Categories
व्यक्तिविशेष

र. धों. कर्वे यांचे बुद्धिवादी विचार

मे - २०१७

र. धों. कर्वे यांच्या समग्र वाङ्मयाचे संपादन करणारे प्रा. अनंत देशमुख यांनी खास अंनिवा वाचकांसाठी र. धों. कर्वे यांच्या वैचारिक भूमिकेची मांडणी या लेखात केली आहे.

माणसाला मन आणि बुद्धी या दोन शक्ती जन्मत:च असतात. मन तसे चंचल असते. त्यात क्षणाक्षणाला असंख्य भावलहरी उमटत असतात. भाव, भावना, भावनात्मक तरंग, विकारवशता हे मनाशी संबंधित असे शब्द. सर्वसामान्य माणूस भावनेच्या प्रवाहात वाहत जातो. मनावर नेहमी बुद्धीचा किंवा विवेकाचा अंकुश असावा लागतो. व्यक्तीच्या कह्यात मन नसले, तर ते सहजच विकारांच्या आहारी जाते. आपले संतुलन हरवते.

मूल जन्मल्यानंतर त्याची अनुभवग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू होते. पूर्वानुभव, निरीक्षण, वाचन, व्यासंग यातून त्याची ज्ञानग्रहणाची शक्ती विकास पावते. म्हणून प्रत्यही त्याच्या बुद्धीची वाढ होत जाते. तिला सत्याचे आणि तर्काचे कोंदण मिळाले, तर त्याच्या व्यक्तित्वाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. मात्र इथे एक चकवा असतो. काहींचा स्वभाव दुसर्‍यांच्या म्हणण्यावर, आज्ञांवर वा विचारांवर चटकन विश्वास ठेवणारा असतो. अशा व्यक्ती श्रद्धावान असतात. परमताची झापडे त्या चटकन स्वीकारतात. उलट काही व्यक्ती स्वमताला प्रमाण मानतात. त्या आपल्या बुद्धीला जे पटेल, तिच्या सत्याच्या कसोटीवर जे उतरेल त्यालाच ठाम चिकटून राहतात. त्या सत्याला, विज्ञानाला, चिवट तर्कधारेला प्रमाण मानतात, त्यांचा विवेकाचा पाया मजबूत असतो.

ज्या व्यक्तींच्या व्यक्तित्वावर बुद्धीपेक्षा भावनांचा पगडा अधिक असतो त्यांचा कौल अर्थातच, भावनाशिलतेकडे असतो. भावलहरी, वैषयिकता, विकारवशता यांच्यापुढेे अशा व्यक्ती काहीशा भाबड्या असतात. एखाद्या घटनेचा, विचाराचा त्या सर्वांगाने मागोवा घेऊ शकत नाहीत. त्यांना दुसर्‍याने सांगितलेले सहज पटते. मनाने तशा त्या कमकुवत असतात आणि त्या वृत्तीने बेडर असण्यापेक्षा भित्र्या असतात. अशा व्यक्ती धर्माच्या, श्रद्धांच्या मागे सहज जातात. ‘बाबा वाक्यं प्राधान्यम्’ अशी त्यांची वृत्ती असते. समाजातील बहुसंख्य व्यक्ती या प्रकारात मोडतात आणि या सर्व प्रकृतीच्या लोकांना बरोबर घेऊन समाज पुढे जात असतो. मात्र विवेकी, बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तींच्या विचारांचा आणि कृतीचा अंकुश समाजमनावर असल्याने त्या समाजात नेहमी वैचारिक मंथन होत जाते. बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तींची म्हणूनच समाजाला वेळोवेळी गरज असते.

