Categories
चळवळ

मअंनिसचा दिल्ली दौरा यशस्वी

मार्च - २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 42 महिने पूर्ण झाले. त्यानंतर त्याच पद्धतीने कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचेही खून झाले. तपास प्रक्रियेतून जे निष्पन्न झाले आहे, ते आपणा सर्वांना माहीत आहे. मात्र तपास समाधानकारक नाही, ही खंत आहे. मअंनिस गेली 42 महिने अत्यंत चिकाटीने, सातत्यपूर्वक अहिंसक पद्धतीने निषेध व्यक्त करीत आहे. शाखेपासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर हा निषेध सातत्याने चालू आहे. राष्ट्रीय स्तरावर दिल्ली तेथे जाऊन मअंनिसने निषेधाचे कार्यक्रम घेतले आहेत.

मअंनिसने पुन्हा एकदा 13 ते 17 फेब्रुवारी 2017 या कालावधीत दिल्ली दौरा आयोजित केला होता. प्रामुख्याने खुनाचा तपास जलद व्हावा, मारेकर्‍यांना तत्काळ अटक व्हावी, त्यांचे फोटो सर्व प्रसिद्धिमाध्यमातून जनतेपर्यंत पोचवावेत या मागण्यांसाठी दिल्ली येथे ‘जंतरमंतर’ वर धरणे आंदोलन करणे, दिल्ली येथील समविचारी संस्था / संघटनांशी भेटून चर्चा करणे, दिल्ली येथे अंनिसचे काम सुरू करणे आणि आपल्या कार्याचा प्रसार करणे, यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संस्था येथे आपले प्रयोगासह कार्यक्रम सादर करणे, ही उद्दिष्टे घेऊन हा दौरा करण्यात आला.

दि. 13 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी मअंनिसचा हा चमू दिल्ली येथे पोचला. सकाळी 11 वाजता गांधी शांती प्रतिष्ठान येथे ‘चयन’ची बैठक झाली. ‘धनक’चे आसिफ आणि राणू, मअंनिसचे कार्यकर्ते यांच्यासह या बैठकीस 11 संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दु.2.00 वा. महाराष्ट्र अंनिस, चयन, IWPC यांनी पत्रकार परिषद घेतली. दिल्ली येथील धरणे, खुनाचा तपास, मअंनिसच्या मागण्या, ‘चयन’चे कार्य यासंदर्भातील प्रसिद्धिपत्रक सर्व उपस्थित पत्रकारांना देण्यात आले.

दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी दयानंद कांबळे, संचालक MIC, दिल्ली यांची त्यांच्या कार्यालयात अविनाश पाटील आणि माधव बावगे यांनी भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. दुपारी एक वाजता चयन, धनक व महाराष्ट्र अंनिस च्या वतीने गांधी शांती प्रतिष्ठानच्या जवळच्या रस्त्यावरून ‘निर्भय वॉक’चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामधून प्रेम, शांती, राष्ट्रीय एकात्मता, हिंसा के खिलाफ, मानवता की ओर याबाबतचा संदेश सडकनाट्याच्या माध्यमातून तेथील मुलींनी, तरुणांनी दिला. हे सादरीकरण अत्यंत प्रभावी होते. याच दिवशी दुपारी ‘साहस 2017’ चे आयोजन ‘चयन’च्या वतीने करण्यात आले होते. ज्यामध्ये Right to choose in marriage / Relationship, Essential systemic and legal changes यावर मान्यवरांनी आपली मते, अनुभव सांगितले. यात मअंनिसच्या वतीने माधव बावगे यांनी विचार मांडले. आपण करीत असलेल्या सत्यशोधकी, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर उपस्थित 10-12 आंतरजातीय विवाहितांचे स्वागत, त्यांची मनोगते घेण्यात आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही आंतरजातीय विवाहितांचे आई-वडीलही उपस्थित होते. त्यांचीही मनोगते झाली. त्यांच्या मुलांनी घेतलेला आंतरजातीय विवाहाचा निर्णय, त्यांची पालक म्हणून असणारी मानसिकता, नातेवाईक, समाज यांचा दृष्टिकोन अशा विविध मुद्द्यांवर खुलेपणाने त्यांनी अनुभव सांगितले. त्यानंतर व्हॅलेटाईन डे साजरा करण्यात आला. शेवटी सर्वांनी माणुसकीची शपथ घेऊन समारोप करण्यात आला. अविनाश पाटील, माधव बावगे, सविता शेटे, गजेंद्र सुरकार ‘साहस 2017’ मध्ये सहभागी होते.

दि. 15 फेब्रुवारी रोजी अविनाश पाटील, माधव बावगे, सविता शेटे यांनी दिवसभर विविध राजकीय पक्ष, संघटना यात CPI, AAP, AITUC, राष्ट्रीय जनता दल यांच्या कार्यालयास भेटी दिल्या, त्यांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका मांडली व धरणे आंदोलनात येण्याचे निमंत्रणही दिले.

लोकसभा ग्रंथालयात जाऊन लोकसभा टी.व्ही. चे मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित सिंग यांची भेट घेतली. त्यांच्याशी आपल्या संघटनेच्या कामाची सविस्तर चर्चा केली. त्यांनीही खूप उत्साहाने प्रश्न विचारले आणि संघटनेची भूमिकाही समजून घेतली. आमच्या वाहिनीवर तुम्ही कसा आणि काय कार्यक्रम घेऊ शकता, असे विचारून संघटनेच्या कामाला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रातील; पण सध्या लोकसभा टी. व्ही. मध्ये कार्यरत असणारे विनोद राठोड यांची यासाठी खूप मदत झाली. त्यांनी हे सर्व जुळवून आणले. त्यानुसार 17 फेब्रुवारीला सकाळी आपल्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचे ठरले.

दि. 16 फेब्रुवारी रोजी दु. 1 ते 6 ‘जंतरमंतर’वर धरणे आंदोलन केले. ज्यामध्ये समविचारी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी सहभाग घेतला. प्रामुख्याने राज्यसभेचे सदस्य खासदार डी. राजा यांनी धरणेस्थळी आवर्जून भेट दिली, वेळ दिला, आमच्याशी चर्चा केली. आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासाविषयी भूमिका मांडली आणि आम्ही हा मुद्दा राज्यसभेत मांडू, उचलून धरू, असे आपल्याला आश्वासन दिले. त्याचबरोबर प्रा. दिनेश वारशने (CPI), डॉ. अमिताभ बसू (CSIR), मा. राधेश्याम (एकता परिषद), ईश्वर नास्तिक, आर. एम. मोहला (शिक्षा का अधिकार), विजय सातोकर (आमची दिल्ली), सत्यप्रकाश भारत (भारत जोडो अभियान), अंकित(दिल्ली विद्यापीठ), मल्याश्री हाश्मी (जनथिएटर) यांनी भेट देऊन मनोगत मांडले व धरणे आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी इतर अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. अविनाश पाटील यांनी मअंनिसची भूमिका व मागणी मांडली. प्राचार्य सविता शेटे यांनी धरणे आंदोलनाची प्रस्तावना, सूत्रसंचालन केले व गाणी घेतली. मान्यवरांची मनोगते, घोषणा, गीते यासह हे धरणे आंदोलन संपन्न झाले. सुशीला मुंडे, माधव बावगे, गजेंद्र सुरकार, शहाजी भोसले, सत्यवान यांनी घोषणा, गाणी, आलेल्या कार्यकर्त्यांच्या नोंदी, त्यांच्यासह चर्चा, वार्ताहरांना प्रसिद्धिपत्रक देणे या सर्व बाबी सांभाळल्या. या धरणेस्थळी पूर्वतयारीसाठी मल्याश्री हाश्मी आणि त्यांचे सहकारी प्रताप नेगी यांनी मदत केली.

आंदोलनानंतर तेथेच समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली व अंनिसचे काम दिल्ली येथे सुरू करण्याबाबत अनेकांनी रुची दाखवली. त्यानुसार एक तदर्थ समिती तयार करण्यात आली व पुढील तीन महिन्यात करावयाच्या कामांची त्यांना माहिती देण्यात आली व त्या दिवसाची सांगता झाली.

दि. 13 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत कार्यकर्त्यांनी विविध शाळांमध्ये प्रयोगाचे सादरीकरण केले. सर्वोदय कन्या विद्यालय, आनंद विहार, दिल्ली, राजकीय सर्वोदय बाल विद्यालय कोंडली, दिल्ली, राजकीय सर्वोदय कन्या विद्यालय, किरणविहार, कडकडडूमा, बवाना, उत्तर प्रदेश बॉर्डर, दिल्ली येथे प्राचार्य मच्छिंद्र मुंडे यांनी प्रयोग सादर केले. सत्यवान शेंबडे यांनी त्यांना सहकार्य केले. दिल्ली विद्यापीठ येथे पदव्युत्तर आणि एस. एफ. आय. च्या विद्यार्थ्यांसमोर दोन आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एक असे तीन कार्यक्रम मच्छिंद्र मुंडे आणि सुशीला मुंडे यांनी सादर केले. तसेच शहीद भगतसिंग विद्यालय गौतम बुद्धनगर, सुरजपूर ग्रेट नोईडा (उ. प्र.) आणि पूर्वप्राथमिक विद्यालय ममुरा, नोईडा येथे शहाजी भोसले यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले. त्याचबरोबर गजेंद्र सुरकार यांनी भलस्वा, दिल्ली येथे कार्यक्रम सादर केला. डॉ. अशोक तिवारी, कॉ. प्रशांत, कॉ. सुरेश, प्राचार्य ताराचंद चव्हाण, असिफ खान, प्राचार्य मृदुला ताडीवाल, कॉ. सदरेआलम यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी कार्यक्रम झाले.

दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी लवकर चित्रीकरणासाठी जाण्याची गडबड होती. त्यानुसार आम्ही सर्वजण सकाळी 9 वाजता राजकीय सर्वोदय कन्या विद्यालय, किरण विहार येथे पोचलो. शाळेच्या प्राचार्यांची भेट घेतली, चर्चा केली. लोकसभा टी. व्ही. चा चमू आला. त्यांनी सर्व पूर्वतयारी केली आणि 11 ते 12.30 या दरम्यान चित्रीकरण झाले.

लोकसभा टी. व्ही.च्या ‘इंडिया स्पीक्स’ या कार्यक्रमासाठी ‘अंधविश्वास का मायाजाल’ या कार्यक्रमात अनुराग पुनेठा यांनी त्यांच्या खास शैलीत अविनाश पाटील, सुशीला मुंडे आणि सविता शेटे यांच्याशी प्रश्नोतरे केली. शहाजी भोसले, मच्छिंद्र मुंडे, माधव बावगे आणि गजेंद्र सुरकार यांनी चमत्काराचे/ प्रयोगाचे सादरीकरण केले. राजकीय सर्वोदय कन्या विद्यालयाच्या प्राचार्य, शिक्षिका आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी होत्या. या सर्वांनी हा कार्यक्रम खूप आवडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. हा कार्यक्रम खूप चांगला झाला. महाराष्ट्र अंनिसला एक खूप व्यापक असा मंच मिळाला, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र अंनिस व तिचे कार्य भारताच्या कानाकोपर्‍यात विशेष करून ग्रामीण भागात पोचले.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये ही आपल्या कामाला खूप मागणी आहे, हे दिसून आले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी सुरू केलेल्या कामास महाराष्ट्राबाहेरही भरपूर मागणी आहे. गरज आहे ती आपल्याला पूर्ण तयारीनिशी पुढे जाण्याची. येत्या काळात आपण सर्वजण मिळून हे करूयात.