Categories
संतविचार

जातिअंतासाठी महात्मा बसवण्णांच्या तीन रीती

मार्च - २०१७

जातिव्यवस्थेशी झुंजणारे महात्मा बसवाण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून करून देत आहोत

मध्ययुगीन कालखंडात भारतीय समाज हा जातिवर्णव्यवस्थेच्या चातुर्वर्णात विभागला गेला होता. त्यातही विभिन्न जाती, उपजातीत समाज छिन्नविछिन्न झाला होता. ‘जात’ ही मानवनिर्मित व्यवस्था असून ती केवळ एका विशिष्ट समुदायाचे हितसंबंध जोपासण्यासाठी, समाजात भेद पसरविण्यासाठी अस्तित्वात आणली गेली व टिकविण्यात आली. याचे सखोल अध्ययन करून महात्मा बसवण्णांनी या अमानवीय व्यवस्थेच्या विरुद्ध लढा पुकारला. त्यासाठी ते पहिल्यांदा वर्णावनत झाले. उत्तम कुळात जन्मल्याचे निराकरण करून आपली नाळ त्यांनी शूद्रातिशूद्रांशी जोडली आणि सांगितले, “वडील आमचे मातंग चेन्नय्या, आजोबा आमचे डोहर कवकय्या, चुलते आमचे चिक्कय्या पाहा, दादा आमचे किन्नरी बोम्मय्या.” बसवण्णांच्या या आश्वासक वाणीने आणि समता प्रतिपादक इष्टलिंग तत्त्वाने तत्कालीन बहुजन समाजात स्वातंत्र्याची, स्व-अस्तित्वाची जाणीव निर्माण झाली. बसवण्णांनी जात, वर्ण, वंश व लिंग हा सारा भेद दूर सारून सर्वजण समान असल्याचे सांगितले. यासंदर्भातील बसवण्णांचे हे वचन पाहा –

देव, देवा मम विज्ञापना ऐका हो

विप्रापासून अंत्यजापर्यंत

शिवभक्त झालेले सर्वजण समान म्हणे मी.

ब्राह्मणांपासून चांडाळापर्यंत

भवी असलेले सर्व सर्वजण सारखेच म्हणे मी.

असा विश्वास असे मम मनी.

दात दिसतील असे नाक कापा हो, कूडलसंगमदेवा.

(ब. व. क्र. 711)

महात्मा बसवण्णा हे कर्तेसुधारक होते. पहिल्यांदा स्वत: आचरण करून नंतर त्यांनी इतरांना सांगितले. अनुभव मंटपात सर्वांना मुक्त प्रवेश दिला. ‘सत्य-शुद्ध कायक’ (श्रम) आणि ‘जंगम दासोह’ (समाजासाठी विनियोग) या दोनच अटी होत्या. कायकाला कैलासाची प्रतिष्ठा मिळाली, तत्परिणामी सर्व जातिवर्णातील श्रमजीवी अनुभव मंटपात एकत्र बसत. प्रधानमंत्र्याचे कायक करणारे बसवण्णा व चप्पल शिवणारा चांभार हरळय्या हे अनुभव मंटपात एकाच आसनावर बसून चर्चा करीत. अशा प्रकारे महात्मा बसवण्णांनी बहुजन समाजाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन त्याच्यातील कनिष्ठत्वाची, हीनत्वाची, न्यूनगंडाची मनोभावना दूर केली. ही बसवण्णांनी जातिअंतासाठी आचरणात आणलेली पहिली रीत म्हणता येईल.

