जगात गाढवांना तोटा नाही.’ बाबा रामदेव भारतीय समाजाचे कुंभार झालेत; पण भारतातील सर्व नागरिकांना सर्वकाळ मूर्ख बनवता येणार नाही. रामदेवबाबांच्या उद्योगाबाबत, योगाबाबत, आयुर्वेदाबाबत तसेच त्यांच्या राजकीय उद्गाराबाबत विविध विचारवंतांनी, विविध माध्यमांत प्रामाणिक शंका उपस्थित केल्या आहेत. रामदेवबाबाचे ढोल-ताशे असत्याचा आवाज लोकांपर्यंत पोचवत आहेत, अशी अनेकांना रास्त शंका आहे.

इंटरनेट आणि विविध माध्यमांतून रामदेवबाबांच्या संदर्भात जे तर्क-वितर्क, त्यांचे शंकास्पद दावे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील फसवेपणा प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या आधारे काही वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढता येतील. एक शेतकर्‍याचा मुलगा राष्ट्रीय पातळीवर लोकांचा हिरो बनतो हे रामदेवबाबांचे कर्तृत्व नि:संशयपणे मान्य करायला हवे; पण ते करीत असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टी भारतीय समाजाच्या नुकसानीस कारण ठरू शकतील. रामदेवबाबांचे सत्यस्वरूप पुराव्यासहित लोकांसमोर मांडणे हा या लेखाचा उद्देश आहे.

* रामदेवबाबांचे योगोपचाराचे दावे कितपत सत्य?

* त्यांच्या आयुर्वेदिक औषधांची सुरक्षितता आणि परिणामकारकता किती?

* बाबा रामदेवच्या उद्योगाद्वारे रोजच्या गरजेच्या उत्पादनात व विक्रीच्या व्यवस्थापनात काही शंकास्पद व्यवहार आहेत का? त्यात भ्रष्टाचार दिसतो का?

* रामदेवबाबांचे राजकारण विवादास्पद का?

* त्यांची वादग्रस्त विधाने त्यांच्या कोणत्या पैलूंवर प्रकाश टाकतात?

* एकूण वास्तवाचा विचार करता बाबा रामदेव संत की बुवा?

पूर्वग्रहविरहीत, सत्यावर निष्ठा ठेवून रामदेवबाबांच्या भल्या-बुर्‍या गर्जनांचे ऑडीट करता येणं शक्य आहे. सामाजिक हितासाठी याची गरज आहे. लोकप्रिय व्यक्ती बहुधा चक्रम असतात. चक्रम असणे म्हणजे सर्वसामान्यांहून वेगळे वर्तन. अशा समाजहितासाठी अपूर्व त्याग करणार्‍या व्यक्ती फारच अपवादात्मक; पण त्यागाचा देखावा करून समाजाला भुलविणारे चक्रमच अधिक. पण हे कळायला उशीर होणे, हे समाजाला घातकही ठरू शकते.

बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण हे योगा आणि आयुर्वेदाच्या मदतीने लाखो लोकांना रोगमुक्त केल्याचा दावा करतात. मधुमेह, संधिवात, गारूट, मायग्रेन, पाठीचे दुखणे, श्वासविकार, अस्थमा, कॅन्सर, मेंदूचे आजार, हृदयविकार इत्यादी. ‘योगा इन सायर्नजी विथ मेडिकल सायन्स’ या त्यांच्या ग्रंथात वरील रोगांवरच्या यशस्वी उपचाराची माहिती दिल्याचे ते सांगतात. ही जोडी असाही दावा करते की, त्यांनी योग उपचाराचे जे प्रयोग केलेत त्यातून हेच सिद्ध होते की, जगातील सर्व प्रश्नांना योगा हेच उत्तर आहे आणि योगामुळे पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल, याबद्दल त्यांना शंका नाही.

पण याबाबतचा पुरावा कोठे आहे?

वरील पुस्तकात आणि रामदेव-बाळकृष्ण जोडीने दावा केलेल्या रिसर्च पेपरमध्ये कोठेही या रोगमुक्तीबाबतचा पुरावा मिळत नाही; फक्त लाखो-करोडो शब्दांना अर्थ नाही. नेमके किती, कोण आणि कसे बरे झाले, याचा वस्तुनिष्ठ अहवाल महत्त्वाचा; बाकी सगळा कचरा होय.

आधुनिक औषध विचार

माणसांना रोगमुक्त करण्याचा डांगोरा पिटवणार्‍या अनेक औषधी प्रणाली जगभर उपलब्ध आहेत. जडी-बुटी, वनौषधी, अ‍ॅक्युपंक्चर, चुंबकीय चिकित्सा, होमिओपॅथी, रक्तमोक्षण… ही यादी न संपणारी आहे. आधुनिक औषधव्यवस्थेला आव्हान देत या सर्व पॅथी प्राचीन काळापासून आजतागायत समाजमनावर प्रभाव टाकून आहेत. या सर्व पॅथींना एकत्रित कॅम (CAM) असं नाव आहे. CAM म्हणजे Complementary आणि Alternative मेडिसीन. आधुनिक वैद्यकाला पूरक किंवा पर्यायी असं या पॅथीचे स्वरूप आहे. कॅम आणि मॉडर्न मेडिसीन यात महत्त्वाचा फरक म्हणजे मॉडर्न मेडिसीन हे पुराव्यावर आधारित मेडिसीन आहे. (Evidence Based Medicine). हे पुरावे शोधण्याची विज्ञानाची खास पद्धत मॉडर्न मेडिसीनमध्ये वापरली जाते. तिला ‘रँडम डबल ब्लाईंड क्लिनिकल टेस्ट’ असं म्हणतात. या चाचणीद्वारे औषधाची सुरक्षितता आणि परिणामकारकता विश्वसनीयरित्या निश्चित केली जाते. जगभरच्या प्रयोगशाळांत घेतलेल्या अशा वस्तुनिष्ठ चाचणीचे तुलनात्मक संशोधन कोक्रेन मॉडेलद्वारा पुन्हा तपासले जाते. कोक्रेन चाचणी ही जागतिक पातळीवरची मेडिकल क्षेत्रातील ‘गोल्ड स्टँडर्ड’ आहे.

