Categories
आंदोलन

कोल्हापूरचा ‘निर्भय मॉर्निंग वॉक!’

ऑगस्ट २०१८

कोल्हापूर पुरोगामी आहे का, हा वादाचा मुद्दा आहे; पण इथले पुरोगामी मूठभर असले की, निर्भयपणे प्रतिगाम्यांशी सामना करतात, एवढे खरे!

न्यूज चॅनेलवरील एका चर्चेत सनातन्यांच्या वकिलाने निर्लज्जपणे धमकी वजा इशारा दिला, “मॉर्निंग वॉक करत चला.” त्याला शहीद डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील भ्याड, खुनी हल्ल्याची पार्श्वभूमी होती, असे वक्तव्य केले. मॉर्निंग वॉकवेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता. बेसावध, नि:शस्त्र माणसावर मागून हल्ला करण्याची मर्दुमकी गाजवणार्‍या षंढांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि आता पुरोगामी घाबरून पळत सुटतील, असा विश्वासही वाटला. त्यातून अशी विकृत विधाने ऐकायला मिळू लागली.

पण कोल्हापूरकर मागे हटले नाहीत. त्यांनी जाहीर केले की, “आम्ही दरमहा वीस तारखेला ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढणार, धमक असेल, तर सनातन्यांनी आम्हाला गोळ्या घालाव्यात.”

पहिला ‘निर्भय मॉर्निंग वॉक’

कॉ. गोविंद पानसरे ज्या रस्त्याने ‘मॉर्निंग वॉक’ करत, त्याच रस्त्याने पहिला ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढण्यात आला. ते रोज शिवाजी विद्यापीठात कठड्यावर जाऊन बसत; पण कुलगुरूंनी विरोध करून आवाराचे फाटक कुलूपबंद केले, तरी ‘वॉक’ यशस्वी झालाच.

विद्यापीठ गावाबाहेर असल्याने पुढील ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ नागरी वस्तीत काढण्याचे ठरले. तेव्हापासून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विभागातून ‘वॉक’ काढला जातो. आतापर्यंत कोल्हापूरच्या प्रत्येक प्रमुख रस्त्यावरून, चौकातून, पेठेतून ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढला गेला.

पाऊस किंवा थंडी, सण-समारंभ किंवा निवडणुकीचाही त्यावर परिणाम झालेला नाही.

महापौरांचा सहभाग

गेल्या वर्षीच्या वीस जुलैची गोष्ट! त्या वेळच्या कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास ‘मॉर्निंग वॉक’मध्ये सामील होणार होत्या. पण धो-धो पडणार्‍या पावसामुळे लोक जमणार नाहीत, असे त्यांना वाटले. त्यांच्या पी.ए.ने दोनवेळा फोन करून खात्री करून घेतली, मगच त्या आल्या. रेनकोट, छत्री घेऊन भरपावसात उभा असणार्‍या पन्नास-साठ कार्यकर्त्यांना पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याही पुढचा धक्का म्हणजे अंनिसचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील सरही वॉकरचा आधार घेऊन सर्वांच्या पुढे होते.

आजपर्यंतच्या प्रत्येक ‘मॉर्निंग वॉक’ला एन. डी. सर वेळेवर जातीने उपस्थित आहेत. त्यांच्या पाच-दहा मिनिटांच्या प्रास्ताविकाने मरगळलेली मने प्रफुल्लित होतात. शासनाच्या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळे निराश बनलेले कार्यकर्तेपुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात.

‘निर्भय मॉर्निंग वॉक’मध्ये नंतरच्या महापौर स्वाती यवलुजे, त्यावेळच्या शिक्षण समिती सभापती वनिता देठे आणि आताचे शिक्षण समिती सभापती अशोक जाधव त्या-त्या भागातील नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहिले आहेत. एकदा तर जिल्हाधिकारी आणि आय.जी. विश्वास नांगरे-पाटील यांनीही हजेरी लावली होती.

नियमित ‘वॉक’

समतेच्या धाग्याने बांधलेले अनेक कार्यकर्ते नियमितपणे ‘निर्भय मॉर्निंग वॉक’मध्ये उपस्थित असतात. त्यामध्ये भटक्या-विमुक्तांचे पुढारी, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, सुरेश शिपूरकर, निहाल आणि तनुजा शिपूरकर, कॉ. बाबूराव तारळी, सतीश पाटील, अरुण पाटील, धनाजी जाधव, कुमार जाधव, रवी जाधव, समाजवादी पक्षाचे हसन देसाई, ‘खादी ग्रामोद्योग’चे सुंदर देसाई, यश आंबोळे, ‘सीपीएम’चे कॉ. शंकर काटाळे, ‘आयटक’चे कॉ. दिलीप पवार आणि कॉ. एस. बी. पाटील यांचा समावेश आहे. पानसरे कुटुंबियापैकी मल्हार आणि मेघा पानसरे कधी ‘मॉर्निंग वॉक’ चुकवत नाहीत.

‘मॉर्निंग वॉक’ बरोबर सकाळी सात वाजता सुरू केला जातो. फिरून आल्यावर आठनंतर त्याच ठिकाणी त्याचा समारोप होतो. त्यावेळी पुढील ‘मॉर्निंग वॉक’चे ठिकाण जाहीर केले जाते.

काही वेळा कार्यकर्ते आदल्या दिवशी त्या भागात पत्रके वाटतात. असे पत्रक वाचून कोल्हापुरातील राजकीय – सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर ‘वॉक’मध्ये सामील झाले. त्यांनी सातत्यही ठेवले आहे.

घोषणा व गीते

मॉर्निंग वॉकमध्ये ‘खुनी सनातनी चले जाव,’ ‘फुले शाहू आंबेडकर- आम्ही सारे दाभोलकर; आम्ही सारे पानसरे;’ ‘विवेकाचा आवाज – बुलंद करूया;’ ‘भारतीय संविधान झिंदाबाद’ अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला जातो. कृष्णात कोरे, संभाजी जगदाळे त्यात पुढे असततात. मधल्या वेळात प्रकाश हिरेमठ आपल्या खड्या आवाजात- “मारली तू गोळी, नको मारू बढाई, विचाराने व्हावे तुझी लढाई”, “माझ्या भारत देशात-कोणी कितीही शिकला/किती शिकला, साधा विज्ञान विसरला” अशा गीतांनी जागृती करतात.

गेली पाच वर्षे दर 20 तारखेला खुनी सनातन्यांना आव्हान देत कोल्हापूरच्या विविध भागात होणारा हा ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-लंकेश यांची स्मृती तर जागवत आहेच, तसेच गेल्या पाच वर्षांत खुन्यांचा शोध तपास यंत्रणा लावू शकलेल्या नाहीत. खुनी आणि त्यांचे सूत्रधार अजूनही मोकाटच आहेत, याची जाणीव प्रशासनाला करून देत सर्वसामान्य जनतेला जागवण्याचे काम करत आहे.

रमेश वडणगेकर

संपर्क ः 9764836994