दि. 7 जुलै 2018 रोजी म.अंनिस शाखा पिंपरी – चिंचवडला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. पूर्ण एकदिवसीय कार्यक्रम व दुसर्या दिवशी अतुल पेठे या म.अंनिस परिवारातील कलाकार – दिग्दर्शक यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचा प्रयोग, अशा रीतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथम सत्रामध्ये म.अंनिसची अभिवादनपर गाणी रिंगणनाट्य चमूने गायली. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिध्द ‘देऊळ’ चित्रपटकार गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यानंतर राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांच्याद्वारा सर्व मान्यवर पाहुण्यांचे सत्कारही विविध पदाधिकार्यांकरवी करण्यात आले. यानंतर मिलिंद देशमुख यांनी पिंपरी-चिंचवड शाखेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा सादर करीत आढावा घेतला.
म.अंनिस, राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी अलिकडील काळातील म.अंनिसच्या राज्यस्तरीय कार्याचा परामर्ष, सध्याच्या अस्थिर वातावरणाच्या छायेमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा रडत-खडत चाललेला तपास आदी विषय विश्लेषित करून पिंपरी – चिंचवड शाखेच्या एकूण कार्य, प्रगती आदींचा आढावा घेत आपल्या भाषणाची सांगता केली.
यानंतर प्रमुख वक्ते, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख आपल्या भाषणात म्हणाले, “धर्माच्या नावाखाली विध्वंसक सूडसत्र सुरू आहे. डोळस, विधायक धर्मचिकित्सांची गरज आहे. अंनिसने अंधश्रद्धा कुशलतापूर्वक दूर करून पुढील वाटचाल केली पाहिजे. सहअस्तित्वाच्या जाणिवा व सहभावना वाढीस लागल्या पाहिजेत. दुसर्याच्या शोषणाचा आपल्याला द्वेष वाटायला हवा. आपण डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा विस्तार करावा.”
कार्यक्रमाचे उद्घाटक गिरीश कुलकर्णी आपल्या उद्घाटकीय व्याख्यानात म्हणाले, “धर्माच्या व्यापारावर ‘देऊळ’ तयार झाला. दाभोलकर नावाच्या विचारांवर हल्ले संयम व सम्यक पध्दतीने व्हायला पाहिजे होते. आम्हाला माणूस बनवायचाय. लोकशाही आकसत चालली आहे ! आम्हाला लोकशाहीच समजत नाही. आम्ही केलेले नियम आम्हीच मोडत आहोत. माणूस म्हणून आम्हाला जगायचंय का ? हे महत्त्वाचं आहे.
विवेकाचा अर्थ गमावलाय. माणूसपण संपवत चाललोय आम्ही. अंनिस स्वतःची ओळख तयार करते. दाभोलकर गेले तेव्हा वैचारिक बाप गमावल्याचं दुःख झालं. तो निर्माण करण्यासाठी ‘भूतदया संकल्पना आढळत नाही निसर्गात. ज्ञाना – तुका गेले, तरी कर्मकांड चालूच!’ माणसासारखी माणसं मारली जातात. ज्ञानाचा दिवा पेटता ठेवणारे दाभोलकर अधून-मधून व्हायला पाहिजेत. मी ‘देऊळ’साठी प्रसिध्द नाही झालो. त्यातल्या विचारांसाठी मी ‘देऊळ’ काढला. सर्वांना आपलं म्हणण्यासाठी करुणा भरलेली असावी लागते. दाभोलकर सरांकडून मी हे शिकलो. मी त्यांची भक्ती करत नाही; विचारांचा अन्वयार्थ, अर्थ काढायचा प्रयत्न करतो. माझा मूळ विचार दाभोलकरांपर्यंत जाऊन पोचतो.” एवढे बोलून कुलकर्णींनी रजा घेतली. प्रथम सत्राचे व शाखेचे अध्यक्ष मा. मनोहर जांभेकरांनी सांगितले, मला शाखेने पंचवीस वर्षे पूर्ण केल्याचा आनंद होतो. डोळस श्रद्धा असावी. रस्त्यांना आइन्स्टाइन, गॅलिलिओची नावे द्यावीत हे सांगताना वैज्ञानिकता प्रत्यक्ष दैनंदिन व्यवहारात कशी आणता येईल याचा विचार त्यांनी मांडला. सर्व वक्त्यांचे विचारसार कथित करत त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष सुभाष सोळंकी यांनी आभारप्रदर्शन केले. अरुणा यशवंते यांनी सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय हे काम केले. एक तासाच्या मध्यंतरानंतर दुसर्या सत्राची सुरुवात झाली.
