Categories
इतर

justified

वार्षिकांक - २०१९

परिसंवाद: अं.नि.स माझे आकलन आणि अपेक्षा
‘श्रध्दा’ अंधच असावी हीच आपली परंपरा

          -दिनानाथ मनोहर

ह्या जागतिकीकरणाच्या जमान्यात काही नव्या अंधश्रद्धांचा प्रसार व्हायला लागला आहे. एखादी वस्तू खरेदी करण्याकरता जास्त पैसे दिले की, ती वस्तू जास्त चांगल्या क्वालिटीची असते, किंवा बंद डब्यातील पदार्थ घरी केलेल्या पदार्थापेक्षा जास्त ऊर्जा देणारे असतात, कपड्याच्या पोतापेक्षा, अंगाला होणाऱ्या स्पर्शापेक्षा, कपड्याची क्वालिटी त्याचं लेबल वाचून कळते, जे जे परदेशी आहे ते देशीपेक्षा उत्तम असते आणि त्याच्या उलट जे जे देशी आहे त्याच्या चांगलेपणाबद्दल शंका घेणे राष्ट्रप्रेम नसल्याचे द्योतक असते, अणुशक्तीच्या वापरातून केलेली वीजनिर्मिती इतर सर्व पद्धतीपेक्षा सुरक्षित व स्वस्त, अशा अनेक नवनवीन अंधश्रद्धा आकारात यायला लागल्या आहेत.
            अंनिस गेली दोन दशके महाराष्ट्रात कार्य करत आहे, त्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘अंनिस माझे आकलन आणि अपेक्षा’ ह्या विषयावरील परिसंवादात मी सहभागी व्हावे अशी संपादकांनी विनंती केली. वस्तुत: अंनिसच्या गेल्या वीस वर्षांतील कार्याची मला जी माहिती आहे ती जुजबी स्वरूपाची आहे, आणि अंनिस संघटनेच्या कार्याशी व कार्यपद्धतीशी माझा आलेला संबंधही मर्यादित स्वरूपाचा आहे. शिवाय डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसारखा माणूस जो अंधश्रद्धा निर्मूलनाचे निशाण हाती घेऊन, दोन तपांपेक्षाही जास्त काळ समाजातील अंधश्रद्धाविरूद्ध एका जिदीनं लढा देत आहे, थोडा शब्दांचा खेळ खेळायचा तर, जो माणूस एका अढळ श्रद्धेने अंधश्रद्धांविरुद्ध संघर्ष करीत आहे अशा माणसाचं नेतृत्व लाभलेल्या ह्या अंनिस संघटनेविषयी मी काही भाष्य करणं हे गैरलागूच होईल.
            परंतु अंनिस करत असलेल्या कार्याच्या आवश्यकतेची जाणीव असल्याने ह्या विनंतीचा अव्हेर करणं शक्यच नसल्यानं मी लिहिण्याचं धाडस करत आहे. तरीही माझ्या मर्यादा लक्षात घेऊन मी ह्या विषयांच्या गाभ्यापासून, म्हणजे केंद्रापासून दूर राहून सुरक्षित अशा बाह्य परिघावरच हिंडणार आहे. मी फार लोकप्रिय आणि शासनमान्य लेखक नसलो तरी मराठी ललित लेखक आहे. मोठमोठ्या मराठी मान्यवर ललित साहित्यिकांच्या साहित्यांशी वाचक म्हणून माझी लहानपणापासूनच ओळख आहे, त्यामुळे असं मूळ गाभ्यापासून सुरक्षित अंतर राखून परिघावर राहून, अवांतरी आणि अधांतरी लिखाण करणं मला जमू शकेल असा मला विश्वास आहे.
