महाराष्ट्र अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते डॉ. मच्छिंद्र वाघ, रा. नेवासा, जि. अहमदनगर यांचे 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मच्छिंद्र वाघ हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात ‘आरोग्य सेवक’ म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्याकाळी लोक त्यांना डॉक्टर म्हणूनच हाक मारीत. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात हागणदारीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती.
डॉ. वाघ हे 1991 पासून अंनिसशी जोडले गेले. ते चमत्कारांच्या प्रयोगाचे सादरीकरण अत्यंत सफाईदारपणे करीत असत. नगर जिल्ह्यात त्यांचे हजारो कार्यक्रम झाले आहेत. बुवाबाबांचा भांडाफोड करण्यात ते नेहमी अग्रेसर असत. अनेक बुवांच्या दरबारात जाऊन त्यांनी नगर जिल्ह्यातील बुवाबाजी बंद केली होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी अंनिसचे काम सुरू ठेवले होते. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या पत्नीची त्यांनी केलेली सेवा अद्वितीय होती.
डॉ. वाघ हे फक्त बोलके सुधारक नव्हते, तर ते कर्ते सुधारक होते. म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबात पुरोगामी विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपली दोन मुलं अभय व अभिजित यांचा सत्यशोधकी पद्धतीने विवाह करून आपण कर्ते सुधारक आहोत, हे सिद्ध केले. हा विवाह अंनिसच्या वतीने लावलेला महाराष्ट्रातील पहिलाच ‘सत्यशोधकी विवाह’ होता. या विवाहाप्रसंगी निळू फुले, प्रकाश आंबेडकर, राम नगरकर व डॉ. नरेंद्र दाभोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वाघांनी सेवानिवृत्तीनंतर अंनिसचे पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते महिन्यातील काही दिवस अंनिसला देऊ लागले. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाची नोंद त्यांच्या डायरीत ते करीत असत. अंगात येणार्या महिलेची नक्कल ते हुबेहूब करत. त्यांना अनेक सामाजिक संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
नेहमी हसतमुख असणारे डॉ. मच्छिंद्र वाघ आता आपल्यात नाहीत. जातानाही त्यांनी मरणोत्तर देहदान करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. वाघ कुटुंबियांच्या दु:खात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहभागी आहे.