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत एकोणिसाव्या शतकातील महात्मा ज्योतिराव फुले, लोकहितवादी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, ‘सुधारक’कर्ते आगरकर इत्यादींनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यातही आगरकरांना अवघे 39 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यात त्यांनी एम.ए. झाल्यावर तत्कालीन अनेक विषयांवर लेखन केले. मील्ल, स्पेन्सर यासारख्या पाश्चात्य विचारवंतांचे विचार त्यांनी अभ्यासले. ‘आधी सामाजिक की राजकीय?’ हा वाद तेव्हा सुरू झाला आणि राजकीय स्वातंत्र्याचा विचार पुढे आला. सामाजिक विषमता जावी, शिक्षणप्रसार व्हावा, स्त्री स्वातंत्र्यासंबंधीचा दृष्टिकोन विकसित व्हावा, हे लोकमान्य टिळकांनाही मान्य होते. परंतु समाज मंदगतीने प्रगती करत असतो, तेव्हा बहुसंख्यांचे जे मत असेल, त्याला शक्यतो दुखवायचे नाही. सामाजिक प्रगती हळूहळू होईल, असे त्यांचे म्हणणे होते. उलट आगरकरांचे होते. ‘इष्ट ते बोलणार…’ ही त्यांची वृत्ती राहिली. त्यांनी स्वमताला प्राधान्य दिले, बुद्धिवादाची कास धरली. त्यांचे विचार, त्यांचे लेखन म्हणूनच बुद्धिप्रामाण्यवादी राहिले. महाराष्ट्रातील ‘पहिले बुद्धिप्रामाण्यवादी’ म्हणून आगरकरांचा सार्थ उल्लेख पुढीलांनी केला.

आगरकरांच्या काळातच महात्मा फुले यांचा ‘सत्यशोधक समाज’ सुरू झाला होता. त्या आधीच महाराष्ट्रात ‘प्रार्थना समाज’, ‘ब्राह्मोसमाज’ कार्यान्वित होते. लोकमान्यांचा सनातनी वर्ग कृतिशील होता, चिपळूणकरांपासून टिळक-आगरकर-धोंडो केशव कर्वे आदी मंडळींनी शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले होते. कर्वे यांचे विधवांच्या आणि स्त्री शिक्षणाच्या संदर्भातले कार्य लक्षवेधी ठरले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांचे ‘डिप्रेस्ड क्लास’संबंधी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ‘रयत शिक्षण संस्थां’चे कार्य मोलाचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलित वर्गाविषयीचे कार्य आकाराला येत होते. त्या काळात महाराष्ट्रीय जीवनाचे वेगवेगळ्या क्षेत्रात लोकोत्तर व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्नशील होत्या. डॉ. केतकर समाजमनस्क विचारांचे होते; पण ‘ज्ञानकोशा’च्या निर्मितीत गुंतले होते.

या पार्श्वभूमीवर रघुनाथ धोंडो कर्वे यांचे कार्य नजरेत भरल्याशिवाय राहत नाही.

रघुनाथरावांनी संततीनियमन, लोकसंख्येचा प्रश्न, गुप्तरोग चिकित्सा यासारख्या विषयांना हात घातला होता. त्याकरिता त्यांनी पुस्तकेही लिहून प्रसिद्ध केली होती; पण 1927 साली त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ मासिक सुरू केले. त्यातून अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन सातत्याने प्रसिद्ध केले. पुढे 1930 ते 1940 च्या दशकात ‘रीझन’ या बुद्धिवादी विचारांच्या मंडळींनी चालविलेल्या नियतकालिकामधून वेगवेगळ्या भूमिकांतून म्हणजे कधी निबंध स्पर्धेत सहभागी होऊन, कधी पत्रलेखन करून, कधी स्वतंत्र लेख लिहून वा संपादक म्हणून सातत्याने इतर विषयांबरोबरच ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या विषयावर लेखन केले आहे. त्यांच्या या लेखनाच्या आधारे ‘बुद्धिप्रामाण्यवादा’संबंधी त्यांची भूमिका समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

