पौराणिकता, इतिहास, वर्तमान आणि भविष्यवेध या सार्वकालिक स्थितीतील संदर्भांचा साक्षेपी धांडोळा घेतला तर पुन्हा-पुन्हा हेच निदर्शनास येते की, समाजपरिवर्तनासाठी कुठल्याही स्तरावरील हिंसेच्या पुरस्काराला विरोधच केला पाहिजे. कारण आजपर्यंतच्या मानवी उत्क्रांतीतील विकासाच्या वाटचालीत माणसाने उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर हिंसेचा विनियोग कमी-कमी करीत आणलेला आहे. अर्थात, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासाला संरक्षणात्मक सामग्रीच्या संशोधनाने गती दिली असली, तरी मानवी विवेकाने त्याच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सतत चालविलेले दिसतात. त्यामुळे वर्तमानात आणि भविष्यात देखील आपण सर्व प्रकारच्या, सर्व स्तरावरील हिंसेच्या विरोधात आणि अहिंसेच्या बाजूने ठामपणे व संघटितपणे उभे राहणे आवश्यक आहे. हे केवळ विचारसंवादाच्या स्तरावर असणे पुरेसे नाही, तर त्याहीपेक्षा अधिक छोट्या-मोठ्या कृतीच्या पातळीवर राहणे अत्यावश्यक आहे. कारण विवेकी विचाराने सातत्यपूर्ण व संघटितपणे कार्यरत राहून विधायक व कृतिशील हस्तक्षेपाने समाज परिवर्तन शक्य आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे आणि आम्ही तो आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांतील यथाशक्ती कार्यातून सिद्ध देखील केला आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे अशा आशावादी भूमिकेतून धोरणीपणाने आम्ही आजच्या असुरक्षित, असहिष्णू, दहशतवादी, हुकूमशाही वाटचाल करणार्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्याचा प्रयत्न संघटितपणे, सामूहिकपणे चालवित राहणार आहोत. हाच सामूहिक संकल्प महाराष्ट्र अंनिस व संविधान समर्थक समविचारींच्या सहभागाने आयोजित पुणे येथील ‘धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्यव्यापी संकल्प परिषद’ निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो.
वर्तमान व नजीकचा संकल्प:-
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा 20 ऑगस्ट हा स्मृतिदिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा करण्याचे देशातील सर्व विज्ञानवादी संस्था-संघटनांनी ठरविले आहे. त्याची सुरूवात या वर्षापासून झाली आहे. त्याला प्रबोधनासाठी अधिक सघन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र अंनिसने 20 ऑगस्ट, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन ते 20 सप्टेंबर, चमत्कार सत्यशोधन दिन या महिनााभरात यापुढे दरवर्षी ‘सर्वांगीण मानवी विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन- संवाद व प्रबोधन अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे काही कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. पुढील वर्षी ते अधिक नियोजितपणे संयोजित करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
मोहनदास करमचंद गांधी व कस्तुरबा गांधी म्हणजे बा-बापू या दोघांचे 150 वे जन्मवर्ष 2 ऑक्टोबर 2018 ते 2019 दरम्यान देशभर साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र अंनिसतर्फे देखील त्यानिमित्ताने गांधी जीवनकार्य विचार समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील वर्षी सप्टेंबर 2017 मध्ये सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे आणि आता भूपेश गुप्ता भवन, मुंबई येथे ‘विवेकी दृष्टीने गांधी समजून घेताना’ राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने गांधींच्या विचारकार्याचे वेगळेपण, महत्त्व, कालसुसंगता आणि त्यांच्या देव, श्रद्धा, उपासना, धर्म, जातविषयक संकल्पनांसह त्यांच्या वरील विविध आक्षेपांची चर्चा उपस्थित केली जाणार आहे. त्यासाठी तयारी करून पुढील वर्षभरात विविध समाजगटांसह कार्यशाळा, प्रबोधन कार्यक्रम, विद्यापीठस्तरीय गांधी महोत्सव, देश व महाराष्ट्रात गांधी परिक्रमा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा विचार आहे.
