Categories
विशेष लेख

बुद्धिवाद आणि अध्यात्मवाद

मे - २०१७

बुद्धिवाद हा तर्कशास्त्रावर आधारलेला असतो आणि अध्यात्मवाद कल्पनेवर आधारलेला असतो, हा या दोहोंतला मोठा फरक आहे. ज्ञानाची कसोटी तर्कशास्त्र आहे. अध्यात्मवादात काही ज्ञान आहे आणि ते अंत:स्फूर्तीने मिळते, असा भ्रम धार्मिक लोकांत आढळतो. अंध:स्फूर्ती याला काही अर्थ असला, तर तो इतकाच की, कधी कधी जाणूनबुजून कोणताही विचार केल्याशिवाय आपल्या मनात एखादी कल्पना येते आणि ती कधी कधी खरी निघते. या अंत:स्फूर्तीचा अर्थ इतकाच की, आपल्याला नकळत आपल्या मेंदूत विचार चाललेला असतो आणि त्याचा निष्कर्ष अंत:स्फूर्तीच्या रुपाने आपल्या मनात येतो; पण अशा रीतीने झालेल्या कल्पनांना तर्कशास्त्राची कसोटी लावल्याशिवाय त्यांना ज्ञानाचा दर्जा कधीही मिळणार नाही. मोठमोठ्या शास्त्रज्ञांनादेखील अंत:स्फूर्तीने पुष्कळ कल्पना सुचतात आणि त्यांच्या साह्याने एखादे वेळी महत्त्वाचे शोध लागतात; पण अशा सुचलेल्या कल्पनांपैकी कोणत्या खर्‍या आणि कोणत्या खोट्या हे तर्कशास्त्राच्या कसोटीने ठरवावे लागते. हे शास्त्रज्ञांना कळते. अध्यात्मवाद्यांना हे कळत नाही आणि म्हणूनच ते भलभलत्या कल्पना खर्‍या धरून चालतात. ईश्वर, आत्मा पुनर्जन्म वगैरे कल्पना तर्कशास्त्राच्या कसोटीला उतरत नाहीत आणि खरे शास्त्रज्ञ त्या मान्य करीत नाहीत. आचार्य भागवतांसारख्या लोकांना हा मूलभूत फरक न कळल्यामुळे ते बुद्धिवादाचा व अध्यात्मवादाचा समन्वय करू पाहतात आणि अर्थातच, हा प्रयत्न फोल होतो. (17 जून, आगरकरांवरील व्याख्यान)

आता काही प्रख्यात शास्त्रज्ञही अशा रीतीने फसलेले आहेत; पण त्याचे कारण इतकेच की, ते शास्त्रीय विचारपद्धतीत पक्के मुरलेले नव्हते. ज्यांनी भूमितीचा थोडासा अभ्यास केला आहे, त्यांनी पायथागोरस या ग्रीक विद्वानाचे नाव ऐकले असेल. हा अशा अर्धवट शास्त्रज्ञांपैकी होता. भूमितीमध्ये त्याने एक अत्यंत महत्त्वाचा शोध लावला की, कोणताही एक काटकोन त्रिकोण घेतला आणि त्याच्या तिन्ही बाजूंवर उभारले, तर त्यातल्या सर्वांत मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ बाकीच्या दोहोंच्या बेरजेबरोबर असते. त्या काळी गणिताची प्रगती आजच्या इतकी झालेली नव्हती. पुष्कळसे बिंदू एकापुढे एक जोडल्याने सरळ रेषा होते आणि या बिंदूंची संख्या कितीही मोठी असली, तरी तो पूर्णांक असतो आणि कोणत्याही दोन रेषांचे प्रमाण पूर्णांकात सांगता आले पाहिजे, अशी त्याची कल्पना होती; पण त्याने जो वर सांगितलेला शोध लावला तो या कल्पनेच्या विरुद्ध जाऊ लागला. कारण काटकोन त्रिकोणाच्या बाजू सारख्या असल्या, तर मोठ्या बाजूवरच्या चौरसाचे क्षेत्रफळ लहान बाजूच्या चौरसांच्या दुप्पट होते आणि या दोन बाजूंच्या लांबीचे प्रमाण जर पूर्णांकात सांगता आले, तर हे शक्य नाही, असे त्याचे त्याला समजले. तेव्हा कोणत्याही दोन रेषांचे प्रमाण पूर्णांकात सांगता येते, ही आपली पूर्वीची कल्पना आपल्याच नवीन शोधामुळे खोटी ठरली, हे उघड दिसले; पण हे कबूल करण्याइतका तो शास्त्रज्ञ नव्हता. कोणत्याही खर्‍या सत्यान्वेषी शास्त्रज्ञाने आपली चूक कबूल केली असती; पण त्याला तसे करता येईना.

