सात एप्रिल, हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. मानसिक आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षीच्या आरोग्यदिनी, आपण सगळे मिळून ‘डिप्रेशन’वर बोलूयात..’, असे आवाहन केले होते. त्या निमित्ताने जगभर ‘डिप्रेशन’विषयी जनजागृती करणारे अनेक कार्यक्रम झाले. सामाजिकदृष्ट्या कायमच दुर्लक्षित राहिलेल्या विषयावर त्यामुळे चर्चेला तर चांगली सुरुवात झाली. मानसिक आरोग्याचा आणि अंधश्रद्धांचा खूप घनिष्ट संबंध असतो हे आपण सगळे जण जाणतोच. अंधश्रद्धा हा देखील मानवी मनाला ग्रासणारा एक प्रकारचा आजारच आहे. डिप्रेशनसारख्या आजाराविषयी समाजात अनेक गैरसमज असल्याने या आजाराने त्रस्त व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक हे अंधश्रद्धेला बळी पडण्याची मोठी शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आपल्या संघटनेने, मानसिक आरोग्य हा विषय पुढील दशकाचा कार्यक्रम म्हणून हाती घेतला आहे. मानसमैत्री हे आपले अभियान त्यासाठीच सुरू करण्यात आलेले आहे. या वर्षीपासून आपण आपल्या संघटनेअंतर्गत मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती असा विभाग तयार करून या मोहिमेला संघटनात्मक आधार देखील तयार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर डिप्रेशनचा आजार, त्यामागची कारणे, उपाय आणि मानसमैत्री उपक्रमाच्या अंतर्गत आपण या निमित्ताने काय करू शकतो ते जरा समजून घेऊया.
‘डिप्रेशन’वर बोलणे कशासाठी महत्त्वाचे आहे? हे जर समजायचे असेल तर सुरुवात अस्वस्थ करणार्या आकडेवारीपासून करायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ‘डिप्रेशन’चा आजार हा 2020 सालापर्यंत जगातील दुसर्या क्रमांकाचा होणार आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जगभरात ‘डिप्रेशन’सारख्या मानसिक आजारावर वेळीच मदत न मिळाल्याने जवळजवळ दहा लाखांपेक्षा अधिक लोक आत्महत्या करत. एका बाजूला ही आकडेवारी आणि दुसर्या बाजूला समाजात ‘डिप्रेशन’विषयी असलेले अज्ञान, गैरसमज आणि उपचारांच्या सुविधांची सार्वत्रिक अनुपलब्धी बघितली तर ‘डिप्रेशन’विषयी बोलण्याची गरज स्वयंस्पष्ट होते.
आपल्या समाजात एक गंमतशीर अंतर्विरोध आहे. आपल्या बहुतांश प्राचीन साहित्यात माणसाच्या मनाची महती सांगितलेली आहे. वेद-पुराणे यांच्यापासून ते रामदास स्वामींचे ‘मनाचे श्लोक,’ ‘ज्ञानेश्वरांचे पसायदान’ या सर्व गोष्टी मनावर विजय मिळवण्याच्या असंख्य युक्त्या सांगतात. प्रत्यक्षात मात्र मनाचे आरोग्य आणि त्याचे उपचार या विषयी समाजात टोकाचे अज्ञान आणि अंधश्रद्धा दिसून येतात. म्हणूनच डिप्रेशनवर बोलण्याची गरज निर्माण होते.
गेल्या आठवड्यात आपल्याकडे आलेली लातूरची एक केस यासंदर्भात समजून घेण्यासारखी आहे. उस्मानाबादला सासर असलेल्या लातूरच्या एका युवतीला बाळंतपणाच्या नंतर ‘डिप्रेशन’चा त्रास होऊ लागला. सासरची मंडळी विचारी समजूतदार असल्याने त्यांनी मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि उपचार सुरू करून काही दिवस तिला माहेरी विश्रांतीसाठी पाठवले. माहेरच्या लोकांना मानसिक आजार आणि ‘डिप्रेशन’विषयी काहीही माहिती नसल्याने त्यांनी सासरच्या लोकांना अंधारात ठेवून सर्व औषधे बंद केली आणि एका मांत्रिकाकडे तिला दाखवले. सासरच्या लोकांनी समजवून सांगून देखील माहेरकडचे उपचार सुरू ठेवायला अजिबात तयार झाले नाहीत. उपचार बंद झाल्याने या युवतीने ‘डिप्रेशन’च्या भरात आत्महत्या केली. आता माहेरच्या लोकांनी सासरकडच्यांवर आपल्या मुलीचा मानसिक छळ करून तिला मनोरुग्ण केले असा दावा ठोकला आहे. चार महिन्याच्या लहानग्याची आई तर कायमची दुरावली आणि वडील कोर्ट-कचेरीमध्ये अडकले आहेत. ‘डिप्रेशन’विषयीचे अज्ञान, त्यामध्ये अंधश्रद्धेचा पगडा आणि ‘मानसमित्रा’सारख्या समुपदेशक यंत्रणेची अनुपलब्धी यामधून किती मोठे टाळता येण्यासारखे दु:ख निर्माण झाले आहे.
