नुकतीच दिल्ली वारी आम्ही करून आलो. पक्षीय आणि देशाच्या श्रेष्ठींना आपल्या मागण्यांचा जाब विचारण्यासाठी! त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रबोधन व संघर्षाची साथ संगत होतीच. यापुढे दिल्लीत नियमित जात राहणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला आवाज पोचविण्यासाठी. आता तर परराज्यातील कामाच्या विस्ताराची सुरुवात आपण देशाच्या राजधानीतून दिल्लीतूनच केली आहे. त्यासह महाराष्ट्रालगतच्या सहा राज्यांमध्ये आणि मागणीनुसार उत्तर भारतात व दक्षिण भारतातील राज्यांमधून देखील अंधश्रद्धा निर्मूलनाचे संघटीत कार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला फारच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्यकर्त्यांची उभारणी मागील तीन दशकात अत्यंत कष्टपूर्वक करता आलेली आहे. त्यानुसार इतर राज्यनिहाय कामाची पायाभरणी करायला किमान एका दशकाचा कालावधी लागणार असे मानले पाहिजे. यासोबत स्थानिक स्थिती, गरज, उपलब्ध सहकारी व संसाधने आणि कामाची व्यापकता व गती यावरही ते अवलंबून राहील; पण आपण त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. मागील तीन वर्षांत गोवा, कर्नाटकासह मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, केरळ, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणासह दिल्लीमधून अनेकदा कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकार्यांचे जाणे झालेले आहे व अजूनही होत आहे. इच्छुकांचे संपर्क झालेले आहेत व होत आहेत. त्यामुळे आपल्या संघटीत कार्याच्या अनुभवाच्या आधारे आपण राज्यनिहाय कामाची रचना व कार्यवाही सुरू करू शकतो. त्याचे तपशील ठरविणे सध्या सुरू आहे.
आजही आपण फिरा (फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन) समन्वय मंचाचे सदस्य म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विवेकवाद्यांशी जोडलेलो आहोत. मिश्र विवाह समर्थन व प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमात सक्रीय राज्यनिहाय संस्था-संघटनांचा समन्वय मंच असलेल्या ‘चयन’ला राष्ट्रीय स्तरावर कार्यान्वित करण्यात आपला पुढाकार आहे. त्याची राष्ट्रीय बैठक नुकतीच 13 फेबु्रवारी रोजी दिल्लीत संपन्न झाली. आयुष्याचा जोडीदार व नातेसंबंध निवडण्याचा अधिकार बजावण्यासाठी येणार्या अडथळ्यांना दूर करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी कायदा दुरुस्ती, मागणी यासह समाजातील दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये आताही 9 राज्यांतील समविचारी सहभागी आहेत.
विवेकवाद समाजात कृतिशील व गतिशील करण्यासाठी आवश्यक असणार्या विविध आघाडीवर काम होणे गरजेचे वाटते. तसेच महाराष्ट्र अंनिस म्हणून आपण मांडीत असलेल्या भारतीय कसावर आधारित विवेकवादी परंपरेची सर्वदूर भूमिका पोचावी, अशी देखील अपेक्षा आहे. समितीच्या रौप्य वर्ष पूर्ती निमित्ताने 7 ऑगस्ट 2015 रोजी आयोजित विवेकवाद्यांच्या राष्ट्रीय परिषदेत आपण ती मांडली होती आणि 17 राज्यांमधून झालेल्या समविचारींनी त्याविषयी आपुलकी व उत्सुकता व्यक्त केली होती. तसेच विजयवाडा येथे गोरांनी आयोजित केलेल्या पाचव्या जागतिक नास्तिकांच्या परिषदेतही उद्घाटनावेळी निमंत्रित प्रमुख पाहुणा म्हणून आपण ती मांडली होती आणि संपूर्ण चर्चेचा सूर त्याभोवती केंद्रित झाला होता. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की, स्थानिक ते वैश्विक ते स्थानिक कार्यरत असताना आपण मानीत असलेल्या वैचारिक वारश्याचे अवलोकन ताज्या संदर्भात करायला हवे. त्यामध्ये जसे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्ताने करायचा प्रयत्न राहील तसाच महात्मा गांधींच्या येऊ घातलेल्या 150 व्या जयंती निमित्ताने देखील करायला हवा आहे. 21, 22 फेब्रुवारीला सेवाग्राम येथील गांधी 150 विषयक राष्ट्रीय बैठकीत सहभागी होऊन आपले योगदान व दृष्टिकोनाबद्दल सांगितलेले आहे. त्यामुळे म्हणावेसे वाटते की, भारतीय कसावर आधारित विवेकवादाचा दृष्टिकोन घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संघटीत कार्याला मुंबई, दिल्लीसह देश-विदेशात पोचवायला कटिबद्ध होऊ या!
–अविनाश पाटील
संपर्क : 9422790610