याचे कारण असे की, तो केवळ शास्त्रज्ञ नव्हता. त्याने एक स्वत:चा धर्मग्रंथ काढला होता आणि धर्मसंस्थापकाने स्वत:ची चूक कबूल केली, तर त्याचे अनुयायी काय म्हणतील? धर्मपंथात वेडगळपणा नाही, हे शक्यच नसते. त्याच्या धर्माचा हा ठाम सिद्धांत होता की, वाल खाणे हे पाप आहे. याला हसण्याचे कारण नाही. कारण चातुर्मासात कांदा खाणे, हे जर पाप होऊ शकते, तर कोणत्याही वेळी वाल खाणे पाप का असू नये? आणि ज्यात पापपुण्य नाही, तो धर्म कसला? तेव्हा काही तरी पापे प्रत्येक धर्मात असायचीच, त्याप्रमाणे त्याच्या धर्मात वाल खाणे, हे पाप होते आणि त्याचे अनुयायी वालांचा जोरजोराने निषेध करीत असत. आता तुम्ही हे तर्कशास्त्राने सिद्ध करायला सांगाल; पण धार्मिक लोकांना तर्कशास्त्रच मान्य नसते. वाल खाणे पाप आहे, असे जर अंत:स्फूर्तीने कळले, तर तेथे तर्कशास्त्राचा काय उपयोग? अर्थात, पायथागोरसच्या धर्मात इतर पुष्कळ गोष्टी होत्या. उदाहरणार्थ, हिंदूंची पुनर्जन्माची कल्पनाही त्यात होती. तीही वेडगळच आहे; पण तिचा वेडगळपणा इतक्या सहज दिसत नाही.

गणितासंबंधी आपल्या मतात वर सांगितलेली विसंगती उत्पन्न झाल्यामुळे आपली फजिती होईल आणि धर्मसंस्थापक या दृष्टीने आपला दर्जा कमी होईल, या भीतीने वरील शोध (म्हणजे दोन रेषांचे प्रमाण नेहमीच पूर्णांकात सांगता येते, असे नाही ही गोष्ट) गुप्त ठेवावी, असे त्याने ठरविले; पण त्याच्या काही शिष्यांना ती कळल्याशिवाय राहिली नाही आणि हे गुपित त्याच्या हिप्पॅसॉस नावाच्या एका अनुयायाने विरुद्ध पंथाच्या अनुयायांना सांगितले. या पापाबद्दल (कारण धर्मसंस्थापकांची फजिती करणे हे पाप आहे) त्याचे गलबत समुद्रात बुडून तो मेला, अशी आख्यायिका आहे. धर्मसंस्थापकाची फजिती झाली, तर त्याच्या पापपुण्याच्या कल्पनाही लोक मानीत नाहीसे होतील आणि मग वालसुद्धा कदाचित खाऊ लागतील! आणि पायथागोरसच्या मते, तर वाल खाणे म्हणजे आईबापांची हाडे खाण्याइतके भयंकर पाप होते; तेव्हा अशा पापाचा फैलाव होऊ देण्यापेक्षा गणितातला शोध गुप्त ठेवलेला बरा, हे कोणाही धार्मिक मनुष्याला पटण्यासारखे आहे. धर्माची आणि सत्याची नेहमी फारकत होते, ती अशी. (जुलै 1945)

