Categories
आंदोलन

विठ्ठल रामजी पुलावरून : ‘जवाब दो’

सप्टेंबर - २०१७

यंदाची 20 ऑगस्टची सकाळ. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना त्यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करायला पुण्याला बालगंधर्व पुलावर भरपावसातही तीनशे-साडेतीनशे लोकांचा जमाव आलेला; तेही कुणाच्या आदेशामुळे नव्हे, तर स्वप्रेरणेनं. थोर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेबाबा आढाव, श्रमिक संघटनेच्या नेत्या मुक्ता मनोहर, सुजाण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अन्य काही मान्यवरांच्या उपस्थितीनं निघणार्‍या मोर्चाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या नेमक्या वेळेला म्हणजे ठीक 7 वाजून 20 मिनिटांनी तीन ठोके वाजवले गेले. पाठोपाठ ‘जवाब दो’ या स्पीकरवर लावलेल्या जोशपूर्ण गीताला सर्वांनी साथ दिली. अण्णा कडलासकर रचित अन् अनिल करवीर यांनी संगीत दिलेलं हे गीत वातावरणनिर्मितीला चांगलंच परिणामकारक होतं.

त्यानंतर प्रथम माननीय बाबा आढाव यांनी मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, “हिंसा ही वरच्या स्तरातच राहिली नसून गोरक्षणाच्या नावाखाली व इतर कारणांनी सामान्यांचीही हिंसा होते आहे. सरकारच दहशतवाद पोसत आहे. अशा परिस्थितीत दाभोलकरांचे विचार जिवंत राहणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज इथे मोठ्या संख्येनं तरुण उपस्थित आहेत, अंनिसचं काम लढवताहेत, हे आशादायी चित्र आहे.”

मुक्ता मनोहर यांनी “श्रमिक हेच अंधश्रद्धांचे मुख्य बळी असतात. त्यामुळे दाभोलकरांचं कार्य श्रमिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं,” अशी भावना व्यक्त केली, तर सोनाली कुलकर्णी या संवेदनशील अभिनेत्रीनं “नरेंद्र दाभोलकरांसारख्या समाजभान असणार्‍या अन् समाजासाठी सदैव शांततेच्या मार्गाने काम करणार्‍या व्यक्तीचा खून व्हावा, ही अत्यंत व्यथित करणारी गोष्ट आहे,” अशी मनोभावना व्यक्त केली. यानंतर घोषणा देत मोर्चा सुरू झाला. पुणे महानगरपालिका, शनिवारवाडा यामार्गे साने गुरुजी स्मारकावर पोचला. तोपर्यंत उपस्थितांची संख्या दोन हजारांच्यावर गेली होती.

पहिल्या सत्राच्या सुरुवातीला श्रीपाल ललवाणी यांनी सर्वांचे स्वागत केले. राजू इनामदार व चाकणच्या गटाने अभिवादन गीत सादर केले. मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्ताविकात, पाऊस असूनही कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. “डॉ. नरेंद्र दाभोलकर हे विवेककारणाबद्दल तरुणांशी बोलायचे. असलेल्या राजकीय परिस्थितीत कसं जुळवून घ्यायचं किंवा व्यक्त व्हायचं, यासाठी ते तरुणांना विवेककारण हा मार्ग सुचवायचे. आज इतक्या संख्येनं सगळे आले, ही मोठी ताकद आहे. ज्याचा खून झालाय, अशा माणसाच्या चळवळीत जायला तरुण उत्सुक असतात, ही उभारी देणारी गोष्ट आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्वत:च्या हयातीतच अविनाश पाटील या तरुण नेतृत्वाच्या हाती आपली अंनिस ही संघटना स्वत: सोपविली होती, तर ‘साधने’च्या संपादकपदाची धुरा विनोद शिरसाठ यांच्या हाती दिली होती,” असे मनोगत व्यक्त करून डॉक्टरांच्या खुनाच्या तपासातील प्रगती आणि चळवळीची वाटचाल, याचा सम्यक आढावा मुक्ताताईंनी घेतला. अमोल पालेकरांच्या पत्नी श्रीमती संध्या गोखले यांनी डॉक्टरांचे विचार मूलभूत पद्धतीनं तरुणांमध्ये रुजले आहेत आणि त्यांची चळवळ निश्चितपणे पुढे जाईलच, असा विश्वास व्यक्त केला.

