निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनानंतर कर्नाटकातील एक निर्भीड पत्रकार, गौरी लंकेश यांच्या निर्घृण खुनामुळे संपूर्ण देश हादरला आहे. ठिकठिकाणच्या पुरोगामी संघटनांनी या हत्येचा तीव्र निषेध केला असून लाखोंचा जमाव उत्स्फूर्तपणे या निषेधात सामील होत आहे.
कर्नाटकातील एक ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी, 5 सप्टेंबर 2017 रोजी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या बंगल्यासमोर बाइकवरून आलेल्या दोन जणांनी 5 गोळ्या झाडून हत्या केली. त्या जागीच कोसळून पडल्या. पुढचे कुठलेही वैद्यकीय उपचार होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी वार्यासारखी सर्वत्र पसरली. हे हिंदू मूलतत्त्ववाद्यांचेच कृत्य असावे असे अनेकांना वाटू लागले. कारण हा संपूर्ण घटनाक्रम दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येशी जुळत होता. समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यातील काही प्रतिक्रिया खुनाचे समर्थन करणार्याही होत्या. ‘जर गौरी जिवंत असती तर अशा प्रकारे हिंसेचे समर्थन करणार्यांना वाट चुकलेले’ म्हणून मोठ्या मनाने क्षमा केली असती आणि ‘कधी तरी यांना सत्य कळून आपल्या कृतीचा पश्चात्ताप होईल’ असे तिला वाटले असते.
गौरी लंकेश यांचे वय मृत्युसमयी 55 वर्षांचे होते. तरुणपणापासून त्यांच्यावर पुरोगामी व उदारमतवादी विचारांचा पगडा होता. त्यामुळे आपले विचार मांडण्यात त्या कधीही घाबरत नसत. अंतिम परिणामाची भीती न बाळगता त्या लिहित असत.
खरे पाहता गौरींना डॉक्टर व्हायचे होते. ते शक्य नाही, याची जाणीव झाल्यानंतर त्या पत्रकारितेकडे वळल्या. 1980च्या मध्यात त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टाइम्स ऑफ इंडिया, संडे, इंडिया टुडे इत्यादी पत्रिकेत त्यांनी विपुल प्रमाणात इंग्रजीत लेखन केले. त्यानंतर काही दिवस ईनाडू टीव्हीसाठीसुद्धा त्यांनी काम केले. त्यांची पत्रकारिता प्रामुख्याने कर्नाटकाबाहेर व दिल्लीमध्येच जास्त प्रमाणात झाली. 2000 साली त्यांचे वडील पी. लंकेश यांची तब्येत फारच खालावली. त्यामुळे त्यांना बंगळुरूला परत यावे लागले.
पी. लंकेश हे एक ख्यातनाम कादंबरीकार, कवी, पत्रकार, नाटककार व काही कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शक होते. बंगळुरू विद्यापीठातील इंग्रजी प्राध्यापकाची नोकरी सोडून त्यानी ‘लंकेश पत्रिके’ या नावाच्या टेब्लॉयड स्वरूपातील साप्ताहिकाची धुरा वाहिली. त्यासाठी ते कर्नाटकातील खेड्यापाड्यातील जीवनाचे जवळून निरीक्षण करू लागले व त्याबद्दल लिहू लागले. मुळातच ते लोहियावादी व समाजवादी असल्यामुळे दलित, वंचित व कष्टकरी यांच्यासाठी ते लढत राहिले. या पत्रिकेचे एक वैशिष्ट्य म्हणजे यात एकही जाहिरात नसायची. जाहिरातीमुळे संपादकीय स्वातंत्र्य संकुचित होते म्हणून ते केवळ वर्गणीतून खर्च भागवत होते. पत्रिकेतील लेख, त्यांची लेखनशैली व प्रस्थापितांवरील घणाघाती टीकेमुळे अल्पकाळात पत्रिका लोकप्रिय झाली.
‘लंकेश पत्रिके’च्या भरभराटीचा तो काळ होता. मुद्रित माध्यमाचे ते चांगले दिवस होते. दूरदर्शनचा अजूनही माजघरात प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे पी. लंकेश यांच्या लेखांना सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे. लंकेश हे मुळातच उदारमतवादी असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब पत्रिकेत उमटत होते. हेच शिक्षण गौरी लंकेश यांनाही मिळत होते. परंतु जानेवारी 2000 मध्ये त्यांना मधुमेहाचा त्रास होऊ लागला व शेवटी एके दिवशी हृदयाघाताने त्यांचा मृत्यू झाला आणि या त्यांच्या पत्रिकेचे भविष्य अधांतरी झाले.
गौरी लंकेशचा हा काळ फारच कठीण काळ होता. पत्रकार असलेले पती चिदानंद राजघट्टांपासून त्या विभक्त झाल्या होत्या आणि आपल्या वडिलांच्या पत्रकारितेचा वारसा आपण पुढे चालवू शकू की नाही, याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. गौरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी लंकेश पत्रिकेच्या प्रकाशकांना भेटून पत्रिकेचे प्रकाशन बंद करावे, असे सांगितले. प्रकाशकांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली व लंकेश पत्रिकेचे पुनरुज्जीवन होऊन गौरी लंकेश यांच्या संपादनाखाली कर्नाटकात प्रकाशित होऊ लागले. वडिलांचा वारसा चालवण्याचा त्यांनी निर्धार केला होता, त्यामुळे पत्रिकेतील मजकुरावर बारीक नजर ठेवून त्या पत्रिकेचे संपादन करू लागल्या. अल्पकाळात त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळू लागले.
2005 साली गौरी लंकेश व त्यांचा सिनेक्षेत्रातील भाऊ इंद्रजित यांच्यामध्ये पत्रिका चालवण्यावरून काही मतभेद झाले, त्यामुळे गौरी लंकेश यांनी स्वतंत्रपणे ‘गौरी लंकेश पत्रिके’ या नावाने नवीन साप्ताहिक सुरू करण्याचा निर्धार केला.
‘गौरी लंकेश पत्रिके’चा वाचकवर्ग खेड्यापाड्यात पसरलेला होता. कर्नाटकातील ग्रामीण भागातील राजकारण, समाजकारण व अर्थकारण समजून घेणे हेच त्यांच्यासमोरील मोठे आव्हान होते. याशिवाय त्यांचे पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व करिअर इंग्रजी बोलणार्या उच्चभ्रू वर्गातील असल्यामुळे कन्नड भाषेतील साप्ताहिक तितक्याच ताकदीने चालवणे हेही एक आव्हान त्यांच्यासमोर होते. गौरी यांना या दोन्ही आघाड्यावर लढावे लागले.
यासाठी त्यांनी कर्नाटकाच्या कानाकोपर्यापर्यंत प्रवास केला, जनसामान्यांच्या समस्या समजून घेतल्या, तळागाळातील उपेक्षितांशी, वंचितांशी चर्चा केली. या प्रवासातून व चर्चेतून त्यांना पुढे काय करायचे, याची निश्चित दिशा सापडली. नेहमीप्रमाणे त्यांच्या या प्रयत्नांवर टीका- टिप्पणी करणार्यांची संख्यासुद्धा कमी नव्हती. त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे व कुठलीही तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळे प्रस्थापितांनी त्यांना नक्षलवादी ठरवून टाकले. त्यांचे विरोधक त्यांचा उल्लेख ‘शहरी नक्सली’ म्हणूनच करत असत. त्यांच्या मृत्यूला नक्षलवादीच कारणीभूत होते अशी अफवा उठवून तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्नही या प्रतिगाम्यांनी केला.
खरे पाहता नक्षलवाद्यांनी हिंसा सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हावे यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. यासाठी त्यांनी अनेकांशी संपर्कही साधला होता. हिंदुत्ववादी विचारसरणीला असलेला त्यांचा विरोधही त्यांनी कधीच लपवला नव्हता. चिक्कमंगळुरू येथील दत्तपीठातील गैरकारभाराविषयी त्यांनी तेथील हिंदुत्ववाद्यांना धारेवर धरले. तसेच रामचंद्रपूरचे मठाधिपती राघवेश्वर भारतीच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला, त्यामुळे या मठाच्या अनेक भक्तांच्या क्रोधाची त्या शिकार झाल्या. गौरी या केवळ पत्रकारच नव्हे, तर एक सक्रिय कार्यकर्त्यासुद्धा होत्या. पश्चिम घाट बचाओ आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. बाबाबुडनगिरी येथील सुफी संताची कबर उखडून टाकण्याचा घाट काही हिंदू जमातवाद्यांनी घातला होता. त्याला विरोध करणार्यामध्ये गौरी लंकेश यांचा सहभाग होता. संघ परिवाराच्या विरोधात संघर्ष करणार्या अनेक पुरोगामी संघटनांशी त्या जोडलेल्या होत्या व प्रत्यक्ष संघर्षात देखील त्यांनी भाग घेतलेला होता.
त्यांच्या हिंदुत्ववादविरोधी पवित्र्यामुळे कळत न कळत त्यांच्या शत्रूंच्या संख्येत मोठी वाढ होत होती. कट्टर हिंदुत्ववादी लोक काहीतरी निमित्त काढून त्यांना कुठेतरी अडकवण्याच्या प्रयत्नात होते. म्हणूनच 2008 साली प्रसिद्ध झालेल्या एका मजकुराच्या आधारे नोव्हेंबर 2016 साली भाजपचे लोकसभेचे सदस्य, प्रल्हाद जोशी व उमेश घुशी यांनी त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक लेखन केल्याबद्दल फौजदारी तक्रार दाखल केली. या खटल्यात त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. या शिक्षेच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना जामीन मिळाला होता.
कित्येक मित्रांनी त्यांना तडजोडीचा मार्गही सुचवला होता, परंतु गौरी लंकेश तडजोड करण्यासाठी तयार नव्हत्या. वैयक्तिक स्वार्थासाठी विचारांना तिलांजली देणे हे त्यांच्या स्वभावात बसत नव्हते आणि त्या कधीच कुंपणावर बसणार्या नव्हत्या. दोन वर्षांपूर्वी जेव्हा कलबुर्गींची हत्या झाली, तेव्हासुद्धा गौरी यांनी जमातवादाचा निषेध करत रान उठवले. विद्वेषी गप्प बसणार नाहीत, याची त्यांना पूर्ण खात्री होती; तरीसुद्धा धार्मिक मूलतत्त्ववाद व जातप्रथांच्यातून व्यक्त होणारी विषमता यांच्याविषयी त्या सातत्याने लिहित होत्या व लढत होत्या. त्यांच्या पत्रिकेच्या मुखपृष्ठावर उल्लेख केलेले मनोरंजन, प्रबोधन व स्फूर्तिदान हीच पत्रिकेची उद्दिष्टे आहेत व त्यांस अनुसरून ‘गौरी लंकेश पत्रिके’ असेल याची ग्वाही त्या वाचकांना देत असत. चैतन्य के. एम. हा तिचा बालमित्र. एकाच ठिकाणी वाढलेले. त्याच्या मते, ‘गौरीशी कितीही वाद घातले, तरी तिच्या ठाम मतांना विरोध केला तरी किंवा तिच्या मतांच्या विरोधात मत प्रदर्शन केले तरी या विरोधी प्रतिवादाचा तिला कधीही राग येत नसे. दुसर्यांच्या मतांचा आदर करण्याइतका मोठेपणा तिच्यात होता.’
दलितांचे नेतृत्व करणार्या जिग्नेश मेवानीचा आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैयाकुमार व शेहला रशीद यांचा आवाज कर्नाटकाच्या कानाकोपर्यापर्यंत पोचवण्याचे कठीण काम त्यांनी केले. अलिकडच्या काळात त्यांची प्रकृती ढासळत होती; तरीसुद्धा कुठलाही कार्यक्रम, मोर्चा वा आंदोलन यांना त्या आवर्जून हजर असायच्या; परंतु त्यांचा रुढी-परंपरांना असलेला विरोध कित्येकांच्या सहनशक्तीच्या पलिकडचा होता. त्यांनी आपले पुरोगामी विचार बासनात गुंडाळून ठेवावेत, असे त्यांच्या विरोधकांना वाटत असे. ‘तुमचे विचार तुमच्यापाशी ठेवून गप्प राहा, नाही तर मरण्यास तयार व्हा.’ हाच संदेश ते देत आहेत की काय, असे वाटत होते. अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढणार्यांचे तोंड कायम बंद केल्यास आपली डाळ शिजेल या दृष्टिकोनातून त्यांच्या विरोधकांनी त्यांचा खून केला. हा खून गौरी नावाच्या व्यक्तीचा नसून त्यांच्या विचारांचा आहे.