            आजच्या ह्या काळात, विशेषत: सामाजिक आणि वैयक्तिक पातळ्यांवर गतीने बदल घडवणान्या ह्या तंत्रयुगात सामान्य माणूस अनेक यंत्रे व तंत्रे ह्यांचा उपयोग करू लागला आहे. मानवाच्या अफाट कर्तृत्वामुळे, विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या गतीमान विकासामुळे आपल्या ह्या ग्रहावर आणि ग्रहाभोवतीच्या अवकाशात अनेक पातळ्यांवर, गुंतागुंतीचे बदल होत आहेत, कित्येक बदल असे आहेत की, त्यांची तर्कशुद्ध कारणं वैज्ञानिकांनाही देणे सहजशक्य होत नाहीये. माणसाचे सामाजिक आणि नैसर्गिक भोवताल अशा रीतीने बदलत असल्याने माणसाला अनेकावधी अनोळखी घटनांचा अनुभव घ्यावा लागत आहे आणि त्यातूनच ह्यामागील कारणं काय असावीत असे प्रश्नही निर्माण होत आहेत. जीवनातील प्रत्येक बदलाचे उत्तर देव आणि दैव असे मान्य असणाऱ्यांना असं का ?’ असे प्रश्न कदाचित पडत नसतील. ही तर स्वामींची इच्छा असं एकच उत्तर त्यावर असेलही. परंतु आजच्या युगात अगदी सर्वसामान्य माणसाचेही ह्या उत्तराने समाधान होत नाही आणि तो इतर जास्त संयुक्तिक कारणांचा शोध घेतो. ही निश्चितच चांगली बाब आहे. एखादी घटना का घडली ह्याचं पटेलसं कारण आपल्याजवळ नसेल तर अशा कारणाची गरज पुरी करण्यासाठी, चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीवर आधारित उत्तरे दिली जातात किंवा काढली जातात, त्यातून अंधश्रद्धा आकाराला येतात असं म्हणता येईल. काहीवेळा अशी चुकीची उत्तरे, स्वार्थ साधण्याच्या हेतूनं जाणीवपूर्वक वा आपलं अज्ञान लपविण्यासाटीही दिली जातात. झपाट्यानं बदलणाऱ्या भोवतालमध्ये अनोळखी अशा अनेक घटना घडत असताना, अशा अंधश्रद्धा वाढणे हे अटळ आहे असं मला वाटतं. म्हणूनच अशा स्थितीत आज अंनिस सारख्या चळवळीची निश्चितच गरज आहे आणि नजीकच्या भविष्यकाळात ही गरज वाढतच जाईल असं दिसतंय.
            अंधश्रद्धा ह्या शब्दात खरं तर अंधपणाचा अवमान केला जातो असं मला पूर्वी वाटायचं. पण आता मला वाटतं, हे अंध ह्याचा अर्थ दृष्टिहीन असा नसून नजरेसमोर दिसत असलेल्या उळढळीत वास्तवाकडे पहाण्याचे नाकारून कपोलकल्पित गोष्टींवर जो विश्वास ठेवतो तो अंध, असा अर्थ अभिप्रेत असावा. खरं तर व्यवहारात अंधश्रद्धा शब्दामधील श्रद्धा ही देखील बऱ्याच प्रमाणात अंधच असते. किंबहुना श्रद्धा ही अंधच असायला हवी अशी आपल्याकडे परंपरा आहे. एखाद्या विचारांवर, संकल्पनेवर, व्यक्तीवर किंचितही शंका न घेता, कुठल्याही प्रकारे कोणत्याही कसोटीवर तिची परिक्षा न करता विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा असणे असाच अर्ध रूढ झाला आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या सर्वच बाबांची भक्ताकडून हीच अपेक्षा असते, ‘माझ्यावर अढळ श्रद्धा ठेव, तुझं जीवन सर्वस्वी माझ्यावर सोपव, मी तुझं कल्याण करीन.’ अशाच श्रद्धेची अपेक्षा आजकाल पक्ष कार्यकर्त्यांकडून पक्षनेतेही करू लागले आहेत. लोकशाहीवरील अढळ श्रद्धेची परंपरा १८८५ पासून असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची अगदी राज्यपातळीवरील पुढाऱ्यांची दिल्लीश्वरांवरही अशीच अढळ श्रद्धा आहे. म्हणून तर अगदी आलतू फालतू समस्येबाबतही ‘वाद-प्रतिवाद-संवाद’ ह्या प्रक्रियेतून न जाता, सर्वांनुमते, एकमताने एक ठराव पास करून सर्व हक दिल्लीश्वराधीन करण्याची पद्धतच पडून गेली आहे. अर्थात इतर राजकीय पक्षही ह्याबाबतीत फार वेगळे असते असं नाही, काही पक्षात तर असा ठराव पारीत करण्याच्या औपचारिकतेचीही गरज नसते.
