Categories
आंदोलन

सोशल मीडियावर ‘जवाब दो’

सप्टेंबर - २०१७

संपूर्ण काळी पार्श्वभूमी आणि त्यावर बंदुकीच्या गोळीभोवती पसरलेले लाल रक्ताचे थारोळे आणि त्याच लाल रंगात लिहिलेल्या ओळी-

सुधारकांचे खुलेआम मुडदे पाडती ते

हिशोब त्या रक्ताचा मांडणार केव्हा?’

या भेदक ओळी थेट सवाल विचारणार्‍या आहेत. हा सवाल एकाच वेळी समाजाला आणि शासनाला विचारलेला आहे. अशा एक-दोन नव्हे तब्बल तीसहून अधिक इमेजेस गेला महिनाभर महाराष्ट्रभर एकच सवाल विचारत होत्या ‘जवाब दो’. ‘दाभोलकरांचे खुनी पकडणार केव्हा? ‘जवाब दो.’ याच इमेजेसच्या इंग्रजी, हिंदी, कन्नड, मल्याळम आवृत्त्याही देशभर व्हायरल झाल्या.

निमित्त होते मअंनिसच्या ‘जवाब दो’ आंदोलनाचे. पण खरे तर ही तरुणाईच्या मनात गेल्या चार वर्षांत साचलेली खदखद होती. मनात साचलेला राग होता. तो राग हातात दगड घेऊन व्यक्त करण्यापेक्षा नवनिर्मितीतून व्यक्त केला गेला, इतकेच. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुन्यांचा तपास चार वर्षांनंतरही पूर्ण होत नाही, उलट डॉ. दाभोलकरांच्या नंतर कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांचाही त्याच पद्धतीने खून केला जातो, आणि त्यांच्याही खुनाचा तपास त्याच संथ गतीने होतो, ही गोष्ट खूपच वेदनादायी आहे. ही वेदना गेल्या चार वर्षांत अंनिसने विधायक मार्गानेच व्यक्त केली. चार वर्षे होऊनही खुनी आणि खुनाचे सूत्रधार पकडले गेले नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी मअंनिसने ‘जवाब दो’ आंदोलन 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2017 या कालावधीत केले. प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन राबवावयाच्या उपक्रमांची रेलचेल होतीच. पण त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये सुद्धा महिनाभर हे आंदोलन चालवायचे, असे अंनिसच्या सोशल मिडिया व्यवस्थापन विभागाने ठरवले. या विभागाचा सहकार्यवाह विनायक होगाडे याने दररोज एक इमेज सोशल मीडियामध्ये प्रसारित करायची, अशी कल्पना मांडली आणि त्याची सर्व जबाबदारी स्वतः स्वीकारली. त्याने विद्याधर कांबळे या मित्राच्या मदतीने अतिशय छान इमेजेस बनवून घेतल्या. या इमेजबरोबर JawabDo असा हॅशटॅग वापरण्याची कल्पना देखील विनायकचीच. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुणांचा एक गट तयार केला. त्यांना त्याबद्दलची सर्व कल्पना दिली. सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आणि 20 जुलैपासून सुरू झाला रोज एक सवाल! अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा!!, धूर्त शोषकांच्या ओठी घोष संस्कृतीचा, चूड इथे या ढोंगाला लागणार केव्हा?’ सुरेश भटांच्या काव्यपंक्तींच्या धर्तीवर विचारलेले प्रश्न आणि सोबत JawabDo हा हॅशटॅग. या सगळ्याचा मनावर प्रभाव पडल्याशिवाय राहत नव्हता. ट्विटर, फेसबुक, whatsapp, इंस्टाग्राम, जिथे-जिथे शक्य आहे तिथे-तिथे या इमेजेस हॅशटॅगसहित ‘पोस्ट’ केल्या गेल्या. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर ज्या-ज्या ठिकाणी हे आंदोलन केले गेले त्या-त्या सर्व ठिकाणी या इमेजेस वापरल्या गेल्या.

