घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन यावर्षी 17 सप्टेंबर रोजी झाले. विविध वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विसर्जनाचा आढावा घेतला आणि मंगळवार, दि. 18 सप्टेंबर रोजी दैनिकांनी बातम्या दिल्या. त्यातील काही बातम्या पुढीलप्रमाणे-
पर्यावरणपूरक विसर्जन बनली लोकचळवळ!
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा आदर्श घेत पंचगंगा नदी घाटावर गणेशमूर्तीचे कुंडात विसर्जन करण्यात आले!
नदीकाठच्या गावांतून शंभर टक्के प्रतिसाद!
प्लॅस्टिकबंदीमुळे निर्माल्यात घट. शंभर टन निर्माल्य जमा!
पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेस जिल्हा परिषदेला यश!
कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाख गणेशमूर्ती दान!
निर्माल्य-खतनिर्मितीसाठी ‘अवनि’कडे!
महापालिकेने बजावली चोख कामगिरी
गणेशमूर्ती विसर्जनासाठी 500 कर्मचारी तैनात!
रंकाळा येथे ‘पर्यावरणपूरक’ला प्रतिसाद!
कागलमध्ये कृत्रिम तलावात विसर्जन!
उदगावमध्ये मूर्तिदानास प्रतिसाद!
पेठवडगावमध्ये काहिलीत गणेश विसर्जन!
कळंबा तलावावर सहा हजार मूर्तिदान!
‘बाप्पा मोरयाऽऽऽ’च्या गजरात मूर्तिदान!
पर्यावरणपूरक विसर्जनानंतर प्रमाणपत्र प्रदान!
इचलकरंजीत पाच हजार मूर्तिदान!
बातम्या बोलक्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची संकल्पना रुजली असून लाखो गणेशमूर्ती दान मिळाल्या; निर्माल्य शंभर टक्के पाण्याबाहेर ठेवण्यात यश आले. शासकीय यंत्रणा कार्यरत झाल्याने सर्वत्र हे यश मिळाले. त्यांनी तालुकावार मूर्तिदानाचे आकडेही जाहीर केले आहेत. त्यानुसार सर्वांत जास्त करवीर तालक्यातून मूर्ती जमा झाल्या आहेत.
करवीर-58,365, भुदरगड – 21,090, गडहिंग्लज – 19,712, पन्हाळा – 25,630, शिरोळ – 21,722, आजरा – 15,975, कागल – 15,797, गगनबावडा – 3200, हातकणंगले – 24,895, शाहूवाडी – 16,043, राधानगरी – 10,600, चंदगड – 6719 एकूण 2,39,748 मूर्ती दान स्वरुपात मिळाल्या.
2018 सालची गोष्ट आहे ही. एवढे यश मिळेल असे 1992 साली ही चळवळ सुरू करताना कोणी सांगितले असते, तर त्याला वेड्यातच काढले असते.
1992 साली कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. त्याला नाव जिल्हा शाखा दिले असले, तरी ती विद्यापीठ हायस्कूल या एका शाळेपुरतीच मर्यादित होती. मुख्याध्यापक बी. एम. पाटील-अध्यक्ष, शिक्षक असलेले अनिल चव्हाण सचिव आणि एक शिक्षिका चं. श्री. महाजन या खजानीस, शाळेतील इतर शिक्षक, कर्मचारी, सभासद अशी ही शाखा!

मोठ्या उत्साहाने भाषणे देणार्या या कार्यकर्त्यांनी त्यावर्षी ‘निर्माल्य पाण्यात टाकू नका,’ अशी विद्यार्थ्यांची प्रबोधन फेरी काढली, शाखा वाढल्या- गडहिंग्लज, गारगोटी, इचलकरंजी इथेही ही चळवळ सुरू झाली. 1995 साली विद्यापीठ हायस्कूलमधील कर्मचारी महादेव खानविलकर कळंबा गावी सरपंच झाले. लगेच अंनिसने तिथेही चळवळ केली. विद्यार्थ्यांच्या प्रचार फेर्या झाल्या आणि ध्यानीमनी नसताना-कोणतेही नियोजन नसताना, निर्माल्याबरोबर लोकांनी 500 गणेशमूर्ती पाण्याबाहेर ठेवल्या.
संध्याकाळी या मूर्तींचे करायचे काय, या प्रश्नाने कार्यकर्त्यांना घाम फुटला. अनेक मिनतवार्या करून लष्कराचे ट्रक आणि एन.सी.सी.ची मुले यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने या मूर्ती दुसर्या दिवशी हलवल्या.
पुढच्या वर्षीपासून पंचगंगेच्या काठावर ही चळवळ अंनिसने राबविली आणि संघर्षाला सुरुवात झाली.
‘गणेशमूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जित करा,’ ‘मूर्ती पाण्यात विसर्जित करणे हे धार्मिक कार्य आहे,’ असा विपरित प्रचार करणारे भोंदूबचाव समितीचे कार्यकर्ते तयार झाले. पोलिसांच्या साक्षीने त्यांची अरेरावी सुरू राहिली. अंनिस आणि पर्यावरणवादी संघटनांनी, मुख्याध्यापक संघ, शिक्षण विभाग, प्राथमिक-माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक संघटना, महापालिका, जिल्हा परिषद इत्यादी विवेकी मंडळींनी नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन सुरू ठेवले.
याच काळात रंकाळा तलावाच्या शेजारी असणार्या राजे संभाजी तरुण मंडळाने काहिलीत – म्हणजे दहा-पंधरा फूट व्यासाच्या लोखंडी भांड्यात मूर्ती विसर्जनाची मोहीम राबवली. उसाचा रस उकळण्यासाठी वापरली जाणारी काहील ट्रॅक्टर-ट्रॉलीत भरून आणणे, उतरणे त्यात पाणी भरणे, मूर्ती खणीत विसर्जित करणे हे काम एकट्या-दुकट्याचे नव्हे. चाळीस-पन्नास तरुणांची फौजच त्यांनी उभी केली. हे काम पंचवीस वर्षे चालले. दोन पिढ्यांनी सहभाग घेतला; परिणामी रंकाळ्याभोवती अनेक तरुण कार्यकर्ते, शाळा, मंडळे, पर्यावरणरक्षणासाठी सिद्ध झाली.
गंमत म्हणजे- ईश्वरी राज्य आणण्यासाठी कटिबद्ध झालेले तथाकथित धर्मरक्षक पंचगंगेच्या काठावर अरेरावी करत थांबत आपले आध्यात्मिक ज्ञान पाजळण्यासाठी राजे संभाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडेही गेले; पण ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ म्हणणार्या संत तुकारामांचे भक्त असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोल्हापुरी भाषेत समज दिली… “ह्यो काय तुझ्या बाचा गणपती हाय काय? आमी काय बी करू… तू कोन… इचारणार?… परत इकडं फिरकलास तर… तंगडी मोडून….”
“बोले तैसा चाले” अशा प्रवृत्तीचे हे कार्यकर्ते असल्याने धर्मरक्षकांनी पुन्हा धाडस केले नाही. त्यांनी विचार केला – ‘शिर सलामत तो, मूर्ती हजार’ (रिकाम्या जागेचे शब्द संसदीय नाहीत) रंकाळा बचाव तरुण मंडळाने 21 फुटी गणपतीच्या मूर्तीही रंकाळ्यात विसर्जित करण्याविरोधात मोठा यशस्वी संघर्ष केला!
कोल्हापूरमधील कोटीतीर्थ, राजाराम या तलावाच्या काठीही अंनिस व पर्यावरणवादी प्रबोधन करत मूर्ती दान घेत असत.
पंचगंगेच्या काठी पहिल्या वर्षी तीन हजारच्या वर मूर्ती स्वरुपात दान मिळाल्या. त्यांनी के. डी. खुर्दांना रात्रभर झोप लागू दिले नाही. पुढच्या वर्षीपासून संघर्ष सुरू झाला आणि ही संख्या जेमतेम दीडशेवर आली. इथेही अंनिस, पर्यावरणवाद्यांनी सातत्य राखले; आज ही संख्या लाखात गेली. अलिकडच्या पाच वर्षांतील वाढ ही पाहण्यासारखी आहे.
जिल्ह्यामध्ये 2015 साली मूर्ती 1 लाख 82 हजार, तर 916 ट्रॉली निर्माल्य जमा झाले. 2016 साली 2 लाख 35 हजार मूर्ती, तर 1312 ट्रॉली निर्माल्य, 2017 साली 2 लाख 46 हजार मूर्ती, तर 1148 ट्रॉली निर्माल्य, 2018 साली 2 लाख 68 हजार मूर्ती आणि 1100 ट्रॉली निर्माल्य जमा झाले.
अंनिसच्या प्रयत्नाने प्रबोधन झाले, त्याचबरोबर न्यायालयाचा दरवाजाही खटखटण्यात आला. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने मूर्ती व निर्माल्य गोळा करण्याचे नियोजन 2015 पासून केले. ग्रामपंचायतीमार्फत प्रबोधनपर फलक, विसर्जनासाठी कृत्रिम कुंड, काहिली, निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली व घंटागाडीची सोय या माध्यमातून हा उपक्रम राबवला. आठवडाभर आधी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचार्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेतली जाते. सर्व खातेप्रमुखांना तालुके व कर्मचार्यांना गावे दत्तक देण्यात येतात. जि.प.चे अध्यक्ष, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वजण जातीने लक्ष घालतात.
कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त, महापौर, नगरसेवक, अधिकारी, आरोग्य विभागही जि.प.प्रमाणेच नियोजन करतात.
धार्मिक काय म्हणतात?
विसर्जनाची कल्पना – हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे एखादी मूर्ती, सुपारी, नारळ इत्यादी देव्हार्यात ठेवून देव म्हणून पूजता येते. पूजण्यापूर्वी देवाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. म्हणजे या मूर्तीमध्ये किंवा नारळ, सुपारीमध्ये देवाने प्रविष्ट व्हावे, अशी प्रार्थना केली जाते. पूजा संपल्यावर देवाला पुन्हा आवाहन केले जाते. ‘हे देवा आमची आराधना झाली आहे, आता तू निघून जावेस.’ याला उत्तरपूजा म्हणतात. उत्तरपूजा झाल्यावर दैवीशक्ती निघून गेल्याने ती वस्तू किंवा मूर्ती पुन्हा पूर्वीप्रमाणे शक्तिहीन बनते; माणसाच्या शरीरात आत्मा प्रवेश करतो व निघून जातो. याच्याशी समांतर अशी कल्पना आहे.
उत्तरपूजा झाल्यावर मूर्ती किंवा वस्तूचे विसर्जन कसे करावे, याबद्दल धर्मामध्ये काहीही सांगितलेले नाही. कोल्हापूरमधील धार्मिक-संस्कृत तज्ज्ञांनी ग्रंथ धुंडाळले; पण त्यात कुठेही मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जित करावी, असे विधान सापडले नाही. ग्रंथात नसेल, तेव्हा परंपरा शोधली जाते.
गणेशाप्रमाणेच नागोबा व बैल पूजले जातात. शेतातील मातीची मूर्ती करून – त्यांची प्राणप्रतिष्ठा, पूजा व उत्तरपूजा झाल्यावर शेताच्या बांधावर ठेवून त्यांचे विसर्जन केले जाते.
गणपतीची आरती करून जागेवरून मूर्ती तीन वेळा हलवली की, उत्तरपूजा झाली, असे समजले जाते.
मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित केल्याने प्लॅस्टर नदीत, धरणात साचून राहते व मूर्तीवरील अखाद्य रंग पाण्यात जाऊन पाणी विषारी बनते. या भौतिक बाबी तपासता येतात. जलचर मरून पाण्यावर तरंगतात, हे दरवर्षी साचलेल्या पाण्यात विसर्जनानंतर दिसत असते. म्हणून मूर्ती पाण्यात विसर्जित करू नयेत, ही भूमिका विवेकी व्यक्तींनी घेतली.
भोंदू धर्मांध काय म्हणतात?
वरील भूमिकेला विरोध करताना एका भोंदूबाबांनी नवेच तत्त्वज्ञान उभे केले. ते म्हणतात – 1) गणेशमूर्तींनी प्रदूषण होत नाही. 2) कारखाने, गटारी प्रदूषण करतात, त्याकडे आधी लक्ष द्या. 3) वाहत्या पाण्यातून पवित्रके सर्वदूर पसरतात.
पहिला मुद्दा असत्य आहे. हे तपासता येते. दुसरा मुद्दा वकिली डावपेचाने प्रदूषणाचे समर्थन करणारा आहे, तर तिसरा मुद्दा हिंदू धर्मात- नसलेला-घुसडण्यात आला आहे.