            अंनिसने ह्या विषयावर माझी मतं व्यक्त करायला आमंत्रित का केलं असावं? ह्या प्रश्नाचा मी विचार करायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की, ह्यामागेही एक अंधश्रद्धा, निदान एक प्रकारचा अंधविश्वास काही प्रमाणात तरी कारणीभूत असावा. आपल्या सर्वांचीच अशी समजूत असते की, एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात जरा नावाजली, जरा उच्च पदावर पोचलो की, तिला सर्व विषयांत समजते. असे सर्वच विषयात लिलया संचार करू शकणारे काही सर्वज्ञ असतीलही. पण सर्वसाधारणपणे असा अनुभव आणि असं वास्तव आहे की, एखादी व्यक्ती काही विशिष्ट विषयात तज्ञ असली तरी इतर विषयांत तिला गती असेलच असे नसते. परंतु यशस्वी व्यक्ती सर्वच विषयात गंभीरतेने विचार करते, आपलं प्रत्येक मत, आपला प्रत्येक विचार तर्कशुद्धतेच्या व वास्तवाच्या कसोटीवर घासून बसत असते अशी स्थिती कचितच असते. मला वाटतं, यशस्वी व्यक्ती सर्वच विषयात साधकबाधक आणि संतुलित विचार करू शकते अशी आपली अपेक्षा व कल्पना ही एक अंधश्रद्धाच आहे. असा समज असल्यामुळेच आणि मिडियावर पाहातो, आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाजाला, वाढते भाव रोखण्याकरता नेमके काय करावे ह्याबद्दल सल्ला विचारला जातो, किंवा अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला सचिन तेंडुलकरबद्दल आपले काय मत आहे असं विचारले जाते. आता सर्वसामान्य लोकांची असामान्य लोकांबद्दल अशी अंधश्रद्धा असणे हे आपण समजू शकतो, पण असामान्य व्यक्तींचीही ‘आपल्याला सर्व विषयात कळते’ अशी स्वतः विषयी समजूत असते आणि इथंच खरी गोची होते.
            माझ्या मनातही अशाच प्रकारची अंधश्रद्धा बालपणापासूनच घर करून होती. व्यक्ती ज्या स्थानावर बसलेली असेल ते स्थान जितके असामान्य असेल तितकीच त्या व्यक्तीची बुद्धी असामान्य पातळीवरची असते असं मला वाटायचं. या आसनाचा आणि बुद्धिमत्तेचा संबंध शाळेपासून लक्षात आलेला. म्हणून प्राथमिक शाळेत आम्ही तरटाच्या पट्ट्यावर बसायचो तर बाई खुर्चीत. हायस्कूलमध्ये स्टुडंटस बाकावर, तर टीचर्स प्लॅटफार्मवरील टेबलामागील खुर्चीवर. कारकून मंडळी ही साध्या खुर्च्यावर तर अधिकारी रिव्हॉल्व्हींग चेअर्सवर आणि न्यायाधीशांची खुर्ची तर सर्वात उंचावर उच्चस्थानी. वरीष्ठ ते कनिष्ठ अशा उतरत्या जिन्यावर वेगवेगळ्या पदांवर असलेल्या व्यक्तींसाठी जास्त कमी उंचीची असण्याची ही परंपरा वा पद्धती ह्यांचा बुद्धीच्या उच्चनिचतेशी संबंध आहे अशी माझी अंधश्रद्धा होती.