हे महाराष्ट्रात चालू असतानाच आपली युवा कार्यकर्ती अनन्या कडले ही अन्य राज्यांतील विवेकवादी संघटना आणि व्यक्तींना अंनिसच्या ‘जवाब दो’ आंदोलनाची आणि सोशल मीडिया कॅम्पेनची माहिती देत होती. तिच्या या संपर्कामुळे कर्नाटकातील साथींनी चालवलेल्या ‘I am Kalburgi’ या फेसबुक पेजने या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला. तशी त्यांनी प्रेसनोटही काढली. त्यांनी आपण तयार केलेल्या इमेजेस कन्नडमध्ये रुपांतरित करून घेतल्या आणि सोशल मीडियातून त्या प्रसारित करायला सुरुवात केली. याच पद्धतीने Atheist Kerala, तर्कशील सोसायटी, लोकायत, निर्मुक्ता, Science and Superstitions, Indian Atheist, जीवनात मला संघर्ष करायचा आहे, पटलं तर बघा, इत्यादी फेसबुक पेजनी या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला. शेवटी-शेवटी तर देशभरातील सेलिब्रिटी या कॅम्पेनमध्ये उतरले. अंजली दमानिया, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेते अतुल कुलकर्णी, राजदीप सरदेसाई, सुप्रिया सुळे, रामचंद्र गुहा, अरविंद जगताप, सुभाष वारे, विश्वंभर चौधरी, निखील वागळे, सीताराम येचुरी अशा कितीतरी मान्यवरांनी यामध्ये सहभाग घेतला. याचबरोबर कित्येक सामान्य लोकसुद्धा यामध्ये उतरले. याचा परिणाम म्हणून 20 ऑगस्टच्या संध्याकाळी गरुरल Jawab Do ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला. त्यामुळे या आंदोलनाचा सोशल मीडियामधून 98 लाख लोकांपर्यंत प्रसार झाल्याचे तांत्रिक विश्लेषणावरून समजते. सोशल मीडिया व्यवस्थापन विभागाचे सहकार्यवाह सुयश तोष्णीवाल यांनी ट्विटर ट्रेंडची संपूर्ण माहिती मिळवून त्यादृष्टीने नियोजन व कार्यवाही केल्यामुळे हे काम सोपे झाले.

दत्ता घुटूकडे या तरुण कार्यकर्त्याने केलेल्या कविता आणि हर्षल जाधव याने तयार केलेले डॉ. दाभोलकरांचे छोटे व्हिडीओ दररोज व्हायरल होत होते. अंनिसचे कार्यकर्ते हे छोटे व्हिडीओ आपले whatsapp status म्हणून ठेवत होते. या कॅम्पेनला वेगळ्या उंचीवर पोचवले ते अनिल करवीर आणि अण्णा कडलासकर या जोडगोळीने. अनिल करवीर यांनी ‘जवाब दो’ आंदोलनासाठी तयार केलेले प्रोफाईल फोटो 20 जुलैपूर्वीच व्हायरल झाले होते. तसेच त्यांनी एक छान व्हिडीओसुद्धा बनवला होता. परंतु त्यानंतर त्यांनी तयार केलेले ‘जवाब दो’ हे theme song खूपच व्हायरल झाले. अण्णा कडलासकर यांचे गीत आणि अनिल करवीर यांचे संगीत अप्रतिम होते. अनेक कार्यकर्त्यांनी हे गाणे आपल्या मोबाईलवर रिंगटोनसाठी ‘सेट’ केले. 20 ऑगस्टला ‘जय महाराष्ट्र’ या वाहिनीने सकाळपासून अधूनमधून वाजवणे चालू ठेवले होते. विशेष म्हणजे या वाहिनीने सोशल मीडियातील कॅम्पेनला सुद्धा खूप सहकार्य केले.

मीडियाकडून दखल सोशल मीडियातील या मोहिमेची प्रसारमाध्यमांकडून चांगल्या प्रकारे दखल घेतली गेली. पुण्य नगरी, द हिंदू, महाराष्ट्र टाईम्स, ABP माझा पोर्टल, महाव्हॉईस पोर्टल, जय महाराष्ट्र चॅनेल इत्यादींनी सोशल मीडियातील या मोहिमेची दखल घेतली. या माध्यमांनी अंनिसच्या इमेजेस आणि त्यातील वाक्ये, हॅशटॅग लोकांपर्यंत पोचवले.

या मोहिमेसाठी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हमीद दाभोलकर, कृष्णात कोरे, विनायक सावळे, मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर यांच्याशी वेळोवेळी केलेली चर्चा आणि त्यांच्या सूचना, मार्गदर्शन या गोष्टी खूप उपयोगी पडल्या. या मोहिमेसाठी अंनिस आणि समविचारी संघटनांच्या तरुणांबरोबरच जे कोणत्याही संघटनेशी संबंधित नाहीत, अशा सर्वसामान्य लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान दिले. परंतु शासन स्तरावरून याबाबतीत एका शब्दाचीही प्रतिक्रिया आली नाही, याचे दुःख वाटते. आंदोलनाने महाराष्ट्र ढवळून निघाला तरी शासनाचा एकही मंत्री याबद्दल बोलला नाही. यावरून जनतेने काय समजायचे? शासनाला आरोपी पकडायचे आहेत का? हा प्रश्न मनात तसाच राहिला आहे.

वाघेश साळुंखे

कार्यवाह, सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग.