औरंगाबाद शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर शेंद्रा नावाच्या गावात दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या पंचमीला मांगीरबाबा देवस्थानच्या नावाने यात्रा भरते. येथे पाच ते सात हजार कोंबड्या, बकरांचा नवस फेडण्याच्या नावाने बळी दिला जातो. काही भाविक तर नवस फेडण्यासाठी आपल्या कमरेला गळ (चार मिलिमीटर जाडीचा लोखंडी आकडा) टोचून घेतात आणि विशेषतः कमरेतून गळ काढल्यानंतरही रक्त निघत नाही. कारण मांगीरबाबा नवसाला पावतो. अशी अडीचशे वर्षांची अनिष्ट परंपरा आहे. महाराष्ट्र अंनिसने मातंग समाजाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनेकदा याबाबत प्रबोधन केले, पत्रके वाटले, जिल्हाधिकार्यांना निवेदने दिलेत; पण हा समाज ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता आणि रक्त का निघत नाही, याचा कार्यकारणभाव देखील सापडत नव्हता. म्हणून एक वर्षी तो गळ तेथून आणला. त्याचा अभ्यास केला. अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली; पण रक्त न निघण्याचे कारण समजत नव्हते. अखेर तो गळ मीच माझ्या कमरेला टोचून घ्यायचा निर्णय घेतला.
हजारोच्या संख्येने आलेल्या भाविकांसमक्ष अशी कृती करणे म्हणजे संकटाला सामोरे जाणे, हे खुले आव्हान होते. म्हणूनच मी वेषांतर करायचे ठरवले. माझी ओळख म्हणजे माझ्या डोक्यावरील केसांची ठेवण हे मला माहित असल्याने सर्वप्रथम डोक्यावरील केस कापले. मिश्या कापल्या. अंगात नेहरू शर्ट व पायजमा घातला. पायात तुटकी चप्पल व डोळ्यावर भिंगाचा चष्मा परिधान करून ग्रामीण व्यक्तीची वेशभूषा केली. सामाजिक कार्य महाविद्यालयातील एका तरुणीला (जी माझी मुलगी वाटत होती) साडी नेसवून पत्नी या नात्याने माझ्यासोबत घेऊन दिनांक 9 एप्रिल 2004 रोजी माझ्या कमरेत गळ टोचून घेतला आणि काय माझ्याही कमरेतून रक्त निघाले नाही..!!
ज्याप्रमाणे इंजेक्शनची सुई किंवा जखमेवर टाके घालण्याची सुई जशी टोकदार, अनकुचीदार अन गुळगुळीत असल्याने शरीरात एखाद्या विशिष्ट ठिकाणी टोचल्यावर रक्त निघत नाही. त्याचप्रमाणे तो गळ अनकुचीदार, टोकदार व गुळगुळीत केलेला असतो. कमरेत चरबीचे प्रमाण अधिक असते. मानवी त्वचा ही लवचिक असल्याने तो गळ जसा कमरेतील त्वचेमध्ये खुपसला जातो, तसाच मागे उपसून काढला जातो. त्यामुळे गळ टोचल्यावर तेथील त्वचा ताणते आणि काढल्यावर पुन्हा पूर्वरत होते आणि म्हणून रक्त निघत नाही. अखेर हा त्यामागील कार्यकारणभाव शोधण्याचा आनंद मिळाला. पत्रकार परिषद घेऊन सत्यता सांगितली. वृत्तपत्रांनी प्रसिद्धीही चांगली दिली होती. त्यामुळे गळ टोचण्याचा प्रकार बर्यापैकी कमी झाला होता; पण पूर्णत: बंद झाला नाही.
अखेर परभणी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्तेगणपत भिसे यांनी त्याबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेला यश मिळाले. अडीचशे वर्षेचालत आलेली ही अघोरी प्रथा अखेर बंद झाली आहे. ‘ही यात्रा सुरू असताना गळ टोचण्याचा प्रकार घडल्यास मांगीर बाबा देवस्थानच्या विश्वस्थ मंडळासह पोलिसांना सहआरोपी करण्यात येईल’, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे यात्रा चालू असताना पोलीस निरीक्षक पदाच्या एक किंवा अनेक अधिकार्यांची नियुक्ती करावी, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. गळ टोचून घेणार्या भाविकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार होते. त्यामुळे यावर्षी पोलिसांनी न्यायालयाचा निर्णय अमलात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
उच्च न्यायालयाने यात्रा सुरू होण्यापूर्वी प्राधान्याने या प्रकरणाची सुनावणी करून अंमलबजावणीचा अहवाल मागविला होता. त्यामुळे ही प्रथा थांबविण्यात यश आले आहे.
–शहाजी भोसले
संपर्क ः 9422212557