विविध प्रकारच्या अनिश्चितता घोंघावत असतात रोज आपल्या मनोविश्वात… कामावर, ऑफिसमध्ये गेलेला आपला नवरा सुखरूप रात्री घरात परत येईल का? त्याचा कुठे काही अॅक्सिडेन्ट वगैरे होणार नाही ना? नोकरी टिकेल का? उद्योगधंद्यात तोटा ओढवेल का? आईला /वडिलांना हार्ट अटॅक आला तर किंवा लकवा मारला तर? नोकरी गेली तर? बायकोचं बाळंतपण सुखरूप होईल का? भावाचं, बहिणीचं लग्न जुळेल का? टिकेल का?
आज नाचणार्या बागडणार्या आपल्या मुलांना काही असाध्य आजार, अपघात झाला तर? मुलं यशस्वी होतील का?
अशा या अनिश्चिततांचा सामना करत जीवन जगण्याचं धैर्य आपल्यापैकी बहुतांशजणांमध्ये नसते आणि म्हणूनच आपण जे-जे केल्याने आपल्यावरची अरिष्टे ओढवणार नाहीत, अशी आपली ‘शास्त्र’ या गोंडस नावाखाली समजूत घालून दिली गेलेली असते, ते-ते सर्व बिनबोभाट, कोणताही तर्क न लावता करत राहतो.
मग अजूनही जन्मानंतर पाचवी पुजली जाते, सटवाई आपलं नशीब लिहिते, असं म्हणून बाळाला तिच्या पायावर घातलं जातं, मुहूर्त पाहूनच सगळं केलं जातं. आपण वास्तुशांत करतो, लग्न जुळवताना मंगळ-बिंगळ असेल तर शांती करतो, अकाली मृत्यू येऊ नये म्हणून कालसर्पयोगाची शांती करतो. सुशिक्षित कुटुंबेही या ‘शास्त्र असतं ते’ या युक्तिवादापुढे सपशेल माघार घेतात.
लहानपणापासून देवदेवतांच्या बाबतीत अनेक गोष्टी सांगितल्या जातात, त्यातील एक उदाहरणादाखल …
अमुक एक देव, त्याच्या वाहनावरून जाताना खाली पडला आणि ते पाहून चंद्रदेव हसला आणि त्यामुळे त्याला शाप दिला गेला की त्याच्या उत्सवाच्या वेळी चंद्र पाहिल्यास चोरीचा खोटा आळ येईल…
पण, आता तर तिसरी-चौथीतल्या मुलांनाही ‘चंद्र’ हा कोणी देव नसून दगड-धोंडे, माती असलेला पृथ्वीभोवताली फिरणारा तिचा उपग्रह आहे, हे माहीत आहे आणि माणसं चंद्रावर जाऊन देखील आली, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. साध्या दुर्बिणीतूनही आपण चंद्राचा खाच-खळग्यांचा पृष्ठभाग व्यवस्थित पाहू शकतो, तरीही…
तरीही आपलं धाडस होत नाही प्रश्न विचारण्याचं, होत नाही धाडस त्या दिवशी चंद्राकडे पाहायचं. कारण ‘शास्त्र असतं ते,’ अशी आम्हाला घातली गेलेली दहशत… आम्ही सांगतो तसे न वागल्यास फार काहीतरी विपरीत घडेल, ही पिढ्यान्पिढ्या आपल्याला घातलेली भीती…
ही भीती आपला ‘देव’ हा समज सतत जागृत ठेवते.
बाकीच्या धर्मांमधील प्रथा मला माहीत नाहीत फारशा; पण तिथेही असंच अंधानुकरण, असाच भीती घालण्याचा प्रकार होत असावा.
शिक्षण घेऊनही, मूलभूत विज्ञान शिकूनही केवळ प्रवाहाविरुद्ध कशाला जा? ज्येष्ठांची, घरातल्या म्हातार्या-कोतार्यांची मने कशाला दुखवा, म्हणून बरेच जण पटत नसलं, तरी बर्याच प्रथा, अंधश्रद्धा पाळत राहतात. पटत नसलं तरी, कशाला विषाची परीक्षा? एवढ्याने काय होतंय? असाही भाव असतो यामागे…
आपण कुठलाही तर्क कधीसुद्धा लावूच नये, अशी इथली व्यवस्था करून ठेवली आहे. कित्येक कथांमध्ये, व्रतांमध्ये उतले-मातल्यास कोप होतो; मग अडचणी येतात, क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊ शकते, अशी भीती घातली जाते. त्यामुळे आपल्या कुटुंबवत्सल बायका करत राहतात उपवास-तापास आणि होतात अजूनच अशक्त.
