Categories
फसवे विज्ञान

जमिनीखाली दडलंय काय? ‘डाऊझिंग’चे फसवे विज्ञान

सप्टेंबर - २०१८

विज्ञानपूर्व काळात मानव अंधारयुगात वावरत होता. तंत्र-मंत्र, जारण-मारण, गंडेदोरे यांच्या मदतीने दैवी शक्तींना वश करण्याचा त्याचा केविलवाणा प्रयत्न असायचा. तथाकथित अदृश्य आसुरी शक्तींना पळवून लावण्याचे त्यांचे खटाटोप चालायचे; पण अशा विविध अंधविश्वासापासून एकविसाव्या शतकातील माणूस मुक्त झालाय का?

गेल्या चारशे वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने घेतलेली गरूडझेप स्तीमित करणारी आहे. अंधारयुगातून बाहेर पडलेल्या मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले. त्याने समुद्रतळाला विहार केला. जिथे वाळवंट होते, तेथे उद्याने आणि हिरवळ फुलविली आणि निसर्गातून विविध आश्चर्यजनक पदार्थांचा खजिनाही हस्तगत केला. हे सगळं कर्तृत्व त्याने विश्वाची रहस्ये आपल्या बुद्धिसामर्थ्याने शोधून गाजविले; पण हा पराक्रम ज्यांनी गाजविला, त्यांचेच लाखो भाऊबंद आजही अंधारयुगात वावरत आहेत. अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार जवळपास चाळीस टक्के अमेरिकन विविध प्रकारच्या अंधश्रद्धा आणि फसव्या विज्ञानाचा आश्रय घेतात. प्रख्यात अमेरिकन विवेकवादी जादूगार जेम्स रँडी यांच्या मते अमेरिकेत एकाच वेळी विज्ञानयुग आणि अंधारयुगाचा अंमल सुरू आहे.

अंधविश्वासाच्या प्रभावाखाली असलेल्या मंडळींचे वर्तन अंधारातील दिव्यावर झडप घालणार्‍या पतंगासारखं असतं. त्यांना जीवन म्हणजे भयप्रद अंधारातील मार्ग वाटतो. अशावेळी त्यातून सुटका करून घेण्यासाठी कुठल्यातरी अंधविश्वासाच्या दिव्यावर हे पतंग झडप घालतात आणि जळून जातात. या लेखात मी ज्या डाऊझिंग प्रकारचे वर्णन करणार आहे, ते वाचून तुम्हाला आपण विज्ञानयुगात की अंधारयुगात वावरत आहोत, याचा संभ्रम पडेल. जगभरच्या विविध समाजात हीच परिस्थिती आढळते.

डाऊझिंग म्हणजे काय?

‘डाऊझिंग’ म्हणजे भूगर्भातील पाणी, खनिजे, गुप्त संपत्ती, लपविलेली स्फोटक द्रव्ये, हरवलेल्या व्यक्ती यांचा विशिष्ट साधनाद्वारे घेतलेला शोध. झाडाची इंग्रजी (Y) आकाराची फांदी किंवा दोन लांब सळ्या किंवा दोर्‍याला बांधलेला लंबक अशा प्रकारची ही साधने होत. कधी-कधी या साधनाशिवायही केवळ आध्यात्मिक सामर्थ्याचा दावा करणारी काही मंडळी लपविलेल्या वस्तूंची जागा दाखवतात. आपल्याकडचे पाणाडे जमिनीत पाण्याची ठिकाणे दाखवतात. त्यांच्या पायांना कित्येक मीटर खोलीवरच्या पाण्याच्या लहरी जाणवतात म्हणे!

