पुणे शाखेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी 15 दिवसांमध्ये तीन महिलांचे समुपदेशन करून त्यांच्या जटा सोडविल्या. सुनंदा बोराडे, निर्मला जगताप आणि अनिता पात्रोड या तीन कष्टकरी महिलांच्या जटा सोडवून त्यांच्या डोईवरचे ओझे उतरविले. याबाबत अनिता पात्रोड या महिलेची जटा निर्मूलनाची कहाणी खाली देत आहोत…
अनिता पात्रोड, वय वर्षे 40, यांच्या डोक्यात पंधरा वर्षांपूर्वी जट (केसांचा गुंता) झाली. परंतु ती देवीची जट आहे.ती कापली तर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, अशी भीती तिला एका भगताने घातली. त्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली.त्यामुळे ती जट काढण्यास तयार नव्हती, परंतु तिच्या मनात असणारी भीती दूर करून जट कशी तयार होते, याविषयी तिचे समुपदेशन केले व तिच्या मनात असणारी भीती दूर केली. गेली 15 वर्षांत ती जट जास्त प्रमाणात वाढत गेली. ती जट पाच ते सहा किलोच वजनाची झाली होती. सतत डोक्यावर ओझे… याचा त्रास अनिताला होत होता.पण मनात असणार्या अंधश्रध्देपोटी जट काढण्यास तयार नव्हती. परंतु याआधी केलेल्या जट निर्मूलनाची बातमी पेपरमध्ये आली होती. ती ज्या ठिकाणी घरकाम करत होती त्या मोनिका मॅडमनी तिला ती बातमी वाचून दाखवली. जट काढल्याने कोणाचा मृत्यू होत नाही. तेव्हा अनिताची भीती कमी झाली. त्यानंतर आम्हाला फोन करून अनिताची माहिती दिली. तिचे समुपदेशन करून तिची जट काढण्यात आली.त्यानंतरची तिची प्रतिक्रिया म्हणजे खूप वर्षांपासून मला केसात गजरा, फूल घालण्याची इच्छा होती, परंतु डोक्यात जट असल्यामुळे मला सतत केसांना कापड बांधून ठेवावे लागत होते. परंतु आता मला या सर्व गोष्टी करावयास मिळणार. डोक्यावरचे ओझे कमी झाल्यामुळे मला खूप हलके वाटत आहे. तिच्या चेहर्यावरचे हसू हेच आमच्यासाठी लाख मोलाचे…
–मिलिंद देशमुख, पुणे