Categories
कव्हर स्टोरी

गौरी लंकेश यांच्या खुनाच्या निषेधार्थ महाप्रचंड रॅली आणि सभा!

ऑक्टोबर – २०१७

आय एम गौरी’च्या घोषणांनी बंगळुरू दुमदुमले.

दि. 5 सप्टेंबर रोजी निर्भीड पत्रकार आणि सत्यनिष्ठ कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. त्याचा निषेध करण्यासाठी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये देशभरातल्या हजारो साहित्यिक, कलाकार, संगीतकार, नट, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी राजकीय पक्ष व संघटना, विद्यार्थी-युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी हजेरी लावली. त्यांच्या मोर्चाची घोषणा होती – “I am Gauri”

12 सप्टेंबरच्या या मोर्चात आणि त्यानंतर झालेल्या महाप्रचंड सभेत अंनिसतर्फे वार्तापत्र संपादक मंडळाचा सदस्य म्हणून अनिल चव्हाण, व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात, सह व्यवस्थापक सुहास यरोडकर आणि अंनिसच्या सोशल मीडियाचे सचिव विनायक होगाडे हे सहभागी होते.

आठशे ते हजार मीटर परीघ असलेल्या ग्राऊंडवर सुमारे दीडशे खांबांचा भव्य मंडप उभारण्यात आला होता. पांढर्‍याशुभ्र छताला मध्ये लालभडक वर्तुळाकार झालर, तर कडेला निळ्या वर्तुळाकार झालरींनी शोभा आणली होती. पन्नास साठ फूट लांबीच्या भव्य स्टेजच्या मागे गौरी यांचा फोटो आणि घोषणांचा फलक लावला होता. स्टेजवर तीन ठिकाणी माईक लटकवले होते. पैकी एक कार्यकर्त्यांच्या वाद्यवृंदासाठी राखीव होता. वीसच्यावर न्यूज चॅनेलच्या कॅमेर्‍यांनी सकाळी नऊपासूनच स्टेजच्या दिशेने तोंडे वळवलेली होती.

दहा वाजता रेल्वे स्टेशनजवळून सुरू झालेली रॅली सभास्थळी यायला बारा वाजले. विविध संघटनांचे बॅनर्स, झेंडे आणि घोषणा फलक घेऊन हजारो युवक-युवती, नागरिक घोषणांच्या गजरात सभास्थानी प्रवेश करत. यामध्ये प्रामुख्याने “आय अ‍ॅम गौरी, वुई आर गौरी” ही घोषणा दिली जात होती. त्याशिवाय ‘वुई वाँट जस्टीस’, ‘नाने गौरी’ ‘गौरी निनगे-लाल सलाम’, सत्यम निनगे लाल सलाम, साहित्य निनगे लाल सलाम’ म्हणजे गौरीला लाल सलाम, सत्याला लाल सलाम अशा घोषणा होत्या.

तरुणांचा एक गट कन्हैय्याकुमारने लोकप्रिय केलेली ‘हमें चाहिए-आजादी, आर एस एस से – आजादी, मनुवादीसे-आजादी’ अशा घोषणा त्वेषाने देत होता. या घोषणेचा खोटा व्हिडीओ करून एका लबाड चॅनेलने कन्हैय्या कुमारला गेल्या वर्षी देशद्रोहाच्या खोट्या खटल्यात अटक करायला लावली, याची आठवण शेजारी उभी असणारी कर्नाटक विद्यार्थी संघटनेची श्रीदेवी नावाची मुलगी सारखी शेजारणीला करून देत होती. मोदी आणि धर्मांध आरएसएसच्या निषेधाच्या घोषणांबरोबर मनुस्मृतीचाही निषेध कन्नडमधून केला जात होता. जथ्थाने येणार्‍या विद्यार्थी-युवकांच्या हातात एकाच रंगांचे झेंडे असत. त्यामध्ये लाल, निळे, तिरंगी याबरोबर काळे झेंडे घेतलेलेही जथ्थे होते. काही जणांनी तर काळे कपडेच परिधान केले होते. विविध संघटनांच्या झेंड्यांमध्ये सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया-कम्युनिस्ट (एस.यू.सी.आय.(सी)), दलित संघर्ष सेना (डी.एस.एस.), स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.), एन.एस.यू.आय., डी.वाय.एफ.आय., ए.आय.एस.एफ. यांचे अस्तित्व दिसत होते. पण बिनझेंडेवाल्यांची संख्या जास्त होती. सुमारे पन्नास कॉलेजमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. रघुभाईंना मी त्यांची संघटना विचारली, तेव्हा त्यांनी आपण स्वतंत्र असून रॅशनॅलिस्ट आहोत, गौरीचे फॅन आहोत आणि पेशाने डेंटिस्ट असल्याचे अभिमानाने सांगितले. मूळचे सांगलीचे असलेले सोन्या-चांदीचे उद्योजक कृष्णा शिवाजी देवकर गेली चाळीस वर्षे बंगळुरूमध्ये राहताहेत; पण त्यांनी गौरी लंकेशना एकदाच पाहिले होते. अशा गौरी लंकेश यांच्या संपर्कात असलेल्या आणि नसलेल्या; पण सत्याची चाड असलेल्या नागरिकांची संख्याही मोठी होती.

गौरी लंकेश पत्रिकेमध्ये सहा महिने इंटर्नशीप केलेल्या ‘कात्यायनी श्री’ या जर्नालिझमच्या विद्यार्थिनीच्या मते गौरी लंकेश सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अत्यंत भावूक होत, दुर्बलांच्या मदतीला धावून जात आणि धर्मांध हिंदुत्ववाद्यांना विरोध करत; पण त्यांच्या पत्रिकेपेक्षा प्रकाशित पुस्तकांचा खप जास्त होता.