ज्येष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी अशोक धिवरे यांनी चळवळीच्या इतिहासात ही चळवळ वेगळी म्हणून नोंदली जाईल आणि विवेकाचा विचार जिवंत राहील, अशी ही चळवळ असल्याचे नमूद केले. ज्येष्ठ विचारवंत विद्या बाळ म्हणाल्या की, “आज जणू नव्या स्वातंत्र्यलढ्याला विचार व विवेकाच्या लढाईला सुरुवात करीत आहोत. स्वराज्याइतकेच सुराज्य महत्त्वाचे. त्यामुळे आज आगरकरांचे स्मरण होते. आजही स्त्रीला विशिष्ट परिस्थितीत धार्मिक स्थळी अपवित्र ठरवले जाते. सनातनी विचार ‘ब्रेन वॉशिंग’ने कसे रुजवले जातात, हे श्रीरंग गोडबोले अन् विभावरी देशपांडे यांच्या ‘ध’ या नाटकात प्रभावीपणे दाखवले आहे. तेव्हा विज्ञानवाद आणि विवेक ही शस्त्रे परजूनच आज लढले पाहिजे.” यानंतर सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अमोल पालेकर यांचे भाषण झाले. “सरकार कुठल्याही पक्षाचे असले, तरी त्यांच्यापैकी कोणालाच विवेकी दृष्टीनं विधायक कार्य करण्याची तीव्र इच्छा नसते व तशी ताकदही नसते. इथे स्वत: पंतप्रधानच गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचं उत्तम उदाहरण आहे, असं सांगतात, तर वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजेल? आणि राष्ट्रपती “मुस्लिम व ख्रिश्चन हे परकीय असल्याने त्यांना इथल्या सुविधा देण्याचं कारण नाही,” असं विधान करतात, तर ते सामान्यांना संरक्षण कसे देऊ शकतील? माजी उपराष्ट्रपतींनाही “जिथे सुरक्षित वाटेल, तिथे बेधडकपणे जायला तुम्ही मोकळे आहात,” असे सांगितले जात असेल, तर या देशात उद्विग्न होण्याखेरीज काय करू शकणार? अशा परिस्थितीत आज तुम्ही, मी आणि विशेषत: तरुणांनी प्रकाशकिरणांकडे जाण्याचं कार्य निर्धाराने हाती घ्यायला हवं,” अशी तळमळ अमोल पालेकर यांनी व्यक्त केली.

पुढील सत्रात प्रख्यात कवी, गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर आपल्या भाषणात म्हणाले, “जगात जिथे-जिथे धर्माचे प्राबल्य आहे, त्या-त्या ठिकाणी अन्याय, अत्याचार व हिंसा आहे. आपला देश धर्मनिरपेक्षतेमुळे वेगळा आहे, असे म्हटले जाते. पण आज हीच ओळख पुसट होत चालली आहे. जेव्हा समाजात विषवल्ली पसरू लागते, तेव्हा ती कोणालाच सोडत नाही, हे लक्षात ठेवा. या विषवल्लीपासून देशाला वेळीच वाचवूया. माणूस विज्ञानाचा वापर करतो; पण विचार जुनेच असतात. बहुसंख्य लोक एखादी गोष्ट मानतात म्हणून इतरही त्याला दुजोरा देतात. चुकीची गोष्ट जेव्हा बहुसंख्य करतात, तेव्हा ती चुकीची आहे, हे लक्षातही येत नाही. जिथे प्रश्न विचारायला मुभा नसेल, तो देश, ते वातावरण निकोप कसे म्हणता येईल? समाजजीवन सुरळीत चालावं, यासाठी नियम असतात. त्यात पवित्र-अपवित्र असं मानायचं काही कारण नाही. आपल्या जीवनाचं ध्येय आपण ठरवायला हवं. समाजातल्या अनेकांच्या योगदानानं आपलं जीवन सुखकर झालं आहे. आपणही समाजासाठी काही तरी योगदान दिलं पाहिजे. सर्व धर्म समान असतात. सर्वच धर्मांत काही अन्यायकारी गोष्टी असतात. दूषित संस्कार समाजात पसरले की, त्याचा दुष्परिणाम सर्वांवरच होतो,” असे जावेद अख्तर म्हणाले. त्यांची ‘नया हुकूमनामा’ ही कविताही त्यांनी वाचून दाखविली.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाची प्रत जावेद अख्तर यांना देऊन श्रीमती शैलाताई दाभोलकर यांनी त्यांचा सन्मान केला. यानंतर बोलताना शैलाताई दाभोलकर म्हणाल्या, “डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी शोषितांसाठी काम करायचं निश्चित केलं होतं; पण शोषितांना वर काढायचं, तर त्यांच्या मनातलं अंधश्रद्धांचं तण काढणं आवश्यक आहे, हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यासाठी त्यांनी काम सुरू केलं. मेंदूचा जो भाग वापरात आणला जातो, तो थोडा असतो व त्यातच अंधश्रद्धा असतात. उरलेला भाग वापरला की, ज्ञानाचा उजेड पडेल. डॉक्टरांच्या मृत्यूच्या ठिणगीनं अनेकांचा सदसद्विवेक जागृत झाला आहे.”

यानंतर सुप्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे भाषण झाले. कार्यकर्त्यांची गर्दी पाहून देशात बदल होऊ शकतो, असं वाटल्याचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, “दाभोलकरांचे मारेकरी का सापडत नाहीत, याचा जवाब थेट केंद्र सरकारला विचारायला हवा. दिल्लीतील घटनेची ‘बे्रकिंग न्यूज’ होते; पण अन्यत्र झालेल्या घटनेचे माध्यमांमध्ये पडसाद नसतात. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे कार्य इतके मोठे असूनही दिल्लीत त्यांना फारसं कोणी ओळखत नाही. माध्यमांतूनही तेवढा आवाज उठत नाही. पत्रकार समाजात विष पेरतात; त्यातही हिंदी चॅनेल्स जास्त अंधश्रद्धा पसरवतात. ‘निर्मलबाबा की तिसरी आँख’ ही मालिका स्वत: निर्मलबाबाच स्पॉन्सर करत होते. त्यासाठी रोजचे दोन लाख या हिशोबाने वर्षाला 5 ते 6 कोटी रुपये ते खर्च करत होते. निर्मलबाबा दिल्लीत 15 वर्षांपूर्वी आले. आता त्यांचा पाचशे कोटी रुपयांचा बिझनेस आहे. आसारामबापूंचे गुजरातमध्ये खूप कार्यक्रम होत. सगळे नेते त्यांच्याकडे जात होते. रामदेवबाबांच्या गैरव्यवहारावरचे पुस्तक प्रकाशित करण्यावर तर बंदीच आहे. रविशंकर हे स्पिरिच्युअल गुरू मानले जातात. त्यांनी यमुनेच्या तीरावर धार्मिक कार्यक्रम घेतला अन् पर्यावरणाची हानी केली. विरोधाला जुमानले नाही. रामदेवबाबा व रविशंकर यांच्याबाबत तपासायला व लिहायला कोणी तयार नाही. पैसा व राजकीय पाठबळ हेच यामागचे कारण आहे. आता तर 5-6 धार्मिक चॅनेल्स सुरू होणार, असे कळते. तथाकथित धार्मिक गुरू, राजकारणी आणि पत्रकार यांची साखळी झाल्यामुळे अंधश्रद्धा उघड होत नाहीत. हल्ली लोक ‘मन की बात’ ऐकतात. स्वातंत्र्यलढ्यात अजिबात सहभाग नसणारे लोक आता देशप्रेमी कोण, देशद्रोही कोण हे ठरवतात. आज देशात धर्मगुरूंच्या हातातच सत्ता, राजकारण व व्यवसाय असल्याने संपूर्ण देश तेच चालवत आहेत. मीडियाच्या आत्म्याला आता लोकांनीच जागवलं पाहिजे.”

जावेद अख्तर व राजदीप सरदेसाई यांना अंनिसच्या व्यासपीठावर कधीतरी बोलवण्याची स्वत: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची इच्छा होती, असे सांगून ‘साधने’चे संपादक विनोद शिरसाठ म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलनाची सामाजिक चळवळ आणि ‘साधना’च्या संपादकपदाची पत्रकारिता या दोन्ही महत्त्वपूर्ण आघाड्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी एकाच वेळी अत्यंत यशस्वीरित्या पेलल्या. गेल्या 25 वर्षांत उघड शोषण न करता आधुनिक अध्यात्म सांगणारे गुरू वाढले आणि मध्यमवर्ग चळवळीत येण्याऐवजी या आधुनिक अध्यात्माकडे वळला.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ 25 वर्षांहून अधिक काळ चालू आहे. तशी चळवळ अन्यत्र झाली नाही. डॉ. दाभोलकरांची 12 पुस्तकं या कार्यासंदर्भात आहेत. तशी अन्य भाषेत नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन हे राष्ट्रीय स्तरावरचे आव्हान आहे. प्रसारमाध्यमाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. संविधानात तीनच स्तंभ आहेत. त्यांना राज्यघटनेच्या चौकटीत काम करावे लागते. या तीन स्तंभावर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रसारमाध्यमं व चळवळी करत असतात.”