खरं पाहायला गेलं, तर अकाली मृत्यू देव-देव करणार्यांच्याही घरात होतात आणि न करणार्यांच्याही… सगळं शास्त्राप्रमाणे साग्रसंगीत करणार्यांच्याही जीवनात, संसारात, अडीअडचणी येतातच.. त्याला प्रत्येकालाच सामोरं जावं लागतं, भिडावं लागतं. ‘देव’ नावाच्या संकल्पनेमुळे थोडा धीर येतो म्हणा संकटांना सामोरं जायला; पण ही pseudo security असते.. ‘लुटूपुटूचा खोटा आधार’ म्हणता येईल. देव-देव करणार्या, आध्यात्मिक वर्तुळात असणार्या कित्येक स्त्रिया आणि पुरुषही औदासिन्याने (depresion) ग्रासलेले मी पाहिलेले आहेत.
प्रश्न पडायला हवेत.. मला पडतात
पोटातला गर्भ अगदी तीन-चार मिलिमीटरचा असतो तेव्हापासून त्याच्या हृदयाची धडधड सुरू होते… आम्ही रोज सोनोग्राफी करताना पाहतो ते, ती धडधड; ते स्पंदन पाहिलं ना की, मनाला प्रश्न मात्र पडतात, या सर्व केवळ रासायनिक प्रक्रिया नाहीत, यावर अजून संशोधन व्हायला हवं. विज्ञान अशा प्रयत्नात असते.
प्रत्येक जीवाला आपली गुणसूत्रे पुढे ट्रान्सफर होत राहावी म्हणून प्रजननाची बुद्धी देते, आपलेच genes पुढे propogate व्हावे असे का बरं वाटतं सजीवांना? बघा ना, झाडे आकर्षक रंगांच्या फुलांमधून परागीभवन कीटकांमार्फत घडवून आणतात, फळे खाऊन प्राण्यांनी टाकलेल्या बियांमधून पुनरुत्पादन होते. हे सगळं इतकं परस्परावलंबी कसं? का?
हा विश्वाचा, ब्रह्मांडाचा अफाट पसारा, सूर्य, त्याभोवतालचे ग्रह, त्या अब्जावधी आकाशगंगा, प्रचंड ऊर्जा असणारे ते महाकाय तारे, ती कृष्णविवरे, ते प्रसरण पावत जाणारं युनिव्हर्स, सगळं एक-एक करत उलगडत चाललोय आपण; पण कितीही उलगडलं तरी न उलगडलेलं काही राहणारच… त्याच्यापल्याड काय? प्रश्न राहणारच.. पण त्यांची उत्तरेसुद्धा भविष्यात मिळतील.
आता जिवंत असलेल्या, पूर्वी मरून गेलेल्या करोडो-अब्जो लोकांमध्ये कोणत्याही दोनचे हाताचे ठसे जुळत नाहीत, चेहरे जुळत नाहीत. वाघ, सिंह, गाय, बैल, बकर्या, मांजरे, कुत्री एकसारखी दिसतात; पण माणसं नाहीत दिसत… हे गुणसूत्रांच्या (genes) permutations आणि combinations मुळे होतं हे खरं; पण त्यात कुठेच repetition नाही, हेही आश्चर्यकारक वाटतं. अध्यात्मवादी अशा गूढापाशी थांबतात आणि मग विविध धर्म, ही त्यांच्या-त्यांच्या देवाची लीला आहे, असे समजून त्यांचा-त्यांचा देव लोकांच्या माथी मारतात.
आणि निरर्थक आरत्या गाऊन, निरंजन ओवाळून, उदबत्त्या लावून आपण कुठल्या तरी देवाशी ‘कनेक्ट’ होतो आणि तो आपल्या सर्व इच्छा, गार्हाणी ऐकून घेतो आणि त्यावर अॅक्शन घेतो, हे कोणीही objectively सिद्ध नाही करू शकलंय आजपर्यंत… subjective अनुभव कसे ग्राह्य धरणार? हे असे अनुभव म्हणजे मानसिक दुर्बलता असल्याचेच लक्षण असते बर्याचदा. तुमचं विज्ञान जेथे संपते, तेथे अध्यात्म सुरू होते, असं अध्यात्मवादी म्हणतात; पण विज्ञान कधीही थांबत नाही. नवी गूढे आव्हान समजून संशोधन चालू राहते. म्हणून अध्यात्म जेथे संपते तेथे विज्ञान सुरू होते, हेच खरं आहे.
