Categories
संपादकीय

असत्याचे डेरे

ऑक्टोबर – २०१७

दोन महिन्यांपूर्वी राम-रहीमचा सच्चा सौदा डेरा उद्ध्वस्त झाला. एका बहाद्दूर महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत न्यायालयाने आधुनिक असत्य रामाला 20 वर्षांच्या वनवासाला तुरुंगात धाडले. आपल्या देशाच्या तथाकथित महान आध्यात्मिक परंपरेचे राम-रहीम-आसारामांनी धिंडवडे काढले. कोण संत आणि कोण बुवा यांच्यातील फरक या अध्यात्माच्या बाजारात कळेनासा झाला आहे. राम-रहीम प्रकरणातून एक भयचकित स्वरुपाचा अध्यात्माचा काळा बाजार उघड झाला आहे.

संत तुकारामांचा सत्याचे महत्त्व सांगणारा एक प्रसिद्ध अभंग आहे. “सत्य-असत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता॥’’ हजारो लोक जरी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतात म्हणून ते खरं असेलच असं नाही. सत्य काय व असत्य काय हे मी माझ्या विवेकाला म्हणजे मन:शक्तीला प्रश्न विचारूनच आपलं आपण शोधायला हवं. पण बुवांच्या दरबारात पसरवले जाणारे असत्य असं पारखून घेतील ते भक्त कसले? करा करा रे असत्याचा गजर। मग खुशाल धरा बाईचा पदर॥ अशा वातावरणात लोभाचा, मोहाचा, ढोंगाचा, हिंसेचा म्हणजे सगळ्या नैतिक अवमूल्यनाचा बुवांच्या डेर्‍यात वा आश्रमात नंगानाच चालू झाला नाही, तरच नवल.

राम-रहीमसारखे ढोंगी किती प्रकारे असत्याचा बाजार मांडतात, हे जरा नीट समजून घ्यायला हवं. पहिलं महत्त्वाचं असत्य म्हणजे ढोंगी बाबा-बुवा मोह-मायेपासून अलिप्त असतात. आचार्य अत्र्यांनी ‘बुवा तेथे बाया’ हे नाटक लिहून बुवाबाजी स्त्रियांच्या लैंगिक शोषणासाठीच चालते, यावर प्रकाश टाकलाय. बुवांच्या डेर्‍यातील किंवा आश्रमातील गुप्त गुहा याच स्त्री भोगासाठी असतात, हे अनेक बाबांच्या दरबारात उघड झालंय. राम-रहीम अशा स्त्री-भोगातूनच उघडा पडला. त्याचे कन्या मानलेल्या हरिप्रीत नावाच्या नटीशी लैंगिक चाळे चालत. त्याच्या डेर्‍यातील गुहेचा दरवाजा स्त्री-भक्तांच्या वसतिगृहात उघडत होता. तेव्हा बुवा हे मोहमायेचा त्याग करणारे हे असत्य; बुवा हे वासनेचे आगर हेच सत्य.

बुवांचे सत्संग ऐका. ते खड्या सुरात सांगतात, ‘आम्ही भक्ताचे म्हणजे जनांचे लोभी- धनाचे म्हणजे संपत्तीचे नव्हे.’ हे दुसरे धादांत असत्य. संपत्तीसाठीच बुवांचे दरबार भरतात. राम-रहीमच्या डेर्‍याच्या झडतीत नोटांची बंडले, इलेक्ट्रॉनिक साधने, उपभोगाच्या विविध वस्तू, महागड्या मोटारी सापडल्या. रामपाल नावाच्या एका बाबाच्या किल्लास्वरूप डेर्‍यात बंदुका आणि अलिशान गाड्या मिळाल्या. परवाच महाराष्ट्रातील रत्नागिरीजवळ सापडलेला पाटील बाबा तर तासा-तासाला नवनवे पेहराव करून, चेहर्‍याला रंग फासून दरबारात नाचायचा. राधे माँ त्यातलीच. तिच्या फोटोत ओठाला लावलेली लाली कशी खुलून दिसते? आमचे ज्ञानोबा, तुकाराम, रामदास किती साधे वागत होते. ते खरे संत! ढोंगी बुवा-महाराज धनत्यागी हे असत्य. ते धनलोभी हेच सत्य.

पैसा आणि स्त्रिया याचसाठी बुवाबाजी चालते. मग हे हेतू साध्य करण्यासाठी विविध प्रकारच्या असत्याचे मळे ही मंडळी फुलवितात. त्यांच्या या चतुराईला तोड नाही. धर्मातील अवतार कल्पनेचा ही मंडळी कौशल्याने वापर करतात. कुणी कृष्णाचा अवतार घेतो, तर कुणी कबीराचा. राम-रहीम तर हिंदू व मुस्लिम देवांचा अनुयायी बनला. रत्नागिरीचा पाटीलबाबा कलियुगातील स्वामी समर्थांचा अवतार. पण सगळ्यात जास्त आवडता अवतार म्हणजे कृष्णाचा. बहुतेक बाबांना कृष्ण व्हायला आवडते. कारण ‘गेल्या जन्मात तू राधा होतीस व मी कृष्ण’, असं सांगितलं की, समोरची बाई वश करणं सोपं जातं. देवांची इतकी थट्टा जगाच्या पाठीवर करणार्‍यात भारताचा नंबर पहिला असेल.

आमच्या औषधाने कॅन्सर बरा होतो, मधुमेह जातो, हृदय रोगापासून मुक्ती मिळते, असं कॉर्पोरेट बुवामंडळी सांगत सुटतात. भारतातील अनेक कॉर्पोरेट बुवाबाबांच्या औषधाच्या फॅक्टर्‍या आहेत. ही औषधे प्रमाणित नसून त्यापासून धोका संभवतो. पण आमच्या रिसर्च सायंटिस्टनी ही औषधे तपासली आहेत, असं ठोकून देऊन असत्याचा प्रचार ही मंडळी बिनदिक्कत करतात.

काही दिवसांपूर्वी भारतातील आखाडा परिषद या आध्यात्मिक संस्थेने 14 बुवा-बाबांची यादी जाहीर केली आहे. हे ढोंगी बाबा असून त्यांना तुरुंगात टाका अशी त्यांची मागणी आहे. हे वाचून आम्हाला हसू आले. आखाडा परिषदेतील शैव-वैष्णव साधूंच्या मारामारीची आम्हाला आठवण झाली. कुंभमेळा भरवून गोदावरीत डुबकी घेणार्‍या भक्तांना पापविमोचनाचा दिलासा देणे म्हणजे शुद्ध ढोंगबाजी होय. तुकोबांनी अशा कुंभमेळ्याचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. कुसुमाग्रजांनी तर ‘लंगोटीला यांच्या मोत्यांची झालर’ अशा शब्दांत तीव्र उपहास केला आहे. तेव्हा आखाडा परिषदेने ‘कोण बुवा’ याचे मापदंड ठरविण्याचा अधिकार स्वत:कडे घेणे म्हणजे एक नव्या असत्याचा प्रचार करणं होय. कोण बुवा आणि कोण खरे संत याची कसोटी सोपी आहे. स्वत:ला संत म्हणणार्‍यांचे चरित्र तपासा, त्यांचं आचरण पाहा, त्यांचं वर्तन न्याहाळा. यासाठी डोकं वापरा. निर्भय होऊन तक्रारीसाठी पुढं या. धर्मसत्तेवर लोकसत्तेचा व राज्यसत्तेचा वचक हाच बुवाबाजी हटविण्याचा खरा मार्ग होय.