“टाळ-मृदंगाच्या गजरात वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने त्या सावळ्या विठूरायाला भेट्ायला निघाल्या आहेत. जात-धर्म, स्त्री- पुरुष, गरीब- श्रीमंत हे सर्व भेद गळून पडले आहे. अवघा रंग एक झाला, असे संपूर्ण वातावरण आहे. ही वारी म्हणजे सामाजिक समतेचे जगातील सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल. विशेष म्हणजे देवाबद्दलचा पूर्वी जो धाक होता, तोही संपून देव सोयरा, सखा, जीवलग झाल्याचे या वारीतून पाहायला मिळते.”

‘गात जा गा, गात जा गा …. प्रेम मागा विठ्ठला’ अशी आळवणी करीत सख्या पांडुरंगाला भेटण्यासाठी वारकरी निघाले आहेत. आपल्या सख्याच्या भेटीची ओढ प्रत्येकाच्या हालचालीत दिसत आहे. देवाशी असणारी सलगी त्यातून व्यक्त होत आहे. देवाविषयी रूढ केलेला धाक संपून एक जिव्हाळा निर्माण झाल्याचे पंढरीच्या वारीत पाहायला मिळते आहे. देव कुणी तरी अगाध आहे, सर्व शक्तिमान आहे. त्याचा कोप झाला, तर आपला तो विनाश करील. त्याची मर्जी सांभाळली पाहिजे. त्यासाठी यज्ञ, जप, तप केले पाहिजेत, गृहत्याग करून वनात गेले पाहिजे. असा देवाविषयी प्रचंड धाक लोकमानसात होता. त्या देवाने केलेले पराक्रम, त्याने केलेली युद्धे, दुष्टांचा केलेला संहार अशा कथा कानावर आदळत होत्या. या देवांना प्रसन्न करण्यासाठी नवस केले जात होते. त्यासाठी देव आणि भक्त यांच्यात मध्यस्थ निर्माण झाले होते. त्यातून भोळ्या-भाबड्या लोकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. कर्मकांडांनी समाजात जर्जर झाला. तेव्हा वारकरी संतांनी असा देव भेटविला की, जो कधीही कुणावर कोपत नाही, रागवत नाही. त्याने यापूर्वी कुणाला मारल्याचा इतिहास नाही, त्याच्या हातात शस्त्र नाही. तो देव म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. हा देव भेटल्यानंतर धाकाची जागा जिव्हाळ्याने घेतली. यज्ञयागात पशुहत्येसारखे प्रकार करून पुण्यसंचय करण्याच्या प्रथेला धक्का देऊन सोपे साधन वारकरी संतांनी जनमानसात रुजविले.
शक्तीच्या उपासकांनी आपल्या देवीचा धाक निर्माण केलेला होता. आदिमाया शक्तीची रुपे म्हणून जी प्रसिद्ध आहेत त्यात कालिका, दुर्गा, महिषासुरमर्दिनी यांचा समावेश होता. या देवीची रुपे आपण पाहिली, तर ती भयानक आहेत. त्यांचा जनमानसात एक धाक आहे. वारकरी संतांनी या देवींनाही विठ्ठलाच्या रुपात पाहिले. देवीची भयानक रुपे लोप पावून ती प्रेमळ झाली. या प्रेमभक्तीमुळे वारकरी संप्रदायात विठोबाची कधी विठाई माऊली झाली ते देव आणि भक्त दोघांनाही कळले नाही. विठाई माऊली जरी झाली तरी तिचे प्रेमळ रूप मात्र बदलले नाही. उलट भक्ताच्या भेटीने तिचा अपत्यभाव अधिकच उचंबळून येतो. भक्तीच्या भुकेने व्याकुळ झालेल्या भक्तांना ती प्रेम पान्हा पाजते. या आईच्या सान्निध्यात प्रेमाचे भरते येते.
अंगी प्रेमाचे भरते। न घे उतार चढते॥
अशी भक्तांची अवस्था होते. शक्तिपूजकांप्रमाणे वारकरी संतही या विठाई, किठाई, कृष्णाई, कान्हाईच्या नावाने गोंधळ घालतात. नामदेवरायांनी ‘विठाई सावळे डोळसे रंगा येई वो’ असे गोंधळाला येण्याचे आवाहन केले आहे. तुकाराम महाराजांनी थेट गोंधळच घातला. ‘जेथे विठूचे राऊळ। तेथे तुकायाचा गोंधळ।’ असा भाव त्यांनी व्यक्त केला. गोंधळाप्रमाणे विठोबाचा जागरही केला. ‘देवाचे भरता वारे। अंगी प्रेमाचे फेफरे॥’
सर्वसामान्य, तळागाळाच्या समाजात अशी दैवतांचे गोंधळ-जागरण घालण्याची प्रथा होती. ती बंद करण्यासाठी वारकरी संतांनी प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर उच्चवर्णियांत पुण्य संचयासाठी केल्या जाणार्या यज्ञ-यागालाही वारकरी संतांनी पर्याय सुचवून सोपे साधन सांगितले. ते म्हणजे-
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी ॥
केवळ पुण्यच मिळविण्याचा नाही, तर पाप घालविण्याचाही मार्ग सांगितला-
नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीचे॥
विठ्ठलाच्या नामाचे संकीर्तन केले की, सर्व पापांचा नाश होण्याचा मार्ग दाखविला आणि देवाबद्दलचा धाक कमी करून जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. तुकाराम महाराज तर जगातली सर्व नाती त्या विठ्ठलामध्ये पाहत होते.