देवाची, धर्माची भीती आहे म्हणून गुन्हे, स्वैराचार कमी आहे या युक्तिवादात काही अर्थ नाही. तुरुंगात गेल्यास 99 टक्के कैदी आस्तिक आणि देव-देव करणारे असतात, फ्रॉड करणारे तर भयंकरच देवभक्त असतात. पण आपल्या लोकांना नवीन देव, नवीन कर्मकांडे हवीच आहेत, दुःख विसरण्यासाठी, हतबलता विसरण्यासाठी असं वाटतं. त्या टीव्ही नावाच्या ‘इडियट बॉक्स’मधून तर सतत अवैज्ञानिक गोष्टींचा भडिमार अध्यात्माच्या नावाखाली होत असतो.
अध्यात्म भावनिक कोलाहलात थहळींश पेळीश म्हणून काम करतं, काही अंशी हे खरेही आहे, मग आक्षेप का ? देव म्हणजे आपल्या मनावर बिंबवली गेलेली काही प्रतीकं… ती हळूहळू आपली श्रद्धास्थानं होतात. हळूहळू प्रतीकांवरच्या श्रद्धा टोकदार होऊ लागतात, त्यांचा इतरांना त्रास होऊ लागतो; मग ते रात्रंदिवस लाऊड स्पीकरवर चाललेली कीर्तने, पारायणे असोत की, रहदारीच्या रस्त्यांवर थाटलेली भव्य प्रतीकं असोत; स्वतःच्या आयुष्यात काहीही कर्तृत्व न गाजवू शकलेला कोणीही उपटतो, स्वतःला साक्षात्कार वगैरे झाल्याची बतावणी करतो, स्वतःला बाबा, महाराज, गुरू म्हणवतो, गोड-गोड शब्दात तत्त्वज्ञान घुसळून सांगतो, मोठाले आश्रम, मठ बांधतो आणि आपल्याला व्यवस्थित उल्लू बनवतो. अलिकडे तर फार हाय-फाय बुवा उपटलेत, ते छद्मविज्ञानाच्या आधारे कोणालाही सहजपणे आपले भक्त बनवतात. या विषयावर खूप-खूप प्रबोधन, विचारमंथन होणं गरजेचं आहे; पण जी कोणी थोडीथोडकी माणसे असा प्रयत्न समाजहितासाठी करत आहेत, त्यांना अगदी चाणाक्षपणे शोषणकर्ते, संस्कृतीवरील घाला घालणारे, संस्कृतीबुडवे म्हणून लेबल लावताहेत, त्यांच्या विरुद्ध आवई उठवताहेत आणि आपली भाबडी जनता त्याला खरं मानतेय.
त्यात पुराण, वेद-बिद जसे सर्वसामान्यांना फारसे कळणारे नव्हते, तसाच प्रकार आपल्या पुरोगामी लेखनांबाबतही व्हायला लागलाय. आपण जनतेशी ‘कनेक्ट’ होण्यामध्ये कमी पडतोय. आपण आपले विचार साध्या किंवा बोलीभाषेत मांडता येतात का बघूया. कधी-कधी एखादं वाक्य, एखादी कविता, एखादा लेख, एखादं पुस्तक, एखादा पिक्चर जीवनच बदलवून टाकू शकतो. साहित्य तर समाजाचं भविष्य घडवू शकतं. सैद्धांतिक, तात्त्विक असे शब्द सर्वसामान्यांच्या पार हातभर डोक्यावरून जाणार असतील तर असे लिखाण करणं म्हणजे फक्त आपल्या बुद्धीचा किस पाडणं होतं; पण हवा तसा परिणामकारक बदल घडत नाही. हा वाद, ते ‘इजम’ हे सर्वसामान्यांना कळत नसतं, सगळ्याच सुशिक्षितांनाही साहित्यिकांची अवजड अलंकारिक भाषा कळते असं नाही. सोशल मीडियामधून आपण या शोषणाविरुद्ध प्रभावीपणे लढू शकतो.
