Categories
प्रासंगिक

असेही एक मरणपत्र!

ऑक्टोबर – २०१७

लंकेश पत्रिकेतील एक संपादकीय

(काही महिन्यांपूर्वी गौरी लंकेश यांनी ‘गौरी लंकेश पत्रिके’साठी लिहिलेल्या संपादकीयांचे पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशन झाले. बहुतेक अग्रलेख कर्नाटकातील राजकारणाशी संबंधित असून त्या-त्या काळच्या प्रसंगावरील टीका-टिप्पणीच्या स्वरुपात आहेत. परंतु 29 जुलै 2009 रोजी प्रकाशित झालेले संपादकीय मात्र फार वेगळ्या प्रकारचे होते. त्यांच्या पत्रिकेसाठी सदर लिहिणार्‍या एका लेखिकेच्या मृत्युनंतर गौरी लंकेश यांना आपले वडील पी. लंकेश यांच्या मृतदेहावरील अंतिम क्रियेच्या वेळच्या घटनाक्रमांची तीव्र आठवण झाली. धर्म न मानणार्‍या वडिलांच्या मुत्यूनंतर आणि या दुःखद प्रसंगी गौरी व तिची बहीण बेबी जास्त बोलण्याच्या स्थितीत नसताना इतर नातेवाईकांनी ज्या प्रकारे सर्व गोष्टींचा ताबा घेतला व उच्छाद मांडला याचे साद्यंत वर्णन या अग्रलेखात आहे. त्या कटु प्रसंगाच्या वर्णनाचा भाग वगळून या कन्नड अग्रलेखातील इतर काही भाग मराठी वाचकांसाठी अनुवाद करून देत आहोत. यावरून त्या किती संवेदनशील होत्या, याची खात्री पटेल.)

——————————

माझ्या शरीराच्या अंतिमक्रियेच्या वेळी कुठल्याही पुरोहिताला बोलवू नये. माझ्या कपाळावर हळद-कुंकू लावू नये. माझ्या मृत देहाच्या दर्शनासाठी कुणीही जमू नये. माझे मृत शरीर एखाद्या मेडिकल कॉलेजच्या संशोधन विभागाला अभ्यासासाठी देण्यात यावे. माझे डोळे नेत्रपेढीला द्यावेत. माझ्या निधनाची बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात छापली जाऊ नये. जिवंत असतानाच मी भरपूर खाल्लेले असताना मी मेल्यानंतर माझ्या जिभेवर तांदळाचे दाणे ठेवले जाऊ नयेत. मी जिवंत असताना अनाथाश्रमातील मुलांच्यासाठी मी नियमितपणे जेवण पाठवत असल्यामुळे माझ्या मरणानंतर मला वैकुंठप्राप्ती व्हावी म्हणून गावजेवण घालू नये. कुणीतरी नातलग हट्टाने पेटून वा मरणोत्तर काहीतरी होईल या भीतीने पुरोहितांना बोलवल्यास मीच त्यांच्या मागे (हात धुऊन) लागेन. काही दिवसापूर्वी मृत पावलेल्या लेखिका, बी. एस. वेंकटलक्ष्मी यांच्या ब्लॉगवरील हे इच्छापत्र वाचत असताना वेंकटलक्ष्मीनी एखादा लेख लिहिण्यासाठी निवांत जागा निवडल्याप्रमाणे दरवाजे बंद करून कुठलेही आवाज न करता जगातून त्या उठून गेल्या.

कुणीही असो, या जगात जसे जगत होते त्याचप्रमाणे या जगाचा निरोप ते कसे घेतात, हेही फार मुख्य आहे. वेंकटलक्ष्मी यांच्या मरणेच्छापत्रामुळे माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरच्या गोष्टी पुन्हा आठवल्या.

बी. एस. वेंकटलक्ष्मी यापूर्वी या पत्रिकेसाठी लिहीत असताना मला त्यांचा तेवढा परिचय झालेला नव्हता. मात्र ‘आवरण – ही एक विकृती’ या पुस्तकाच्या लेखनाच्या संदर्भात माझी व त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. वेंकटलक्ष्मी यांनी संपादित केलेल्या ‘चिंतकांची चावडी’ या सदरातील लेख वाचत असताना माझे मित्र पट्टाभिराम सोमयाजी यांनी भैरप्पा यांना चावडीतील लेख फार आवडल्याचा उल्लेख केला. मी ते लेख वाचून वेंकटलक्ष्मींना फोन केला व ‘वि-कृती’साठी काही लेख छापण्याची परवानगी मागितली. त्यांनी आनंदाने अनुमती दिली. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्या आवर्जून हजर राहिल्या व स्नेहितांसाठी काही प्रती विकतही घेतल्या.

‘चिंतकाची चावडी’ साठी त्या नेहमी लेख पाठवत होत्या. काही वेळाने पोस्टाने व काही वेळा गांधीबाजारला आल्यास ऑफिसमध्ये येऊन. ऑफिसमध्ये आल्या तरी मी फार बिझी असेन म्हणून आम्हाला कळू न देता परस्पर जात असत. केवढा हा मनाचा मोठेपणा!

वेंकटलक्ष्मी यांच्या मृत्यूने कर्नाटकातील ‘चिंतकांच्या चावडी’ला अवकळा प्राप्त झाली आहे. अजून एक आवाज अस्तंगत झाला आहे. (29 जुलै 2009)

मराठी भाषांतर : प्रभाकर नानावटी