आपण बहुतेकजण मळलेल्या वाटेवरचा प्रवास पसंत करतो. कराड (जि. सातारा) येथील कल्पना चावला विज्ञान केंद्राचे सर्वेसर्वा संजय पुजारी याला अपवाद आहेत. विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यांच्या या कार्याबद्दल नुकतेच त्यांना राष्ट्रीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे मुलांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी देण्यात आला.
सरकारी धोरणानुसार महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये विज्ञानाचे अध्यापन केले जाते. पण संजय पुजारी यांनी कल्पना चावला केंद्रात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने विज्ञानाच्या अध्यापनाचा प्रयोग यशस्वीरित्या चालविला आहे. त्यांच्या या कार्याचा परिचय वाचकांना स्फूर्तिदायी ठरेल.
शिक्षक कसा झालो?
संजयचे मूळ गाव गडहिंग्लज (जि. कोल्हापूर). तेथील शाळेत शिकत असताना मुलांना प्रोजेक्ट्स बनवायला दिले जात. नाटकात भाग घ्यायला मिळे… आंतरभारती या साने गुरुजींच्या प्रेरणेने सुरू झालेल्या प्रकल्पात विविध ठिकाणी जाऊन अनुभव घ्यायला मिळत. राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात भाग घ्यायला मिळे. तेथे यदुनाथ थत्ते आणि इतर समाजवादी विचारवंतांची भाषणे ऐकायला मिळत. थोडक्यात, हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा परिपोेष करण्यास शाळेत प्रोत्साहन मिळे. कला, संगीत, नाट्य यांचा उपयोग पुढे संजयला विज्ञान आनंददायी करण्यासाठी झाला.
बारावी झाल्यावर संजयला एम.बी.बी.एस.ला प्रवेश मिळाला होता. तो सहा महिने वैद्यकीय शिक्षणासाठी गोव्यात राहिला. पण या मेडिकल क्षेत्रात त्याचेे मन रमले नाही. त्याला हे शिक्षण खूपच रूक्ष वाटले. एम.डी. झालेल्या एका परिचयाच्या डॉक्टराशी तो बोलला. ते म्हणाले, ‘हे आमचे काम आनंददायी नाही. तू शिक्षक हो. तुझ्यातील हरहुन्नरीपणाला त्या क्षेत्रात संधी मिळेल.’
संजयने वैद्यकीय शिक्षणाला रामराम ठोकला आणि सरळ बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. त्याला फिजिक्स आवडे. पण विज्ञानाच्या विविध शाखांचे ज्ञानही त्याला हवेसे वाटे. मग त्याने फिजिक्सच्या जोडीला रसायन व जीवशास्त्र असे विषय निवडले. शेवटच्या वर्षात फिजिक्सची पदवी घेतली. पुढे तो एम.एस्सी. झाला. बी.एड्. आणि एम.एड्.ही झाला आणि गडहिंग्लजला विज्ञानाचा शिक्षक म्हणून काम करू लागला. शिक्षणमंडळ, कराडचे रा. गो. प्रभुणे सर ‘श्यामची आई’ या साने गुरुजींच्या पुस्तकाचा परिचय महाराष्ट्रभर करत असताना गडहिंग्लजला आले. तेथे संजयचे वेगळेपण लक्षात घेऊन त्यांनी त्याला कराडला टिळक हायस्कूलमध्ये नोकरी देऊ केली. येथून पुढे संजयचा विज्ञान लोकप्रिय करण्याचा कार्यक्रम वेग घेऊ लागला.
टिळक हायस्कूलमध्ये क्रमिक अभ्यासक्रम शिकवत असताना विज्ञान अधिक आनंददायी कसं करता येईल, यावर तो विचार करू लागला. त्यातून तोे भौतिक विज्ञानातील विविध उपकरणांची मॉडेल्स बनवू लागला. विज्ञान प्रदर्शनात भाग घेऊ लागला. 2001 साली त्याच्या गटाने बनविलेल्या विज्ञान मॉडेल्सची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. मुलांना घेऊन तो दिल्लीला गेला. माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना भेटला. कलाम यांनी अवकाश विज्ञान मराठीतून लोकप्रिय करण्याचा सल्ला त्याला दिला. तो अग्निबाण, उपग्रह, विमानविद्या यांची माहिती संकलित करून शाळा-शाळांमधून भाषणे देऊ लागला. रविवारचा हा त्याचा उद्योग असे.