सत्य या मूल्याचा आदर करावयाचा असेल, तर सर्व प्रकारच्या औषध पॅथीनी हे गोल्ड स्टँडर्ड पास करायला हवे. कारण सत्य म्हणजे सत्य. माझे सत्य वेगळे, तुमचे सत्य वेगळे असं असू शकत नाही. ही डबल ब्लाईंड कसोटी रामदेव-बाळकृष्ण द्वयीच्या योगा आणि आयुर्वेदिक औषधांच्या यशस्वितेला मान्यता न देणारी आहे. आयुर्वेद आणि योगाबाबत अधिक काटेकोर संशोधन होण्याची गरज आहे, असा कोक्रेन कसोट्यांचा निष्कर्ष आहे.

‘डबल ब्लाईंड चाचणी’ कशी घेतली जाते? या परीक्षणात आजारी व्यक्तींचे दोन गट पाडले जातात. प्रत्येकात अशा व्यक्तींची पुरेशी संख्या असते. एका गटाला चाचणी औषध, तर दुसर्‍या गटाला प्लॅसिबो म्हणजे केवळ साखरेची गोळी दिली जाते. दोन्ही गटात, वय, लिंग, आहार याबाबतीत पुरेशी स्वैरता ठेवलेली असते. औषध घेतलेल्या गटातील लोक अधिक संख्येने बरे होत आहेत, असे दिसले तर औषध परिणामकारक. ही चाचणी घेताना डॉक्टर आणि पेशंट या दोघांना औषध कुणाला व प्लॅसिबो कुणाला दिला, हे कळू दिले जात नाही. याला म्हणतात काटेकोर वस्तुनिष्ठता. अशा वस्तुनिष्ठ चाचण्या एखाद्या नव्या औषधाबाबत जगभर केल्या जातात. त्या सायंटिफिक जर्नल्समध्ये प्रसिद्ध केल्या जातात. इतर वैज्ञानिक त्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ते प्रयोग रिपीट करतात. अशा तर्‍हेने तावून-सुलाखून घेतलेले निष्कर्ष मान्यताप्राप्त होतात. प्रथम त्यांचा प्रयोग प्राण्यावर व नंतर माणसावर होतो, हे संशोधन 15 ते 20 वर्षे चालते. मगच नवीन औषध (ज्याची अशी काटेकोर दीर्घ चाचणी यशस्वी झाली) बाजारात आणले जाते.

रामदेवबाबा किंवा अन्य औषधनिर्माता काहीही म्हणो; त्यांचे औषध अशा चाचण्यांद्वारे पास व्हायला हवे. आधुनिक मेडिसीन हे अशा कठोर चाचण्यांतून व्यवहारात आणले जाते. मधुमेह, हृदयविकार, मेंदूचे आजार, पोटाचे विकार अशा सर्व विकारांसाठी गेल्या केवळ दोन-तीनशे वर्षांत आधुनिक विज्ञानाने केलेले संशोधन थक्क करणारे आहे. मधुमेह इन्शुलिन या रसायनाच्या कमतरतेमुळे होतो, हे आयुर्वेद आणि कॅमपॅथीना माहीत तरी होते का? रक्ताभिसरणाचे नेटवर्क कोणी शोधून काढले? मेंदूची रचना कशी शोधली गेली? कॉलर्‍याच्या जंतूचा शोध आधुनिक विज्ञानानेच लावला नाही का? साधा स्टेथेस्कोप कोणाची देणगी आहे?

सुरक्षितता आणि उपयोगिता या बाबतीत आधुनिक औषध प्रणालीला कोणतीही कॅमपॅथी आव्हान देऊ शकणार नाही. आधुनिक मेडिसीनने साथीचे रोग नियंत्रणात आणले, प्रतिकारक लसी निर्माण केल्या, ‘देवीचा रोगी कळवा, हजार रुपये मिळवा,’ ही घोषणा कुणामुळे शक्य झाली?

गेल्या चारशे वर्षांत विज्ञानाच्या विविध शाखांत संशोधन करून मानवी जीवन सुखमय करणारे गॅलिलिओ, न्यूटन, विल्यम हार्वे, व्हेसॅलिस्टर, लुई पाश्चर आदी वैज्ञानिक हेच खरे ज्ञानमहर्षी होत. ते सत्य संशोधक होते. या सर्वांच्या प्रयत्नांतून आधुनिक विज्ञानाची चिकित्सक पद्धती रूढ झाली, जी सत्यशोधनाचा प्रभावी मार्ग म्हणून स्वीकारली गेली आहे.

कॅमचे समर्थक मॉडर्न मेडिसीनवर अनेकविध आरोप करतात. त्यात कितपत तथ्य आहे? एक आरोप असा की, आधुनिक औषधांचे दुष्परिणाम होतात. पर्यायी किंवा पूरक औषधे सुरक्षित असतात. हे धादांत असत्य आहे. आधुनिक औषधांचे दुष्परिणाम होतात, हे डॉक्टर्स कधीच अमान्य करीत नाहीत; पण त्यावरचे उपायही शोधले जातात व औषध शक्य तितके सुरक्षित केले जाते. आयुर्वेदिक औषधांचे देखील दुष्परिणाम होतात. या औषधातील धातुची भस्मे विषारी असतात, हे सिद्ध झाल्यामुळे संबंधित औषधांना अमेरिकेत प्रतिबंध करण्यात आला आहे. आयुर्वेदिक औषधात होलिस्टीक म्हणजे व्यक्तीचे मन, शरीर, वातावरण यांचा एकत्रित विचार होतो. पण मॉडर्न मेडिसीनमध्ये असा विचार होत नाही, अशी टीका ही मंडळी करतात, जी चुकीची आहे. आधुनिक औषध देतानाही रोग्याची मानसिकता, मन, शरीरसंबंध, वातावरण-शरीरसंबंध या सर्वांचा विचार डॉक्टर करतातच. आयुर्वेदिक औषधे पूर्णत: नैसर्गिक असतात, हा दावा धादांत असत्य आहे. आधुनिक औषधेसुद्धा नैसर्गिक पदार्थापासून बनवितात. पेनिसीलीन हे प्रतिजैविक बुरशीपासून बनते. आधुनिक औषधातील रासायनिक द्रव्ये ही वनस्पती व प्राणी यांच्यापासून बनतात. अर्थात, त्यात नैसर्गिक खनिजे देखील असतात. आयुर्वेदिक औषधात प्राण्यांची हाडे व पार्‍यासारख्या धातुची भस्मे मिसळलेली असतात. मग ती पूर्णपणे नैसर्गिक कशी? पर्यायी उपचार करणार्‍या सर्व पॅथीचे समर्थक जी टीका मॉडर्न औषधांवर करतात, ती कशी सर्वार्थाने चुकीची आहे, हे आता आपल्या लक्षात येईल.

आधुनिक औषधे ज्ञानाधारित आणि सत्याधारित असतात म्हणूनच जगभर आधुनिक सोयींनी सुसज्ज अशा हॉस्पिटलद्वारे विविध आजारांचे नियंत्रण करण्यात मॉडर्न मेडिसीनशी इतर कुठल्याही पॅथीची तुलना होऊ शकत नाही. मग पूर्वजांचा अभिमान, ऋषी-मुनींच्या नावाचा उपयोग, प्राचीन संस्कृतीचा ठेवा अशा कुबड्या लावून आयुर्वेदासारखी छद्मविज्ञाने विकण्याचा मतलबी धंदा संन्याशाच्या नावाने रामदेवसारखी मंडळी करू लागतात.

योगा कितपत सुरक्षित व परिणामकारक याची सखोल माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. nirmukta.com/2011/06/09 या साईटवर श्रीनिवास कक्कीलय (Kakkilaya) यांची योगावरील टीका उपलब्ध आहे. श्रीनिवास हे मेंगलूर (केरळ) येथे व्यावसायिक फिजीशियन आहेत. स्यूडोसायन्स आणि धर्म या शीर्षकाखालचा ‘No, Yoga Does Not Cure Any Disease’ हा त्यांचा लेख योगाच्या दाव्यातील फोलपणा उघड करतो. त्यांच्या लेखाचा मतितार्थ सारांशरुपात खाली देत आहे.

अष्टांग योगाच्या आठ अंगापैकी पहिले महत्त्वाचे अंग म्हणजे ‘यम’. यामध्ये योग्याने पाळावयाच्या नीतितत्त्वाची चर्चा येते. पाच यमनियमांपैकी दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे ‘सत्य’; पण रामदेवबाबा आणि तत्सम योगप्रचार करणार्‍या मंडळींनी सत्यापासून फारकत घेतलेली आढळते. कारण केवळ योगाने सर्व प्रकारच्या आजारांवर मात करता येते, या दाव्याला विश्वसनीय पुरावा नाही.

श्रीनिवास यांनी 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय योगादिनावेळी लिहिलेल्या लेखात म्हटलंय,

All the available evidence as of now and the systematic and meta-analysis indicate clearly that Yoga Does Not Cure or Prevent or significantly alliviate. Any ailment that affects humans, Yoga Do Not endorse it as a stand alone treatment for any human illness.

योगोपचार प्राचीन हे मोठे असत्य – (Great Lie)

योगा हा भारतीय औषध प्रणालीचा घटक नव्हताच. चरकसंहिता किंवा अष्टांगहृदय या ग्रंथात कोणत्याही रोगास प्रतिबंध करणे किंवा बरे करणे यासाठी योगाच्या उपयोगाचा उल्लेख नाही. मणीभाई हरिभाई देसाई (श्री योगेंद्र – 1947-1989) आणि जगन्नाथ गणेश गुणे (स्वामी कैवल्यानंद) यांनी अनुक्रमे मुंबई आणि लोणावळा येथे योग केंद्राची स्थापना केली. या केंद्राद्वारे भारतात सर्वत्र आणि जगभर योगाचा प्रसार करण्यात आला. या केंद्राद्वारे योगमीमांसा जर्नल आणि इतर मेडिकल जर्नल्समधून योगावरील संशोधन पेपर्स प्रसिद्ध करण्यात आले. 100 वर्षे संशोधन करून तीन हजार शोधनिबंध योगावर प्रसिद्ध झाले. तरी योगाच्या प्रचारकांना, योगाची परिणामकारकता सिद्ध करणारा एकही विश्वसनीय पुरावा मिळाला नाही.

योगावर काही सिस्टीमेटिक रिव्ह्यू आणि मेटॅ अ‍ॅनॅलिसिसद्वारे (यात कोक्रेन रिव्ह्यूचा समावेश आहे) उपलब्ध आहेत. पण त्यातील एकाही संशोधनात मानसिक किंवा शारीरिक प्रकारच्या कोणत्याही आजारावर योगाच्या परिणामकारकतेला निश्चित पुरावा मिळालेला नाही.

श्रीनिवास यांनी लेखाच्या उत्तरार्धात हृदयविकारापासून ते मधुमेहापर्यंतच्या विविध आजारांत योगाची विश्वसनीयता दाखविणारे समाधानकारक पुरावे मिळाले नसल्याचा उल्लेख केला आहे.

पण रामदेवबाबा दडपून, ‘आस्था-संस्कार’द्वारे योगाचा उद्घोष सातत्याने करतात. याचा विषाद वाटतो. योगातील यम नियमातील सत्यनिष्ठा या मूल्याचा विचार करता वरील पुराव्याच्या आधारे रामदेवबाबा असत्याचे प्रचारक ठरतात. मराठीत एक म्हण आहे. जे जास्त बडबड करतात, त्यांच्या एरंड्या विकल्या जातात; पण जे प्रचारात कमी पडतात, त्यांचा गहू देखील खपत नाही. बाबा रामदेव योगा आणि आयुर्वेदाच्या एरंड्या विकणारे चलाख विक्रेते वाटतात. म्हणूनच प्रख्यात योगतज्ज्ञ बी. के. अय्यंगार यांनी रामदेवबाबाच्या सर्व रोगहारी कपालभातीची खिल्ली उडविली आहे.

शरीराची लवचिकता, मनाचे आरोग्य यासाठी योगसाधना उपयोगी ठरू शकते, हे मान्य करता येईल; पण योगाने कॅन्सरसहीत सर्व आजार बरे करता येतात, हा दावा अविश्वासार्ह आहे.

मॉडर्न मेडिसीन व विज्ञानातील इतर संशोधन हे तावून-सुलाखून घेतलेले सोने आहे. ते कुणालाही तपासून पाहता येते, त्याच्या आधारे कोणीही नवीन साधने बनवू शकतो. त्यात काही अपुरेपणा निदर्शनास आला, तर वैज्ञानिक वर्तुळात त्याची चर्चा होते आणि पुन:परीक्षणाला प्रोत्साहन दिले जाते. कॅम थेरपी किंवा इतर प्रकारच्या आयुर्वेद-योगासारख्या छद्मविज्ञानाची पद्धत नेमकी याच्या उलट आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक सुंदर वचन आहे, ‘खर्‍या संस्कृतीची स्फूर्ती ही विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मिळत असते.’ या विधानाला फार मोठा अर्थ आहे. इतिहासकालापासून ते आजतागायत जगभर विविध देशांत, विविध संस्कृतीत माणूस, निसर्ग आणि एकूण विश्वाबद्दल शोध चाललेला आढळतो. या शोधात कित्येकदा अज्ञानमूलक कल्पनाही आढळतात. त्या पुढच्या पिढीत तपासल्या जातात. हळूहळू मानवी समाज अधिकाधिक शहाणपणाकडे वाटचाल करीत राहतो. आजचे ज्ञानवंत या विज्ञान संस्कृतीला मानतात आणि त्यातील सत्य शोधण्याच्या पद्धतीचा नव्या ज्ञानासंदर्भात चिकित्सेसाठी वापर करतात. श्रद्धेच्या तपासणीचा इतिहास आणि योग्य कार्यकारणभावाचा शोध म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. या दृष्टिकोनाच्या आधारे मूल्यवान काय आणि कचरा कोणता, हे शोधण्याची शक्तिमान किल्ली माणसाला गवसली आहे. औषध क्षेत्रात डबल ब्लाईंड वैज्ञानिक चाचणी, मेटॅ अ‍ॅनॅलिसीस आणि क्रोक्रेन रिव्ह्यू ही ती किल्ली आहे. या किल्लीच्या मदतीने आयुर्वेदातील औषधे कितपत सुरक्षित व परिणामकारक आहेत, हे तपासलं गेलंय.

