– अरविंद पाखले
मी बांधकाम व्यावसायिक आहे. कुतुहलापोटी वास्तुशास्त्रावरील एक पुस्तक वाचले. आणि नकळत या शास्त्राकडे आकर्षित झालो. माझ्या घरात वास्तुशास्त्राप्रमाणे बदल केले. पण अनुभवांनी माझा भ्रमनिरास झाला. माझ्या घराची रचना पूर्ववत केली आणि वास्तुशास्त्र या अंधश्रद्धेबाबत लोकांचे प्रबोधन करू लागलो. हे कसे घडले?
प्रथम वास्तुशास्त्राची माहिती घेऊया. या शास्त्रात दिशांना महत्त्व आहे. पूर्व – इंद्राचा प्रभाव, पश्चिम – वरुणाचा प्रभाव, दक्षिण – यमाचा प्रभाव, उत्तर – कुबेराचा प्रभाव, ईशान्य – ईशान्याचा प्रभाव. ईश म्हणजे परमेश्वर, आग्नेय – आग्नेयाचा म्हणजे अग्नीचा प्रभाव, नैऋत्य – नैऋत्याचा प्रभाव, वायव्य – वायव्याचा प्रभाव.
दिशांबरोबरच तुमचे शास्त्र पंचमहाभूते म्हणजे 1.अग्नी, 2.पृथ्वी, 3.वायू, 4.जल, 5.आकाश यांचे महत्त्व आणि महात्म्य सांगते. आता आपण एक-एक दिशा, तिचे महत्त्व आणि त्या अनुषंगाने निर्माण होणार्या श्रद्धांचा (की अंधश्रद्धांचा) प्रभाव बघू या.
1. घराचे, कार्यालयाचे प्रवेशद्वार शक्यतो पूर्व-पश्चिम असावे.
2. स्वयंपाकघरात अग्नी नेहमी आग्नेय दिशेने प्रज्वलित होईल, या पद्धतीने किचन ओटा असावा.
3. किचन सिंक हे ईशान्येकडे असावे. तसेच ईशान्येकडे पाण्याचा माठ अथवा फिल्टर ठेवावा.
4. विहीर अथवा हौद (पाण्याची टाकी) ईशान्येला किंवा उत्तर-पूर्व असावी.
5. शौचालये उत्तरेकडे तोंड येईल, अशी असावीत.
6. अडगळीचे सामान, जड वस्तू, मोठी तिजोरी शक्यतो दक्षिणेकडच्या भागात असावी.
7. शयनगृह नैऋत्येस असावे.
8. मुलांच्या अभ्यासाची खोली, तसेच अभ्यासाला बसण्याची दिशा ईशान्येकडे किंवा उत्तरेस असावी.
9. घरातील पलंगाची जागा अशी असावी की, झोपताना कोणत्याही परिस्थितीत डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे असू नयेत.
10. घराचे प्रवेशद्वार नैऋत्येस कधीही नको. तसेच घरातून बाहेर पडताना आपले तोंड दक्षिणेकडे नको.
हे सर्व वाचल्यावर असे कळले की, याप्रमाणे घर अथवा कार्यालय नसल्यास तो वास्तुदोष मानला जातो. असे दोष असलेल्या वास्तूचे परिणाम वाचून तर हादरलोच. कारण ते परिणाम हे पूर्णत: एखाद्या व्यक्तीला कोलमडून टाकणारे आहेत. उदा. 1.घरात वारंवार आजारपण येणे. 2.व्यवसाय नीट न चालणे, 3.कर्ज होणे, 4.कोर्ट-कचेरी मागे लागणे, 5.घरात सतत भांडणे होणे. 6.मुलांची लग्ने न जमणे, 7.अपघात होणे, 8.अकाली मृत्यू येणे, 9.घरातल्या सदस्यांमध्ये वांझपणा, मतिमंदपणा येणे, 10.सुख-समृद्धी, शांती दूर जाणे, थोडक्यात वास्तुदोष म्हणजे सुख-समृद्धी, शांती, आरोग्य या सर्वांचा र्हास.