इतर विचारवंतांच्या खुनाप्रमाणे यांचा खूनही पूर्वनियोजित होता, यात शंका नसावी.
अनेक तथाकथित विचारवंत, आपल्या संस्कृतीत सहिष्णुता ठासून भरलेली असून विचारांचा मुकाबला विचारांनीच करता येतो, अशा भ्रमात असतात व अशा हिंस्त्र वर्तनाच्या प्रसंगी जाणून बुजून मौनव्रत धारण करतात. परंतु दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व आता गौरी लंकेश या शहिदांनी विचारवंतांच्या चिडीचुप्प राहण्याच्या मानसिकतेला धक्का दिला आहे. त्यामुळे आपले मूक राहणे, हे जमातवाद्यांना आणखी अन्याय करण्यास चिथावणी दिल्यासारखे आहे, हे विसरता येत नाही.
गौरी यांची हत्या कुणी केली, यापेक्षा का केली, हा प्रश्न स्वराज्य पक्षाचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र यादव यांनी विचारला आहे. खून कुणी केला, त्यासाठी वापरलेले हत्यार, पूर्वनियोजित योजनेचे तपशील, मदतनीस, त्यामागील सूत्रधार, त्यातून त्यांना मिळणारे राजकीय लाभ इत्यादी गोष्टींचा तपास पोलीस करतीलच; परंतु त्यांचा खून व्हावा म्हणून हिंसेला उत्तेजन देणारे व खुनानंतर त्याचा आनंद साजरे करणारे यांच्याविषयी चर्चा करण्याची जरुरी आहे, असे योगेंद्र यादव यांना वाटते.
प्रवीण बर्दापूरकर या ज्येष्ठ पत्रकाराने अक्षरनामा या ई-फोरममध्ये खालील प्रमाणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे :
“बंगळुरूच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची झालेली हत्या जेवढी मानवतेला काळिमा फासणारी आहे, त्यापेक्षा जास्त काळिमा फासणारं वर्तन त्या हत्येनंतर बहुसंख्य भारतीय समाजाकडून घडलेलं आहे. गौरी यांच्या रक्ताचे डाग सुकण्याआधीच ज्या टोकाच्या विखारी आणि धर्मांध प्रतिक्रिया दोन्ही बाजूंनी उमटल्या आहेत; त्यातून या समाजात सामुदायिक शहाणपण, सहिष्णुता आणि विवेक शिल्लक उरलेला आहे किंवा नाही, असा प्रश्न कुणाही संवेदनशील माणसाला पडावा, अशी ही स्थिती आहे.
या हत्येच्या निमित्तानं प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं आणि त्यावर व्यक्त होणारे कथित बुद्धिवंत, तसेच राजकीय नेत्यांचं वर्तन हे एकारल्या आणि विखारी कर्कश्शपणाचं उदाहरण आहे. ज्यांना (स्वघोषित) उजवे म्हणून संबोधलं जातं, त्यांच्यातील अनेकांनी गौरी यांच्या हत्येचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. गौरी यांची जात काढली, त्यांचा विवाह कोणत्या धर्माच्या पुरुषाशी झालेला होता आणि तो त्यांनी कसा लपवून ठेवला, याचा गौप्यस्फोट करण्यात आला. गौरी यांचा उल्लेख अश्लाघ्य अशा शब्दांत करण्यात आला.
ही हत्या आणि नंतर हे जे काही घडत होतं किंवा घडवून आणलं होतं, त्यातून एखाद्या सुसंस्कृत समाजावर पडलेला डाग म्हणून ज्याची लाज वाटायला हवी, अशा हत्येचा तो मांडलेला किळसवाणा उत्सव भासत होता. अशा नृशंस हत्येचं समर्थन करणारा आणि कोणतीही चौकशी होण्याआधीच बेजबाबदारपणाची सीमा गाठत त्या हत्येची जबाबदारी परस्पर कुणावर तरी ढकलून देणारा हा बहुसंख्य समाज सामुदायिक शहाणपणा, सहिष्णुता आणि विवेक याबाबतीत अश्मयुगापेक्षाही जास्त अप्रगत, असंस्कृत आणि महत्त्वाचं म्हणजे अमानवी असल्याचं मन विदीर्ण करणारं चित्र समोर आलेलं आहे.”
सुज्ञास जास्त सांगणे न लगे!