सभेची सुरुवात क्रांतिकारक गीतांनी झाली. सभेत विविध पक्ष-संघटना-स्वतंत्र मतवादी, कलाकार, चित्रपट तारे, साहित्यिक, पत्रकार अशा देशभरातून आलेल्या पन्नासच्यावर वक्त्यांनी विचार मांडले. ते सूत्ररूपाने ठरावात प्रतिबिंबित झाले. एकमताने मंजूर झालेल्या ठरावाचा मतितार्थ होता- “गुन्हेगारांना त्वरित शोधून काढा, या विवेकवाद्यांच्या खुनामागे व्यापक कट असून, जमातवादी शक्तींच्या विरोधात एक होऊन मुकाबला करू या.”

गौरीच्या आई इंदिरा लंकेश यांनी आपल्या भावनिक भाषणाचा शेवट करताना सांगितले – “योग्य तत्त्वासाठी गौरीच्या शरीराचा कण आणि कण संघर्षरत होता; माझ्यासाठी तुम्ही सर्वजण आज गौरी बनले आहात.” विविध वक्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-

तिस्ता सेटलवाड – खुनानंतरची चांगली बाब म्हणजे ऐक्य वाढले आहे, ही शक्ती आम्ही वाया जाऊ देणार नाही. गौरीचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही.

चंद्रशेखर पाटील (लेखक)- काही वर्षांपूर्वी मी नरेंद्र दाभोलकर होतो, त्यानंतर कॉ. गोविंद पानसरे बनलो. दोन वर्षांपूर्वी माझे वर्गमित्र एम.एम.कलबुर्गी यांचा खून झाला, तेव्हा मी कलबुर्गी होतो आणि आज मी गौरी आहे.

देवनूर महादेवा (लेखक) – देश स्वतंत्र झाला तेव्हा एका आदर्श समाजाचे स्वप्न नेतृत्वाने पाहिले; पण ते दिवास्वप्न बनले असून आजचे नेते देशाला काळ्याकुट्ट भूतकाळाकडे नेत आहेत.

मेधा पाटकर (नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या)- उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववाद्यांनी जात आणि धर्माच्या नावावरच नव्हे, तर विकासाच्या नावावरही खून पाडले आहेत.

‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमें है।

देखना है जोर कितना बाजूए कातिल में है।- हे सांगण्यासाठी हा जनसागर जमला आहे.‘ गौरीने आपल्या लेखणीला अशी धार लावली की, त्यामुळे धर्मांध घाबरले. ही शोकसभा नाही, हिंमत सभा आहे.

उदय प्रकाशजी (हिंदी साहित्यकार आणि पुरस्कारवापसी गटाचे नेते)-

“आसमान में इतने काले बादल क्यूँ है?

लगता है बिजली बरसने वाली है,

बरसात, तुफान आनेवाला है।

नफरत की ये दिवार आज गिरनेवाली है।”

सागरिका घोष (महिला पत्रकार) – सत्ताधार्‍यांची घोषणा आहे – “बेटी बचाव, बेटी पढाव,

और जादा पढी तो, गोलीसे उडाव।”

अ‍ॅड. प्रशांत भूषण (स्वराज्य अभियानचे कार्यकर्ते)

खुनी संस्कृती आमची नाही, हिंदू नाही, भारतीय नाही. आज संस्कृती, देश, न्यायालये, पोलीस सर्वजण संकटात आहेत. मोदी म्हणतात – ‘अच्छे दिन’ येणार आहेत, प्रेम आपुलकी आणि विचार व उच्चार स्वातंत्र्याचे जग अवतरणार आहे, हे पटते.

स्वामी अग्निवेश (सामाजिक कार्यकर्ते) – मी जाहीरपणे सांगतो की, महात्मा गांधींच्या खुनाप्रमाणे हा खूनही हिंदुत्ववादी संघटनांनीच केला आहे.

एच. एस. दोरे स्वामी (स्वातंत्र्य सैनिक) – जनतेला आणि विचारांना दाबणारे कधी यशस्वी होत नाहीत. द्वेषावर आधारित धर्म आणि राजकारण दोघांनाही आपण दूर लोटले पाहिजे.

गणेश देवी (दक्षिणायनचे प्रणेते) – गोळीला आपण मतपत्रिकेतून उत्तर दिले पाहिजे.

जिग्नेश मेवानी (दलित कार्यकर्ता) – गौरी लंकेश मला मुलगा मानत. मी गौरी अम्मांची शपथ घेऊन सांगतो की, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू राष्ट्र कल्पनेला विरोध करीन आणि आधुनिक भारतासाठी झटेन.

कॉ. सीताराम येचुरी (जनरल सेक्रेटरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) – हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या संघपरिवारामुळेच चार विवेकवाद्यांचे खून झाले आहेत. महात्मा गांधी आणि असंख्य दंगलग्रस्तांच्या मृत्यूला संघाचा विखारी प्रचार कारणीभूत असल्याचे सरदार पटेल यांनीही म्हटले होते.

वीरभद्र चेन्नमल्ला स्वामी (निदूममीडी मठ) – विरोधकांना जिवे मारण्याचे त्यांचे तत्त्वज्ञान असून कलबुर्गींचा खून धार्मिक कारणांमुळे तर गौरीच्या खुनामागे राजकीय कारण आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्याख्याने सुरू राहिली. मध्येमध्ये क्रांतिकारी गीतांनी हजेरी लावली. ‘आय अ‍ॅम गौरी-वुई आर गौरी’ च्या गगनभेदी घोषणांनी, सर्वांनी मुठी आवळून, हात उंचावून सभेची सांगता केली.

अनिल चव्हाण

संपर्क : 9764147483