कल्पना चावला केंद्राची स्थापना
1 फेबु्रवारी 2003 ला कल्पना चावला या अंतराळ वीरांगनेचा मृत्यू झाला. कुतुहलापोटी संजयने तिचे चरित्र अभ्यासले. तिच्या शौर्याने प्रभावित होऊन तिच्या नावाने विज्ञान केंद्र सुरू करण्याचे ठरविले. संजय, पत्नी नेहा यांनी कल्पनाच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांची भेट घेतली. कल्पनाबद्दल या तरुणाला अपार आदरभाव आहे आणि तिच्या नावाने विज्ञानप्रसाराचे कार्य हा तरुण करू इच्छितो, याने प्रभावित होऊन कल्पनाच्या वडिलांनी संजयला विज्ञान केंद्राचे नाव ‘कल्पना चावला विज्ञान केंद्र’ असं ठेवण्यास मान्यता दिली आणि दर रविवारी कल्पना चावला विज्ञान केंद्राचे कृतीद्वारे विज्ञान मनोरंजक करण्याचे कार्य संजयने जोमाने सुरू केले.
कृतीद्वारे शिक्षण (Learning by doing)
वर्गात केवळ भाषणाद्वारे विज्ञानाचे अध्यापन म्हणजे माहिती दिली जाते. तिला कृतीची जोड हवी असे संजयचे मत. इतर शिक्षकांच्या टीकेला न जुमानता, संजयने दर रविवारी आपल्या अभिनव पद्धतीने विमान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे प्रयोग सुरू केले. शिक्षण मंडळाच्या कॉलेजचे प्राचार्य डिसोझा यांनी संजयला प्रोत्साहन दिले. कराड परिसरातील विविध शाळांमधून संजय विमानविद्येचा इतिहास मॉडेल्सद्वारा सांगू लागला. रविवारी वर्कशॉप भरवू लागला. सुरुवातीला मित्रांच्या सहकार्याने त्यांच्या जागेत वर्कर्शाप घेऊ लागला. दहा वर्षांपूर्वी या वर्कशॉपमध्ये फक्त 60 मुलांचा सहभाग असायचा. आता ती संख्या दोनशेच्या आसपास पोचली आहे.
नेहाची साथ
नेहा ही संजयची पत्नी. नोकरी मिळाल्यावर आपण बरे आणि आपली मुलं आणि पत्नी यांच्या सहवासात राहणं बरं, अशी मानसिकता बहुतेकांची असते. पण संजय वेगळ्या वाटेने चालला होता. ‘तुम्ही त्याला विरोध केला नाही’, असा प्रश्न मी नेहाला विचारला. त्यावर नेहा सांगू लागली.
“संजय हा हरहुन्नरी आहे. तो विविध क्षेत्रात वावरतो. त्याला फोटोग्राफीचा छंद आहे. असा जोडीदार निवडला, तर आपल्याला देखील आनंद देणार्या क्षेत्रात काम करायला संधी मिळेल, हे पटल्यामुळे मी त्याच्याशी विवाहबद्ध झाले. शिवाय तो नोकरी करत होता. त्यामुळे जमिनीवर पाय रोवून झेपावण्याचा विचार करायचा, हा व्यवहारी दृष्टिकोन योग्यच होता.” नेहाच्या साथीचा आदरपूर्वक उल्लेख करताना संजय म्हणाला, “तिला नोकरी मिळत होती. आजच्या हिशेबाने तिला 80 हजार रूपये पगार मिळाला असता. पण तिने केवळ माझ्या कार्याला गती यावी, यासाठी योगदान करण्याचे ठरविले आणि नोकरीची कल्पना डोक्यातून काढून टाकली व मला साथ देऊ लागली.”
स्वत:च्या जागेत
प्रतिवर्षी ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’त प्रवेश घेणार्या मुलांची संख्या वाढू लागली. संजयने निवासासाठी घेतलेल्या फ्लॅटच्या इमारतीतील तळमजल्यावरची खोली विज्ञान केंद्रासाठी घेतली होती. ती अपुरी पडू लागली. कोणत्याही प्रयोगासाठी धाडस लागतेच. मंगळवार पेठेतील 3000 चौरस फुटाची जागा संजयने विकत घ्यायची ठरविली. किंमत होती 15 लाख. बँक तळघरातील अशा फ्लॅटला कर्ज देईना. मग नेहाचे वडील पुढे झाले आणि त्यांनी संजयला ही जागा घेण्यास मदत केली.
मुलांमध्ये संशोधक वृत्ती जागवणारे विज्ञान केंद्र
केवळ विज्ञान दिनाच्यावेळी विज्ञानविषयक उपक्रम ठिकठिकाणी घेतले जातात. पण या केंद्रात रोजचा दिवसच विज्ञान दिन असतो. दर रविवारी दोन तास इ. 4 थी ते पदवीपर्यंतची मराठी व इंग्रजी माध्यमातील मुले एकत्र येतात आणि विज्ञान व तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीने शिकतात. या विज्ञान केंद्राच्या उपक्रमामध्ये पक्षिनिरीक्षण, आकाश निरीक्षण, वनस्पतींची ओळख, विज्ञान प्रतिकृती तयार करणे, खेळणी वापरून विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान सहली, शास्त्रज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान, पर्यावरण विषयक चित्रपट, नाटके, विज्ञानविषयक ग्रंथालय, जंगलभ्रमंती, गड-किल्ले भ्रमण, औद्योगिक क्षेत्रांना भेटी, आधुनिक शेती केंद्रांना भेटी इत्यादींचे आयोजन केले जाते. वरील उपक्रमांना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाते. संजय आणि नेहा यांना विज्ञानाबरोबर माणसांचंही वेड आहे. त्यांनी अनेक मित्र जोडले आहेत. आपल्या शैक्षणिक उपक्रमांसाठी ते या मित्रांची मदत घेतात. डॉ. सी. बी. साळुंखे, पक्षिमित्र डॉ. एस. एस. पाटील, डॉ. शंतनु कुलकर्णी आणि सौ. शैलजा कुलकर्णी, सुहास इनामदार, प्रा.आर.डी.कदम, सुधीर कुंभार या मित्रांची वरील उपक्रम राबविण्यासाठी अमूल्य मदत होते.
वर्षभरातील 52 रविवार आणि इतर सुट्टीचे दिवस यामध्ये हे उपक्रम होतात. दिवाळीच्या सुट्टीत मुक्कामी सहलीचे आयोजन केले जाते.

विज्ञान केंद्रातील मुले दर रविवारची आतुरतेने वाट पाहतात. इतर दिवशी विज्ञान केंद्र आणि फक्त रविवारी शाळा असावी, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते. इथे ठराविक अभ्यासक्रम नाही, कोणतीही परीक्षा नाही, त्यामुळे विद्यार्थी कोणतेही टेन्शन न घेता विज्ञान केंद्रात येतात. प्रत्येक रविवारी नाविन्य असते. स्लाईड शो, माहिती, मॉडेल बनविणे यामुळे विद्यार्थी रमतात. एखाद्या रविवारी येता आले नाही, तर मुलांना चुकल्यासारखे वाटते.
आजच्या काळात पालकांनी मुलांना तू अमूक एक कोर्स कर, ही साईड घे, असे सांगण्यापेक्षा मुलांनी आता स्वत: ठरवायचे आहे की, मला काय आवडते आणि त्यानुसारच त्यांनी शिक्षण घ्यायला हवे. कारण आवडीचे काम मिळाले, तर ते अधिक चांगले होते. नोकरी किंवा व्यवसाय आवडीशी संबंधित असेल, तर त्यातून उत्पन्नाबरोबरच समाधानही मिळते.