वरील सर्व वाचल्यावर मी माझ्या राहत्या घराची वास्तुतज्ज्ञांच्या मानकांप्रमाणे तपासणी करून बघितली आणि हादरलोच. बघतो तर काय, माझे पूर्ण घर, प्लॉटसकट वास्तुदोषपूर्ण निघाले. सर्वप्रथम रस्ता प्लॉटच्या दक्षिणेला, त्यानंतर कंपौंडचे गेट पश्चिमेच्या कोपर्याला, मुख्य प्रवेशद्वार, खालचा मजला आणि वरचा मजला दोन्हीकडे दक्षिणाभिमुख, खालच्या मजल्यावरील बैठकीची खोली स्लॅब हाईट बारा फूट घेतल्याने खाली व इतर खोल्या वरच्या लेव्हलला. किचन ओटे बरोबर आग्नेयेच्या विरुद्ध दिशेला. झोपायच्या खोल्या, बाथरूम्स विरुद्ध दिशेला. हे सर्व तपासल्यावर मग एकाएकी जाणावायला लागले की, आपल्या आयुष्यात जे काही प्रश्न निर्माण झालेत, ते सर्व या वास्तुदोषांमुळेच. बरं, असं आहे की, हे घर जेव्हा म्हणजे 1987-88 साली बांधले, तेव्हा वास्तुतज्ज्ञ हे नावसुद्धा कानावर कधी आलं नव्हतं. मग काय, एक-एक गोष्टी मनात फेर धरून नाचू लागल्या. व्यवसायातल्या अडचणी आणि नुकसान, पैसा वेळेवर आणि पुरेसा न मिळणे, वडिलांचे आजारपण आणि मृत्यू, घरातले वाद अशा सर्व नकारात्मक गोष्टी मनात भरून गेल्या आणि खात्री झाली की, हे सर्व वास्तुदोषांमुळेच. बायकोने अनेक प्रकारे समजावून बघितले की, हे सर्व तुमच्या मनाचे खेळ आहेत. आयुष्यात चढ-उतार चालूच राहतात. तरीपण मनाने मात्र घेतलेच होते की, घरात जेवढे शक्य आहे तेवढे बदल करायचेच. दोन वास्तुतज्ज्ञांना बोलावून सल्ला घेतला. त्याची फी दिली. त्यातल्या एकाने तर सांगितले की, हे बदल करा. तुम्हाला आठ दिवसांतच फरक जाणवेल. त्याप्रमाणे खालील बदल केले.
1. किचन ओटा आग्नेयेकडे केला. सिंक मात्र उत्तर-पूर्व ठेवले.
2. मुख्य दरवाजापुढे आरसा लावला.
3. बेडरूम नैऋत्येकडे शिफ्ट केली.
4. देव्हारा ईशान्येकडे लावला व पूजा करताना आपले तोंड उत्तर-पूर्व असेल, असे बघितले.
5. मुलींची अभ्यासाची खोली उत्तर-पूर्व केली.
6. पाण्याची टाकी ईशान्येला बसविली व तशी पाईपलाईन करून घेतली.
या सर्व बदलांबरोबरच काही कमी राहायला नको म्हणून घरात नवचंडीचा होम करून घेतला. एका ज्योतिषाकडे जाऊन पुष्कराज व पोवळे असे दोन खडे घेतले व अंगठीत अडकवले. या सर्व गोष्टी करण्यात खूप पैसा खर्च झाला, शारीरिक त्रास झाला आणि त्यानंतर काय बदल घडतात, याची प्रतीक्षा सुरू झाली. घरात केलेल्या बदलांमुळे एक तर वावर अतिशय अडचणीचा झाला होता. लवकर अंगवळणी पण पडत नव्हता. तरी पण जगणे, तर चालू ठेवायलाच हवे होते. मी रोज काय काय घडते, यावर बारीक लक्ष ठेवून होतो. व्यवसायात पण कोणाशीही चर्चा करताना माझे तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे राहील, याबाबत दक्ष राहत होतो. रोजच्या रोज हे सर्व बदल काय चमत्कार घडवून आणतात, याचे मूकपणे निरीक्षण करत होतो.
