Categories
चिकित्सा

गाणे म्हणा आणि आजार बरा करा सरकारपुरस्कृत नवी अंधश्रद्धा

जून - २०१९

संगीत उपचार आता शालेय अभ्यासक्रमात

इ. 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता संगीत-वादन-नृत्य कलांचा समावेश असणारा ‘भारतीय संगीत’ विषय सुरू होत आहे.

प्राचीन परंपरा

भारताला संगीताची प्राचीन परंपरा आहे. लोकगीतांपासून शास्त्रीय संगीतापर्यंत, आदिवासी नृत्यापासून कथ्थक नृत्यापर्यंत, मंजुळ सनईपासून कान फोडणार्‍या ढोलाच्या दणदणाटापर्यंत अनेक मार्गांनी इथली संगीत परंपरा संपृक्त झाली आहे. आता त्यात पाश्चात्य संगीतानेही प्रवेश केला आहे.

संगीत हा विषय अबालवृद्धांच्या आवडीचा आहे. शैशव काळात अंगाईगीतापासून संगीताची ओळख होते आणि बाथरूम सिंगरपासून स्टेजवर गाणार्‍यापर्यंत प्रत्येकजण त्यातून आनंद घेतो. अशा संगीतकलेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. ते काम या विषयाने होणार आहे. या विषयाची क्षमताविधाने प्रसिद्ध झाली आहेत. पहिले विधान आहे – भारतीय संगीत कलेबद्दलची जाणीव व कलेचे महत्त्व समजून घेणे.

अभ्यासक्रम

या प्रकारे पुढे भावना, विचार व्यक्त करण्याची क्षमता, निसर्गातील व मानवनिर्मित संगीत, सांगीतिक परिभाषा, ताल, गायन-वादन, भजन-भावगीत-लोकगीत, नृत्ये, सादरीकरण, संगीताचा वारसा, वाद्यांची रचना-प्रकार, उपयोग, निर्मिती, थोर कलाकारांची ओळख या विषयावरील ग्रंथ, प्राचीन संगीत अशा अनेक उपविषयांचा यात समावेश आहे.

संगीत विषयाच्या अशा सखोल अभ्यासाची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून देतानाच काही ‘संधिसाधू’ त्यात शिरले आहेत. अध्यात्म म्हटले की, ज्ञानोबा आणि तुकोबांची आठवण होऊन हात आपोआप जोेडले जातात; पण त्याचा गैरफायदा घेऊन रामरहीम आणि आसाराम सारखे सनातनीही अध्यात्माच्या नावाखाली संधी साधतात.

तसे संगीताला असलेल्या लोकमान्यतेचा गैरफायदा घेऊन लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न होत आहे. अभ्यासक्रमाच्या क्षमताविधानामध्ये 22, 23 व 24 क्रमांकाची विधाने रोगमुक्तीसंबंधी आहेत. (विधान 22) अभिजात संगीताचे अध्ययन करताना विविध आजारांवर संगीतोपचार करण्याची क्षमता वृद्धिंगत करणे, (विधान 23) संगीतातून रोगमुक्ती होऊ शकते याची अनुभूती घेणे, (विधान 24) शरीरातील विविध अवयव, विविध व्याधी आणि संगीत यांचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणे. याची अधिक माहिती पाठ्यपुस्तके आल्यावर मिळेल. तोपर्यंत आपण पाठ्यपुस्तकाबाहेरील माहिती घेऊ.

थोडक्यात, म्हणजे विविध व्याधी आणि रोगमुक्तीसाठी आता संगीतोपचार करावयाचे आहेत.

गायक डॉक्टर

पुढच्या काळात शासकीय इस्पितळांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्सची भरती करण्याऐवजी गायक, वादक आणि नृत्यांगणांच्या नेमणुका झाल्या, तर आश्चर्य वाटायला नको. आज दुरावस्थेमुळे बंद पडू लागलेली शासकीय इस्पितळे रुग्णांनी नाही, तरी निदान संगीत शौकिनांनी गजबजू लागतील. डॉक्टरांच्या गळ्यात स्टेथॅस्कोपऐवजी तंबोरा आणि ढोल दिसू लागतील. आयसीयूमधील ऑक्सिजन नळ्या जाऊन ढोलकी घुमू लागेल. हृदयनाथ मंगेशकरसारखी सुप्रसिद्ध इस्पितळे आपले नाव ‘सार्थ’ ठरवतील.