विठ्ठल माय–बाप चुलता। विठ्ठल बंधू आणि भ्राता।
विठ्ठलाविन चाड नाही गोता। तुका म्हणे आता नाही दुसरे॥
विठ्ठलाशिवाय जगात दुसरे कोणतेही नाते नाही, तोच सर्वस्व आहे, हा प्रेमभाव वाढीस लागला. त्यामुळे देवाबद्दलचा धाक कमी होऊन पराकोटीचा जिव्हाळा वाढीस लागला. धाक कमी झाल्यास जसा जिव्हाळा वाढतो, तसाच कधी-कधी अनुरागही निर्माण होतो. त्यातून आपल्या प्रिय व्यक्तीसोबत भांडणतंटाही होतो. विठोबाबद्दलचा धाक कमी झाल्यामुळेच अनेक वारकरी संतांना त्याच्याबद्दलचा अनुराग निर्माण झाला आणि त्यातून देव आणि संत यांच्यात भांडणंही झाली. या भांडणात नामदेव महाराज देवाच्या औदार्यावर शंका घेतात आणि देवाला सुनावतात- देवा तू पतीत पावन आहेस अशी ख्याती ऐकून तुझ्या दारात आलो; पण तू तसा नाहीस म्हणून मी माघारी जातो-
पतीत पावन नाव ऐकून आलो मी द्वारा।
पतीत पावन नव्हे, तरी मग जातो माघारा॥
किंवा
घेशी तेव्हा देशी ऐसा आसशी उदार।
काय धरू देवा तुझे कृपनाचे द्वार।
या अनुरागाचा सर्वाधिक स्फोट कुणाच्या अभंगात पाहायला मिळत असेल, तर तो जनाबाईच्या. जनाबाई थेट देवाला कचकचीत शिव्याच हासडते-
अरे विठ्या विठ्या विठ्या। मूळ मायीच्या कारट्या।
तुझी रांड रंडकी झाली। जन्म सावित्रा चुडा ल्याली।
तुझे गेले की रे मडे। तुला पाहूनी काळ रडे॥
उभ्या राहूनी अंगनी। शिव्या देते दासी जनी॥
अशा अनुरागाने भरलेले अभंग सर्वच संतांच्या साहित्यात पाहायला मिळतात. त्यातूनच देवाबद्दल असणारा दरारा कमी होऊन देव कुणा परलोकातला नाही, तर आपल्यातलाच आहे. आपला सखा आहे, सोबती आहे, आपल्या मदतीला धावून येणारा आहे, असे वाटते; मग सांसारिक जबाबदार्या सांभाळतानाही तो आपल्या सोबत असल्याचा आधार मिळतो. जनाबाईला दळताना, सावता महाराजांना खुरपिताना, नरहरी सोनारांना दागिने घडविताना आणि गोरोबा काकांना मडकी घडविताना इतकेच नव्हे, तर सज्जन कसायांना मांस विकताना आणि चोखोबांना मेलेली जनावरे ओढतानासुद्धा तो आपल्यासोबत असल्याची जाणीव होते.
या जिव्हाळ्यातूनच मग पंढरपूर हे माहेर वाटू लागते, चंद्रभागा बहीण, तर पुंडलिक बंधू वाटू लागतो. केवळ हे नाते बहीण-भावापुरते मर्यादित राहत नाही, तर ते प्रिय सखा, पतीसारखे होते. तुकाराम महाराज आपले भगवंताविषयी असणारे नाते स्पष्ट करताना म्हणतात-
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण। आम्हा नारायण तैशापरी।
पतिव्रता स्त्रीला ज्याप्रमाणे आपला पती हाच प्रमाण आहे. त्यामुळेच त्याच्याविषयीचा जिव्हाळा आमच्या मनात निर्माण होतो. हा जिव्हाळा वारकर्यांमध्ये रुजलेला असल्यामुळे मोठ्या ओढीने ते पंढरपूरच्या दिशेने त्याच्या भेटीला निघतात. आज लाखो वारकरी जात, धर्म, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत हे भेद विसरून मजल दरमजल करीत, त्या सावळ्या विठूला भेटायला निघाले आहेत. सामाजिक समतेचाच हा जागर म्हणावा लागेल. पंढरीच्या दिशेने निघालेल्या सोहळ्यात अलिकडे समाजात जागृतीचेही विविध उपक्रम राबविले जात आहेत. एकाच ठिकाणी एवढा मोठा समूह एकत्र भेटत असल्याने त्याचे चांगले परिणामही पाहायला मिळत आहेत.