आयुर्वेद चिकित्सा

सर्व ज्ञान वेदात आहे, पूर्वीच्या ऋषी-मुनींनी आपल्या आरोग्याचा परिपूर्ण विचार केला आहे. आयुर्वेद हा भारतीयांचा मूल्यवान ठेवा आहे. जुन्या ग्रंथांतून सांगितलेले आयुर्वेदिक उपचार हे अनुभवांचे ज्ञान आहे. त्याचा सर्वत्र प्रसार झाला पाहिजे, अशी एक प्रभावी विचारधारा आपल्या देशात होती. ती आजही आहे आणि अधिक प्रभावी होत आहे. श्रद्धेवर आधारित या विचारधारेची चिकित्सा होण्याची गरज आहे. या विचारधारेच्या खांद्यावर रामदेवबाबा, पतंजली योगा आणि आयुर्वेद यांना; हनुमानाने जसा द्रोणागिरी तोललाय, तसा तोलून दौडत निघाले आहेत. मतलबी प्रचार राष्ट्रीय अभिमानाला चेतना देण्यासाठी ठीक आहे; परंतु कोणतेही ज्ञान; मग ते भलेही पवित्र वेदातील, पवित्र कुराणातील अथवा पवित्र बायबलमधील असो, त्याचे निरंतर परीक्षण आणि आत्मसुधार या गोष्टी ज्ञानाच्या सत्यतेसाठी आवश्यक आहेत. दंतकथात्मक पुरावे, व्यक्तिगत समर्थन व साक्षी आणि लोकसमजुती यापासून आयुर्वेदाला मुक्त करावयाचे असेल, तर ‘डबल ब्लाईंड चाचणी’ शिवाय अन्य पर्याय नाही; पण भारतात आयुर्वेद आणि इतर पर्यायी उपचारांना एवढे स्वातंत्र्य दिलेले आहे की, कोणीही उठावे, अमक्या रोगावर प्रभावी उपाय सापडल्याची जाहिरात करावी आणि दडवून परीक्षण न झालेली औषधे विकावीत, अशी परिस्थिती आहे. मॉडर्न मेडिसीनला पाश्चात्य विषारी औषधे असं हिणवून, आयुर्वेदाची भलावण करत भारतीय अस्मितेला आवाहन करत रामदेवबाबा धावत सुटले आहेत. त्यांची ही अस्मिता भारतीय समाजाच्या कल्याणासाठी आहे, असा त्यांचा दावा म्हणजे ढोंग आहे. लोककल्याणासाठी सत्याचा सन्मान करावा लागतो. बाबा रामदेव असत्याला सत्याची प्रतिष्ठा देत आहेत. आयुर्वेदिक औषधांच्या ‘डबल ब्लाईंड चाचणी’द्वारे आपणास याची प्रचिती देता येईल. रामदेवबाबा आणि इतर परंपराभिमानी वैद्य आणि गुरू, असा दावा करतात की, तुम्ही कितीही संशोधन करा, सृष्टीच्या प्रारंभी वैदिक ऋषींना आयुर्वेदाचे जे ज्ञान प्राप्त झाले होते, त्यात कोणताही बदल करू नये, हा विचार प्रगतीला मारक आहे.

वृंदा करात – रामदेव वादानंतर रामदेवबाबांच्या योगा-आयुर्वेद प्रचारावर इंडियन मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजयकुमार यांनी आपले व्यक्तिगत टीकास्त्र सोडले. सोबत त्यांनी डॉक्टरांना विनंती केली, रामदेव आपल्या व्यवसायाची प्रतिमा गढूळ करीत आहेत, त्यांना थांबवा; पण भारतीय डॉक्टरांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. भारतीय वैद्यकीय क्षेत्र आयुर्वेद चिकित्सेबाबत तटस्थ आहे. ‘आयुष’ने आयुर्वेदाला मुक्तता दिलेली आहेच. अशा स्थितीत आयुर्वेदातील जे टिकाऊ ते ठेवून आणि असत्य ते नाकारून मॉडर्न मेडिसीनप्रमाणे आयुर्वेदाला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न कसा सफल होईल? रामदेवबाबासारखी मंडळी हे होऊच देणार नाहीत, अशा वेळी आयुर्वेदाची गंभीर दखल घेऊन आधुनिक कसोटीद्वारे जे हाती आले आहे त्याचा प्रचार आपणाकडे कसा होईल, यासाठी प्रयत्न करावा लागेल.

नॅशनल कौन्सिल फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसीन या अमेरिकेतील प्रतिष्ठित संस्थेने आयुर्वेदाबाबत काढलेले निष्कर्ष महत्त्वाचे आहेत.

आयुर्वेदिक औषधे सुरक्षित आहेत काय?

आयुर्वेदिक औषधात विविध प्रकारची घटकद्रव्ये असतात. यातील काहीत वनौषधी, खनिजे आणि धातुद्रव्ये असतात. त्यातील काही आरोग्याला हानिकारक असू शकतात. काही वनस्पती मॉडर्न मेडिसीनशी क्रियाशील होऊन धोकादायक बनतात. काहींना साईड इफेक्ट्स असतात. शिशासारखे काही धातू हे मानवी शरीरासाठी विष आहे.

* 2008 मध्ये NCCIH फंडद्वारा केलेल्या संशोधनात 193 आयुर्वेदिक औषधांची सुरक्षितता तपासण्यात आली. ही औषधे इंटरनेटद्वारा खरेदी करण्यात आलेली होती, जी भारतात व अमेरिकेत बनविण्यात आली होती. या तपासात 21 टक्के औषधांत शिसे, पारा आणि आर्सेनिक यांचे वाजवीपेक्षा अतिरिक्त प्रमाण आढळून आले.

आयुर्वेदातील मसाज, खास आहार पदार्थ आणि शुद्धीकरण द्रव्ये याबाबतही सुरक्षिततेचे प्रश्न आढळून आलेत.

आयुर्वेदाचे समर्थक अ‍ॅलोपॅथीच्या दुष्परिणामांबाबत टीका करतात. आयुर्वेद औषधे दुष्परिणामरहीत आहेत, हा त्यांचा दावा किती फोल आहे, हे वरील संशोधनातून स्पष्ट होईल.

परिणामकारकतेचे काय? आयुर्वेदिक औषधे मॉडर्न मेडिसीनला पर्याय म्हणून उपयोगी आहेत काय? याचे उत्तरही नकारार्थी आहे. NCCIH च्या अहवालानुसार आयुर्वेदिक औषधांबाबतच्या क्लिनिकल चाचण्या लहान, संशोधनाच्या डिझाईन्समध्ये अडचण असणे, कंट्रोल गु्रपचा अभाव आणि इतर अपुरेपणा यामुळे विश्वसनीय ठरत नाहीत. थकज म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या कसोटीस या चाचण्या उतरत नाहीत, हे खुद्द डॉ. एम. एस. वालियाधन; जे आयुर्वेदाचे खास समर्थक इंडियन डॉक्टर आहेत यांनीसुद्धा मान्य केलंय.

काही आजार काळाच्या ओघात नैसर्गिकरित्या ताब्यात राहतात, आजारात चढ-उतार होत असतो. आजार वाढून उताराकडे जात असताना औषध घेतले तर औषधांमुळे बरं वाटलं, अशी रुग्णाची समजूत होते. प्लॅसिबो परिणामही मदतीला येतो. म्हणून वस्तुनिष्ठ क्लिनिकल चाचण्या महत्त्वाच्या ठरतात. अशा चाचण्या आयुर्वेदिक औषधांबाबत नकारार्थी निष्कर्ष देतात.

मानवी शरीराचे व त्यातील विविध जैवरासायनिक क्रियांचे ज्ञान मानवाला अलिकडे दोन-तीनशे वर्षांत झालं आहे. आयुर्वेदाचे सिद्धांत आणि औषधांचा शोध हा दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. मग त्यामध्ये अपुरेपणा असणारच. महान ऋषींनी सांगितले म्हणून ते सर्व खरंच असं मानण्यात कोणता शहाणपणा आहे? अनुभवातून व निरीक्षणातून आयुर्वेदिक औषधांचा प्रभावीपणा समजला असेल, तर ती औषधे पुन:चाचणीद्वारे प्रमाणित करून मुख्य औषध प्रवाहात आणणे योग्य आहे; पण सरसकट प्राचीन महान वारसा म्हणून आयुर्वेदाची भलावण करणे शहाणपणाचे नाही. गंमत अशी की, बहुसंख्य बी.ए.एम.एस. आयुर्वेदिक डॉक्टर्स आपल्या दवाखान्यात आयुर्वेदाचा वापर न करता मॉडर्न मेडिसीनचा वापर करतात.

संस्कृतीचा किंवा श्रद्धेचा पुनर्तपास हा मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचा असेल, तर मग रामदेवबाबांच्या ढोल-ताशांचे काय?

आपली संस्कृती श्रेष्ठ, पाश्चात्य मंडळी औषध नाही, विष विकत आहेत, आयुर्वेद सुरक्षित आहे, तो नैसर्गिक आहे, अशा ‘आस्था-संस्कार’वरील घोषणा म्हणजे असत्याचा पुकार आहे. योगा आणि ध्यानधारणा, प्राणायाम आणि आयुर्वेद यांचा जयजयकार करताना त्यांच्या मर्यादा रामदेवबाबा लक्षात घेत नाहीत. ते भारतीय आरोग्य प्रणालीचे अवास्तव मार्केटिंग करीत सुटले आहेत. जोपर्यंत रामदेवबाबांच्या प्रयोगशाळेतील आयुर्विज्ञान जागतिक पातळीवरील विविध प्रयोगशाळेत सिद्ध होत नाही, तोवर बाबांच्या घोषणांना काहीही किंमत नाही. मानवी आयुष्याशी संबंधित औषध विज्ञानाला कठोर वस्तुनिष्ठ कसोटी न लावता, ते आमचे प्राचीन वैभव आहे, असं म्हणणं म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ होईल. तथाकथित संत रामदेवबाबांना हे न शोभणारं ठरेल.

योगगुरू ते मार्केटबाबा

रामदेवबाबांना पाश्चात्य औषधांचा जसा फोबिया झालाय, तसाच पाश्चात्य कंपन्यांच्या जीवनोपयोगी (कंझ्युमर गुड्स) वस्तूंचीही अ‍ॅलर्जी झालीय. परदेशी बड्या कंपन्यांना मी पळवून लावणार, अशी दर्पोक्ती रामदेवबाबा भारतीय श्रोत्यांसमोर काढतात. ते म्हणतात,

‘पॅन्टिन का पेंट गीला होनेवाला है, कोलगेट का गेट बंद हो जाएगा, नेसलेका पंछी उड जाएगा, युनिलिव्हर का लिव्हर खराब हो जाएगा।’

बाबा रामदेव यांनी राजीव दीक्षितबरोबर स्वदेशी मालाची चळवळ सुरू केली आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळाले. फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्सची निर्मिती त्यांनी सुरू केली. आज त्यांच्या ऋचउॠ, पतंजलीचा व्याप आणि नफा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. रामदेवबाबा खर्‍या अर्थाने मार्केटबाबा बनले आहेत.

औषध निर्मितीच्या बाबतीत जशी भारतीय अस्मिता बाबांनी वापरली तशीच ऋचउॠ बाबतही बाबा भारतीय अस्मितेला आवाहन करतात. आपली उत्पादने अस्सल देशी, पूर्णपणे शुद्ध आणि सुरक्षित अशी त्यांची जाहिरात त्यांच्या आस्था-संस्कार; तसेच इतर चॅनेल्सवरून चालू असते. टी.व्ही.वर दर मिनिटाला रामदेवबाबा आपल्या मालाची जाहिरात करताना दिसतात. संन्याशाच्या वेषात आमचाच साबण वापरा, असे त्यांचे भाषण ऐकताना हसू येते. साबण विकणारा संन्याशी कशी वाटते कल्पना? स्कॉटलंडमध्ये रामदेवबाबांनी त्यांच्या उद्योगासाठी जमीन खरेदी केली आहे. ह्यूस्टनजवळ (अमेरिकेत) त्यांचे प्रॉडक्शन युनिट होणार आहे. बाबा परदेशी कंपन्यांचे भारतातून उच्चाटन करणार असतील, तर त्यांच्या परदेश आक्रमणाचे काय? हे संन्याशाचे नैतिक वर्तन ठरते काय?

विज्ञानाने जग एक होत चालले आहे. मुक्त व्यापाराची संकल्पना जगभर आकारास येत आहे. अशा वेळी परदेशी वस्तूंचा फोबिया पसरविणे योग्य आहे काय? परदेशी कंपन्यांत काम करणारे लेबर इथलेच असतात. इथला कच्चा माल उपयोगात आणला जातो. मोठ्या उद्योगाला जोडलेले अनेक छोटे उद्योग निर्माण होतात. केवळ पतंजलीच हे करते असं नाही. फॉरेन कंपन्यांनी भारतीय अर्थव्यवस्था ताब्यात घेतली आहे, हा आक्षेप बरोबर नाही. रामदेवबाबासारख्या मंडळींना अर्थशास्त्राचे ज्ञान नसावे. बाजारात स्पर्धा असेल, तर किमती नियंत्रणात राहतात. मग उत्पादक भारतीय असो की, परदेशी. उत्पन्नाची क्वॉलिटीसुद्धा स्पर्धेमुळे सुधारते.

परदेशी कंपन्यांवर टीका करताना रामदेव या कंपन्या धोकादायक रसायनाचा वापर करतात व भेसळयुक्त पदार्थांची निर्मिती करतात, अशी टीका करतात; पण हे खरं नाही. कारण भारतीय अन्न आणि औषध प्रशासनाचे सर्टिफिकेट असल्याशिवाय त्यांचा माल बाजारात येत नाही आणि रामदेवबाबांच्या ‘पतंजली’ प्रॉडक्टस्चे काय? 2016 मध्ये भारतीय जाहिरात नियंत्रण कौन्सिलने (अडउख) ने ‘पतंजली’ची दिशाभूल करणार्‍या जाहिरातीबद्दल कानउघाडणी केली होती. गैरवाजवी जाहिरातींबद्दल ‘पतंजली’ला 21 लाखांचा दंडही करण्यात आला होता. अजूनही ‘पतंजली’ एड्स बरा करणारी जाहिरात प्रसिद्धीस देत असते, जी खोटी आहे.

2013 ते 2016 या काळात ‘पतंजली’च्या 82 सँपल्सपैकी 32 सँपल्स गुणवत्ता चाचणीत अयोग्य ठरल्याचे आर.टी.जे. तपासातून निष्पन्न झाले.

मी कृष्णवर्णीय आहे. गोरा म्हणजे पाश्चात्य असतो, तर मला नोबेल पारितोषिक मिळाले असते, अशी दर्पोक्ती रामदेवबाबाने काढली होती. एड्सवरील त्यांच्या फसव्या दाव्याबद्दल त्यांना नोबेल समितीने आपले बक्षीस देण्याचा विचार अवश्य करावा.

‘पतंजली’च्या नूडल्समध्ये अळ्या सापडल्याचे पुरावे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जीवनोपयोगी वस्तूंच्या ‘पतंजली’च्या मार्केटमध्ये सर्वकाही प्रामाणिक व पारदर्शक व्यवहार आहेत, असं दिसत नाही; पण स्वदेशीच्या भावनेला हात घालून रामदेवबाबांनी ‘पतंजली’चा विस्तार केला, यात त्यांचा धूर्तपणाच दिसून येतो.

‘गॉडमॅन टू टायकून’ या प्रियांका नरेन पाठक यांच्या पुस्तकात ‘पतंजली’निर्मित, देशी गायीच्या दुधाच्या अस्सल तुपाचा उल्लेख आहे. रामदेवबाबांचे सी.ई.ओ. पात्रा सांगतात – रामदेवबाबा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून लोणी मागवतात. ते कोणाच्या दुधापासून; देशी गायीच्या की म्हशीच्या की जर्सी गायीच्या, हे कोणी पाहिलंय? या लोण्यापासून बनणारे तूप देशी गायीचे तूप म्हणून पतंजली कंपनी विकते. नंदिनी या दूध व्यवसायातील कर्नाटकमधील कंपनी 23 लाख शेतकर्‍यांकडून (22000 खेड्यांतील) लोणी कलेक्ट करून ‘पतंजली’ला पाठविते. हे लोणी देशी म्हशीपासूनचे किंवा जर्सी गायीचे नसेल कशावरून?

हा रामदेवबाबांचा भ्रष्टाचार नव्हे का? हेच बाबा भ्रष्टाचाराविरोधात रामलीला मैदानावर उपोषण करतात, ही बुवाबाजी नव्हे काय?

वादग्रस्त वक्तव्ये

संत किंवा सच्चे साधू हे विनयी असतात. बाबा रामदेव यांनी वेळोवेळी जी जहाल वक्तव्ये केली, त्यावरून त्यांचा संतपणाचा मुखवटा गळून पडतो आणि त्यांच्या आक्रमक, उद्धट कोपीष्ट स्वभावावर प्रकाश पडतो.

‘या देशातील जो कोणी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही त्याचे डोके उडवले असते; पण कायद्याने हात बांधल्यामुळे मला ते करता येणार नाही. भारतमातेबद्दल अनादर दाखविणारे एक, दोन वा लाखो असोत, त्या सर्वांची शिरे धडावेगळी करण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे,’ हे उद्गार रोहटक येथील एका संमेलनात बाबा रामदेवने काढले. दारूल उलूम देवबंद या इस्लामिक धार्मिक स्कूलद्वारे आदल्याच दिवशी घोषणा झाली होती. आम्ही ‘भारतमाता की जय,’ म्हणणार नाही. कारण इस्लामला मूर्तिपूजा मान्य नाही; पण भारताबद्दलचा आदर आम्ही ‘हिंदुस्थान झिंदाबाद’ किंवा ‘मादरे वतन’ या घोषणेने करू. आय.एम.ए.चे नेते ओवेसी यांनी गळ्यावर सुरी ठेवली, तरी मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, असे उद्गार काढले होते. या दोन्ही घटनांना रामदेवबाबाने वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली. 29 एप्रिल 2016 रोजी रोहटक कोर्टाने कलम 504 अन्वये बाबाला समन्स जारी केले. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपापल्या धार्मिक रीतीनुसार भारताबद्दलचे प्रेम व आदर व्यक्त करण्याचा भारतीय नागरिकांचा अधिकार काढून त्यांना हिंदू धर्माप्रमाणे वागण्यासाठी दमबाजी करण्याचा अधिकार रामदेवबाबांना कोणी दिला?