संगीतोपचारातून रोगमुक्तीला तज्ज्ञ आणि प्रथितयश डॉक्टरांच्याकडून काही दुजोरा मिळाला नाही; पण संगीतातून मुक्ती होते म्हणणारे विविध दावे करत आहेत.

जसा प्रत्येक रोगांचा संबंध एका ग्रहाशी असतो, तसा प्रत्येक सूर आणि रागाचा संबंध एकेका ग्रहांशी आहे. रोग्याला ग्रहाशी संबंधित आजार होतात, तेव्हा ग्रहाशी संबंधित राग आणि सूर ऐकवले तर संबंधित रोग्यास लवकर आराम पडतो.

‘रोगाचा संबंध ग्रहाशी असतो आणि ग्रहाचा संबंध रागाशी असतो’ हे कोणी, कधी, कसे तपासले? या प्रश्नाचे उत्तर या मंडळींच्याकडे नाही. ‘संगीत मकरंद’ ग्रंथामध्ये संगीताध्याय प्रकरणात नारदाने रोग्याच्या शरीर आणि मनावर संगीत प्रभाव पाडत असल्याचे म्हटले आहे.

आयुधर्मयशोवृद्धि: धन धान्य फलम लभेत्।

रागाभिवृद्धि सन्तानं, पूर्णभगा: प्रगीयते॥

म्हणजे ‘आयु, धर्म, यशवृद्धी सन्तानची अभिवृद्धी, धनधान्य, फल लाभ इत्यासाठी राजागे पूर्ण गायन केले पाहिजे.

प्राचीन ग्रंथ

प्राचीन ग्रंथात लिहिलेले सगळे सत्य आहे, असे समजून चालले तरी वरील श्लोक रोगमुक्तीचा दावा करण्यासाठी निरुपयोगी आहे. ऋषी-मुनींच्या काळात आजचे रोग आणि आजची गायन-वादन साधने अस्तित्वात नव्हती. भक्ष्याच्या मागे किंवा भक्ष्य होऊ नये म्हणून जंगलझाडीतून धावणारे, आपले पूर्वज आणि आज अलिशान गाडीपर्यंत चालण्याचे श्रम झाल्याने धापा टाकणारे आपण यांचे रोग समान कसे असतील?

संगीतोपचारांसाठी वेदाचीही साक्ष का काढण्यात आली आहे? ऋग्वेदामध्ये ‘गाथपति’ चिकित्सा म्हणजे संगीत चिकित्सेचा उल्लेख आहे. सामवेद संगीताचा वेद असून त्यात रोग निवारणासंबंधी उल्लेख आहेत; तर अथर्ववेदामध्ये गदक, यजुष आणि साम असे श्लोक स्वास्थ्यासंबंधी आहेत.

आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ धातू संतुलनासाठी शब्दशक्ती, मंत्रशक्ती आणि गीतशक्तीचा उपयोग केला जाई.

वेद

वेद हे प्राचीन वाङ्मय आहे. आर्यांना लेखनकला माहीत नव्हती. तेव्हा त्यांनी त्या काळचे साहित्य मुखोद्गत करून सांभाळले. मुखोद्गत करण्यासाठी गेयता-ताल-सूर अधिक उपयोगी आहेत. पाठांतराच्या सहाय्याने वाङ्मय पिढ्यान्पिढ्या सांभाळल्याबद्दल त्या काळचे ऋषी-मुनी अभिनंदनास पात्र आहेत.

वेद माणसासाठी तयार केलेले नाहीत. ते अपौरुषेय आहेत; वेदापासूनच विश्वनिर्मिती झाली; वेदामध्ये दैवी शक्ती आहे; वेदमंत्रांचा व्यवस्थित उच्चार करून गायन केले तर पाऊस पडतो, शत्रूंचा नाश होतो, गायी-गुरे विपुल होतात इत्यादी दावे केले जातात.

हे दावे अनुभवाच्या कसोटीवर असत्य ठरतात; जगातील सर्व आदिम मानवी टोळ्यांनी नैसर्गिक घटनांमध्ये अमानवी शक्ती कल्पिली. निसर्गालाच त्यांनी देव मानले. या परमेश्वराकडे त्यांनी आरोग्य, शत्रूचा नाश, युद्धात विजय, धनधान्य आणि गायी-गुरांची खिल्लारे, विपूल अन्न इत्यादींची मागणी केली. त्याला प्रार्थना म्हणतात. वेदामध्येही हेच आहे. काही ऋचा अश्लीलही आहेत. रोग निवारणासाठी वेद उपाय सुचवू शकत नाहीत.