डाऊझिंगचे वास्तव

अमेरिकेत आणि जगात सर्वत्र लाखो लोक डाऊझिंगवर विश्वास ठेवतात. ‘डाऊझिंग’ हे छद्मविज्ञान आहे आणि त्याच्या उपयोगातून संपत्ती आणि मानवी जीवनाचा फार मोठा विनाश होत आलाय. ज्योतिषाइतकेच जनमानसावर प्रभाव गाजविणारे हे भ्रामक विज्ञान आहे. ‘जेम्स रँडी एज्युकेशनल फाऊंडेशन’ ही अमेरिकेतील विवेकवादाचा प्रसार करणारी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक जेम्स रँडी यांनी अतींद्रिय आणि तत्सम सामर्थ्याचा दावा करणार्‍यांना ते वैज्ञानिक चाचणीद्वारे सिद्ध करणार्‍यास 10 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. जेम्स रँडी यांनी अमेरिका, संपूर्ण युरोप आणि ऑस्ट्रेलियातील डाऊझर (Dowser) मंडळींची वैज्ञानिक चाचणी घेतली. एकही माईचा लाल अजूनपर्यंत जमिनीखालचे पाणी खात्रीशीरपणे वैज्ञानिक चाचणीद्वारे दाखवू शकलेला नाही. जेम्स रँडीप्रमाणेच मार्टीन गार्डनर आणि रिचर्ड डॉकिन्स यांनी डाऊझरच्या ‘डबल ब्लाईंड’ चाचण्या घेतल्या आहेत. त्यात संबंधित मंडळी त्यांचा दावा सिद्ध करू शकली नाहीत.

डाऊझिंग करणारे त्यांचे साधन वैज्ञानिक असल्याचा दावा करतात; पण त्यात विज्ञान नसून ते विज्ञानाची झूल पांघरलेले छद्मविज्ञान आहे. काही ब्रिटीश डाऊझर्सनी, कारमध्ये लपविलेले बाँब शोधणारे इलेक्ट्रॉनिक साधन इराकमधील मिलिटरीला विकले; पण त्या फसव्या साधनांनी बाँब वाहून नेणार्‍या गाड्या शोधता आल्या नाहीच; उलट इराकी सरकारचा पैसा या प्रकारात वाया गेलाच; शिवाय अनेक इराकी सैनिक आणि नागरिक या फसव्या विज्ञानाने मृत्युमुखी पडले. आजही मध्य-पूर्वेत आतंकवाद्यांच्या कारवाया शोधण्यासाठी ‘डाऊझिंग’चा दुरुपयोग सुरू आहे.

डाऊझिंगचे भ्रामक विज्ञान

डाऊझर असा दावा करतात की, पाणी किंवा कोणत्याही पदार्थापासून एक प्रकारची ऊर्जा किंवा प्रेरणा उत्सर्जित होते. ही ऊर्जा कमी-अधिक तीव्रतेत बाहेर पडते. डाऊझर्स आपल्या साधनाद्वारे ही ऊर्जा पकडतात आणि त्यांना त्याचे ज्ञान होते, असा दावा करतात. डाऊझरच्या या युक्तिवादाला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. एक म्हणजे जमिनीतील पाण्यातून निघालेली अशी ऊर्जा नसतेच. डाऊझिंगचे रॉड्स किंवा लंबक अशी ऊर्जा कशी पकडतात, याला कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण किंवा पुरावा मिळत नाही. म्हणून डाऊझिंग हा वैज्ञानिक पुराव्यावरील आधारित प्रकार नाही. हे तंत्र म्हणजे एक प्रकारची तथाकथित दैवी किंवा आध्यात्मिक भानगड म्हणता येईल. अतिनैसर्गिक शक्तीचे वलय याला दिलं गेलंय. गूढवाद आणि विज्ञान याची खिचडी असं डाऊझिंगचं वर्णन करता येईल.