साधारण वर्षानंतर मात्र मला जाणवायला लागले की, हे बदल करून काहीही घडले नाही. गेली वीस वर्षे माझे आयुष्य जसे चालले होते, तसेच आतापण या वर्षांत गेले. कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक बदल घडला नाही. आर्थिक परिस्थिती काहीही बदलली नाही. आरोग्य आहे तसेच राहिले. प्रकृतीच्या थोड्याफार तक्रारी या चालतातच. मग प्रश्न पडला हे सर्व आपण का केले? का स्वत:स तोशीस लावून घेतली? बायको म्हणायला लागली की, जी पूर्वीची व्यवस्था होती तीच चांगली होती आणि मी त्यात अत्यंत सुखी आणि समाधानी होते. मग आम्हीच एकमेकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की, पाण्याच्या टाकीचा आणि समृद्धीचा काय संबंध? आग्नेय दिशेला ओटा असल्याने काय घडले? मुलीची अभ्यासाची दिशा बदलल्याने तिच्या एकाग्र चित्तात काही फरक पडला का? आपले जे पूर्वीचे प्रश्न होते ते सुटले का? आणि यातून विचारप्रक्रिया सुरू झाली आणि घर पूर्ववत करण्यात आणखी काही रक्कम खर्ची पडली.
आता मात्र आपण एकदम निर्बुद्धपणे वागलो, याची शरम वाटते. त्यानंतर घडणार्या काही घटनांनी तर विचाराची दिशाच बदलून टाकली. आता मात्र माझी वास्तू मला सर्वोत्तम वाटते. माझ्या या वास्तूचे दार जरी दक्षिणेला असले, तरी त्या दारातून बैठकीच्या खोलीत आणि एकूण संपूर्ण घरातच हवा, उजेड भरपूर आहे. खिडक्यांना छानसे पडदे लावले आहेत. फर्निचर आटोपशीर असल्याने घर सदैव मोठे आणि मोकळे भासते. घरी केव्हाही गेलं तरी एक प्रकारे निवांत आणि सुरक्षित वाटतं. संध्याकाळी बायको-मुलीची वाट पाहणं घराची ओढ लावतं. आईचा आसपास असणारा वावर आधाराचा वाटतो. खालच्या मजल्यावर भाऊ राहतो. तेथील हॉल आणि प्रवेशद्वार जरी वास्तुदोषांत गणले गेले, तरी हॉल त्याच्या उंचीमुळे अतिशय भव्य आणि प्रसन्न वाटतो. भावाची लहान मुले मस्ती, गोंगाट करत असतात. ते मनाला हवंहवंसं वाटतं. घराच्या दक्षिणेला कव्हर्ड टेरेस आहे. त्या टेरेसमध्ये छानसा झोपाळा आहे. ज्या वास्तुतज्ज्ञानेही टेरेस दोष म्हणून दाखविली तीच मला निवांतपणा देते. सकाळी चहा घेताना झोपाळ्यावर बसलं की, समोर मोठमोठ्या झाडांची हिरवाई आणि आवारातील वेली आणि फुलझाडे मन सुखावतात. तेथे अनेक पक्षी सकाळी चिवचिवाट करत असतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माझ्या वडिलांचा, जे आयुष्यात मंदिर-देवळे-देवपूजा या सर्वांपासून दूर राहिले आणि कधीही खोटे न बोलणे व कोणातही न फसवणे हीच देवपूजा मानली, त्यांचा आधारस्पर्श या वास्तूला सतत जाणवत असतो.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संपर्कात आल्यापासून माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली. डॉ. दाभोलकरांनी सांगितलेला विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन याचे आचरण मी जीवनात करू लागलो. अंनिसच्या कामात सक्रिय सहभाग घेऊ लागलो. नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी माझे अपहरण करून मला बेदम मारहाण केली. तरीही मी डगमगलो नाही. यावेळी डॉ. दाभोलकरांनी जी मदत केली ती मी विसरू शकत नाही. माझ्या मुलीचा मी सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिला. अंनिसमुळे मी विवेकी आणि आनंदी जीवन जगत आहे.
संपर्क : 9822015537