सुरुवातीला काँग्रेसबरोबर असणारे व त्यांच्या सत्तेद्वारे विविध फायदे घेऊन झाल्यावर सत्ता गेल्यानंतर रामदेवबाबांनी काँग्रेसविरोधी भूमिका घ्यावयास सुरुवात केली. ते भाजपचा प्रचार करू लागले आणि कडवा हिंदुत्ववाद मांडू लागले. हिंदुत्वाचा अजेंडा राबविणार्‍या मोदी सरकारची ते भलावण करू लागले. साधू रामदेव पुरते ‘संधिसाधू’ झाले.

‘राहुल गांधी दलितांकडे पिकनिक व हनिमूनसाठी जातात. दलित मुलीबरोबर राहुलने लग्न करावे म्हणजे त्यांचे भाग्य उजळेल व ते भारताचे पंतप्रधान होतील,’ अशी बोचरी उपहासगर्भ टीका रामदेवबाबाने केली होती. उत्तरप्रदेश पोलिसांनी या विधानाला आक्षेप घेत बाबांवर गुन्हा दाखल केला. काँग्रेसने या जातिवाचक विधानाला आक्षेप घेऊन रामदेवबाबांवर टीकेची झोड उठविताच आपला शेरा मागे घेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम तरुणास ‘बीफ खाल्ल्यावर हिंदू समुदायाने ठार मारले होते. या घटनेवर जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी नाराजी व्यक्त करून बीफ हे गरिबांचे अन्न आहे आणि गरीब हिंदूंचेदेखील ते अन्न आहे,’ असे म्हटले होते. लालूंच्या या उद्गारावर रामदेवबाबांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. लालूप्रसाद यादव यांनी यादव कुळाचा अपमान केला आहे. ज्या कुळात भगवान कृष्ण जन्मले, या कुळाशी हिंदू बीफ खातात, असं बोलून लालूंनी प्रतारणा केली आहे. लालूप्रसाद हे कृष्णाचे वंशज नसून, कंसाचे वंशज असावेत. याच लालूप्रसादांनी वृंदा करात-रामदेव वादाच्या वेळी रामदेवबाबाचे समर्थन केले होते. त्या समर्थनाबद्दल रामदेवबाबाने लालूंना कंसाचे वंशज म्हणून ‘कृतज्ञता’ व्यक्त केली म्हणायची.

काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात रामदेवबाबांचे रामलीला मैदानावरील आंदोलन बाबांच्या पळपुटेपणाने गाजले. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कृती करण्यास सुरुवात केल्यावर बाबा सलवार-कुर्ता घालून व दुपट्ट्यात तोंड झाकून गर्दीत नाहीसे झाले. याच वेषात त्यांना नंतर अटक करण्यात आली. या आंदोलनात एका स्वयंसेवकाचा मृत्यूही झाला. लोकांना शौर्याचे धडे देणारे बाबा असे पळपुटे निघाले. गांधीजी त्यांच्या जागी असते, तर त्यांनी निर्भयपणे स्वत:ला अटक करवून घेतली असती आणि आपल्या सहकार्‍याचा प्राण वाचविला असता. या घटनेवर वाराणसीचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी खालील शब्दात उपहासात्मक टीका केली.

जो पुलीसके डरसे औरतोंके कपडे पहनकर भागे, वो कौनसा ऋषी है, कोई हमे बताये। ऐसा व्यक्ती ऋषी नहीं हो सकता। वो संन्यासके रुपमे व्यवहार करते है और लाल कपडे पहनकर बिझिनेस करते है।”

साधू की संधिसाधू?

संत तुकारामांचे एक अभंगवचन आहे. ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।’ रामदेवबाबा संन्याशाची भाषा बोलतात; पण त्यांचे वर्तन संन्याशासारखं नाही. ते भ्रष्टाचारावर हल्ला करतात; पण त्यांच्या योगा, आयुर्वेद आणि पतंजली प्रॉडक्ट्सबाबत अवाजवी प्रचार दिसतो. पक्षीय राजकारणात महत्त्वाकांक्षेने प्रेरित बाबा अनेकांशी प्रतारणा करून उड्या मारत सुटले आहेत. सध्या ते हिंदुत्ववादी पक्षाचे पाठिराखे आहेत. भविष्यात ते कोठे उडी घेतील, सांगता येत नाही.

गांधीजींच्या ‘सत्य’ या मूल्याचा आणि शिवाजींच्या ‘धैर्य’ या गुणाचा बाबा रामदेवमध्ये मागमूसही नाही. या देशात ‘पतंजली’द्वारे गरिबी हटलेली दिसत नाही. आयुर्वेद योगाद्वारे भारत रोगमुक्त झाल्याचे आढळत नाही. अशा वादग्रस्त गुरू रामदेवला आपण रामराम ठोकावा, हेच योग्य होईल.

प्रा. . रा. आर्डे