डाऊझिंगची पद्धत

डाऊझिंग कसे करतात? समजा, डाऊझर जमिनीतील पाण्याचा शोध घेत आहे. संबंधित जमिनीवरून डाऊझर आपल्या हातात वाय (Y) आकाराच्या फांदीच्या शाखा पकडतो आणि ‘वाय’चा दांडा पुढे धरतो. (लेखाच्या सुरुवातीचा फोटो पहा) हळूहळू फिरत असताना तो दांडा जमिनीकडे कलला की, तेथे खाली पाण्याचा स्रोत आहे, असे समजायचे. विशिष्ट ठिकाणी ‘वाय’ साधनाचा दांडा खाली कसा झुकतो, हे आपल्याला कळत नाही, याचे आश्चर्य वाटून डाऊझिंगने पाण्यातील सुप्त शक्तीशी संबंध जोडल्याने असं घडलं असा आपला समज होतो. हीच क्रिया दोन लांब तारांद्वारे घडवून आणता येते. एकमेकींना समांतर धरलेल्या तारा पाण्याच्या ठिकाणी आल्यावर एकमेकींना क्रॉस करतात. अशा ठिकाणी लंबक आपोआप हलू लागतो, असं डाऊझर दाखवितात.

वैज्ञानिक चाचणी

जमिनीवर निरनिराळ्या ठिकाणी बंद पेटीत बाटल्या ठेवायच्या. या बाटल्यांतील काहींमध्ये पाणी, तर दुसर्‍या बाटल्यांमध्ये वाळू ठेवायची किंवा त्या रिकाम्या ठेवायच्या. कोणत्या बाटलीत काय ठेवलंय, हे चाचणी घेणार्‍याला व देणार्‍याला दोघांनाही माहीत होऊ दिलं जात नाही. याला ‘डबल ब्लाईंडिंग’ म्हणतात. शक्यता सिद्धांतानुसार (Probability) चाचणी देणारा डाऊझर पन्नास टक्के बरोबर निष्कर्ष देऊ शकतो. (शंभर वेळा फेकलेल्या नाण्यात छाप वर येणे 50 टक्के) पण ऐंशी किंवा नव्वद टक्के निष्कर्ष बरोबर आला, तर तो डाऊझर खरा यशस्वी ठरणार. जेम्स रँडी आणि रिचर्ड डॉकिन्स यांनी डाऊझिंगच्या घेतलेल्या अशा ‘डबल ब्लाईंड’ चाचणीत एकही डाऊझर यशस्वी ठरला नाही. डाऊझिंगच्या चाचणीसाठी जमिनीखाली एक-दोन फुटावर पाणी वाहून नेणार्‍या नळ्यांचा वापर करता येतो. रँडीने अशा चाचण्या घेतल्या आहेत. अशा नळ्या विशिष्ट अशा चौकोनी किंवा गोल जागेत विविध दिशेने पुरल्या जातात. त्यातील काही नळ्यांतून पाणी सोडले जाते. कोणत्या नळीतून पाणी वाहते, ते डाऊझरने ओळखायचे. या चाचणीतसुद्धा चाचणी घेणार्‍या व देणार्‍या दोघांनाही काहीच माहीत होऊ दिलं जात नाही. अशा चाचणीतसुद्धा डाऊझर नापास ठरले आहेत. 1990 मध्ये जर्मनीतील कॅसेल या गावी, ‘सोसायटी फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ दि पॅरॅसायन्सेस’ या संस्थेमार्फत जेम्स रँडीने अशी चाचणी घेतली. चाचणीत यशस्वी डाऊझरला रँडीने दहा लाख डॉलर्सचे इनाम जाहीर केले. या चाचणीत 30 डाऊझर्सनी भाग घेतला. ही चाचणी तीन दिवस चालली होती. सर्व डाऊझर्सनी ही योग्य प्रकारची चाचणी आहे आणि आम्ही यात शंभर टक्के यशस्वी होऊ, असे लिहून दिले होते. या चाचणीत एकाही डाऊझर्सला अपेक्षित यश मिळू शकले नाही.