आणि आपली ही आवड ओळखण्यासाठी मदत करते ‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र.’ दार उघडायचा प्रयत्न केव्हा होतो, ते दिसते तेव्हा. पण जर दारच दिसले नाही तर…? अशी दारे दाखवायचे काम करते ‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र.’
विज्ञान शिकण्याची वेगळी पद्धत
कल्पना चावला केंद्रात शिकविण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना यासंदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.
थोडक्यात, या उपक्रमांमधून केवळ विमानांच्या प्रतिकृती करण्याचे कौशल्य मुले शिकत नाहीत तर त्यामागचे विज्ञानसुद्धा समजून घेतात. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता, ज्येष्ठ आकाश अभ्यासक हेमंत मोने, विज्ञानलेखक प्रा. मोहन आपटे अशा अनेक नामवंतांशी संवाद साधण्याची संधी कल्पना चावला विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कराडच्या मुलांना मिळाली आहे.
पुजारी सरांनी कल्पना चावला विज्ञान केंद्रातर्फे 2008 साली नाट्यरूपांतराच्या आणि सिनेमाच्या माध्यमांतूनही विज्ञान लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. 34 बालकलाकारांना घेऊन ‘धमाल विज्ञानाची’ हा बालचित्रपट केंद्राने तयार केला. गॅलिलिओ गॅलिली, सर आयझॅक न्यूटन आणि थॉमस अल्व्हा एडिसन हे तीन शास्त्रज्ञ मुलांना भेटतात आणि आपण लावलेल्या शोधांबद्दलचे प्रयोग त्यांना दाखवितात, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ ही कराडची नवी ओळख झाली आहे.
विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालयही आहे. विज्ञानासंबंधी दोन हजार पुस्तके आहेत. यात नासा, डिस्कव्हरी चॅनेल यांची अनेक पुस्तके डॉ. कल्पना चावलाच्या मोठ्या भगिनी सुनीता दीदी यांनी दिली आहेत. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, शास्त्रज्ञांची चरित्रे, विश्वकोश, लहान मुलांचे विज्ञानविषयक कोश उपलब्ध आहेत. रोज पुस्तकांची देवाणघेवाण केली जाते. वर्षभरात कोण किती पुस्तके वाचतो यावर वाचक स्पर्धा घेतली जाते आणि त्यांना त्यांच्या आवडीचे ग्रंथ भेट दिले जातात. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड वाढू लागली आहे व टी.व्ही. पाहण्याचे प्रमाणही लक्षात यावे इतके कमी झाले आहे, असा अनेक पालकांचा अनुभव आहे. विज्ञान केंद्रातील मुलांच्या वाढदिवसाला देखील विज्ञानविषयक पुस्तके भेट दिली जातात.
याचबरोबर सी.डी., डी.व्ही.डी.चा देखील मोठा संग्रह आहे. यामध्ये नासा, इस्त्रो, विज्ञान प्रसार केंद्र, नोयडा, दिल्ली, बालचित्रवाणी, डिस्कव्हरी चॅनल, अॅनिमल प्लॅनेट यांच्या निसर्ग, पर्यावरण, अवकाश, खगोलशास्त्र, मानवी शरीररचना, प्राणी, पक्षी, वनस्पती या विषयीच्या फिल्म्स उपलब्ध आहेत. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान विषयाचे विविध देशांचे चित्रपटदेखील आहेत. अधूनमधून डी.एल.पी.प्रोजेक्टरच्या सहाय्याने एखादी फिल्म मोठ्या पडद्यावर दाखवली जाते. नंतर त्यावर चर्चा केली जाते.
विविध प्रकारचे विज्ञानविषयक प्रयोगांचे साहित्यदेखील उपलब्ध आहे. ध्वनी, प्रकाश, उष्णता, यांत्रिकी, न्यूटनचे गतीविषयक नियम, एडिसनचा ग्रामोफोन, प्लाझ्मा स्थिती, गॅलिलिओचे लंबकाचे प्रयोग, विविध प्रकारचे कॅमेरे, आकाश निरीक्षणाच्या दुर्बिणी असे अनेक प्रकारचे प्रयोगाचे साहित्य आहे.
शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असल्याने प्रत्येक मुलाला प्रयोगाचे साहित्य हाताळायला मिळते असे नाही. शिक्षक दिग्दर्शक पद्धतीने विज्ञानाचे प्रयोग दाखवतात; पण विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रयोग हाताळायला दिला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने एकच प्रयोग कसा करता येईल, याचे मार्गदर्शन केले जाते.
प्रयोगाच्या साहित्याबरोबरच राईट बंधूंच्या विमानापासून विविध प्रकारच्या विमानांचा संग्रह, प्रतिकृतींचा संग्रह, रॉकेट, मिसाईल, उपग्रह, स्पेसशटल यांच्या प्रतिकृतीदेखील विज्ञान केंद्रात उपलब्ध आहेत.
अल्पावधीतच विज्ञान क्षेत्रात कराडचे ‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ लोकप्रिय झाले आहे. विद्यार्थी, पालक, नागरिक यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. इस्लामपूरच्या आदर्श विद्यामंदिरातही शाखा सुरू झाली आहे. लवकरच स्वत:ची जागा घेऊन संस्था विज्ञान प्रयोगशाळा, तारांगण, बोटॅनिकल गार्डन, उभे करण्याच्या प्रयत्नात आहे.
डॉ. कल्पना चावलाच्या विचाराने प्रेरित होऊन संस्थेचे काम सुरू आहे. ‘स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे. तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे.’
यासाठी विज्ञान केंद्राचे प्रेरणागीत प्रत्येकाला नेहमी प्रेरणा देत असते.
‘ज्ञानयोगी होऊन आम्ही, विज्ञानाचे पंख करू,
तारे सारे मोजून येऊ, सूर्यालाही थक्क करू,
अष्टग्रहांना जिंकून घेऊ, भव्य ही संकल्पना,
आदर्श आहे कल्पना, अन् प्रेरणा ती कल्पना.’
शोधक वृत्तीची जोपासना
‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’त मुलांचा कल पाहून त्यांना योग्य दिशा देण्याचे प्रयोग यशस्वीरित्या केले जातात. त्यांच्या आवडत्या क्षेत्रात शोधक वृत्ती प्रवाहित होते आणि ही मुले त्या क्षेत्रात भरारी घेतात. याबद्दलचे काही अनुभव नेहाने सांगितले.
अमोल देशमुख हा आठवीतील मुलगा कल्पना चावला केंद्रात येत होता. कल्पनाच्या कर्तृत्वाबद्दलचे व्याख्यान त्याने ऐकले आणि तो प्रभावित झाला. पुढची चार वर्षे त्यानं कल्पनाच्या जीवनाविषयी, तिच्या विमानविद्येबद्दल वेगवेगळ्या माध्यमांतून माहिती गोळा केली. त्याच्या घरच्या खोलीतील भिंती कल्पनाबद्दलची चित्रे, पोस्टर्स आणि विविध माहितीने भरून गेल्या होत्या. चार वर्षे बारावी पास होईपर्यंत एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यात तो गढून गेला होता. बारावीनंतर त्याने या विषयांची प्रवेश परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात तो पास झाला. आता तो अमेरिकेमध्ये एरॉनॉटिकल इंजिनिअर म्हणून काम करतो आहे.
अभिलाष सरोदे हा असाच दुसरा ध्येयवेडा मुलगा. कल्पना चावला केंद्रात येत होता. बारावीनंतर तो आय.आय.टी. व ‘इस्त्रो’ची प्रवेश परीक्षा दोन्हीतही पास झाला. आय. आय. टी. कडे न वळता ‘इस्त्रो’त काम कर, असा सल्ला त्याने स्वीकारला. आता तो बंगलोर येथे ‘इस्त्रो’मध्ये सॅटेलाईट इनचार्ज म्हणून कार्यरत आहे.