आयुर्वेद

प्राचीन भारतात रोग निवारणासाठी वनस्पतींचे पान, फूल, फळ, खोड, मूळ, बिया इत्यादी अवयव व विविध भस्मे यांचा वापर केला गेला. त्यातून आयुर्वेद औषधे विकसित झाली. आजही त्यातील अनेक औषधांचा यशस्वी वापर होत आहे; पण शब्दशक्ती, मंत्रशक्ती आणि गीतशक्तीने रोगनिवारण केल्याचे शास्त्रीय पुरावे नाहीत. मंत्रामध्ये काही इतकीही शक्ती नसते, हे पूर्वीच्या अभ्यासू व्यक्तींना ठाऊक होते.

मंत्रशक्ती

करवीरमधील शंकराचार्यांच्या मठावर पेशव्यांचे सरदार पटवर्धन यांनी हल्ला केल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांनी शंकराचार्यांना खुर्चीशी बांधून घातले आणि त्यांच्या समोरच मठ खणून संपत्तीची लूट केली.

वेदशास्त्रसंपन्न शंकराचार्यांच्याकडे मंत्रशक्ती असल्याची शंका जरी असती, तर ब्राह्मण असलेल्या पेशवे किंवा पटवर्धनांनी असे धाडस केले असते काय?

वेदशास्त्रसंपन्न शंकराचार्यांनाही वेद किंवा मंत्रात शक्ती नसल्याची खात्री होती म्हणून त्यांनी मंत्राने शाप देण्यात वेळ घालवला नाही किंवा यज्ञ करत बसले नाहीत.

‘मठाचे संरक्षण करू शकलो नाही’ या उद्वेगापोटी त्यांनी पिठावर शिष्य बसवला आणि आपण जीभ हासडून प्राण दिला. मंत्रात शक्ती असल्याचे दावे खोटे आहेत.

‘मोक्ष किंवा स्वर्गप्राप्तीसाठी परमेश्वराची आराधना केली पाहिजे. त्यासाठी मंत्र आले पाहिजेत. संस्कृतचा अधिकार शूद्रांना नाही, शूद्रांना मंत्र म्हणता येत नाहीत. त्यामुळे त्यांना मोक्षाचा किंवा स्वर्गाचा अधिकार नाही,’ या वैदिकांच्या प्रचाराला वारकर्‍यांनी नामाचा महिमा सांगून उघडे पाडले. भक्तीसाठी केवळ नाम घेणे पुरेसे आहे. भावना महत्त्वाची; शास्त्रशुद्ध उच्चाराची काही गरज नाही.

संगीतोपचार करताना शास्त्रशुद्ध गायनाची गरज सांगितली जाते. हा प्रचार वारकर्‍यांच्या मूळ कल्पनेला छेद देणारा आणि वैदिकांची भलावण करणारा आहे.

संगीताची जादू

संगीत काय-काय करू शकते याची उदाहरणे सादर करण्यात आली आहेत. “संगीतामुळे वनस्पतींना रोगग्रस्त होण्यापासून वाचवता येते. गारूड्याच्या पुंगीने साप आणि मोर डोलू लागतात. कॅनडामधील संगीत ऐकणार्‍यांसाठी गायी जास्त दूध देतात. त्याप्रमाणे विविध रोगांवर मानवासाठीही संगीतोपचार करणे शक्य आहे.”

वर उल्लेखलेल्या समजावर आता शास्त्रशुद्ध अभ्यास उपलब्ध आहेत. साप गारूड्याच्या पुंगीने डोलतो, या समजावर आधारित काही सिनेमात इच्छाधारी नागिणी अवतरल्या. प्रत्यक्षात नाग डोलतो तो संगीताने नव्हे; पुंगीच्या हालचालीमुळे. हलणार्‍या वस्तूपासून आपल्याला धोका आहे, हे कळल्याने संरक्षणाचा भाग म्हणून नाग डोलतो. त्याचा मेंदू संगीत समजण्याएवढा विकसित नाही. आधुनिक कुक्कुटपालन आणि पशुपालनात संगीताचा वापर यशस्वीपणे करून उत्पन्नात भर घातली जाते. तिथे संगीताचा वापर अचानक कानावर पडून विचलित करणार्‍या ध्वनीपासून संरक्षण म्हणून केला जातो.