अगदी सुरुवातीला त्यांनी ‘माझे जीवनाविषयक तत्त्वज्ञान’ नावाचा एक परिच्छेद लिहिला आहे, तो लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ते लिहितात, “स्वर्ग, नरक, ईश्वर, आत्मा वगैरे मी मानीत नाही; तेव्हा ऐहिक सुखालाच मी किंमत देतो. पण हे सुख कशाने मिळते? पैशाने अनेक इष्ट वस्तू मिळतात, अडचणी दूर होतात; परंतु तेवढ्यानेच मनुष्य सुखी होत नाही. सुखाचे एकमेव साधन म्हणजे पूर्ण मन:शांती. याकरिता स्वत:च्या मतानेच स्वत:ची किंमत कमी होईल, अशा गोष्टी करू नयेत, ती वाढेल अशा कराव्यात; मग लोकमताची पर्वा (शक्य तोवर) करू नये. पश्चाताप होईल, असे करू नये; पण तसा प्रसंग आलाच तर अपरिहार्य गतगोष्टींचा शोकही करीत बसू नये.”

या समग्र परिच्छेदात एका बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीचे विचार आणि आचरण प्रतीत झाले, असे म्हणता येते. ते स्वत: स्वर्ग, नरक, ईश्वर, आत्मा वगैरे मानीत नव्हते; ते स्वत:ला प्रमाण मानीत होते. एखाद्या गोष्टीपुढे स्वत:ची किंमत कमी होईल, असे वर्तन झाले, तर त्याचा शोकही करायचा नाही, हे सारे बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीचे वर्णन. रघुनाथरावांचे विचार आणि आचरण यात मुळातच विलक्षण ऐक्य होते. रघुनाथरावांचे हे विचार (1) माझ्या जीवनात धर्मांना, श्रद्धांना थारा नाही (2) स्वत:वर जबरदस्त विश्वास (3) परमत न जुमानणे आणि (4) स्वत:ची किंमत यदा कदाचित कमी झाली, अशी पाळी आली, तर शोक न करणे या चतु:सूत्रीवर आधारलेली आहे.

रघुनाथरावांचा विषय गणित होता; पण ते लैंगिक विषयाकडे वळले. याचे कारण त्यांनी ह. वि. देसाई नावाच्या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे आणि ते म्हणजे या विषयावर चर्चा करायला लोक घाबरतात, आपण नाही, असे होते.

‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा त्यांचा अतिशय जवळचा विषय होता. मात्र या विषयाचा सविस्तर आणि सूक्ष्म विचार एकत्र व्यक्त होईल, अशी ग्रंथरचना करावी, असे त्यांना वाटले नाही. तरीही या विषयावरील त्यांचे ठिकठिकाणी विखुरलेले लेख ‘समाजस्वास्थ्या’तील निवडक लेख’, ‘असंग्रहित र. धों. कर्वे’आणि ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ (अनुवाद : प्रा. मधुकर तोरडमल) यामध्ये स्वतंत्र स्तबकांमधून मांडणी करून मी दाखविले आहेत. ते मुळातून पाहण्यासारखे आहेत.

“बुद्धिप्रामाण्यवाद’ हा जगाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे आणि तो जगातील कोणत्याही गोष्टीला लावता येतो. बुद्धिप्रामाण्यवादी असे म्हणतो की, दुसर्‍या कोणाच्याही मताला, कोणत्याही बाबावाक्याला न जुमानता केवळ स्वत:च्या बुद्धीच्या सहाय्याने सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करण्याचा मला हक्क आहे… बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकच असेल असे नाही, तो ईश्वरवादी देखील असू शकेल. पण त्याने आपले मत दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्न करू नये. कारण स्वत:चे मत बनविण्याचा दुसर्‍याचा हक्कदेखील त्याने मानला पाहिजे. त्याने पाहिजे, तर स्वत:च्या मताच्या सत्यतेबद्दल युक्तिवादाने दुसर्‍याची खात्री करण्याचा प्रयत्न करावा…’