शब्दप्रामाण्य

कित्येक लोक स्वत:ला बुद्धिप्रामाण्यवादी समजतात; पण ते स्वत: त्यात नसतात. तुकारामांकरिता स्वर्गातून विमान आले आणि ते सदेह वैकुंठाला गेले, असे म्हटले म्हणजे ते हसतात; पण मृतांच्या आत्म्यांवर ते विश्वास ठेवतात. सर ऑलिव्हर लॉजसारखे लोक या वर्गातले आहेत. मृतात्म्यांचा परलोक कोठेसा असतो, याचा पत्ता कोणालाही नाही; तरी या परलोकासंबंधी विलक्षण गोष्टी नेहमी प्रसिद्ध होत असतात. ‘सायकिक ऑबझर्व्हर’ नावाच्या मासिकात मृतात्म्यांचे फोटो आणि संदेश प्रसिद्ध होत असतात. त्यातच अशीही माहिती (?) दिली आहे की, एखाद्याने आत्महत्या केली, तर त्याचा आत्मा हे जग आणि परलोक यांच्यामध्ये अनंतकालपर्यंत हेलकावे खात राहतो. अर्थात, यातल्या कोणत्याही विधानाला पुराव्याची गरज नसते!

डॉ. ब्लायफुस नावाचे एक शहाणे सांगतात की, या विषयाची चेष्टा करणे बरे नव्हे, हा गंभीर विषय आहे. वरच्यासारखी विधाने वाचून कोणाला हसू येणार नाही? जुन्या ग्रंथांतले चमत्कार निदान प्राथमिक लोकांच्या अज्ञानामुळे त्यांना खरे वाटले, असे म्हणता येईल. या आधुनिक चमत्कारांत फसवणुकीपलिकडे काही नाही. खुळ्या लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढण्याची ही युक्ती आहे.

भुते मध्यस्थांच्या अंगात येऊन टेबलांसारखे जड पदार्थ उचलतात, हा मोठा चमत्कार समजतात. यात चमत्कार काय आहे? मध्यस्थाच्या अंगात शक्ती किती असेल, यावर ते अवलंबून आहे. हमालांना त्यापेक्षाही मोठी ओझी दूरवर घेऊन जाता येतात, तर मग एखाद्या लफंग्या मध्यस्थाने टेबल उचलले, तर काय झाले? आणि ते टेबल किती उचलते? तर जेथपर्यंत मध्यस्थांचे गुडघे उंच होतील तेथपर्यंत. ते एकदम छताला जाऊन आपटत नाही. मार्गेरी नावाच्या मध्यस्थ बाईने एक दहा पौंड वजनाचे टेबल जमिनीपासून आठ इंच उचलले, हा मोठा चमत्कार असे एका पुस्तकात वर्णन आहे. त्यात चमत्कार इतकाच आहे की, हे भुताने केले, असे त्या बाईने सांगितले आणि तेथे जन्मलेल्या बावळटांना ते खरे वाटले.

मृतात्म्यांवर विश्वास ठेवणार्‍या एका बाईचा मुलगा मेला होता आणि दररोज रात्री ती त्या मुलाकरिता एक पाण्याचे ग्लास भरून टेबलावर ठेवीत असे आणि सकाळी त्यातले थोडेसे पाणी कमी झाल्यामुळे तिला आनंद होत असे की, मुलाला पाणी मिळाले. पण ते आपोआप वाफ होऊन गेले असेल, हे तिला खरे वाटेना. बरे, ज्या मृतात्म्याला टेबलावरचे ग्लास घेऊन पिता येत असे, त्याला स्वत: ग्लासात तोटीतले पाणी घेऊन का पिता येऊ नये? त्याच्याकरिता दररोज पाणी ठेवण्याचे काय कारण?

सर्व प्रसिद्ध मध्यस्थांची लबाडी कोर्टात सिद्ध झालेली आहे आणि हे लफंगे मध्यस्थ एकमेकांना नावे ठेवीत असतात. सादी कुक नावाची बाई खरी मध्यस्थ होती, अशी तिने प्रो. क्रूक्स यांची खात्री करून दिली, असे म्हणतात; पण प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषशास्त्रज्ञ फ्लामारिआँ लिहितो की, होम या मध्यस्थाने त्याला स्वत:चे मत म्हणून सांगितले की, कुक ही लबाड होती. जादूगार एकमेकांची अशी निंदा करीत नाहीत. कारण त्यांचा धंदा प्रामाणिक असतो. फसवेगिरीचा ज्यांचा धंदा आहे, त्यांना एकमेकांबद्दल विश्वास कसा असेल? आपल्यासारखेच सगळे सोदे आहेत, हे त्यांना पक्के माहीत असते आणि एकमेकांनी एकमेकांची बिंगे बर्‍याच वेळा फोडलेली आहेत. फ्लामारिआँ याने स्पष्ट लिहिले आहे, ‘गेल्या चाळीस वर्षांत मी आपल्या घरी जगातील बहुतेक सर्व पुरुष व स्त्री मध्यस्थांना बोलावलेले आहे आणि सर्व धंदेवाईक मध्यस्थ लफंगे असतात, असे मी बिनदिक्कत म्हणतो.’

मध्यस्थांना भर उजेडात आपले प्रयोग का दाखवता येत नाहीत, याचे कारण अगदी उघड आहे. अंधारात लोक फसण्याचा संभव जास्त असतो. म्हणूनच त्यांना अंधार लागतो. मध्यस्थ सांगतात की, मृतात्म्यांना उजेड सोसत नाही. मग मनुष्य मरताना जर आत्मा शरीर सोडून जातो, तर पुष्कळ माणसे भरदिवसा मरतात, तेव्हा हे आत्मे काय करतात? तेव्हा परलोकात जायला जर त्यांना उजेडाची भीती वाटत नाही, तर नंतरच ती का वाटते? कधीच अस्तित्वात नसलेल्या लोकांची, कादंबर्‍यांतल्या कल्पित पात्रांची भुतेदेखील पुरेसे पैसे दिल्यास हजर होतात. यापेक्षा फसवेगिरीचा आणखी पुरावा काय पाहिजे? आणि या फसवेगिरीच्या जोरावर मृतात्म्यांचा शोध लावण्याकरिता इंग्लंडमध्ये एका विद्वानांची (?) संस्था स्थापली आहे आणि या विषयावर पुस्तकांचे ढीगच्या ढीग प्रसिद्ध झालेले आहेत.

यावर विश्वास ठेवणारे विद्वान लोक आहेत, यावरून काहीच सिद्ध होत नाही. ईश्वरावर विश्वास ठेवणारे पुष्कळच विद्वान आहेत, म्हणून काही ईश्वराचे अस्तित्व सिद्ध होत नाही. ते विद्वान इतकेही म्हणायला तयार असतात की, जेव्हा लुच्चेगिरी सापडली नाही, तेव्हा मृतात्मे खरोखर झाले असावेत. शेकडा 98 वेळा जो मनुष्य फसवतो त्याची लुच्चेगिरी दोनदा सापडली नाही म्हणजे तेवढ्या दोन वेळांपुरता त्याला सच्चा मानणे हा मूर्खपणा आहे. ही शास्त्रज्ञांची गोष्ट, मग अप्टन सिंक्लेअर, ठॉमस मान, बेर्गसॉ यांची काय किंमत आहे? ते शास्त्रज्ञ नाहीत. डॉ. कॅरोल यांचे नावही या यादीत आहे; पण त्यांचा प्रार्थनेच्या उपयोगावरदेखील विश्वास आहे! श्रद्धेला औषध नाही.