काही मुलांना शालेय रूटीन ज्ञानात रस नसतो. त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. त्यांना वाट करून दिली, तर ती मुले भरारी घेतात. हृतेश इनामदार हा मनोहर क्लॉथ स्टोअर्सच्या मालकांचा मुलगा. तो विज्ञान केंद्रात येत असे. वडिलांनी त्याला भविष्यात काय करायचे, याबद्दल पूर्ण मोकळीक दिली होती. त्याला प्रवास करण्याचा छंद होता, बारावी 45 टक्क्यांनी पास झाल्यावर तो आम्हाला भेटला. मला आर्टस्, कॉमर्स, सायन्स काहीच नको’, असे तो म्हणाला. मग ‘तू ट्रॅव्हल आणि टुरिझमचा कोर्स कर’, असा सल्ला आम्ही दिला. कारण त्याला प्रवास आवडे. त्याने पुण्यात तो कोर्स जॉईन केला. फायनल परीक्षेत तो महाराष्ट्रात पहिला आला. आता तो दुबईमध्ये एका मोठ्या ट्रॅव्हल कंपनीत मॅनेजर झालाय.
शोधक वृत्तीचा उपयोग आपल्या नेहमीच्या वास्तव जगात कसा करायचा, हे पण विज्ञान केंद्रात शिकविले जाते. इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय हे न समजता मुलं इंजिनिअर बनू पाहतात. आम्ही सायकल पूर्ण सुटी करून परत जोडण्याचे ट्रेनिंग मुलांना देतो. इंजिनिअरिंगमध्ये नेमके काय शिकता येते, याचे ज्ञान त्यामुळे मिळते. रिमोट कंट्रोल मधून निघालेल्या रेडिओ लहरी दूर अंतरावरील इलेक्ट्रॉनिक्स साधनात पोचतात. मग नेहमीची वीज वापराविना दूर पाठविता येईल काय, असा प्रश्न एका मुलानं विचारला. शुद्ध पाण्याची नासाडी करू नका, असं नुसतं सांगून उपयोगी नाही, तर पाणी शुद्धीकरणाची क्रिया कशी चालते, हे आम्ही शुद्धीकरण केंद्रात मुलांना नेऊन समजावून देतो. त्यासाठी करावी लागणारी यातायात पाहून मुलं पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, हे आपोआप शिकतात. कोठे नळ वाहत असेल, तर तिथे जाऊन तो नळ बंद करण्याची जागरुकता दाखवितात.
नेहा सांगत होती – ‘आमच्या केंद्रातील मुलं फटाके उडवत नाहीत. झाडाच्या पानाआड पक्षी झोपलेले असतात. त्यांना आवाजाचा त्रास कसा होतो, हे प्रत्यक्ष पक्ष्यांना घाबरून उडताना बघून कळते. अनुभव व शोध असा उपयोगी आणला जातो.’
मुलांच्या प्रश्नांना टाळले जात नाही. एका मुलीने विचारले – माणसांना देवाने निर्माण केले; मग देवाला कुणी निर्माण केले. संजयने त्या मुलीला केंद्रातील लाकडी पट्ट्या दिल्या. तिला कोणता देव आवडतो, हे विचारले. तिने गणपती आवडतो, असं सांगितलं. मग तू या पट्ट्यांचा गणपती बनव, असं सांगितल्यावर तिनं तसा गणपती तयार केला. मग संजयचा प्रश्न, ‘या गणपतीला कोणी बनविला?’ कन्यका म्हणाली, ‘मी बनवला.’ म्हणजे देवाला कोण निर्माण करते, तर आपण म्हणजे माणसाने.
असे हे शोधक बुद्धीचे प्रयोग ‘कल्पना चावला केंद्रा’त चालतात.
अधिक माहितीसाठी : संजय पुजारी (सचिव), ‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’, ओंकार अपार्टमेंट, चव्हाण हॉस्पिटलशेजारी, रुक्मिणीनगर रोड, मंगळवार पेठ, कराड, जि.सातारा. फोन : 02164-225204, 9226193260