अचानक कानावर पडलेल्या ध्वनीमुळे कोंबड्या, शेळ्या, गायी बिथरतात, घाबरतात. त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. सतत संगीत चालू असेल, तर जवळून जाणार्‍या गाड्या त्यांना विचलित करत नाहीत.

रोग आणि राग

प्राण्यासाठी फायदेशीर ठरलेले संगीत रोगमुक्तीसाठी माणसांना उपयोगी पडावे, असा सद्हेतूने संगीतोपचार तज्ज्ञांनी विविध रोगांवरील उपचारासाठी काही रागांची शिफारस केली आहे.

हृदय रोगासाठी राग दरबारी आणि सारंग लाभदायक असून या रागात गायलेली गीते – तोरा मन दर्पण कहलाए (काजल), राधिके तूने बंसरी चुराई (बेटीबेटे), झनक झनक तेरी बाजे पायलिया (मेरे हुजूर), बहुत प्यार करते है, तुमको सनम (साजन), जादूगर सैय्या छोड मोरी (फाल्गुन), ओ दुनिया के रखवाले (बैजू बावरा), मोहब्बत की झुठी कहानी पर रोये (मुगले आजम) सुचवली आहेत.

याप्रमाणे निद्रानाशावर भैरवी आणि सोहनी राग, अ‍ॅसिडिटीवर राग खमाज, कमजोरीवर राग जय जयवंती, स्मृतिभ्रंशावर राग शिवरंजनी, रक्त कमी म्हणजे लोहाच्या कमतरतेवर राग पिलू, मानसिक आजार व डिप्रेशनवर राग बिहाग आणि मधुवंती, रक्तदाबावर भूपाळी, अस्थमावर राग मालकंस आणि ललित, तर डोकेदुखीवर भैरव राग सुचवला आहे.

प्रत्येक रागातील सिनेगिते दिली आहेत. संगीतोपचार तज्ज्ञाने सुचवलेले रोग हे रोगजंतूंनी होणारे रोगी नाहीत, त्या शारीरिक व्याधी आहेत. शारीरिक यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे त्या निर्माण होतात.

व्याधीमागे शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक इत्यादी कारणे असू शकतात. काहीवेळा कारणांवर मात करून व्याधी कमी होतात किंवा नष्टही होतात.

शास्त्रशुद्ध अभ्यास

संगीत यासाठी कितपत उपयोगी पडेल, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास झालेला नाही. विशिष्ट व्याधी असणार्‍या शंभर व्यक्तींना विशिष्ट रागाचे संगीत ऐकवले, त्याचे परिणाम तपासले. या काळात त्यांना इतर संगीत ऐकण्यापासून रोखावे लागेल. त्यांना द्यावयाच्या औषधावर नियंत्रण ठेवावे लागेल.

त्याचवेळी तशाच व्याधी असणार्‍या शंभर व्यक्तींना समान औषधोपचार सुरू असताना त्या विशिष्ट रागाचे संगीत ऐकू न देता परिणाम तपासले. या दोन गटांच्या परिणामांची तुलना केल्यावर त्या विशिष्ट रागाच्या संगीताबाबत निष्कर्ष काढता येईल.

हे निष्कर्ष हजारो लोकांबाबत तपासावे लागतील, सत्य ठरले तर त्याचा नियम बनेल. असे काही प्रयोग केले असल्यास संगीतोपचार तज्ज्ञांनी जाहीर करावेत. ते विद्यार्थ्यांना, समाजाला प्रेरक ठरतील. असे काही नसेल, तर ते केवळ काल्पनिक चिंतन ठरेल. अंदाजे केलेल्या दाव्यांना विज्ञानात जागा नाही आणि आरोग्य विज्ञानात दिली, तर नागरिकांच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांची जबाबदारी कोणाची?

मंत्राने रोगमुक्ती

कोणत्याही शास्त्रीय नियमांचा आधार नसताना, अंदाजे गोळ्या मारण्याची पुढची पायरी काही जणांनी गाठली आहे.