चर्चासत्र : म.अंनिसचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचे शिक्षण!
चर्चासत्रासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. एन. एस. उमराणी, साधना साप्ताहिकाचे संपादक मा. विनोद शिरसाठ, जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. माळी यांनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय संसाधन विभाग म.अंनिस चे सह कार्यवाह डॉ. राजेंद्र कांकरिया, प्रा. प्रतिभा कॉलेज, पिंपरी यांनी प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्त्यांचे शाखेच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते स्वागत केले.
यानंतर दुसर्या सत्राचे सूत्रसंचालन देविदास इंगळे यांनी केले. विनोद शिरसाठ यांनी अत्यंत शास्त्रोक्त पध्दतीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर शिक्षणामध्ये करून गणित इत्यादी विषय अधिकाधिक सोपे व सहज असे करून विद्यार्थ्यांचे आवडीचेही कसे करता येतील, ते सभागृहाला अतिशय रोचक पध्दतीने समजावून सांगितले. एन.एस.उमराणी यांनी, तीनशे वर्षांपूर्वी देशात ब्रिटिशांनी शिक्षण आणले; परंतु इथल्या व्यवस्थेने शिक्षणामुळे व्हावयाचे खरे परिणाम, ते कसे होऊ दिले नाहीत. परिणामी, इथले सर्वोच्च नेते व शास्त्रज्ञही बाबा व मंत्र-तंत्राच्या आहारी जात राहिले, याची माहिती दिली. हे शिक्षणाबरोबर वैज्ञानिक दृष्टी न शिकवण्याचे परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. वैज्ञानिक दृष्टी ही एक विचारपध्दती असून निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती व प्रयोग या टप्प्यांनी निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची पध्दती आहे, हे सांगितले. पुराव्यानिशी सिध्द झाल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवायचा नाही, ही वृत्ती त्यामध्ये असते, असे सांगून भारतीय संविधानामध्ये या शास्त्रीय विचारांचा अवलंब (डलळशपींळषळल ींशाशिीराशपीं) यांचा नागरिकांचे कर्तव्य म्हणून अंतर्भाव केला असल्याचे सांगितले.
यानंतर, जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. श्री. माळी यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात वैज्ञानिक दृष्टीच्या अभावाने निर्माण होणार्या वैचित्र्यपूर्ण घटना कशा निर्माण होतात ते उदाहरणासह सांगत सभागृहाला सतत हसवत ठेवत मनोरंजनात्मक मार्गाने वैज्ञानिक दृष्टीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अवलंबाच्या निकडीचे भान दिले आणि रजा घेतली. यानंतर शुभांगी घनवट यांनी आभारप्रदर्शन करुन दुसर्या सत्राच्या समाप्तीची ग्वाही दिली.
कुटुंब मेळा व सिंहावलोकन
या सत्रामध्ये कुटुंबमेळा, सिंहावलोकन, शाखेची रौप्यमहोत्सवी वाटचाल याविषयी मनोगते व्यक्त करण्यात आली. पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, सह कार्यवाह विश्वास पेंडसे, अॅड. मनीषा महाजन यांनी मनोगतातून अंनिसची वाटचाल व सध्याची आव्हाने याबाबत मत व्यक्त केले.
अॅड. मनीषा महाजन, शुभांगी घनवट, रविकर पाठक, सुभाष सोळंकी या चार ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मृत कार्यकर्त्यांच्या वारसदारांना, सात माजी शाखाध्यक्षांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेता – दिग्दर्शक अतुल पेठे होते. त्यांनी अत्यंत भावपूर्ण शैलीमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना सद्य:स्थितीचा आढावा घेतला. सायंकाळी सातच्या दरम्यान ‘हम होंगे कामयाब’ या समितीच्या पारंपरिक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, डॉ. राजेंद्र कांकरिया, संजय बनसोडे, सुभाष सोळंकी, संजय बारी, देविदास इंगळे, अंजली इंगळे, दिलीप कामत, अॅड. मनीषा महाजन, शुभांगी घनवट, राधा वाघमारे आदींनी विशेष परिश्रम घेतले. दि. 8 जुलै 2018 रोजी ‘समाजस्वास्थ्य’ हे अतुल पेठे दिग्दर्शित नाटक अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे सायं. 6.00 ते 8.00 दरम्यान रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आले. या कार्यक्रमासही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
– देवीदास इंगळे, पुणे