बुटांची एक जोडी निजायच्या खोलीतून निघून भरदिवसा हवेतून जिन्यावरून खाली येऊन खाली दोन माणसे चहा घेत होती त्यांच्या पायाशी पडली, असे एखादा मनुष्य सांगू लागला, तर तो वेड्यांच्या इस्पितळातच पाठवण्यास योग्य आहे; पण अशा गोष्टींवर या लोकांचा विश्वास बसतो आणि या गोष्टी मृतात्म्यांनी केल्या, हे त्यांना खरे वाटते आणि हे उघडपणे सांगायला त्यांना काही वाटत नाही, हे आश्चर्य आहे. (ट्रूथ सीकर)

या मूर्खपणाचा समाजावर काय परिणाम होतो, याचे विवेचन टेलर नावाच्या लेखकाने पुढील उदाहरण देऊन केले आहे. जुलै 1937 मध्ये केपटाउनच्या उपनगरातील एका कुटुंबाला भुतांनी सतावून सोडले, अशी बातमी केपटाउन येथील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. टेबले-खुर्च्या हालवणे, अंथरुणे उसकटणे वगैरे भुताटकीचे सर्व प्रकार त्यांनी केले, अशा प्रकारची साद्यंत हकिकत कित्येक दिवसांपर्यंत वर्तमानपत्रांत चित्रांसह येत होती. या पत्रांचे संपादक यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख होते काय? तेही मूर्ख नव्हते आणि सुशिक्षित वाचकही इतके मूर्ख नव्हते. मग ही हकिकत का छापली? मूर्ख वाचकांची दाणादाण उडवण्याकरिता? संपादकांचा तसा उद्देश नसेल. त्यांचा उद्देश इतकाच की, अशा गमती छापल्याने अंक जास्त खपावा. पण ज्या समाजावर वर्तमानपत्रांचे अस्तित्व अवलंबून असते, त्याचाही थोडा विचार करणे जरूर आहे. या समाजाचाही उद्देश अशिक्षितांना घाबरवण्याचा असेल, असे नाही. निदान हा उद्देश कोणी कबूल करणार नाही; पण स्वर्ग, नरक वगैरे धार्मिक थापांचा जो नेहमीचा परिणाम, तोच भुताटकीच्या गोष्टींचा. सुशिक्षित समाजाचा दरारा अशिक्षित समाजावर राहावा, हा धर्माचा मुख्य उपयोग असतो. लहान मुलांना बागुलबुवाच्या गोष्टी का सांगतात? त्यांनी मोठ्या माणसांचे ऐकावे म्हणून. बरोबर तसाच परिणाम भुताटकीच्या थापांचा. विशेषत: दक्षिण आफ्रिकेत अशी स्थिती होती की, तेथील बहुतेक गोरे लोक आणि सर्वच शिद्दी अशिक्षित होते. शाळांतून थोडेबहुत शिक्षण दिले जात असे; पण तेही शास्त्रीय शिक्षण नसून धार्मिक वळणाचे होते, त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यास उत्तेजनच मिळत असे. तेथे खालच्या म्हणजे काळ्या लोकांनी बंड करू नये म्हणून त्यांना दहशत दाखवणे जरूर होते आणि हा उद्देश अशा गोष्टींनी चांगला साधतो. कदाचित कोणी असे म्हणेल की, भुताटकीवर विश्वास ठेवणारे अशिक्षितच असतात, असे नाही. उदाहरणार्थ, इंग्लंडमधील ‘सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च’ ही अशिक्षितांची संस्था नाही; पण भुतांनी अशिक्षितांची जितकी गैरसोय होते, तितकी सुशिक्षितांची होत नाही. भुताटकीने पछाडलेले घर त्यांना सोडून जाता येते. गरिबांचे तसे नसते. त्यांना काय होईल, ते सोसावे लागते.

मृतात्म्यांसंबंधी प्रचार देशहिताच्या द़ृष्टीने अत्यंत हानिकारक आहे, कर्तबगारीला विरोधक आणि बावळटपणाला पोषक आहे; पण मृतात्म्यांचा धंदा करणार्‍यांना हे सांगून काय उपयोग? स्वत:च्या पोटापलिकडे ते पाहत नाहीत.

(समाजस्वास्थ्य, डिसेंबर 1945)

(‘समाजस्वास्थ्यमधील निवडक लेख’ मधून साभार)