गौरी लंकेश यांचे मारेकरी तातडीने पकडा,
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि प्रा.कलबुर्गी यांचे मारेकरी आणि त्या मागचे सूत्रधार हे अजून फरार असताना त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांचा खून होणे ही अत्यंत वेदानादाई गोष्ट आहे. त्यांच्या मारेकर्यांना तातडीने पकडले जावे आणि या खुनाचा डॉ. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खुनाशी काही संबंध आहे का याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट— अंनिस तर्फे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे केली आहे
धर्माच्या नावाने जो उन्माद आणि कट्टरीकरण केले जाते त्याच्या विरोधी त्या निर्भीड पणे आवाज उठवीत असत. या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे ती पद्धत आणि डॉ.दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि प्रा.कलबुर्गी यांच्या खुनाची पद्धत या मध्ये मोठे साम्य दिसून येते. तपास यंत्रणानी या सर्व गोष्टींचा सखोल तपास करावा अशी देखील मागणी या पत्रकात करण्यात आलेली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, स्वतंत्र विचार मांडणार्या आणि विवेकवादी लोकांच्या अशा प्रकारे होणार्या हत्या हे एक प्रकारची दहशतवादी कृत्ये आहेत. व्यवस्थेमधील त्रुटींच्या विषयी प्रश्न उपस्थित करणे हे लोकशाहीत नागरिकांचे एक अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य आहे आणि जोपर्यंत हे मारेकरी सापडत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र अंनिस सातत्याने लोकशाही सनदशीर मार्गाने या विषयी लढा देत राहील असे देखील या पत्रकात नमूद केलेले आहे. गौरी लंकेश यांच्या खुनाच्या मागे कोणत्या व्यक्ती आणि संघटना आहेत हे जरी स्पष्ट झालेले नसले तरी डॉ दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांचे मारेकरी पकडले न गेल्यानेच या शक्तींचा जोर वाढतो आहे असे देखील या पत्रकात म्हटले आहे. विवेकवादी विचारवंत कार्यकर्ते आणि पत्रकार संघटना यांच्या लढाईत विचारी नागरिकांनी सहभागी व्हावे आणि फरार मारेकरी शोधण्यासाठी शासनावर दबाव निर्माण करावा अशी अपेक्षा देखील या पत्रकात व्यक्त केलेली आहे.