बुद्धिप्रामाण्यवादी माणूस सत्यता, पुरावे, वस्तुनिष्ठता आणि तार्किक मीमांसा यावर भर देणारा असतो. स्वाभाविकच स्वप्नरंजित, काव्यात्म आणि अतिशयोक्त बाबींसंबंधात त्याच्या मनात तीव्र स्वरुपाची अप्रीती असते. या संबंधातील बुद्धिवाद्यांची भूमिका स्पष्ट करताना रघुनाथराव लिहितात, ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा मोठा शत्रू म्हणजे धर्म होय आणि म्हणून बुद्धिप्रामाण्यवाद्यांची सर्व शक्ती आजपर्यंत धर्मगुंडांच्या अरेरावीविरुद्ध झगडण्याकडे आणि युक्तिवादाने त्यांच्या चुका दाखवण्याकडे खर्च झालेली आहे.’ रघुनाथरावांनी हा लेख ‘समाजस्वास्थ्य’च्या जुलै 1938 च्या अंकात लिहिला असला, तरी ते इथे जणू गतजीवनातला स्वत:चाच अनुभव कथन करीत आहेत, असे वाटते. ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाच्या सप्टेंबर 1931 च्या अंकात ‘व्यभिचाराचा प्रश्न’ हा लेख त्यांनी लिहिला. त्यात त्यांनी लिहिले, ‘हिंदू धर्माचे सार भगवद्गीतेत आहे, असे म्हणतात. या ग्रंथाचा प्रणेता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण…’ यात श्रीकृष्णाचे त्यांनी केलेले वर्णन वाचून त्यांच्यावर अश्लीलतेच्या आरोपाखाली खटला झाला.

बुद्धिप्रामाण्यवाद्यांना समाजामधील अंधश्रद्धा स्पष्ट व्हाव्यात असे वाटते. मुळात भारतीय संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीने विखुरलेली आहे. तिच्यातील हे विखुरलेपण जावे, तिच्यात ऐक्य निर्माण व्हावे, ही बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीची भूमिका असते. या संदर्भात ते लिहितात, ‘भारतीयांमध्ये भेदभाव पसरवणार्‍या जात, पंथ, धर्म, वेश, अन्न वगैरे कलहबीजांना राष्ट्रभक्तांनी आणि बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे. सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे धर्म, जात आणि पंथ यांचा समूळ नायनाट करणे हाच होय.”

इतिहास, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मार्क्सवाद, गूढविद्या वा परलोकविद्या यांच्या संबंधात त्यांनी आपले विचार पुन:पुन्हा मांडले आहेत. त्या काळात महाराष्ट्रात उपासनी महाराज, मेहरबाबा, पाचलेगावकर महाराज आणि साकोरीचे महाराज हे विद्यमान होते आणि त्यांच्या संबंधात वृत्तपत्रात नेहमी काही ना काही लिहून येत असे. रघुनाथरावांना मग राहवत नसे. मग त्यांच्यावर ते कठोरपणे टीका करीत. या काळात महादेवशास्त्री दिवेकर यांनी ‘किर्लोस्कर’ मासिकातून लेेखन केले होते.

वि. दा. ऋषी नावाचे एक गृहस्थ त्या काळात ‘संमोहन विद्या’, ‘मृतात्म्यांशी संवाद’ म्हणजे भूतयोनीवर ठिकठिकाणी प्रात्यक्षिके करीत असत. या ऋषींचा एक कार्यक्रम दादरच्या खांडके बिल्डिंगमध्ये झाला होता आणि त्यासंबंधी ‘प्रबोधन’कार के. सी. ठाकरे यांनी ‘माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्रात लेखन केले आहे. स्वत: न. चिं. केळकर यांनी ‘गतगोष्टी’ या आपल्या आत्मचरित्रात गायकवाडवाड्यात टिळकांच्या आत्म्याला बोलावून ऋषींनी प्रयोग केल्याचे लिहिले आहे. इतकेच नव्हे, तर एकदा इरावती कर्वे विलायतेला जहाजाने जात होत्या. तेव्हा त्या आगबोटीत ऋषी पती-पत्नी होते. तिथे त्यांनी ‘हिप्नॉटिझम’चा प्रयोग केला. इरावतीबाईंनी ‘आपण प्रयोग केल्यास मला बोलवा’ असे त्यांना सांगितले होते; परंतु ऋषींना शंकेखोर अथवा चिकित्सक श्रोते नको असल्याने त्यांना बोलाविले नाही. ऋषींच्या या प्रयोगांची बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून रघुनाथरावांनी चिकित्सा केली आहे. ‘प्रत्येक बुद्धिवाद्याने क्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष अवलोकन केले पाहिजे, नाहीतर तेथील चमत्कारांबद्दल शंका घेता कामा नये, असे कोणीही समंजस मनुष्य म्हणणार नाही. एखादा विश्वसनीय मनुष्य काही सांगू लागला, तर त्यावर आपण सामान्यत: विश्वास ठेवतोच; पण ज्या गोष्टी सकृतदर्शनी अशक्य वाटतात, म्हणजे आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी ज्या विसंगत दिसतात, त्यावर केवळ कोणाच्या तरी म्हणण्यावरून विश्वास ठेवणे, हा बावळटपणा आहे, इतकेच तो म्हणतो…’

रवींद्र केळेकर हे एक गोमंतकीय लेखक. त्यांच्या तरुणपणी म्हणजे 1943-44 च्या सुमारास त्यांचा ओढा बुद्धिप्रामाण्यवादाकडे होता; तेव्हा त्याविषयीच्या आपल्या शंका ते रघुनाथरावांना विचारीत असत. इथे तत्त्वज्ञान आणि अध्यात्मसंबंधाविषयी केळेकरांनी शंका विचारली आहे आणि त्यासंदर्भात एका पत्रात रघुनाथराव केळेकरांना लिहितात- ‘तत्त्वज्ञान हे पॉझिटिव्ह सायन्स आहे, ही एक थाप आहे. आपण म्हणता त्यात मतभेद होणे शक्य नाही. मग मतभेद दिसतात, त्याला काय म्हणायचे? रसायनशास्त्रातील सत्याबद्दल मतभेद होत नाहीत; परंतु अध्यात्मात मतभेद होतात हे सर्वांना माहीत आहे. तेव्हा आपल्या व्याख्येप्रमाणेच ते पॉझिटिव्ह सायन्स ठरत नाही. त्याची रसायनशास्त्राशी तुलना करणे, हाच मूर्खपणा आहे. अध्यात्म हे जर रसायनशास्त्रासारखे शास्त्र असेल, तर प्रत्येक धर्माची मते याबाबतीत वेगळी असतात. ती का? धर्म ज्या अर्थी अध्यात्मावर आधारलेले असतात आणि कोणत्याही दोन धर्मांचे ज्या अर्थी पटत नाही, त्या अर्थी अध्यात्मात मतभेद नाही, हे म्हणणे ही एक थाप आहे. अध्यात्म बुद्धिवादातून निघालेले नाही, श्रद्धेतून निघालेले आहे, म्हणजे बाबावाक्यातून निघालेले आहे. त्याला शास्त्रीयदृष्ट्या काही किंमत नाही…’

रघुनाथराव प्रत्यक्ष जीवनात अस्सल ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ होते. त्यांच्या आयुष्यात विल्सन कॉलेजचे प्राचार्य मॅकेंझी यांनी, पीईएन संस्थेच्या सभासदांनी त्यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अश्लीलतेच्या आरोपाखाली त्यांच्यावर तीन खटले झाले. या सर्व प्रसंगांना त्यांनी जिद्दीने, चिकाटीने, स्थैर्याने तोंड दिले. त्यासंबंधी त्यांनी वेळोवेळी लेखनही केले. पण त्यातून ते कुठे चिडले आहेत, नाउमेद वा हताश झाले आहेत वा स्वकृत्याचा त्यांना पश्चात्ताप झाला आहे, असे चुकूनही जाणवत नाही. कारण बुद्धिवाद्याच्या अंगी आवश्यक असणारा आत्मसन्मानाचा पीळ आणि स्वाभिमान त्यांच्यापाशी होता. 1928 नंतर मालतीबाई कर्वे ‘पार्निशियस अ‍ॅनेमिया’ने आजारी होत्या, त्या 1944 साली दिवाळीच्या पहाटे वारल्या. त्या संबंधात त्यांनी त्याची नोंदही केली नाही. कारण ‘शोक आवरणे’ हा बुद्धिवाद्याचा विशेष त्यांच्या रक्तातच होता.