सन 1987-88 मध्ये जर्मनीतील म्युनिच येथे वैज्ञानिक बेझ (Betz) आणि त्याचे सहकारी यांनी डाऊझिंगची मोठी चाचणी घेतली. या चाचणीत 500 डाऊझर्सची सुरुवातीस निवड केली. त्यापैकी 43 सोडून इतर सर्व डाऊझर्स चाचणीस अपात्र ठरले. चाचणीसाठी खालच्या मजल्यावर पाईप्स मांडल्या होत्या, तर चाचणी देणारे वरच्या मजल्यावरून कोणत्या पाईपमधून पाणी वाहत आहे, हे डाऊझिंगद्वारे सांगणार होते. काटेकोर चाचण्या आणि त्यांच्या संख्याशास्त्रीय काटेकोर तपासणीद्वारे सर्वच्या सर्व 43 डाऊझर्सना 50 टक्क्यांपेक्षा अधिक करेक्ट अंदाज वर्तवता आला नाही. 1943 पासून 2013 पयर्ंंत अशा प्रकारच्या अनेक चाचण्यांमध्ये डाऊझिंग हे वैज्ञानिक कसोटीत नापास झाल्याचे रिपोर्ट्स प्रसिद्ध झालेत.

डाऊझिंगचे मानसशास्त्र

डाऊझरच्या हातातील साधन विशिष्ट ठिकाणी जमिनीकडे किंवा विशिष्ट दिशेला झुकते किंवा क्रॉस होते, याची दोन मानसशास्त्रीय कारणे देता येतात. पहिले कारण आहे इंडिओ मोटार इफेक्ट (Indeomotor effect). दुसरं आहे अनुकूल निश्चिती कल (Confirmation bias). विशिष्ट ठिकाणी आल्यावर डाऊझरच्या अंतर्मनाद्वारे अनुकूल किंवा हव्या असणार्‍या परिणामासाठी सूचना मिळतात; परिणामी त्याच्या हाताच्या स्नायूंची आपोआप हालचाल होऊन डाऊझिंग साधन जमिनीकडे झुकते. ही क्रिया डाऊझर्सच्या बाह्यमनाला जाणवत नाही; परिणामी साधन हातातच हलू लागते, याचे डाऊझर्सलाही आश्चर्य वाटते. बरेच डाऊझर्स मुद्दामहून फसवणूक करतात, असंही नाही. आपल्यात काही तरी वेगळं सामर्थ्य आहे, असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. तथापि, हा प्रामाणिकपणा म्हणजे स्वत:ची व इतरांची फसवणूक असते, हे त्यांना कळत नाही; मात्र बरेच डाऊझर्स हेतुपूर्वक लबाड असतात, हेही तितकेच खरं. डाऊझर लबाड असो की प्रामाणिक, डाऊझिंग ही फसवणूकच आहे.

सर्वत्र आढळते पाणी; पण…?

एखाद्या विशिष्ट भूभागात जमिनीत सर्वत्र पाणी असते; परिणामी डाऊझर जी जागा दाखवील तेथे पाणी असतेच; पण प्रश्न आहे किती प्रमाणात आणि कोणत्या कारणाने. अंतर्भागात वाहणारे पाण्याचे प्रवाह जेथून जातात, त्या शिरेवर ड्रिलिंग केले की, पाण्याची सातत्यपूर्ण उपलब्धता होते; पण जेथे पावसाचे मुरलेले पाणी साठून राहते, तेथेही खणले की, पाणी मिळणार; पण ते थोड्याच अवधीसाठी. पावसाळ्यात ते मिळत राहिले, तरी पावसाळा संपला की, ते आटत राहते आणि उन्हाळ्यात संपून जाते. सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात काढलेल्या बोअरवेल्स नंतर कोरड्या पडतात, असे माझे निरीक्षण आहे. याचे कारण या विहिरी साठलेल्या पाण्याचा वापर करतात, जिवंत झर्‍याचे ते पाणी नसते. योगायोगाने पाण्याच्या शिरेचे ठिकाण डाऊझर्सला मिळू शकते. (मुलगा होणार की मुलगी? ढोंगी बाबा सांगतात मुलगाच होईल, असाच प्रकार आहे.)

डाऊझिंग की आधुनिक तंत्रज्ञान?

जमिनीखालील पाण्याचा किंवा खनिजांचा शोध अयशस्वी झाला, तर आर्थिक नुकसान होते; पण एकवेळ ते सह्य असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती किंवा संस्था याबाबत फार चिंता करत नाहीत; मात्र अलिकडे डाऊझिंगमधील फसव्या विज्ञानाबाबत लोकशिक्षणाचा प्रसार झाल्याने विविध देशांतील सरकारे खनिज किंवा पुरातत्त्व विज्ञानात (archeology) डाऊझिंगचा वापर सहसा करीत नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान आणि भूगर्भ विज्ञान यांच्या उपयोगातून विकसित झालेली साधने खात्रीशीर असण्याची शक्यता जास्त असते. मात्र त्यांच्या वापरासाठी येणारा खर्चही प्रचंड असतो. तो सामाजिक संस्थांना परवडतो. भारतात व जगात सर्वत्र वैयक्तिक पातळीवर पाणाडे किंवा डाऊझर यांचा खर्च परवडणारा असतो. म्हणून लोक लागली लॉटरी तर लागली या मानसिकतेतून पाणाड्यांचा उपयोग करतात. डाऊझिंग या छद्मविज्ञानाचा प्रसार टाळायचा असेल, तर भूगर्भातील पाण्याचा शोध घेणारे आधुनिक तंत्रज्ञान सर्वांना वाजवी खर्चात उपलब्ध करून दिले पाहिजे. आरोग्य क्षेत्रातील खर्चिक उपायांबाबत भारत सरकारने सामान्यजनांसाठी जशा योजना उपलब्ध केल्या आहेत, त्याचप्रमाणे जलसंशोधनासाठी धोरण हवे.

चिंतेचे कारण

पाणी किंवा खनिज संपत्ती शोधाबरोबर डाऊझिंगचा उपयोग आणखी ज्या कारणासाठी केला जातो, ते म्हणजे लपविलेल्या बाँबचा शोध. याचे एक उदाहरण म्हणजे एडीई 651 (ADE 651) या बाँब डिटेक्टरचा दुरुपयोग. डाऊझिंग साधनाला निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक साधनाची जोड देऊन बनविलेले साधन. ही तकलादू साधने मध्य-पूर्वेतील युद्ध क्षेत्रात लपविलेली स्फोटके शोधण्यासाठी हजारोंच्या संख्येने विकले गेले. अमेरिका आणि ब्रिटनमधील सत्ताधार्‍यांनी स्वत:च्या फायद्यासाठी असे तकलादू बाँब डिटेक्टर्स इराकी मिलिटरीला त्यांच्या टेहळणी केंद्रासाठी विकलेत. ‘जेम्स रँडी एज्युकेशनल फाऊंडेशन’ने यातील भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि याविषयी प्रबोधन केले. या संघटनेने ADE 651 हे साधन खात्रीशीर असल्याचा पुरावा सादर करणार्‍यांना आपले 10 लाख डॉलर्सचे आव्हानही दिले. ADE 651 च्या निर्मात्या ब्रिटीश कंपनीने हे आव्हान स्वीकारले नाही. दुर्दैवाने इराकी सरकारमधील एका मिलिटरी अधिकार्‍याने या बाबींकडे दुर्लक्ष करून इराकी सरकारला अशी एक हजार साधने विकत घेण्यास भाग पाडले. त्याची किंमत 8 कोटी डॉलर्स एवढी होती. ही साधने गुप्तपणे वाहून नेल्या जाणार्‍या वाहनातील स्फोटके शोधण्यासाठी निरुपयोगी ठरली; परिणामी अनेक नागरिक आणि सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. मध्य-पूर्वेतील अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी अशी तकलादू साधने विकणार्‍या ब्रिटीश कंपन्यांनी अमाप संपत्ती जमविली. छद्मवैज्ञानिक साधनांचा व्यापार रोखण्यासाठी लोकप्रबोधन हाच खरा उपाय आहे. कुणी सांगावे, आपल्याकडेही नक्षलवादी जे भुसुरूंग जमिनीत पेरतात, ते शोधण्यासाठी भारतातील एखादा स्वार्थी उद्योगपती असे छद्मवैज्ञानिक साधन सरकारला विकत घेण्यासाठी भाग पाडेलही. हा धोका वेळीच ओळखायला हवा.