ठराविक राग-उच्चार यामध्ये गायिलेले मंत्र म्हणजे संगीतच आहे. अशा मंत्राने रोगमुक्ती करण्याचे दावे केले जातात. एक तज्ज्ञ म्हणतात, ‘रुग्ण-डॉक्टरकडे जातात आणि त्यांच्या सल्ल्याने औषध घेतात; पण काही वेळा इलाज करूनही रोग दूर होत नाहीत. मूळ कारण दूर न केल्याने केवळ बाह्य उपचारांचा उपयोग होत नाही. अशा वेळी मंत्राचा चांगला उपयोग होतो.’ पुढे ते म्हणतात, ‘आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर रोगाचे मूळ माणसाच्या या जन्मातील किंवा पूर्वजन्मात केलेल्या पापात असते. म्हणून आयुर्वेदाने देवतांचे ध्यान करण्याचा मार्ग सांगितला आहे.’

जन्मांतर पापं व्याधिकेपण बाधते।

तच्छान्तिरौषध प्राशैजपहोमसुरार्च नै:

‘आयुर्वेदाने जप, हवन, पूजन ही औषधेही सांगितली आहेत,’ पुढे या तज्ज्ञांनी मंत्रही सुचवला आहे.

विकीपीडिया

विकीपीडियाला संगीत चिकित्सेमध्ये संगीत ध्वनी, संगीतातील सिद्धांत, जैवसंगीत यांच्या आरोग्याशी संबंधाचा अभ्यास अभिप्रेत आहे.

ही एक अंतर्वैयक्तिक प्रक्रिया आहे. प्रशिक्षित संगीत चिकित्सक रुग्णाच्या रोग निवारणासाठी संगीताच्या शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक, सौंदर्यात्मक व आध्यात्मिक पैलूंचा वापर करतो. तो गायन, गीतलेखन, संगीतश्रवण, संगीत चर्चा इत्यादींचा उपयोग करतो.

संगीत चिकित्सेमध्ये – शिक्षणाधारित संगीत चिकित्सा, स्वयंसंगीत चिकित्सा, मनोवैज्ञानिक संगीत चिकित्सा, तांत्रिक संगीत चिकित्सा अशा शाखा तयार झाल्या आहेत.

पाश्चात्य देशात

पाश्चात्य देशात, अमेरिका, इंग्लंड इथेही संगीतोपचारांचा अभ्यास सुरू आहे. विद्यापीठामध्ये पाठ्यक्रम, पदवी, पी.एचडी., देशापातळीवरील संघटना अशा मार्गाने तिथे अभ्यास चालतो. त्यांचा भर मानसोपचारावर आहे. सध्याच्या संशोधनानुसार पारंपरिक उपचारांना संगीतोपचारपूरक समजले जातात, त्यावर संशोधन सुरू आहे.

रागांची संख्या असंख्य असून प्रत्येक रागाचे गुणावगुणही खूप आहेत. त्यामुळे एखाद्या विशिष्ट रोगाशी एखादा राग जोडला जाऊ शकत नाही. एका प्रयोगात हृदय रोग्यांचा रक्तदाब, हृदयाची हालचाल आणि चिंता यावरील संगीताचा प्रभाव अभ्यासण्यात आला; पण निष्कर्ष आशादायक नाहीत. अभ्यासकांनी नोंदवले की, रुग्णांच्या मनोविकारावर संगीताचा प्रभाव दिसला नाही. संगीतोपचारांच्या गुणवत्तेचे पुरावे मजबूत नाहीत आणि नैदानिक महत्त्व स्पष्ट नाही. नैराश्य कमी करणे, प्रेमिकांना अधिक आकृष्ट करणे आणि धार्मिकास अधिक धार्मिक करणे यावर आपण संतुष्ट आहोत, असेही काही संगीतोपचार तज्ज्ञांनी म्हटले आहे.

एकूणच, विज्ञानाच्या कसोटीवर न घातलेल्या, ठोस निष्कर्ष नसलेल्या, अत्यंत बाल्यावस्थेत असलेल्या, ठिसूळ गृहितकांवर आधारित ही नवीन रोगनिवारक थेरपी पाठ्यक्रमात घालण्याने ‘सुडोसायन्स’मध्ये भर पडणार आहे.

पुराणकथांचा वैभवशाली इतिहास समजणारे राज्यकर्तेअशा पाठ्यक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या शतकात नेणार आहेत, हे समजत नाही.