वारकरी संतांनी दिलेल्या समताधिष्ठित मूल्यांशी जोडून घेण्यासाठी आता सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्तेप्रयत्न करताना दिसत आहेत. राष्ट्र सेवा दल, एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन, लेक लाडकी अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांसह अनेक संघटना एकत्र येऊन ‘एक तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबवीत आहेत. एक दिवस पंढरीच्या वारीत चालत आहेत. या चालणार्यांत लेखक, कवी, पत्रकार, शाहीर, विचारवंत यांचा समावेश असतो. तीन वर्षेज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात चालल्यानंतर या वर्षी 30 जून रोजी हा उपक्रम तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राबविण्यात आला. नेहमीप्रमाणे शरद कदम आणि सुभाष वारे यांनी या उपक्रमाचे नेटके नियोजन केले होते. या वर्षी या उपक्रमाचे आणखी एक पाऊल पुढे टाकले. ते म्हणजे थेट पंढरपूरपर्यंत ‘संविधान जागर दिंडी’ काढण्यात आली आहे. सध्या ही दिंडी सुरू आहे. संविधानप्रेमींनी या दिंडीत सहभागी व्हावे. मी स्वतः (शामसुंदर महाराज सोन्नर) या दिंडीचे नेतृत्व करीत असून वारकरी संतांचे विचार आणि संविधानातील मूल्यं कशी परस्परपूरक आहेत, हे समाजात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. या पूर्वी 2012 साली जेव्हा स्त्री-भ्रूण हत्येच्या घटना महाराष्ट्रात वाढल्या, तेव्हा अशीच ‘स्त्री- भ्रूणहत्याविरोधी जागर दिंडी’ काढली होती. त्यावेळी मी आणि माझी मुलगी ज्ञानेश्वरी हिने ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात महत्त्वाच्या मुक्कामात कीर्तन करून लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन महिला आणि बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे याही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
वारकर्यांमध्ये 90-95 टक्के लोक हे माळकरी असतात. माळकरी अभक्षभक्षण (मांस-मच्छी) आणि अपेयपान (दारू) करीत नाहीत; मात्र यातील बहुतेकजण शेतकरी आणि कष्टकरी असल्याने त्यांना तंबाखू आणि विडीसारखी व्यसनं मात्र असतात. या दोन्हींचा त्यांच्या शरीरावर आणि संसारावर परिणाम होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून सर्व व्यसनांपासून मुक्तीसाठी संघाच्या वतीने दिंडीत समाजजागृती केली जाते. दारू, गांजा, अफीम, गर्द या व्यसनांपासून ते तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट यांच्या सेवनाने होणार्या दुष्परिणामांबाबत जागृती केली जाते. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या व्यसनांपासून होणार्या रोगांच्या दुष्परिणामाचे प्रदर्शन भरविले जाते. त्याशिवाय दिंडीच्या वाटेवर ट्रकमध्ये अखंड पथनाट्य सुरू असते. व्यसनाचा राक्षस कसा समाजाला गिळंकृत करतोय, ते या पथनाट्यातून दाखविले जाते.
पर्यावरण प्रदूषण ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची समस्या होऊ पाहत आहे. पर्यावरण जागृतीबाबत अनेक संस्थांच्या माध्यमातून जागृती केली जाते. ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे तर गेल्या पाच वर्षांपासून पालखी सोहळ्यात पर्यावरणाची दिंडी काढतात. त्याशिवाय भारुड सम्राज्ञी चंदाबाई तिवाडी याही भारूडाच्या माध्यमातून समाजजागृती करतात. वारकर्यांचा संतवचनावर विश्वास असल्यामुळेच संतवचनांच्या माध्यमातूनच ही जागृती केली जाते. जलसाठा आणि वृक्षांचे महत्त्व सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
नगरेची रचनावी। जलाशये निर्मावी।
महा वने लावावी। नानाविध॥
एखाद्या नगराला पाणीटंचाईची समस्या भेडसावू नये असे वाटत असेल तर ते नगर रचण्यापूर्वी जलाशयाची निर्मिती करा आणि पर्यावरणाची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी महावने लावा, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुकाराम महाराजांची पर्यावरण विषय भूमिका तर-
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती॥
येणे रुचे आम्हा एकांताचा वास। नाही गुण-दोष अंगा येत॥
या अभंगातून प्रकट झालेली आहे. अशा संतवचनांचा हवाला देऊन पर्यावरणजागृती केली जाते.
काही कृषी संस्थांही वारीच्या वाटेवर वेगवेगळी प्रदर्शने भरवून कोणते बियाणे वापरावे, कोणत्या खतांचा वापर करावा, कोणत्या पिकांना कोणती कीटकनाशके वापरावीत याची प्रदर्शने वारीच्या वाटेवर भरवत आहेत. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत औषध वाटप केले जात असतानाच काय आरोग्यविषयक काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शनही केले जाते. एकंदर ही वारी केवळ आध्यात्मिक पायवाट न ठरता, ती जनजागृतीची वहिवाटही ठरत आहे, हे महत्त्वाचे.