त्यांच्या मते, “पूजा केल्यावर मूर्तीमध्ये पवित्रके जमा होतात. ती उत्तरपूजा करताना पूजा करणार्याला मिळतात. उरली-सुरली पवित्रके पाण्याबरोबर वाहत जातात, बाप्पाबरोबर हवेत मिसळतात आणि पाण्याबरोबर सर्वदूर पसरतात.”
मूळ धार्मिक कल्पनेत ‘पावित्र्य’ आहे; ‘पवित्रके’ नाहीत. पावित्र्य हेही काल्पनिक असले, तरी एकसंघ आहे. उदाहरणार्थ – एखाद्या ब्राह्मणाने शूद्राला स्पर्श केला तर तो अपवित्र बनतो आणि गायीचे शेण खाल्ले व मूत प्याला, तर पुन्हा पवित्र बनतो. इथे पवित्र किंवा अपवित्र असे दोनच पर्याय संभवतात.
पवित्रकांची कल्पना मांडणार्या भोंदू-बुवांनी चलाखीने त्यांना भौतिक गुण चिकटवले आहेत. समजा, मूर्तीला कापूर चिकटला आहे. उत्तरपूजा झाल्यावर मूर्ती उचलणार्याच्या हाताला कापुराचे कण चिकटतील ‘उरले-सुरले’ मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर पाण्यात मिसळतील. पाण्याबरोबर वाहत जातील. त्यांचीही पाण्याबरोबर वाफ होईल. वाफ होण्याचे प्रमाण तापमानावर अवलंबून असेल. पावसाबरोबर ते पुन्हा पृथ्वीवर पडतील.
आध्यात्मिक पवित्रकांचे गुणधर्म असे भौतिक कापरासारखे आहेत काय? हिंदू धर्मातले पावित्र्य पाण्याबरोबर वाहणारे किंवा उन्हाने सुकणारे नाही. आध्यात्मिक काल्पनिक पवित्रकांना अशा तर्हेने मूळ धर्मात नसलेले भौतिक गुणधर्म चिकटवून भ्रामक तत्त्वज्ञान तयार केले गेले.
सखोल अभ्यास नसणारे विद्वानही अशा चलाखीला बळी पडतात, तिथे भोळ्या-भाबड्या धार्मिक लोकांची काय कथा?
पण अनुभवानेच लोक शहाणे होत आहेत.
फालतू कर्मकांडाला फाटा देऊन केवळ ईश्वराचे नाव घेणे पुरेसे आहे, असे सांगणार्या वारकर्यांचा विचार समाज स्वीकारतो आहे. प्रदूषण टाळून विवेकी बनत आहे.
कोल्हापुरात सुरू झालेली चळवळ महाराष्ट्रभर पसरली ती यामुळेच.
यानिमित्ताने पुरोगाम्यांनी एक महत्त्वाचा धडा लक्षात घेतला पाहिजे. लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन तात्पुरता लाभ मिळवणारे प्रतिगामी शेवटी पराभूतच होणार असतात; आपण थोड्या सबुरीने; पण कार्यात सातत्य राखून प्रयत्न केले पाहिजेत.
डॉ. दाभोलकर यासाठी एक दाखला देत- “दीडशे वर्षांपूर्वी सावित्रीमाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. त्यांना शेणगोळे आणि दगड मारणार्या सनातन्यांना आपण विजयी झाल्याचा क्षणिक आनंद मिळाला; पण आज दीडशे वर्षांनी पाहिले, तर काय दिसते? महिला मोठ्या प्रमाणात शिकत आहेत. मोठमोठी जबाबदारीची पदे सांभाळत आहेत.”
“आज कोण जिंकलेले दिसते? दगड मारणारे सनातनी की सावित्रीमाई?”
प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेच ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढणारे कोल्हापूरकर एक गाणे म्हणत असतात-
“गोळ्या घाला, लाठ्या मारा, विचार नाही मरणार
अन्यायाच्या विरोधात, लढत आम्ही राहणार!
आम्ही सारे पानसरे, आम्ही सारे दाभोलकर!”
‘विवेकी समाजाचे आपले स्वप्न अवघड वाटत असले, तरी अशक्य नाही,’ हेच खरे.
संपर्क : 9764147483