कोर्या साडीचा गंध लिंबाचा गंध भंडार्याचा गंध फुलांचा
गंध कडू हिरवा गोड सफेद तुरट पिवळा घमघम
कळना नाकाला काई येगयेगळ
आज्जीन आंघोळ घाटलीती उष्ण उदकानं
जसा सूर्यच ओतायलीती अंगावर
निस्त्या वाफांनी धुकं भरतेल दगडी न्हाणीत
जसा भिंतीना पाझर फुटल आत्ता, पण नही फुटला
लिंब बांधलाता वल्या आंगाला देवासमूर
केसांचा आंबाडा नारळायेवढा, आंबोली, जाईजुईचे गजरे
मस्तकावर लिंब तोंडात लिंब कपाळावर भंडारा आणि कोरी साडी
सोन्याची जरकाडी चमचम मातेचा घोष उदे उदे
जीभ कडू नेत्र तिखट पिवळ्या धुक्यात मातेचा घोष उदे उदे
बाशिंग न मुंडोळ्या चकचक झकझक चौंडक वाजतेलं उदे उदे
सुपात तांदूळ तांदळात खंजीर खंजीराला पटका पटक्यावर बाशिंग
आणि मुंडोळ्या चकचक झकझक चौंडक वाजतेलं उदे उदे
मोरपिसांचे नेत्र गरगर फिरतेले रंग हिरवा जांभळा पारवा
झळझळ टाक टाकावर कुंकू लाल लाल भडक
बगतेली देवी चांदीच्या नेत्रांनी टकमक टकमक
फिटतेला आंतरपाट मस्तकावर पिवळ्या आक्षदांचा सपसप मारा
पिवळ्या आंधाराचे लपके पडतत खालती
त्याचे शिंतोडे उडतत नेत्रांत उडतत उजेडात दिसतेली नही देवी
दिसतेला नही सुपातला खंजीर दिसतेलं नही भिन्नटलं बाशिंग उदे उदे
अकरा वर्षाची वेदिकानवरी लाख वर्षाचा खंजीरनवरदेव उदे उदे
पिवळ्या आंधाराचे लपके पडतत खालती लपालप लपालप
– ‘गावनवरी’ या वेदिका कुमारमुर्ती यांच्या पुस्तकातून….
वेदिका कुमारस्वामी यांच्या काव्य आविष्कारामुळे हे पुस्तक एक विचार करायला भाग पाडणारे, अंतर्मुख करणारे झाले आहे. ही तशी एका स्त्रीच्या आणि तेही एका देवदासीचे अमानुष जीवन वाट्याला आलेल्या स्त्रीच्या दु:खाची कहाणी आहे. तशीच ती स्त्री जातीच्या दु:खाचे, अन्याय, अत्याचाराची प्रतिनिधित्व करणारी कहाणी आहे. या कवितासंग्रहात येणार्या प्रत्येक स्त्रिया काही ना काही कारणांनी शोषित, अत्याचारित आहेत; मग त्या उच्च जातीतील असोत अथवा देवदासीसारख्या खालच्या जातीतील.
‘गावनवरी’ हा वेदिका कुमारस्वामी (टोपण नाव) यांचा आत्मचरित्रात्मक कवितांचा संग्रह आहे. देवदासी प्रथेच्या बळी ठरलेल्या वेदिका कुमारस्वामी यांनी आपल्या जीवनात घडलेल्या घटनांच्या संदर्भात हे आत्मचरित्रात्मक काव्य लिहिले आहे. नुकत्याच अकाली निधन पावलेले कादंबरीकार, कवयित्री कविता महाजन यांनी या काव्यसंग्रहाचे संपादन केले आहे. कदाचित त्यांचे हे शेवटचे संपादन असावे. या संपादनाबरोबरच त्यांनी या काव्यसंग्रहात ‘देवदासींचे वास्तव’ या शीर्षकाखाली एक दीर्घ संशोधनात्मक लेखही लिहिला आहे. देवदासी प्रथेच्या उगमापासून आत्तापर्यंतची या प्रथेची वाटचाल त्यांनी या लेखात अधोरेखित केली आहे. तसेच अश्विनी देवेगौडा-देशपांडे यांचा ‘गावनवरी’ काव्यसंग्रहाची समीक्षा करणारा एक उत्कृष्ट लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या दोन्ही लेखांमुळे आणि वेदिका कुमारस्वामी यांच्या काव्य आविष्कारामुळे हे पुस्तक एक विचार करायला भाग पाडणारे, अंतर्मुख करणारे झाले आहे. ही तशी एका स्त्रीचे आणि तेही एका देवदासीचे अमानुष जीवन वाट्याला आलेल्या दु:खाची कहाणी आहे. तशीच ती स्त्री जातीच्या दु:खाचे, अन्याय, अत्याचाराची प्रतिनिधित्व करणारी कहाणी आहे. या कवितासंग्रहात येणार्या प्रत्येक स्त्रिया काही ना काही कारणांनी शोषित, अत्याचारित आहेत; मग त्या उच्च जातीतील असोत अथवा देवदासीसारख्या खालच्या जातीतील.
आपल्या वेदनेचा, अत्याचारांचा अर्थ लावताना कवयित्री कुठलेही पूर्वग्रह बाळगत नाही किंवा ऊरबडवेपणा करून त्याचे भांडवल करीत नाही. काळ्या आणि पांढर्या रंगात ती समाजवास्तव चितारत नाही; उलट वाळवंटातील ओयासिसप्रमाणे माणुसकीचे झरेही या भीषण वास्तवात आपल्याला दिसून येतात. आपल्यासाठी न्याय शोधताना कवयित्री कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेते. अखेर परिस्थिती, त्या वेळचे समाजजीवन धार्मिक रुढी, चाली-रीती याच कशा यासाठी जबाबदार आहेत याकडे बोट दाखवते. आणि ही काही फार जुनी कहाणी नाही, अगदी आजही अस्तित्वात असेल अशी कहाणी आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक कवयित्रीने अर्पण केले आहे देवदासी समाजातील पहिली आय. ए. एस. असलेल्या मुथम्माला. म्हणजे शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे, असे कवयित्रीला सुचवायचे आहे. तसेच पुस्तकाच्या सुरुवातीला संत सोयराबाईचा अभंग आहे. ज्यामध्ये संसाराच्या सुखाला ढगांच्या सावलीची उपमा दिली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणापूर्वी बसवेश्वरांची वचने उद्धृत केली आहेत. बसवेश्वर हे स्त्रीमुक्तीचे प्रणेते होते. त्यांच्या वचनातील अर्थ कवयित्रीच्या काव्यात्मक निवेदनात आहे. त्यामुळे या कविता वेगळ्या उंचीवर जातात. कवितेची सुरुवात होते, ती एका खुनापासून….कोणाचा खून…
हेगडे मला म्हणतेला, रांडे तुझी अवकात काय्यें
हेच मला आठीवलं सेम प्रश्न
आज्जीला तिच्या नवर्यानं विचारलाता
सेम प्रश्न अम्माला पुजार्यानं विचारलात
इथे हेगडे आणि पुजारी उच्च जातवर्गाचे आणि धर्मसत्तेचे आणि पुरुष सत्तेचे प्रतीक आहेत. पण ही पुरुषसत्ता केवळ आर्थिक, धार्मिक, जातीय नाही. कारण कवयित्रीच्या आज्जीलाही तिच्या नवर्याने हाच प्रश्न विचारला होता; किंबहुना प्रत्येक स्त्रीला कुठलाही पुरुष हाच प्रश्न विचारत असतो की, तुझी औकात काय? म्हणजे जात, वर्ग, धर्म आणि पुरुषसत्ता असा हा मिलाफ आहे, स्त्रीविरुद्ध उभा ठाकलेला. या गोष्टी सुट्या-सुट्या नाहीत तर परस्परांना बळ पुरविणार्या आहेत. स्त्रीशोषणाविरुद्धचा लढा असा सर्वांविरुद्ध व्यापक आहे. कवयित्री पुढे म्हणते,
हेगडे उभा आहे माझ्या बेचक्यात
हेगडेला कळत नही माज्यातून उठून कुठे जावं
मला कुठे जावं हा प्रश्नच नाही
एकदा देवाच्या गळ्यात बांधलं की सर्वेप्रश्न
मिटतेत घट्ट
रस्ता उरत नाही बेचकी उरते
हेगडेने सत्तेच्या जोरावर कवयित्रीची आज्जी, नंतर तिची आई या सर्वांशी उपभोगाचा व्यवहार केलेला असतो. आता तो म्हातारा असूनही तरुण कवयित्रीचा भोग घेत असतो आणि या खेळातच तो मरेल अशा पद्धतीने कवयित्री त्याला मारते. तो मरतो. देवदासी झाल्यावर काय अवस्था वाट्याला येते, हे कवयित्री वरील कडव्यात व्यक्त करते. फक्त उपभोगाची वस्तू एवढेच तिचे अस्तित्व उरते. हाच धागा पुढे नेत कवयित्री म्हणते,
हेगडेचे प्रेत मी कोण्हच्या डोंगरावरतून दरीत फेकू ?
कि मुंग्या लागायच्या आधी खाऊन घिऊ भात ?
काय आसतेत नियम
काय आसतेत कायदे
देवाला वाहिलेल्यांना कायदे लागू असतात काय ?
वरील कडव्याच्या अखेरच्या ओळीत देवाला वाहिलेल्यांना कायदे लागू असतात काय, असा प्रश्न कवयित्री समाजास विचारते त्याचे उत्तर अर्थातच कोणाकडे नाही. अर्थात त्यांना कायदे लागू असतात; पण ते वेगळे अलिखित. उदा. कवयित्रीला शाळेत जाण्याची इच्छा असते, ती आज्जीकडे, तिच्या अम्माकडे खूप आग्रह धरते. पण त्या दोघीही तिला शाळेत पाठवायला तयार होत नाहीत. कारण त्यांच्याकडे वेश्या म्हणूनच पहिले जाते, तेव्हा तिला शाळेत कोण घेणार? कवयित्री त्याचे वर्णन करते पुढील शब्दात,
शेवटी भुणभुणीला कंटाळून आज्जीने नेलंत उचलून तर
शाळेतले सर्वेसर म्याडम चुपचाप झालते
छत धप्पकन डोक्यावरती
पडल्यासारके
हेड्सर आज्जीला म्हणतेले रागावून की, घरी जा !
किती मुलं–मुली म्हणत व्हती प्रार्थना रांगेत मला रांगच नव्हती
मी कधी म्हणतीली नही प्रार्थना
तरी मला पाठ आहे….भारत माझा देश अहे अजून
देश असूनही तो नसलेल्या करोडो जनतेची वरील ओळ जणू स्वगतच आहे. त्या शाळेत एक लता म्याडम होत्या. त्या मग घरी आल्या आणि मी वेदिकाला शिकवते म्हणाल्या, त्यांनी आज्जीला विचारले कोणत्या भाषेत शिकवू?
लताम्याडम म्हणतेल्या आज्जीला की, कोण्हत्या भाषेत
शिकवायचे वेदिकाला?
आज्जी हासती निस्ती… म्हणती, कोण्हच्या भाषेला
गिर्हाईक अहे जास्ती? चांगल्या शिरीमंत गिर्हाईकाच्या
भाषेत शिकीव माज्या नातीला !
आज्जीचा दृष्टिकोन स्पष्ट व्यवहारी. इथेही चांगले गिर्हाईक मिळण्यासाठी श्रीमंताच्या म्हणजे इंग्रजी भाषेत शिकवायला सांगते आज्जी.
लहान असताना खूप भाषा येताल्यात म्हणतेल्या लता म्याडम
मोठेपणीच्या भाषा दोनच; येक देहाची, दुसरी पैशाची
इथे अगदी सहजपणे स्त्रीजातीचे दू:ख सांगून जाते कवयित्री. तिचे नाव वेदिका ठेवले जाते. त्याचीही मनाला चटका लावणारी कथा आहे. पुजार्याच्या बायकोला मुलगी होते. मुलगी झाल्यावर सतराव्या दिवशी तिचा आज्जा मरण पावतो. त्यामुळे पुजार्याची आई मुलीला अपशकुनी ठरविते व दुधाच्या घंगाळात बुडवून मारली जाते. त्या मुलीचे नाव ठेवलेले असते वेदिका. मग तेच नाव ठेवले जाते कवयित्रीला. कारण कवयित्रीची आई असते. पुजार्याची बायको देवीला वाहिल्यामुळे. मुलीला मारल्यावर पुजार्याच्या बायकोला रडूही दिले जात नाही. रडण्यावरही बंदी.
देवदासी झाल्यानंतरच्या आज्जीच्या दु:खाबद्दल कवयित्री लिहिते,
आज्जीला आठवतंत तिच्या मस्तकावरल्या जटा
आज्जीला आठवतेलं की, तिच्या ओकळीच्या येळी
भर रस्त्यानं कसं लिंब बांधून नागडं नाचवत नेयाचे तिला
हातात लिंबाच्या डहाळ्या निस्त्या बचावासाठी
रस्त्याच्या दोन्ही कडांनी आंगावर रंग आणि पाणी फेकतली पुर्ष
छातीला चिपकलेली वली साडी भुकेने बगणारे हज्जार नेत्र
किती नाचलं तरी सरायचा नाही मंदिराचा रस्ता
किती युग नाचायले, नाचत धावायले वाटे…. लाखो वर्षे!
वरील चार ओळीत कवयित्रीने देवदासीच्या दु:खाचा जो वेध घेतला आहे, जो हजार प्रबंध लिहूनही घेता येणार नाही. आज परंपरेच्या नावाने ओरडणारे आणि आपल्या धर्माच्या महान संस्कृतीचे गोडवे गाणारे अशा अमानुष परंपरेचा उल्लेखही करत नाहीत. जणू आपल्या धर्माची ही सडलेली बाजू त्यांना दाखवायची नसते. त्यामुळे आजवर दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, देवदासी यांची दु:खे फारशी कोणी मांडलेली नाहीत. कारण ही त्यांच्या महान संस्कृतीची आणि त्यांच्या कुकर्माची किडलेली दुर्गंधीत बाजू आहे. मग त्यांचा ‘धर्म, धर्म’ म्हणवून घेण्याच्याही लायकीचा राहात नाही.
आज्जी आणि कवयित्रीची आई देवदासी कशा झाल्या? आज्जीला मुलगी होते; मुलगा होत नाही. मग तिचा नवरा सवत आणतो. यल्लम्माला नवस बोलतो, ‘मुलगा झाला तर तुला मुलगी वाहीन,’ मुलगा होतो. मुलीला देवाला वाहिले जाते. मुलीबरोबर आज्जीही येते देवळात राहायला. सवतीचा मुलगा मतीमंद पण आज्जी त्याला पेसे पाठवत राहते. आपण मेल्यावर हा आपल्याला अग्नी देईल या भावनेने. धर्म डोक्यात कसा फिट्ट बसला आहे, याचे हे उदाहरण आहे. कवयित्री आज्जीला म्हणते-
आज्जीला मी म्हणतेले, आज्जी मी जाळलं तर
तुजं लाकूड जळायचं नही काय?
आज्जी म्हणतेली, लाकूड जळंल, पण माझा आत्मा
नरकात तळमळंल….
हित्त नरक, थित्त नरक मला कुठ स्वर्ग नूको का?
आपल्या समाजातील पुत्राची लालसा या धार्मिक भावनेवर टिकून आहे. जसा संपत्तीला वारस पुत्र लागतो, तसा अग्नी द्यायलाही पुत्र लागतोच. आजही धर्मभोळ्या लोकांच्या मनात ही भावना घट्ट आहे; मग ते शिकलेले असोत किंवा अडाणी.
हेगडे मरतो. त्याचा मुलगा सदाशिवआप्पा. तो असतो वेदिकेच्या प्रेमात आणि वेदिकाही त्याच्या प्रेमात. हेगडेचा मुलगा असला आणि जमीनदार असला तरी तो असतो साधा-सरळ, प्रेमळ असतो. पण बाप मेल्यावर त्याला लग्न करायला भाग पाडले जाते. वेदिका सोडून मला दुसरी नको असे म्हणत राहतो पण वंशाला दिवा पाहिजे असतो. मग तो म्हणतो, बायको करेन; पण वंशाचा दिवा लागल्यावर मी तिला स्पर्श करणार नाही. वेदिकावर त्याचे अफाट प्रेम. तो तिला मातंग पर्वतावर विरूपाक्षाच्या दर्शनासाठी घेऊन जातो. अखेरच्या रात्री तो वेदिकाला म्हणतो,
सदाशिवअप्पा म्हणतेला आखरीच्या रात्री मला
तू माझी आयी व्हती, माजी बायी झाली, आता तू माझी लेक व्ह्य
आईक माजं आणि शिक्षण कर …. धाव्वीची परीक्षा बाह्येरून दे
आभ्यास कर रोज… पास झाली तर
धाडीन म्हेसूरला कॉलेजात … म्हणतेला… किती वेळ तेच सांगणं
इथं प्रेमभावना सर्व काही ओलांडून निखळ मानवी होताना दिसते. सदाशिवआप्पा त्या भावनेचे प्रतीक बनतो. म्हणून वेदिका आपली प्रेमभावना व्यक्त करताना म्हणते,
त्या रातीपर्यंत मी कधीच कुणाला म्हणतेले न्हवते आप्पा
त्या राती म्हणतेली… आणि गाढ नीज लागली नेत्रांना
माझ्या नेत्रातील सगळा गुलाल मी उधळीन
त्याच्या लग्नाच्या वरातीत नाचताना
आजवरच्या अत्याचार आणि दु:खाचा सदाशिवआप्पा जणू वेदिकासाठी उतारा ठरतो. लग्नात रीत म्हणून तिला वरातीसमोर नाचायचे असते, भंडारा उधळायचा असतो. वेदिका आज्जीला विचारते-
आज्जीला इच्चारले, इत्का भंडारा कशाला
आपल्याच नशिबाला?
आज्जी म्हणतेली, आपल्या इतक्या जखमा
दुसर्या कोण्हाकडे हईत?
जखमांची हाक असते हाळदीला!
आपल्या जखमांना असतात हजार नेत्र
हजार नेत्रांना असतात पापण्या, कायम उघडे
दुनियेची दु:ख दिसत राहतात सारकी
म्हणून पाहिजे भंडारा
दु:खनाशाला.
लग्नात वेदिकाचे कपाळ कुंकवाने भरलेले असते. तेव्हा आजी म्हणते, “देवाची बायको कधीच विधवा होत नाही. देव नेहमी जिवंतच राहतो.” तेव्हा वेदिका आज्जीला म्हणते, “समुद्रमंथनातून अमृतालाही जुमानणार नाही, अशी विषाची वडी काढून देवाला ती देऊन मारून टाकला पाहिजे, देव मरून गेल्यावर त्याच्याबरोबर कोणीच लग्न लावणार नाही मुळीच. वेदिका दहावीत पहिल्या वर्गात पास होते; पण तिची आई तिला कॉलेजात जाऊ देत नाही. म्हणते, “कुठेही गेलीस तरी तुझा भूतकाळ तुझी पाठ सोडणार नाही.” पुढे आई आजारी पडते आणि मरते. सदाशिवआप्पाची बायको – जयंतीला – मूल होत नाही. ती आत्महत्या करते. तिच्या आत्महत्येनंतर वेदिकेसाठी सगळेच बदलते. तिच्या आत्महत्येला वेदिकेला जबाबदार धरले जाते. आज्जीला या भीषण भवितव्याची चाहूल लागते. ती वेदिकेला म्हणते,
आज्जीने तोंडावर हात दाबला गच्च आणि गप म्हणतेली
म्हणतेली, आता जयंतीचे भाऊ तुजे तुकडे करतील यिवून
बांध चटकन कापड….. दागिने, पैसे हाताशी आसल ते घ्ये
रातोरात पळ हितनं माज्याकडं बघू नको वळून
मादन्ना यील येशीपस्तोर… पुढे तुजी तूच तुला….
तेव्हापासंन
कारवार, पणजी, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर
पायाला चाकं नेत्रात भय मस्तकात राख दोन वर्षं.
वेदिकेच्या आयुष्याला वेगळे वळण लागते, सुखाचा शोध लागतो आणि तो असा हिरावला जातो. रात्री जयंतीचे भाऊ येतात आणि घराला आग लावतात. त्यांना माहीत नसते, वेदिका पळून गेली आहे. आज्जी नदीकिनारी जाऊन लपून बसते. घरात वेदिका असेल म्हणून सदाशिवआप्पा जळत्या घरात शिरतो आणि होरपळून मरतो. आज्जीला लोक शोधून काढतात आणि सर्वजण तिच्यावर बलात्कार करतात. तिला वेड लागते. आता वेदिकेला कोणीच नसते; पण बाहेरील जगाचा एकट्या स्त्रीसाठी असणारा सापळा असतोच. वेदिका लिहिते,
….. काय सांगावं कोण्हाकोण्हाला सांगावं का सांगावं?
सर्वेप्रश्न हिंडून हिंडून आखरीले यीवून पडतेत
थानं मांड्यांमध्ये
पुर्षांसाठी तितकंच खरं, बाकी काही नही.
माजं गाठोडं नेलं चोरानं जसं त्याचंच होतं
काय अहे माजं ? देह तरी अहे का माजा ?
येकेकान ओरबाडली कातडी चावलं मांस मोडली हाडं
रस्ता संपत नाही, थारा मिळत नही
माणूस गवसना येकही सर्वेकिडे, सरडे
पुरुषसत्तेवर असा सरळ घाव घालते वेदिका, अगदी अनुभवातून. या सगळ्या मांडणीत वेदिका बसवेश्वरांची शिष्या अक्कमहादेवीचे संदर्भ देते. तिने तिच्या काळात पुरुष सत्तेला कसे ठोकरले, याचे दाखले देते. पुरुषसत्तेबद्दल वेदिका लिहिते,
वाघ आला तर चिरकतेत माकडे
नाग आला तर वरडतेत पाखरं
सावध करतेत की हितं धोका अहे बायी
जावू नही पुढं मागं हालू नही इकडं तिकडं
पण पुर्षेआली तर सावध कोण्ह करतेलं?
माणूसच आसतेलं माणसाचं खरं सावज ह्ये कोण्ह जाणतां सांगतेलं ?
या प्रवासात तिला भीमाक्का भेटते, आसरा देते, तत्त्वज्ञान सांगते.
भीमाक्का म्हणतेली की, याच प्रीथ्वीवर स्वर्ग
याच प्रीथ्वीवर नरक!
मरणानंतर राहतेली निस्ती राख थोडी हाडं
आत्मागीत्मा नसते काई आणि प्रेम हृदयात नही
मस्तकातल्या मेंदूत राहते.
भीमाक्काचे ऐकून वेदिका संभ्रमात पडते. आज्जीचे खरे की भीमाक्काचे. ती विचार करू लागते,
कुठून आलतो कुठं जाणार, सगळ्यांचा पत्ता सेम आसतो
आधी आभाळाखालती मग जमिनीखालती
एकदम इहवादी तत्त्वज्ञान भीमाक्काच्या – अनुभवांतून आलेलं; पण तिथंही वेदिकावर भीमाक्काचा नवरा जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो. मग तेही घर सुटते… वेदिका लिहिते,
उघड्या जखमांची घीण यावी, तशी माणसांची घीण आली होती
माणसं जखमाच आहेत प्रीथ्वीच्या
असंई वाटलंत
माणसाचा आवाज नुको, वास नुको, स्पर्श नुको
चव नुको माणसायची कडू–खारट–तिखट
नजरेलाई पडू नये कोण्ही दोन पायांचं
अशा जागी जावं जिथं वाटलं की
नहीचये अस्तित्वात ही जमात प्रीथ्वीवरती
या सगळ्या अनुभवानंतर वेदिका अक्कमहादेवीच्या कद्लीवनात राहते. तीन वर्षे इथे ती जीवनाचे नवे तत्त्वज्ञान अंगीकारते. स्वत:चा स्वत:शी संवाद सुरू होतो. त्यातून एक नवा दृष्टिकोन आकार घेतो. इथेच तिला कुमारस्वामी भेटतात. आजवर भेटलेल्या सर्व पुरुषांमध्ये तिला पशूचे दर्शन घडलेले असते; पण कुमारस्वामींमध्ये तिला पहिल्यांदा माणूस भेटतो. समानतेने प्रेम करणारा, स्त्रियांविषयी समानतेचा, करुणेचा भाव असणारा. कुमारस्वामीच्या आईला त्याचे वडील काहीही कारणाने मारझोड करीत. एक दिवस कुमारस्वामींनी बापाचा आईवर उगारलेला हात धरला आणि बापाला मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हापासून त्यांचे जीवन स्त्रियांविषयी करुणेने भारून गेले. वेदिकाला हवा असणारा जणू ज्याची ती वाट पाहत होती असा पुरुष भेटला. ती म्हणते-
माझ्या देहावरून गळून पडले
आजपस्तोरचे सगळ्या पुर्षांचे स्पर्श
झाले निवळशंक
कुमारस्वामी आधुनिक विचारांचे स्त्रीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते नाथपंथीय; शिवाय इहवादी विचारांचे. सध्या देवळांचे राजकारण आपल्याकडे जोरात आहे. कुमारस्वामी म्हणतात-
बायी कशाला पाहिजे देऊळ?
नाही का पुरा देह ?
श्वास घेता येतला नाकानं, नेत्राने बगता येतलं
स्पर्श कळतेलं कातडीला
जिभंला चव लागतेली
कान ऐकतो हाका…. वेदिका… वेदिका
मग देवळात जाता आलं काय, नही काय
वेदिका आणि कुमारस्वामी यांचे संवाद मुळातून वाचण्यासारखे आहेत. वेदिकाची प्रतिभा यात फुलून आली आहे. वैराग्याकडे निघालेली वेदिका इथे अभिसारिका झाली आहे. कवितेच्या एक-एक दोन-दोन ओळीतून वेदिकेने फार मोठे तत्त्वज्ञान मांडले आहे,
सत्य इतकंच आहे
कोण्हा आजारी माणसाच्या भीतीतून जल्मलाय देव
कोण्हा आयीबायीच्या पोटातून नही.
किंवा
दगडाच्या योनीला कळतो का स्पर्श बायी ?
तुज्या रक्ताचा टिळा भाळावर लावतेले भक्त जाणतत का अर्थ
बायीच्या रक्तात भिजतेल्या वेदनेचा ?
कळत आसंल त्यांना तर
माजीई तयारी अहे दगड बनण्याची
किंवा,
नीलाचल पर्वतावरती
दगडाची योनी
देवी कुंकवाचं रक्त वाहवतेली
या दारातनं जल्मली दुनिया
जल्मलं ज्ञान, कृती, संपत्ती
या ‘गावनवरी’ कवितेची अखेर आसाममधील देवी कामाख्याच्या मंदिरात होते. वेदिका कुमारस्वामींना सांगते, मला सर्व शक्तिस्थलांचे दर्शन करायचे आहे. त्यासाठी वेदिका इथे आली आहे. ती कोणत्याही धार्मिक भावनेतून आलेली नाही. ही शक्तीस्थळे तिला स्त्रीच्या सामर्थ्याची प्रतीके वाटतात. ती स्पष्ट म्हणते-
मी दर्शनाला आले नही माते,
दर्शन द्यायला नही, दर्शन घ्यायला नही
तू मुंगीयेवढी की
आभाळ व्यापून राह्यतली याचं मला नाही कुतूहल
कोणा येकानं भयाच्या क्षणाला
जल्माला घातलेली कल्पना तू
अजून कोण्ही कोण्ही
किती पिढ्या वाढवून पोसलेली.
वयाच्या सहाव्या दिवशी बलात्काराला बळी पडलेली एक बालिका, जिला तिच्या आज्जीने जगवलं, वाढवलं, त्यात आज्जीचा स्वार्थ होता तो म्हणजे ही मोठी झाली की पोटाचा, भाकरीचा प्रश्न मिटेल. ती बालिका अशी प्रगल्भतेच्या शिखरावर पोचली. तिच्या कवितांचे शब्द अंधार जाळणारे आणि प्रकाशाची बीजे रोवणारे आहेत. देवदासी प्रथेला बळी पडलेल्या या बालिकेने आपली आपणच सोडवणूक करून घेतली आहे. पण म्हणून हा प्रश्न संपला आहे काय? देव, धर्म, जातपात नाकारून एक निखळ माणूस म्हणून उभे राहण्याचा प्रयत्न करणार्या एका स्त्रीचा हा विद्रोह अखिल जगातील स्त्रियांच्या शोषणाचा आहे. आजही हे दास्य आणि शोषण सुरूच आहे आणि लढाईही. जोपर्यंत स्त्रिया मुक्त नाहीत, सुखी नाहीत, तोपर्यंत कुठलाही समाज मुक्त आणि सुखी असू शकत नाही. वेदिका, कुमारस्वामींच्या कविता मुळातून वाचण्याची गरज आहे.
लेखक संपर्क ः 9869392157