मोठ्यांचे विचार बदलवणे अवघड असते म्हणून आपण मुलांमध्ये प्रबोधन करू, असे म्हणतो; पण शाळेत एखादा अंनिसचा कार्यक्रम करून पोरगं येतं आणि आई त्याला रात्री म्हणते, ‘जा, जरा त्या शेतातल्या म्हसुबाला नारळ फोडून, दामटा टाकून ये,’ पोरानं तर्क लावून ‘कशासाठी?’ म्हणून विचारलं की त्याला पाठीत एक धपाटा मिळतो आणि ‘गप सांगितलंय ते कर, लै शाना लागून गेलास, शास्त्र असतंय ते,’ अशी उत्तरे आईकडून मिळतात आणि तोही मोठ्ठा झाल्यावर हाच कित्ता गिरवत त्याच्या पोराच्याही पाठीत धपाटा घालत म्हणतो, ‘चूप, शास्त्र असतं ते!’
अजून या प्रवाहात लोक यावे, असं प्रत्येक प्रवाहाला वाटत असतं; पण त्यामागे केवळ जनहित हाच हेतू असावा, श्रेष्ठत्व गाजवण्याची, हीन लेखण्याची, आमचंच सगळं बरोबर अशी वृत्ती असू नये, कट्टरपणा नसावाच; पण मताचा, तत्त्वांचा आग्रह तरी असावाच. स्त्रियांची तर ज्ञानाची भूक मरूनच गेलीय, या कर्मकांडाच्या पसार्यात, व्यापात; मग त्या मुलांना काय ज्ञानाची शिदोरी देणार? कशी मिळणार मुलांना निरक्षीर विवेकी बुद्धी? स्त्रियांना नास्तिक, निधर्मी होऊन जगणं फार-फार अवघड आहे. नाती सांभाळावी तर तत्त्वांना छेद जातो, तत्त्वांशी ठाम राहावं तर नात्यांना तडा जातो.
या जगाला आपण सर्वांत सुंदर भेट देऊ शकतोे ते म्हणजे नवीन संशोधन; मग ते कुठल्याही क्षेत्रात असू दे. या कर्मकांडाच्या जंजाळात मुलांनी न फसता संशोधनात वेळ घालवावा, त्यामुळे मानवी जीवन अधिक सुसह्य होईल. देव तर युगे नि युगे आहेत म्हणे; पण आपलं जीवन खरोखर कशाने सुसह्य झालंय, याबद्दल जरा नीट विचार करा. आज ज्या प्रकारचे जीवन जगतोय ते इलेक्ट्रॉनिक्स क्रांती, वैद्यकीय क्रांतीमुळे इतकं सुसह्य झालंय; पण आपल्याकडे संशोधनासाठीचे प्रयोग करून बघणे ही वृत्ती निर्माण केली जात नाही. शाळेतल्या प्रार्थनासुध्दा ‘सर्वात्मका, शिवसुंदरा’ या टाईपमधल्या मुलांवर दैववादी संस्कार लादणार्याच असतात. हे बदलायला हवं. असं वातावरण निर्माण करायला हवं की, ठामपणे, निर्भयपणे पुढची पिढी म्हणताना दिसायला हवी…
‘होय, आम्हाला खूप प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं हवीतच.’
‘होय, आम्हाला शास्त्राच्या नावाखाली शोषण मान्य नाही.’
‘होय, आम्ही ‘कळप मनोवृत्ती’ झिडकारतो’
‘होय, आम्हाला सगळंच जुनं ते सोनं हे मान्य नाही… म्हणून आम्हाला तुम्ही सांगितलेला देव मान्य नाही. माहीत नसणं याचे दुसरे नाव देव. विज्ञान इथे थांबत नाही, ते प्रश्नांना भिडते व सृष्टीचा योग्य कार्यकारणभाव निरंतरपणे शोधण्याच्या प्रयत्नात राहते. विज्ञानपूर्व कालात विविध समाजाने निर्माण केलेल्या विविध देवता आणि विविध धर्म जगात अराजकाला निमंत्रण देतात. ते अहंकारी असतात. परस्परांविरोधात लढतात. असे देव आणि असा धर्म आम्हास मान्य नाही. मानवता हाच खरा धर्म आणि सत्याचा शोध, हाच खरा धर्म.’
‘होय, आम्ही नास्तिक आहोत, निधर्मी आहोत.’
नास्तिकता जीवन अधिक समृद्ध, अर्थपूर्ण करते, हे मात्र नक्की (स्वानुभावावरून)… आणि अजून एक, अस्तिकांना वाटतं तसे नास्तिक ‘अहंकारी’ नसतात, ते अधिक विवेकी, बुद्धिमान आणि संवेदनशील असतात, ते सत्यशोधक असतात.