महाराष्ट्र अंनिसचं दुसरं सूत्र वैज्ञानिक दृष्टिकोन हे असून त्या दृष्टीनं 21 ऑगस्टलाच ‘साधने’चा विशेषांक निघणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. डॉ. दाभोलकरांच्या एकंदर 800 पानांच्या लिखाणाच्या युनिकोड ब्लॉगचे लोकार्पण राजदीप सरदेसाई यांनी केले. यानंतर सचिन गोस्वामी लिखित व सचिन मोरे दिग्दर्शित एक नाटिका योगेश शिरसाठ यांनी सादर केली. नंतरचे सत्र ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या विषयावर होते. प्रथम विजय केंकरे बोलले. ते म्हणाले की, “हल्ली तरुणांना हिंसेचं काही वाटेनासंच झालं आहे. काही गोष्टी पद्धतशीरपणे केल्या जात आहेत. नथुरामचा हिरो बनवला जातोय. गणेशोत्सव, शिवजयंतीसारख्या उत्सवात लोकांना जास्तीत जास्त गुंगवून सध्याचे प्रश्न जाणवूच द्यायचे नाहीत, तसेच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवून विचारवंतांच्या हत्येच्या विषयापासून लक्ष विचलित करायचे, असे प्रयत्न चालू आहेत.” यानंतर त्यांनी सबा नक्वी लिखित, प्रमोद मुजुमदार यांनी अनुवादित केलेल्या ‘सलोख्याचे प्रदेश’ पुस्तकातील हिंदू-मुस्लिम संबंधांबाबत वर्णनाचे वाचन केले.

पत्रकार अरविंद जगताप यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावरील ‘जवाब दो’ या अप्रतिम कवितेचे वाचन केले. सुप्रसिद्ध कवी किशोर कदम यांनी ‘पेशावर’ ही मुलांवर झालेल्या निष्ठूर गोळीबारावरची मन हेलावणारी कविता, तसेच ‘दहशत’ व ‘मर्डर’ या कवितांचे वाचन केले.

शेवटच्या सत्रात प्रथम श्रीमती मेधा पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यक्तीचा स्मृतिदिन हा त्या व्यक्तीच्या विचारांचा जागरदिन असतो, असे सांगून नवीन पिढीतील पाकबद्दलच्या वाढत्या द्वेषभावनेबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. “खुनी सापडतील अथवा नाही; पण आपण विवेकी मार्गानं प्रतिवाद करत आहोत. देशपातळीवरील प्रतिनिधींना, शासनसंस्थेला जाब विचारत राहिले पाहिजे. इतर अनोख्या प्रांतातही आता आम्हाला बोलावतात. हे चांगलं नेटवर्क तयार होत आहे.” असे मेधा पानसरे म्हणाल्या. यानंतर हमीद दाभोलकरांचे मनोगत व्यक्त झाले. ते म्हणाले की, “या चळवळीतून काहीही व्यक्तिगत फायदा नसूनही इतके लोक जोडले जात आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर असं म्हणायचे की, हे सगळे विचार असणारेच लोक आहेत. मी फक्त त्यांना एकत्र बांधण्याचं काम करत आहे.” आज त्यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्रात सव्वाशे ते दीडशे ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम घेतले जात आहेत. या चळवळीचे लढे हे संविधानाच्या चौकटीत आणि अहिंसक पद्धतीनंच लढवले जातात.

पाऊस असूनही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल डॉ. हमीद यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. पुढील काळात केवळ अंधश्रद्धांविरुद्धच नाही, तर ‘विवेकी’ समाजनिर्मितीसाठी आवश्यक ते ते समिती करेल, याचाही उच्चार त्यांनी केला.

काही सत्रांच्या मध्यंतरात राजू इनामदार व इतर कार्यकर्त्यांची गाणी झाली. अतुल पेठे, श्रीपाल ललवाणी, मिलिंद देशमुख, बुरांडे यांनी वेगवेगळ्या सत्रांचे सूत्रसंचालन केले.

शेवटी सर्व उपस्थितांनी हातात हात घालून म्हटलेल्या ‘हम होंगे कामयाब’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. दिवसभर मिळालेल्या सकस विचारांची ठेव घेऊन, नवी प्रेरणा व उमेद घेऊन सारेजण परतले.

सुनीला बुद्धिसागर