शरीराने धडधाकट दिसणार्या व्यक्तीला डिप्रेशन सारखे दुखणे कसे होते, हे समजून घेणे खरे तर वाटते तेवढे अवघड नाही. बहुतांश मानसिक आजारांच्या प्रमाणे ‘डिप्रेशन’चा आजार हा जैव-मनो -सामाजिक कारणांमुळे होतो. जैविक कारणांमध्ये मेंदूतील काही रसायने कमी होणे, तसेच ‘अनुवंशिकता’ हे कारण असते, तर मानसिक कारणांमध्ये हळवा किंवा उतावळा स्वभाव, अशी कारणे असू शकतात. सामाजिक कारणांमध्ये गरिबी, व्यसन, पुरुषप्रधान समाजव्यवस्था, अशी अनेकविध कारणे येऊ शकतात. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या मनावर एक काळा पडदा पडल्यासारखे होते. त्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात सगळ्या गोष्टींमधील नकारार्थी गोष्टीच समोर येऊ लागतात. स्वत:विषयी नकारार्थी विचार येणे, आत्मविश्वास कमी होणे, हे सगळे तर होतेच; पण आजूबाजूच्या जगाविषयी आणि भविष्याविषयी देखील नकारार्थी विचार येऊ लागतात. आयुष्य हे अत्यंत ताणदायक झाले आहे, असे वाटून हे विचार टोकाला गेले, तर जगू नये असे देखील वाटू लागते.
शारीरिक आजाराचीच उपमा द्यायची, तर डिप्रेशन हे बहुतांश वेळा मनाच्या सर्दी-खोकल्यासारखे असते. जसे सर्दी-खोकल्याचा वेळीच उपचार केला नाही, तर तो बळावतो तसेच ‘डिप्रेशन’चा वेळीच उपचार केला नाही, तर ते बळावते. ‘डिप्रेशन’वर अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत, हे आपल्यातील अनेक जणांना माहीतच नसते. सौम्य प्रकारचे डिप्रेशन तर केवळ चांगल्या समुपदेशनाने कोणत्याही गोळ्या आणि औषधे न घेता बरे होऊ शकते. मध्यम आणि तीव्र स्वरुपाचे डिप्रेशन बरे करण्यासाठी; मात्र समुपदेशनाच्या बरोबर मेंदूतील रासायनिक असंतुलन दुरुस्त करणारी औषधेच लागतात. औषधांविषयीच्या गैरसमजातून आपण ती घेणे टाळता कामा नये.
आपल्या स्वत:च्या आयुष्यात आणि आपल्या जवळच्या लोकांच्या आयुष्यातील ‘डिप्रेशन’ची लक्षणे ओळखणे, हे अजिबात अवघड नाही. थोडी संवेदनशीलता आणि थोडे प्रशिक्षण यांच्या मदतीने आपण ते सहज साध्य करू शकतो. ’परिवर्तन संस्थे’ने ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने राबवलेल्या जन-मन-स्वास्थ्य प्रकल्पांतर्गत, शासकीय आरोग्य यंत्रणेचा भाग असलेल्या ‘आशा’ताई पासून ते दहावी पास कोणत्याही व्यक्तीला ‘डिप्रेशन’चे निदान कसे करायचे? आणि रुग्णाला उपचार घेण्यासाठी कसे तयार करायचे?’ हे प्रशिक्षण देता येऊ शकते याविषयी महत्त्वाचे काम करण्यात आलेले आहे. यामधील निष्कर्षांनुसार ज्या समाजात मनोविकारतज्ज्ञांचा तुडवडा आहे तिथे अशा स्वरुपाचे भावनिक प्रथमोपचार देणारे समुपदेशक हे ‘डिप्रेशन’च्या उपचारामध्ये मोलाची भूमिका पार पडू शकतात. याच प्रकल्पांतर्गत ‘डिप्रेशन’ विषयी जनजागृतीसाठी आपण ‘मन की आँखे’ आणि ‘जागृती’ अशा दोन शॉर्ट फिल्म्सची निर्मिती केली आहे. ख्यातनाम सिनेदिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी त्यांचे दिग्दर्शन केले आहे. मानसमैत्री प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण आणि जनप्रबोधन या दोन्ही गोष्टींसाठी या फिल्म अत्यंत उपयोगी पडू शकतील.
आपल्या मनाला वाटणारे ‘डिप्रेशन’ म्हणजेच उदासीनता ही काही फार उत्साहाने दुसर्याशी बोलली जाणारी गोष्ट नाही; पण आज अनेकजण समाजाच्या पुढे येऊन आपल्या ‘डिप्रेशन’च्या अनुभवाविषयी मोकळेपणाने बोलू लागले आहेत. जसे शारीरिक आजाराविषयी आपण कोणताही गंड न बाळगता बोलतो, त्याप्रमाणेच ‘डिप्रेशन’विषयी समाजात मोकळेपणाने बोलले गेले पाहिजे.
दीपिका पदुकोन ही आजची अत्यंत यशस्वी अभिनेत्री यशाच्या शिखरावर असताना तिला ‘डिप्रेशन’चा त्रास होऊ लागला होता आणि तिने त्यासाठी योग्य उपचार घेऊन ती बरी झाली. आज ती जाहीररित्या स्वत:च्या ‘डिप्रेशन’विषयी बोलते आणि समाजात ‘डिप्रेशन’विषयी जनजागृती करण्याचे काम करते.
‘महाराष्ट्र वन’ वाहिनीची पुण्यातील धडाडीची पत्रकार प्राची कुलकर्णी हिने तिला आलेल्या डिलिव्हरीनंतर आलेल्या ‘डिप्रेशन’विषयी जाहीर सांगितले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि लेखक संदेश कुलकर्णी यांनी देखील ‘लोकसत्ता’मध्ये लेख लिहून आपल्या मानसिक ताणाच्या अनुभवाविषयी लिहिले आहे. ‘डिप्रेशन’च्या छुप्या शत्रूशी आपल्याला लढायचे असेल, तर आपण सर्वांनी देखील ‘डिप्रेशन’विषयी सजग होणे आणि बोलू लागणे, हे महत्त्वाचे आहे.