आर्थिक व सदस्य विस्तारासाठी:-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य लोकाधारित आहे. त्यामुळे संघटन चालविण्यासाठी राज्यात व राज्याबाहेरील वाढत्या मागणीला समर्थपणे व सुनियोजितपणे न्याय देण्यासमवेतच आवश्यक आर्थिक पाठबळ देखील वाढते आहे. त्याला उभारण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे मुखपत्र असलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ मासिकाचा नोव्हेंबर-डिसेंबर हा जोडअंक आम्ही विशेषांक म्हणून प्रकाशित करतो आणि त्याला व संघटनेला देणग्या जमा करीत असतो. यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणेच आमचे देणगीदार, जाहिरातदार, हितचिंतक व समविचारी आपल्याकडे आलेल्या आमच्या सहकारी कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मदत द्याल, अशी आशा आम्ही बाळगून आहोत. कर्मठ, सनातनी प्रवृत्तींनी विरोध आणि बुद्धिभेदाचा कितीही बागुलबुवा उभारण्याचा प्रयत्न केलेला असला तरी आमच्या कार्याचा वस्तुपाठ आणि त्यांच्या राष्ट्रद्रोही, संविधानविरोधी हिंसक कट-कारस्थानांचा पर्दाफाश आता जगासमोर ढळढळीतपणे आलेला आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वाढत्या मागणीला देश-विदेशात प्रतिसाद देण्यासाठी आणि समाजाकडेच आपली झोळी पसरवून देणगी घेऊन सहकार्याची साथ मागणार आहोत. त्यासोबतच डिसेंबर व जानेवारीदरम्यान संघटनेच्या वार्षिक सभासदत्वाची व वार्तापत्र वर्गणीदार नोंदणी मोहीम देखील आपल्याला राबवायची आहे. आज सभासद असणार्यांनी नवीन प्रत्येक 10 सभासद आणि वर्गणीदार असणार्यांनी नवीन प्रत्येकी 5 वर्गणीदार आम्हाला मिळवून दिलेत तर आम्ही आपले शतश: ऋणी राहू. सव्वा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे महाराष्ट्र राज्याला मे 2020 मध्ये पूर्ण होणार्या 60 वर्षांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचे हितचिंतक असणार्या सव्वा लाख सभासदांची नोंदणी करणे शक्य आहे का? त्यासाठी नियोजनबद्धरित्या सर्वांनी कटिबद्ध होऊ या! असे विनम्र आवाहन करतो आहे.
महिला सक्षमीकरण प्रबोधन:-
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, 3 जानेवारी ते राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, 12 जानेवारीदरम्यान महाराष्ट्र अंनिसच्या राज्य महिला सहभाग विभागाच्या पुढाकाराने ‘महिला सक्षमीकरण प्रबोधन मोहीम’ गेली 5 वर्षे दरवर्षी राबविली जात आहे. बालिका, कुमारी, युवती, महिला यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आकलनाची स्पष्टता व दृष्टिकोन विकसित करून त्यांचा समर्थपणे जगण्याचा आशावाद द्विगुणित करण्याचा प्रयत्न महा. अंनिसमधील महिला सहकार्यांच्या पुढाकाराने केला जात असतो. यावर्षी देखील त्यांचे राज्यभरात किमान 100 प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
संविधान बांधिलकी महोत्सव:-
26 नोव्हेंबर, संविधान स्वीकृती दिन ते 26 जानेवारी, भारतीय प्रजासत्ताक दिन या दोन महिन्यांच्या दरम्यान यावर्षी ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये 26 नोव्हेंबर, संविधान स्वीकृती दिन व 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनी विकेंद्रित स्वरुपात कार्यक्रम होतील, तर दरम्यानच्या काळात राज्यातील महसूल विभागनिहाय संविधानातील मूल्यआशय व संकल्पना स्पष्ट करून ‘भारतीय नागरिकत्व’ जबाबदारीच्या क्षमता विकास करणारा प्रबोधन संवाद घडविणार्या संकल्प परिषदा व कार्यशाळांचे आयोजन करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
आज आहे जरी दहशत अन् साशंकता
संविधानच देईल शांतता आणि अखंडता
विवेकाचा आवाज बुलंद करू या!
अविनाश पाटील
राज्य कार्याध्यक्ष
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती