महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि दिल्ली अंधविश्वास उन्मूलन समिती यांच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित असुरक्षितता, असहिष्णुतेच्या परिस्थितीला आणि अवैज्ञानिक भूमिका घेतलेल्या सरकारने जवाब देण्यासाठी जाहीर चर्चासत्राचे आयोजन कॉनस्टिट्यूशन हॉल, नवी दिल्ली येथे नुकतेच करण्यात आले होते. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन, साहित्यिक क्षेत्रातील प्रवक्तेपण करणार्या वक्त्यांची भाषणे महाराष्ट्र अंनिसचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. त्यामध्ये माकपचे सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी, भाकपचे ज्येष्ठ नेते खासदार डी. राजा, बंधुवा मुक्ती मोर्चाचे आर्य समाजी स्वामी अग्निवेश, शास्त्रज्ञ गौहर रझा, प्रागतिक लेखक संघाच्या गीथा हरिहरन, राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मनोज झा आणि दिल्ली विश्वविद्यालयातील अभ्यासक प्रा अपूर्वानंद आदींचा समावेश होता.
‘भारताच्या विविधेतील एकतेच्या वास्तवाला बदलवून एक धर्म, एक भाषा, एक पक्ष आणि एक नेता या दिशेने केले जाणारे प्रयत्न धोकादायक ठरत आहेत. त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील व सर्व क्षेत्रातील संवेदनशील नागरिकांना एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करावा लागेल,’ असे प्रतिपादन याप्रसंगी कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी केले. ‘देशाच्या राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना कदाचित सुरक्षितता उपलब्ध असेल; परंतु सर्वसामान्य जनतेला देशात सुरक्षित वातावरणात आपण जगू शकत नाही, असे वाटते आहे. या वाढत्या भयग्रस्त मानसिकतेला सरकार आणि त्यांच्या विचारधारांचे प्रतिनिधित्व करणार्या संघटनांचे प्रमुख लोक कारणीभूत आहेत,’ असे विश्लेषण ज्येष्ठ खासदार कॉम्रेड डी. राजा यांनी व्यक्त केले. नवभारताच्या उभारणीमध्ये जातिविहीन व वर्गविहीन समाजनिर्मितीसाठी संवैधानिक मूल्यांवर आधारित कृती कार्यक्रम करीत राहणे हाच यावरील मार्ग असू शकेल,’ असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
आर्य समाजी स्वामी अग्निवेश यांनी याप्रसंगी बोलताना आपल्या देशातील वर्णाधिष्ठित जातिव्यवस्थेमुळे होणार्या शोषणाचा पुरस्कार आजच्या सरकारमधील नेतृत्व करणारे पक्ष, संघटना करीत आहेत, असा आरोप केला. तसेच शास्त्रज्ञ गौहर रझा यांनी सांगितले की, भारताप्रमाणेच बांगलादेशात 12 व पाकिस्तानात 6 विवेकवाद्यांची हत्या करण्यात आली, तेथील आरोपींना शिक्षा देखील झाली. परंतु भारतातील विवेकवाद्यांचे खुनी अजूनही मोकाटच आहेत. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विज्ञानाची मंदिरे उभारण्याची पायाभरणी केली, परंतु आताच्या सरकारातील नेतृत्व अंधश्रद्धेच्या बाजाराला बढावा देत आहे. वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रातील संस्थांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत. त्यामुळे आपला देश जगाच्या स्पर्धेत मागे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रागतिक लेखक संघाच्या गीथा हरिहरन यांनी देशातील दोन पातळ्यांवरील वास्तवाचा वेध घेतला. त्यामध्ये एका बाजूला लेखक, कवी, साहित्यिक, इतिहासकार यांसह संगीत, कला व चित्रपट क्षेत्रातील निर्माता, कलावंतांची होणारी मुस्कटदाबी व वाढता हस्तक्षेप नवनिर्मिती आणि सृजनासाठी घातक ठरत असल्याचे सांगितले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हे या स्वातंत्र्याच्या संकोचाविरोधात समाजमन तयार करीत असल्यामुळे त्यांच्या विरोधात कट रचून त्यांना जीवे मारण्यात आले. राष्ट्रीय जनता दलाचे महेश झा यांनी सद्य:स्थितीत देशापुढील आव्हानांचा पट मांडला. आपल्याकडे ऐतिहासिकता व पौराणिकता यांची सांगड घालून सर्वसामान्यांचा बुद्धिभेद केला जात आहे. केवळ आभासी व भावनिक मुद्द्यांचा वापर करून उन्मादी परिस्थिती निर्माण करण्याचा व त्यातून जगण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न नाकारण्याचा डाव रचला गेला आहे. दिल्ली विश्वविद्यालयातील अभ्यासक प्रा. अपूर्वानंद यांनी धार्मिकतेच्या आधारावर निर्माण केल्या गेलेल्या संकल्पना व श्रद्धा आणि भौतिक जगातील प्रश्नांच्या निराकरणासाठी निर्माण केल्या गेलेल्या व्यवस्था यांचा परस्परांशी संबंध जोडून परिवर्तनाचा आभास तयार केला जात आहे, असे सांगितले. ही मूर्खपणाची व अवास्तव, अतार्किक करणारी विचारपद्धती समाजामध्ये रूढ करण्याच्या प्रयत्नांना मिळत असलेले यश अत्यंत धोकादायक वास्तवाचे निदर्शक ठरत आहे, असे निदान केले.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी असलेले महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी अंधश्रध्दा निर्मूलनापासून सुरू झालेली आमची लढाई विवेकी समाज निर्मितीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगितले. त्यामधील एका बाजूला चमत्कार, भूत, आत्मा, पुनर्जन्म यासारख्या कपोलकल्पित संकल्पनांना आव्हान देण्याचे काम करीत राहावे लागणार आहे. त्याचवेळी देशातील भयमुक्त वातावरणनिर्मितीसाठी आणि संवैधानिक व्यवस्था व भारतीय नागरिकत्वाच्या जबाबदारीचे सक्षमीकरण करण्याचे प्रयत्न देखील करावे लागणार आहेत, असे आम्ही मानतो. त्यामुळे दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खुनानंतरही ‘माणूस मारल्यानंतरही विचार मरत नाहीत’, हे आम्ही कृतीतून गेल्या चार वर्षांत सिद्ध केले आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 4 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित 20 जुलै ते 20 ऑगस्टदरम्यान झालेल्या ‘जवाब दो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारताची राजधानी दिल्ली येथे विविध निषेध कार्यक्रमांसह जाहीर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या संयोजनासाठी अनहद संस्थेच्या प्रमुख शबनम हाशमी, प्रतापकुमार यांच्या सहकार्याने आणि दिल्ली अंधविश्वास उन्मूलन समितीचे डॉ. अमिताभ बसू, आर. एम. मौला, असिफ इक्बाल, सत्यवान आणि इतर समविचारींचे सहकार्य लाभले. चर्चासत्राआधी महाराष्ट्र अंनिसच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने चळवळीच्या गीतांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये गायक विजय नांगरे, वादक सुनील जाधव, अवधूत कांबळे, नीलेश कुडाळकर आणि संजय बनसोडे यांचा सहभाग होता. सर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रमोद गंगणमाले यांनी केले, सूत्रसंचालन प्रधान सचिव माधव बावगे यांनी केले, तर चर्चासत्राचे संयोजन आणि आभार राज्य सरचिटणीस शहाजी भोसले व कृष्णा चांदगुडे यांनी मानले.
– शहाजी भोसले