गुप्त धनाच्या शोधाची बुवाबाजी

जमिनीखालील पाणी, खनिजे किंवा लपविलेले धन शोधण्यासाठी पाश्चात्य जगात विज्ञानाचा मुलामा दिलेली साधने तरी वापरतात; पण भारतातील याबाबतची बनवेगिरी सर्वांना स्तीमित करणारी ठरावी. भारतात कोणीही उठतो आणि स्वत:ला दैवी सामर्थ्य लाभले आहे, अशी थाप मारतो. ‘डिव्हाईन पॉवर’चा सुळसुळाट असलेल्या आपल्या देशात सोन्याचा खजिना शोधणारी अशीच एक बुवाबाजीची घटना घडली. ऑक्टोबर 2013 मध्ये उत्तर प्रदेशातील दौंडीया खेरा ऊर्फ संग्रामपूर या गावात ही घटना घडली. तेथील एक साधू शोभन सरकार यांना स्वप्न पडले. एकोणिसाव्या शतकातील राम बक्ष सिंग या राजाच्या मालकीच्या किल्ल्यात एक हजार टन सोने पुरलेले आहे, असे या साधूने स्वप्नात पाहिले. त्याने भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाला तसे पत्राने कळविले. या खात्याने साधूचे स्वप्न गृहीत धरून उत्खननास सुरुवात केली. 18 ऑक्टोबर 2013 मध्ये या उत्खननाला सुरुवात झाली. 29 ऑक्टोबरपर्यंत संबंधित ठिकाणी खड्डे खणण्याचे काम चालू होते. सोने मिळाले नाहीच; उलट भारत सरकारचे प्रचंड आर्थिक नुकसान या मोहिमेत झाले. अखेर पुरातत्त्व विभागाचे डायरेक्टर जनरल प्रवीण श्रीवास्तव यांनी ही मोहीम थांबविली.

एका मराठी चित्रपटात प्रसिद्ध असं गीत आहे, ‘या टोपीखाली दडलंय काय?’ या चालीवर आपणही म्हणूया, ‘या जमिनीखाली दडलंय काय?’ ते सापडत तर नसतंच. बर्‍याचदा फसगत होते, हे कसं कळत नाही? कळतं; पण वळत नाही. कुणीतरी सांगायचं आणि आपण जमीन खणायची. खणणार्‍यांना सल्ला देणारे आणि खणण्याची यंत्रणा राबविणारे दोघेही आपले खिसे भरणार. उद्धवा! अजब तुझे सरकार! जेम्स रँडी म्हणतो त्याप्रमाणे अजूनही आपण अंधारयुगातच वावरत आहोत. अंधाराला भिऊन सैरभैर झालेल्या पतंगाप्रमाणे आपण अंधविश्वासाच्या आणि छद्मविज्ञानाच्या दिव्यावर झडप घालून पंख जाळून घेतो. माणसानं अंतरिक्ष जिंकत आणले; पण ‘जमिनीखाली दडलंय काय’ याच्या शोधाबाबत अजूनही अंधारयुगाचीच वाटचाल चालू आहे. प्रकाशाच्या वाटचालीबरोबर अंधारातील सैरभैर वाटचाल एकाच वेळी सुरू राहणे, हा केवढा विरोधाभास!

. रा. आर्डे

ऑस्टीन (अमेरिका)