अनुभव मंटपात समान, तसेच समाजातही आपण सर्वजण समान आहोत. “लोखंड तापविणारा लोहार झाला, कपडे धुणारा धोबी झाला, विणणारा विणकर झाला, वेदपठण करणारा ब्राह्मण झाला. कानातून जन्मलेला कोणी आहे जगात?” असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी श्रमावरून जात ठरविणार्‍या व्यवस्थेला जाब विचारला आहे. सर्वांचे श्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत, तसेच सर्व श्रम करणारेही समानच आहेत. म्हणून एकत्र बसणे, चर्चा करणे, एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणे; एवढेच नाही, तर सहभोजन घेणे, हाच खरा शिवाचार होय, असे बसवण्णा म्हणतात आणि या तत्त्वाचे आचरण म्हणूनच नागीदेव कांबळे या अस्पृश्याच्या घरी जेवण घेतात, महार चेन्नय्याच्या घरी भोजन करतात. जातियता निर्मूलनासाठी बसवण्णांनी आचरलेली ही दुसरी रीत म्हणता येईल. बसवण्णांच्या या दुसर्‍या रीतीने तत्कालीन वैदिक व्यवस्था हादरली, भयभीत झाली. या प्रसंगामुळे झालेला सामाजिक भूकंप खुद्द बसवण्णाच आपल्या एका वचनात शब्दबद्ध करतात.

वेद थरारले, शास्त्रे बाजूला हटली।

तर्कही अतक्य होऊन मूक झाले।

आगमही हटून दूर सरले।

कारण आमच्या कूडलसंगमदेवाने

मादार चेन्नय्याच्या घरी भोजन केले.

(ब. व. क्र. 750)

महात्मा बसवण्णा एवढ्यावरच थांबले नाहीत. जातियतेचे समूळ उच्चाटन करणे, हे त्यांचे ध्येय होते. सहपंक्ती भोजन समाज पचवू लागला. ही सामाजिक प्रक्रिया संथपणे जोर धरू लागली, तेव्हा अनुभव मंटपात जेवणे-जेऊ घालणे, सहपंक्ती भोजनाबरोबरच कन्या देण्या-घेण्यासंबंधी चिंतन सुरू झाले. इष्टलिंगधारी आपण सर्वजण समान आहोत, एकमेकांच्या घरी आपण जेवण घेत आहोत, तर आपल्यात सोयरीक का होऊ नये? जोपर्यंत आपण असे करणार नाही, तोपर्यंत जातियता समूळ नष्ट होणार नाही. जेवणे नि जेऊ घालणे मान्य करून सोयरीक जुळविण्यात जर कूळ शोधत असतील, तर ते भक्त नव्हेत, शहाणे नव्हेत, असे स्पष्ट मत बसवण्णा नोंदवितात –

जेवणे नि जेऊ घालणे यात शील नको म्हणती,

पण सोयरीक जुळविण्यात कुळाचा विचार करती.

कसे बरे त्यांना भक्त म्हणू?

कसे बरे त्यांना शहाणे म्हणू?

कूडलसंगमदेवा, ऐका हो,

चांडाळीण शुद्ध पाण्याने न्हाल्यापरी हो.

(ब. व. क्र. 628)

महात्मा बसवण्णांच्या या समताधिष्ठित आचार-विचारांमुळे अनुभव मंटपात, शरण समुदायात सर्वांगीण समता निर्माण झाली होती, म्हणूनच चांभार हरलय्या आणि ब्राह्मण मधुवरस हे आपली पूर्वाश्रमीची जात विसरून समतेचे पाईक झाले होते. समता केवळ विचारात नको, तर ती आचरणातही यावी म्हणून त्यांनी आपल्या मुला-मुलीचा विवाह करण्याचा प्रस्ताव अनुभव मंटपात ठेवला. बसवण्णांसह सर्वच शरणांनी या विवाहास मान्यता दिली. हा विवाह संपन्न झाला आणि शतकानुशतके जातियतेचे विषबीज पेरणार्‍या शक्ती पराजित झाल्या. समतेचा ध्वज फडकला. जातिअंतासाठी बसवण्णांची ही तिसरी रीत म्हणता येईल. महात्मा बसवण्णांचा समता ध्वज उंचावत ठेवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज नि बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. या महामानवांच्या वाटेवर चालणार्‍या पथिकांनी हा वारसा अत्यंत निष्ठेने जपला व संवर्धित केला पाहिजे.

(संदर्भ : बसवण्णनवर वचनसंपुट (समग्र वचन संपुट -1)

संपादक : डॉ. एम. एम. कलबुर्गी

प्रकाशक : कर्नाटक सरकार, कन्नड पुस्तक प्राधिकार, बेंगळुरू, दुसरी आवृत्ती : 2001)

राजू ब. जुबरे, भालकी

संपर्क : 08904638908