Categories
पर्दाफाश

नेपाळीबाबाच्या चमत्काराचा पर्दाफाश

ऑक्टोबर - २०१८

मी संगीता गणेश पांढरे. मी गोरेगावच्या संस्कारधाम महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. मालाड पूर्वमधील आंबेडकरनगर येथील पिंपरीपाडा या वस्तीत माझ्या आईबरोबर राहते.वस्तीतील माणसे अंधश्रद्धेच्या खूप आहारी गेली आहेत. येथे बर्‍याच बाबा-बुवांची ये-जा चालू असते. आमच्या वस्तीत पूर्वीपासून एक नेपाळी बाबा राहतो. मी त्याला लहान असल्यापासून माझा ‘दादा’ असे मानते. तो मला नेहमी भूत-प्रेताच्या गोष्टी सांगतो. कुणाच्या अंगातील भूत काढले, कुणाची करणी काढली, अशा गोष्टी तो मला ऐकवतो. मी त्याला सांगत असते की, भूत वगैरे सर्व झूठ आहे, असे विज्ञान सांगते. त्यावर तो शहाणा म्हणतो, ‘या जगात जर देव आहे, तर भूतही असणार. तू रात्री वस्त्रहीन अवस्थेत स्मशानात जा. तेथे तुला भूत दिसेल आणि दुसर्‍या दिवशी तू आजारी पडशील.’ त्याचे बोलणे मी हसण्यावारी नेते.

त्याच्या अंगात कधी देवी, तर कधी वेताळ येतो, असे तो सांगत असतो. ‘हे मी नाटक करीत नाही, असं अंगात आलं की, मी खरंच काय करीत असतो, हे माझं मलाच आठवत नाही,’ असे तो म्हणतो. मी माझ्या परीने त्याला समजवायचा प्रयत्न करते, ‘एखाद्या व्यक्तीबद्दल आपण विचार करू लागलो की, कधी-कधी त्याच्यासारखे वागू लागतो. जणू आपण परकाया प्रवेश करीत आहोत, असे तुला वाटते. देवीची आरती लागली की, तुझ्या अंगात देवी येते असे का? तू अगदी लक्षपूर्वक आरती ऐकत असतोस आणि तुझा या गोष्टीवर विश्वास असल्याने तू मनाने परकाया प्रवेश करतोस. तुला खरं तर मानसिक उपचाराची गरज आहे.’

एकदा तो मला सांगत आला की, ‘आज मला देवीने दृष्टांत दिला आहे आणि मी तिने सांगितल्याप्रमाणे तुझ्यावर केलेली काळी करणी उतरवून दाखवतो.’ त्याने बरोबर काही साहित्य आणले होते. त्याने एक ताटली झोळीतून बाहेर काढली. त्यावर थोडी हळद पसरली. मग त्याने एक लिंबू बाहेर काढला व मंत्र पुटपुटत त्याने ते हळदीत गोल-गोल घोळले. घरातल्या देवापाशी एक उदबत्ती पेटवून ती त्या लिंबाभोवती तो फिरवीत राहिला. एकीकडे त्याचे पुटपुटणे चालूच होते. हा-हा म्हणता ती पूर्णपणे जळून तिची सर्व काजळी बशीत पडली. नंतर त्याने त्या बशीत अर्धा पेला पाणी ओतून त्यावर झाकण ठेवले. म्हणाला, ‘बघ संगीता, देवीने मला दृष्टांत दिला आहे, त्यामुळे काय होते ते’ आणि काय सांगावे त्याने डोळे उघड मिटत ताटलीवरचे झाकण काढताच आतले पाणी लाल-लाल झालेले दिसले. ‘बघ, तुझ्यावरची करणी देवीने या पाण्यात उतरवली आहे,’ असे तो म्हणाला. माझ्या डोक्यात विचारांचे चक्र फिरू लागले की, यामागे काय विज्ञान असेल. ‘घाबरू नकोस, तुझा दादा तुझी ही करणी काढून पण टाकू शकतो,’ तो म्हणाला. मग त्याने त्या बशीत थोडे लिंबू पिळले. ते मिश्रण ढवळताच पाणी पुन्हा पिवळे झाले आणि काळा गाळ खाली बसला. ‘आता ही करणीची काळी घाण चौरस्त्याच्या न्हाणीत टाकू या,’ असे तो म्हणाला. अशा रीतीने करणी काढून दाखवण्याचे आव्हान त्याने मला दिले.

मी झाल्या प्रकारावर बराच विचार केला. त्याची कृती मी बारकाईने पहिली होती आणि त्याचे आव्हान मी स्वीकारले. त्याच रात्री सर्वांसमोर मी हा प्रयोग केला. आधी हळदीने पिवळे झालेले पाणी, त्यात उदबत्तीची काजळी पडल्यावर ती अल्कली असल्याने माझ्या अनुमानाबरहुकूम ढवळताच ते पाणी लाल झाले. त्यात थोडा लिंबू रस, जे आम्ल असते ते घातल्यावर पाणी पूर्ववत पिवळे झाले. माझ्या नेपाळी दादाचा चेहरा पडला. ‘बघ, मी करून दाखविले. म्हणत होतास ना देवी फक्त तुलाच दृष्टांत देते म्हणून आणि फक्त तूच हे करू शकतोस.’ माझं बोलणं ऐकून ‘हे सायन्स आहे,’ असं पुटपुटत खाली मान घालून तो बाहेर पडला. झाल्या प्रकारचे मला खूप हसू आले. मी आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे आणि या जगात चमत्कार नसतात असे आम्ही मानतो. प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण असते. प्रत्येक वेळी ते आपल्याला ज्ञात असेलच, असे नाही; पण ते जाणून घेण्याचा प्रयत्न कसा करायचा, हे आम्हाला माहीत असते.

संगीता पांढरे (गोरेगाव, मुंबई)