मात्र हेच रघुनाथराव ‘दिदोरो’, ‘डार्विन’ आणि ‘लोकहितवादी’ गोपाळराव हरी देशमुख यांच्यासंबंधात लिहितात- या तिन्ही व्यक्तींमधील एक समान गुण रघुनाथरावांनी प्रकर्षाने सांगितला आहे आणि तो म्हणजे ते अत्यंत हुशार होते, बुद्धिप्रामाण्याची कास धरणारे होते आणि त्याकरिता त्यांच्या काळात बुद्धिवादाला आणि सामाजिक प्रगतीला खीळ घालणार्‍या धर्मव्यवस्थेवर त्यांनी प्रहार केले. ‘चित्रा’ साप्ताहिकात 1937 साली कुणा एका अज्ञात लेखकाने ‘महाराष्ट्रातील मूर्तिभंजक’ ही लेखमाला चालवली होती. तिच्यातील पहिलाच लेख रघुनाथरावांवरचा होता. तिथे त्या लेखकाने लिहिले होते.

“पारंपरिक आणि तर्कदुष्ट समजुतींचा उच्छेद करून त्यांच्या जागी तर्कशुद्ध विचारसरणीची प्रस्थापना करावयाची, हाच जर मूर्तिभंजकाचा अर्थ असेल, तर प्रोफेसर रघुनाथ धोंडो कर्वे यांना ‘महाराष्ट्रातील मूर्तिभंजकांचे राजे’ म्हणावे लागेल. समाजाची बुद्धी बधीर करणार्‍या आणि दृष्टी अधू करणार्‍या रूढ आणि परंपरागत कल्पनांचा धुव्वा उडवून लोकांना तर्कशुद्ध विचारसरणीची सवय लावणे आणि व्यक्तीच्या व समाजाच्या राहणीची रचना बुद्धिवादाच्या भरभक्कम सांगाड्यावर करणे, हेच प्रो. कर्वे आपले जीवित कार्य समजतात…”

‘र. धों. कर्वे’ यांचे य. दि. फडके यांनी चरित्र लिहिले. त्याचा शेवट करताना य. दि. लिहितात, ‘आत्मश्लाघेचा आरोप केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊनही रघुनाथरावांनी आगरकरांचे आपणच एकटे वारस आहोत, असा दावा केला.’ असे लिहिले आहे. वस्तुत: रघुनाथरावांनी लिहिले आहे, ‘आमचा उद्देश प्रथमपासूनच असा होता की, आगरकरांनी ज्या बुद्धिवादाचा पुरस्कार केला, त्या बुद्धिवादाचा प्रकाश शक्य तितक्या विषयांवर पाडून प्रसार करावा. अर्थात, बुद्धिवाद आगरकरांनी आपल्या डोक्यातून काढलेला नाही. त्याचा त्यांनी पुरस्कार केला इतकेच; परंतु कित्येक बुद्धिवादी लोक असे समजतात की, आगरकर म्हणजे बुद्धिवादाची कमाल मर्यादा झाली. त्यांच्यापुढे जाणे शक्य नाही. आमच्या मते ते शक्य आहे आणि आम्ही तसा प्रयत्न केला आहे.’ सारांश, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत म्हणून र. धों. कर्वे स्वयंभू होते. ‘आगरकरांचे अनुयायी’ ही कल्पना त्यांना अमान्य होती.