Categories
उपक्रम रक्त-नेत्र-देह-अवयव दान

मअंनिस तर्फे बकरी ईद निमित्त रक्तदान शिबीरे संपन्न

सप्टेंबर - २०१८

धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग हे महत्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी कुर्बानी किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते.

आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिका अधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. हाच विचार समोर ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ या तर्फे बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून दि.22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2018 ‘ बकरी ईद निमित्त राज्यव्यापी रक्तदान सप्ताह 2018’ हे अभियान राबविले गेले. महाराष्ट्रातील मअंनिसच्या10 शाखांमध्ये हे अभियान यशस्वीपणे राबविले गेले.

पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नोइंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्स आणि राष्ट्र सेवा दलाने पुण्याच्या साने गुरुजी स्मारक येथील नाथ पै हॉलमध्ये बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. दिवसभर चाललेल्या या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम तरुण सहभागी झाले होते. यावेळी दिवसभरात 50 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

‘बकरी ईदच्या दिवशी पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल करायला हवे. त्याऐवजी रक्तदानासारखे उपक्रम राबविले पाहिजे. भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात असे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येईल’, असं यावेळी उपस्थितांनी सांगितलं. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, माजी न्यायाधीश शहापूरकर, अंनिसचे डॉ. श्रीपाल ललवाणी, नोइंग गांधीझमचे संकेत मुनोत आणि जेष्ठ कायदेतज्ज्ञ प्रवीण मोतीवाला उपस्थित होते.

लातूर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर शाखेच्या वतीने बकरी ईद निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. लातूर जिल्ह्यात सद्या डेंगू ची साथ चालू आहे त्यासाठी प्लेटलेट्स ची मागणी वाढत आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत शिबिराचे आयोजन केले. या शिबीरात अंनिसच्या 20 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी केला.

कोराडी नागपूर येथील आदर्श सभागृहात मुस्लीम सत्यशोधक मंडळ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोराडी शाखेच्या वतीने बकरी ईद निमित्ताने ईदच्या पूर्व संधेला रक्तदान शिबीर व नि:शुल्क फिजिओथेरपी, दंततपासनी, रोगनिदान चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले. या सणाचे औचित्य साधून मुस्लीम सत्यशोधक मंडळ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील सहा वर्षांपासून रक्तदान शिबीराचे आयोजन करीत असते. यावेळी 16 जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन कोराडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. गणेश ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

शहादा शाखा, नंदुरबार येथे मुस्लिम बांधवांच्या सहभागाने रविवारी 26 तारखेला रक्तदान कार्यक्रम घेतला, त्यात समविचारी मित्रही सहभागी झाले, एकूण 25 जणांनी रक्तदानात सहभाग घेतला. कोल्हापूर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर शाखेच्या वतीने मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या सहकार्याने बकरी ईद निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 20 जणांनी रक्तदान करून हे अभियान यशस्वी केले.

पनवेल शाखेने राष्ट्रसेवा दल, इनरव्हील ऑफ न्यू पनवेल, रोटरी ब्लड बँक च्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले, या शिबिरात 31 जणांनी रक्तदान करून हा उपक्रम यशस्वी केला. नांदेड शाखेने बकरी ईद निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केले, या शिबिरात 17 लोकांनी रक्तदान केले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. इचलकरंजी शाखा आणि राष्ट्रसेवा दल तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 10 जणांनी रक्तदान करून सलग चौथ्या वर्षीही शिबीर यशस्वी करून दाखविले. परतूर शाखा, जालना येथेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 10 रक्तदात्यांनी सहभाग देवून हा उपक्रम उत्तम साजरा केला.

सातारा शाखेतर्फे ‘ईदचा संदेश कुर्बानिचा अन् त्यागाचा, करू संकल्प रक्तदानाचा…देशप्रेमाचा…’ असा संदेश देत परिवर्तनाच्या चळवळीत, मानवाच्या मदतीसाठी रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर नेहमी खोडसाळ आरोप केला जातो कि तुम्हाला फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धा दिसतात इतर धर्मांच्या अंधश्रद्धा तुम्हाला दिसत नाही का? व अशा आरोपांना समिती नेहमी अशा कृतीशील उपक्रमातून उत्तर देत असते. दरवर्षी अधिकाधिक शाखा ‘बकरी ईद निमित्त रक्तदान सप्ताह’ हे अभियान राबवून सामाजिक सलोखा जपत आहेत तर मुस्लीम बांधवा सोबत हिंदू बांधव ही रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवीत आहेत ही आशेची बाब आहे.

अनिल करवीर, राज्य-कार्यवाह (विविध उपक्रम विभाग)